॥ श्रीगणेशाय नमः ॥
हे कश्यपात्मज वामना । हे बटुरुपधारी नारायणा ।
तूं बलीच्या घेऊन दाना । कृतार्थ त्याला केलेंस ॥१॥
राज्य मृत्युलोकीचें । घेतलें त्वां जरी साचें ।
तरी दिलें पाताळाचें । राज्य बलीकारणें ॥२॥
आंवळा घेऊन नारळ दिला । तुम्ही त्या पुण्यवंत बलीला ।
आणि त्याच्या भक्तीस्तव झाला । द्वारपाळ द्वारीं तुम्ही ॥३॥
या मन्वंतरानंतर । बलीच आहे होणार ।
देवांचा राजराजेश्वर । देवा तुझ्या वरानें ॥४॥
एक घटकेंत अनंता । चहूं वेदांच्या संहिता ।
पठण केल्या बुद्धिमत्ता । केवढी तुझी अगाध तरी ! ॥५॥
अवघ्यां तुझ्या अवतारीं । हा सोंवळा अवतार श्रीहरी ।
कोणाचाही भूमीवरी । वध न तुम्ही केलांत ॥६॥
शत्रुमित्राच्या घरीं दिवा । ये अवतारीं लाविला बरवा ।
देव आणि दानवा । तूं वंद्य सारखाच ॥७॥
देव तेही आनंदविले । राक्षस तेही रक्षिलें ।
आपलें ईशत्व सांभाळिलें । याच अवतारीं देवा तूं ॥८॥
तुला माझा नमस्कार । असो वामना वारंवार ।
मस्तकीं ठेवा वरद कर । तुम्ही दासगणूच्या ॥९॥
टिळक बाळ गंगाधर । महाराष्ट्राचा कोहिनूर ।
दूरदृष्टिचा सागर । राजकारणीं प्रवीण जो ॥१०॥
निज स्वातंत्र्याच्यासाठीं । ज्यानें अनंत केल्या खटपटी ।
ज्याची धडाडी असे मोठी । काय वर्णन तिचें करुं ? ॥११॥
करारी भीष्मासमान । आर्य महीचें पाहून दैन्य ।
सतीचे झाला घेतां वाण । भीड न सत्यांत कोणाची ॥१२॥
वाक्चातुर्य जयाचें । बृहस्पतीच्या समान साचें ।
धाबें दणाणें इंग्रजांचें । पाहून ज्याच्या लेखाला ॥१३॥
कृति करुन मेळविली । ज्यानें लोकमान्य ही पदवी भली ।
ती न कोणी त्यांना दिली । ऐसा होता बहाद्दर ॥१४॥
तो एके वेळीं अकोल्याला । शिवजयंतीच्या उत्सवाला ।
लोकाग्रहें येतां झाला । व्याख्यान द्याया कारणें ॥१५॥
झाली तयारी उत्सवाची । त्या अकोल्यामध्यें साची ।
मोठमोठाल्या विद्वानांची । गेली गडबड उडून ॥१६॥
दामले, कोल्हटकर, खापर्डे । आणखी विद्वान् बडेबडे ।
जमते झाले रोकडे । तया अकोल्या ग्रामासी ॥१७॥
अध्यक्ष त्या उत्सवाचे । नेमिले होते टिळक साचे ।
नांव ऐकतां टिळकांचें । वर्हाड सारें आनंदलें ॥१८॥
शिवरायाची जयंती । याच्या आधींच या प्रांतीं ।
झाली पाहिजे होती । त्याचें कारण ऐसें पहा ॥१९॥
शिवाजीची जन्मदात्री । जी वीरमाता जिजा सती ।
ती वर्हाडीच आपुली होती । सिंधखेडीं जन्म जिचा ॥२०॥
त्या वीरगाजी शिवाजीला । जिनें पोटीं जन्म दिला ।
वर्हाडमहाराष्ट्र एक झाला । या सतीच्या कर्तृत्वें ॥२१॥
माता होती वर्हाडी । पिता महाराष्ट्री शहाजी गडी ।
अवघ्या दंपत्यांत ही जोडी । खचित होती अनुपम ॥२२॥
आधींच उत्सव शिवाजीचा । जो कलिजा महाराष्ट्राचा ।
आणखी वरी अध्यक्ष त्याचा । टिळक बाळ गंगाधर ॥२३॥
आधीं एक महिना तयारी । उत्सवाची चालली खरी ।
ज्याच्या त्याच्या अंतरीं । आनंद होत चालला ॥२४॥
अध्यक्ष उपाध्यक्श निवडले । स्वयंसेवक तयार झाले ।
तईं कईकांचें म्हणणें पडलें । ऐशा रीतिं विबुध हो ॥२५॥
या शिवजयंती उत्सवाला । आणा शेगांवचे महाराजाला ।
श्रीस्वामी समर्थ गजाननाला । म्हणजे दुधांत साखर पडेल कीं ॥२६॥
शिवाजीच्या राष्ट्रोद्धारा । आशीर्वाद होता खरा ।
समर्थांचा साजिरा । म्हणून तडीस गेला तो ॥२७॥
टिळकांचें राजकारण । हेंच जिजाई-हृदय-रत्न ।
त्याला पाहिजे आशीर्वचन । समर्थंचि विबुध हो ॥२८॥
ते कित्येकां पसंत पडलें । कित्येकांस नाहीं रुचलें ।
ज्यां न रुचले ते बोलले । उघड उघड येणें रीतिं ॥२९॥
तो शेगांवाचा अवलिया । कशास आणितां ये ठायां ।
तो कांहीं तरी करुनियां । विक्षोभ करील सभेचा ॥३०॥
फिरेल नागवा सभेंत । "गिण गिण गणांत" ऐसा म्हणत ।
मारील वाटे कदाचित् । तो लोकमान्याला ॥३१॥
कांहीं लोक बोलले । हें न म्हणणें चांगलें ।
गजाननाचीं पाउलें । लागलीं पाहिजेत सभेला ॥३२॥
त्याचें जें कां वेडेपण । तें आहे वेडयाकारण ।
जे कोणी विद्वान् सज्जन । त्यासी न वदती वेडयापरी ॥३३॥
खरेखुरे राष्ट्रोद्धारक । जरी टिळक असतील एक ।
तरी महाराज निःशंक । सभेसी येतील ये ठायां ॥३४॥
खर्याखोटयाची परीक्षा । साधूच हे करिती देखा ।
म्हणून सांगतों भिऊं नका । त्यांना आमंत्रण देण्यास ॥३५॥
ऐसी भवति न भवति झाली । मंडळी शेगांवास आली ।
आमंत्रण तें द्याया भली । सभेचें श्रीगजानन ॥३६॥
येतांच दादा खापडर्यासी । बोलते झाले पुण्यराशी ।
आम्ही येऊं सभेसी । तुमच्या शिवाजी उत्सवाच्या ॥३७॥
वेडयापरी न तेथें करुं । जागींच बसून मौन धरुं ।
सुधारकांचा कधीं न करुं । मनोभंग मनाचा ॥३८॥
करावयासी राष्ट्रोद्धार । योग्य बाळ गंगाधर ।
याच्या परी न होणार । राष्ट्रप्रेमी पुरुष पुढें ॥३९॥
स्नेही त्या टिळकाचा । अण्णा पटवर्धन नांवाचा ।
शिष्य नरसिंहसरस्वतीचा । आळंदीचा असे जो ॥४०॥
त्या दोघां पुरुषां पाहाण्यास । आम्ही येऊं अकोल्यास ।
तें ऐकतां खापर्डयास । अती आनंद जाहला ॥४१॥
पाहा पाहा कोल्हटकरा । वर्हाडप्रांताचा ज्ञानहिरा ।
यानें वृत्तान्त जाणिला सारा । जो का झाला अकोल्यांत ॥४२॥
यावरुन संतांचें । ज्ञान केवढें अगाध साचें ।
खर्या राष्ट्रपुरुषाचें । प्रेम यांना पाहा किती ! ॥४३॥
बोलावयाची आपणांस । जरुर पडली कांहीं न खास ।
तेच होऊन आपणांस । येतो म्हणून म्हणाले ॥४४॥
मुहूर्त या उत्सवाला । अती उत्तम लागला ।
चला वंदून समर्थाला । आपण जाऊं अकोल्यास ॥४५॥
खापर्डे कोल्हटकर । निघून गेले साचार ।
आला आठ दिवसांवर । सभेचा तो दिवस पाहा ॥४६॥
वर्हाड सारें आनंदलें । ज्यांना त्यांना वाटलें ।
कधीं टिळकांचीं पाउलें । पाहूं आम्ही अकोल्यांत ॥४७॥
शके अठराशें तिसासी । ती सभा होती वैशाखमासीं ।
वर्हाडप्रांतीं अकोल्यासी । उभारिलेल्या मंडपांत ॥४८॥
सण अक्षय्यतृतीयेचा । वर्हाडप्रांतीं महत्त्वाचा ।
परी समुदाय जनांचा । मिळता झाला प्रचंड ॥४९॥
तोच अखेरीचा दिन । त्या सभेचा होता जाण ।
लोक आले लांबलांबून । लोकमान्यांसी पहावया ॥५०॥
शिवाय श्रोते त्या दिवशीं । महाराज येणार सभेसी ।
ऐसी खबर लोकांसी । आधींच होती विबुध हो ॥५१॥
मंडप चिकार भरुन गेला । जो तो पाहूं लागला ।
म्हणती कां हो सभेला । अजूनी न आले महाराज ॥५२॥
परी ते सभा भरण्याआधीं । येऊन बसले मंडपामधीं ।
साधु आपल्या वाणीस कधीं । असत्यता न येऊं दे ॥५३॥
सभेमाजीं उच्च स्थानीं । बसले होते कैवल्यदानी ।
गादीस लोडा टेकूनी । जीवनमुक्त साधुवर ॥५४॥
सिंहासनाच्या अग्रभागा । टिळकास दिली होती जागा ।
त्यांच्या सन्निध बसले बघा । अण्णासाहेब पटवर्धन ॥५५॥
श्रीकृष्णाचा नंदन । गणेश ज्याचें नामाभिधान ।
खापर्डे कुलाचा कुलभूषण । एक्या बाजूस टिळकाच्या ॥५६॥
दामले कोल्हटकर त्या ठायीं । भावे व्यकंटराव देसाई ।
सभेचे पुढारी पाही । चमकत होते ते ठायां ॥५७॥
आणिक व्याख्याते विद्वानेतर । बसले होते सभोंवार ।
त्यांचें वर्णन कोठवर । करावें मी एक्या मुखें ॥५८॥
सभेलागीं आरंभ झाला । हेतु प्रथम निवेदिला ।
मग व्याख्यानसिंह उठला । टिळक बोलावयातें ॥५९॥
"दिवस आजचा धन्य धन्य । आहे पहा हो सज्जन ।
स्वातंत्र्यासाठीं ज्यानें प्राण । खर्चिले आपुले पूर्वकालीं ॥६०॥
त्या धनुर्धर योध्याची । वीर गाजी शिवाजीची ।
जन्म-जयंति आहे साची । म्हणून आपण मिळालों ॥६१॥
त्या रणगाजी शिवाजीला । रामदासें हातीं धरिला ।
म्हणून त्याचा बोलबाला । झाला भरतखंडामध्यें ॥६२॥
तेवींच आज येथें झालें । आशिर्वाद द्याया आले ।
श्रीगजानन साधु भले । आपुलीया सभेस ॥६३॥
म्हणून शिवाजीचे परी । सभा यशस्वी होवो खरी ।
अशाच सभेची जरुरी । आहे सांप्रत राष्ट्राला ॥६४॥
स्वातंत्र्यसूर्य मावळला । दास्यत्वाचा काळोख पडला ।
स्वातंत्र्य नाहीं जगीं ज्याला । तो समाज प्रेतवत् ॥६५॥
यासाठीं म्हणून । आहे करणें प्रयत्न ।
ज्या शिक्षणेंकरुन । राष्ट्रप्रेम वाढेल हो ॥६६॥
ऐसें शिक्षण पुढिल्यांप्रती । देणें भाग निश्चिती ।
तें शिक्षण हा भूपती । देईल कां हो अर्भकांला ?" ॥६७॥
ऐसें टिळक म्हणाले । महाराज आसनीं उठून बसले ।
गर्जून त्रिवार बोलले । नाहीं नाहीं ऐसें पहा ॥६८॥
आवेशाच्या भरांत । बोलले गंगाधरसुत ।
जें बोलणें किंचित् । टोचून होतें राजाला ॥६९॥
त्या भाषणाचा रोख भला । समर्थांनीं जाणिला ।
आणि हांसत हांसत शब्द केला । ऐशा रीतिं श्रोते हो ॥७०॥
अरे अशानेंच पडतात । काढण्या दोन्ही दंडांप्रत ।
ऐसें बोलून गणगणांत । भजन करुं लागले ॥७१॥
सभा निर्विघ्न पार पडली । टिळकांची वाहवा झाली ।
खरें झालें त्याच सालीं । समर्थांचें भाकित ॥७२॥
भूपतीनें टिळकाला । एकशें चोवीसाखालीं धरिला ।
दोर्या पडल्या दंडाला । आला प्रसंग शिक्षेचा ॥७३॥
राजसत्तेचिया पुढें । कोणाचेंही न चाले घोडें ।
वकील होते बडे बडे । ते झटूं लागले टिळकास्तव ॥७४॥
प्रेमी मंडळी टिळकांची । जी कां होती जिव्हाळ्याची ।
त्यांनीं पारमार्थिक उपायाची । केली योजना एक अशी ॥७५॥
दादासाहेब खापर्डे । हेही होते गृहस्थ बडे ।
ते उमरावतीहून मुंबईकडे । जाऊं लागले खटल्यास्तव ॥७६॥
अकोल्याच्या स्टेशनावरी । कोल्हटकरास मधुरोत्तरीं ।
बोलते झाले ऐशापरी । तें थोडकें सांगतों ॥७७॥
तुम्ही जावें शेगांवासी । समर्था विनंती करा ऐसी ।
सोडवा बाळ टिळकासी । प्रसंग मोठा दुर्धर ॥७८॥
मीच गेलों असतों तेथें । परी मी जातों मुंबईतें ।
तुम्ही जाऊन शेगांवातें । विनंती करा महाराजा ॥७९॥
लगेंच बसला गाडींत । कोल्हटकर टिळक-भक्त ।
येतां झाला शेगांवांत । स्वामी गजाननाकडे ॥८०॥
तईं महाराज मठातें । निज आसनीं निजून होते ।
तीन दिवस जहाले पुरते । परी न उठले यत्किंचित् ॥८१॥
कोल्हटकरहि तोंवरी । बसला मठाभीतरीं ।
जो का असेल बिगारी । तो न ऐसें वागे कदा ॥८२॥
कळकळ टिळकाविषयींची । कोल्हटकरा पूर्ण साची ।
कमाल त्यानें चिकाटीची । केली असे आपुल्या ॥८३॥
जाळावांचून नाहीं कड । मायेवांचून नाहीं रड ।
ऐसी आहे एक जाड । म्हण मराठी भाषेमध्यें ॥८४॥
चवथें दिवशीं समर्थ उठले । कोल्हटकरास बोलते झाले ।
तुम्ही अलोट प्रयत्न केले । परी न फळ येईल त्या ॥८५॥
अरे छत्रपती शिवाजीला । रामदासाचा वशिला ।
होता परी तो कैद झाला । बादशाही अमंलांत ॥८६॥
सज्जनास त्रास झाल्याविना । राज्यक्रांति होईना ।
कंसाचा तो मनीं आणा । इतिहास म्हणजे कळेल ॥८७॥
ही मी देतों भाकर । ती खाऊं घाला लवकर ।
टिळकांप्रती अंतर । यांत कांहीं करुं नका ॥८८॥
या भाकरीच्या बळावरी । तो मोठी करील कामगिरी ।
जातो जरी फार दूरी । परी न त्याला इलाज ॥८९॥
ऐसें ऐकतां उत्तर । साशंक झाले कोल्हटकर ।
समर्था करुन नमस्कार । भाकर करीं घेतली ॥९०॥
ती नेऊन मुंबईला । घातली टिळकास खायाला ।
वृत्तान्त तोही कथन केला । अथपासून इतिवरी ॥९१॥
तो ऐकून लोकांप्रत । टिळक बोलले हंसत हंसत ।
स्वामींचें तें अगाध सत्य । ज्ञान आहे खचित पहा ॥९२॥
यश तुमच्या प्रयत्नासी । नाहीं निश्चयेंसी ।
आपुली बाजू रक्षण्यासी । सरकार न्याया पाळीन ना ॥९३॥
जेव्हां स्वार्थाचा संबंध नसतो । तेव्हां न्याय आठवतो ।
हा जगाचा सिद्धान्त तो । होईल खोटा कोठूनी ? ॥९४॥
माझ्या हातें कामगिरी । मोठी होणार आहे खरी ।
ऐशी समर्थांची वैखरी । बोलली हें गूढ एक ॥९५॥
भूत भविष्य वर्तमान । जाणताती साधुजन ।
आपण मनुष्य सामान्य । पाहूं पुढें काय होतें ॥९६॥
प्रसाद म्हणून भाकरी । ती कुसकरुन भक्षिली खरी ।
दंत न मुखाभीतरीं । परी प्रसाद टाकवेना ॥९७॥
झाली शिक्षा टिळकास । नेलें ब्रह्मदेशीं मंडाल्यास ।
तेथें जन्मला गीतारहस्य । गीतेवरील ग्रंथ त्यांचा ॥९८॥
हीच मोठी कामगिरी । झाली त्यांच्या हस्तें खरी ।
मान जगत्-गुरुपरी । मिळता झाला टिळकांतें ॥९९॥
या गीताशास्त्रावर । टीका झाल्या अपार ।
त्या सांगूं तरी कोठवर ? । मति नाहीं दासातें ॥१००॥
बुध हो प्रत्येक आचार्यांनीं । कालमानातें पाहूनी ।
केली गीतेची मांडणी । जगदोद्धार करावया ॥१॥
कोणीं लाविली अद्वैतपर । कोणीं लाविली द्वैतपर ।
कोणीं लाविली कर्मपर । त्याच एका गीतेला ॥२॥
हीच मोठी कामगिरी । त्यांच्या हस्तें झाली खरी ।
या कामाची नये सरी । कोणत्याही कृत्यातें ॥३॥
येणेंच बाळ गंगाधर । जगतीं होतील अजरामर ।
कीर्ति त्यांची दूरवर । पसरवील ग्रंथ हा ॥४॥
स्वातंत्र्य जरी मिळविलें असतें । तरी न ऐशी कीर्ति टिकते ।
पहा करुन चित्तातें । पूर्णपणें विचार ॥५॥
त्यांत फारसें नाहीं सार । तो व्यवहार लौकिकीं ॥६॥
गीताशास्त्राचें तसें नाहीं । तें मोक्षपदा प्रती देई ।
आणि समाजाची बसवी पाही । विस्कळीत घडी हें ॥७॥
यावच्चंद्रदिवाकर । पुरुष बाळ गंगाधर ।
चिरंजीव निरंतर । राहील कीर्तिरुपानें ॥८॥
असो करवीर कोल्हापुरीचा । द्विज चित्पावन जातीचा ।
श्रीधर गोविंद नांवाचा । काळे उपनांव जयाचें ॥९॥
तो गरिबीच्या स्थितींत । गेला इंग्रजी शाळेंत ।
आंग्लविद्या शिकण्याप्रत । मँट्रिक परीक्षा पास झाला ॥११०॥
पुढें काँलेजांत गेला । परी इन्टर नापास झाला ।
म्हणून फिरत राहिला । वर्तमानपत्रें वाचीत ॥११॥
तों केसरी पत्रांत । वाचलें ओयामा टोगो चरित्र ।
तेणें त्याच्या मनांत । वृत्ति एक उठली अशी ॥१२॥
आपण जावें विलायतेला । यंत्रविद्या ही शिकण्याला ।
उगे भार भूमीला । होण्यामाजीं अर्थ काय ? ॥१३॥
टोगो यामा दोघेजण । प्रथमतः ज्ञान संपादून ।
अभ्युदयाकारण । जपान आणीते जहाले ॥१४॥
तैसें आपण करावें । मायभूमीस उद्धरावें ।
ऐसा विचार त्याच्या जीवें । घेतला परी इलाज ना ॥१५॥
द्रव्याची न लागे संगत । कोणीही ना करी मदत ।
घरची गरीबी अत्यंत । काय करितो बिचारा ॥१६॥
तो आपल्या मित्रासी । आला भेटण्या भंडार्यासी ।
जो मन्रो हायस्कुलासी । होता एक शिक्षक ॥१७॥
त्यासी विचार आपुला । श्रीधरानें कळविला ।
तोही त्याला पसंत पडला । परी पैशाची वाट काय ? ॥१८॥
मित्रा, एक पैशाविणें । कांहीं नाहीं जगीं होणें ।
दरिद्रयानें मनींच करणें । मनोराज्य बापा रे ॥१९॥
चाल जाऊं गांवाला । आपुल्या जन्मभूमीला ।
त्या करवीर कोल्हापुराला । इकडे उन्हाळा विशेष ॥१२०॥
दोघे बसले गाडींत । समर्थांची ऐकून कीर्त ।
उतरते झाले शेगांवांत । साधु कैसा तो पहावया ॥२१॥
पोस्टमास्तराच्या दारीं । सामान ठेविलें सत्वरीं ।
आतुरता मोठी अंतरीं । समर्थाला पहाण्याची ॥२२॥
दोघे आले मठांत । समर्थां केलें दंडवत ।
बसते झाले जोडून हात । स्वामीचिया सन्मुख ॥२३॥
मनोदय श्रीधराचा । समर्थांनीं जाणिला साचा ।
म्हणाले उगीच परदेशाचा । विचार वेडया करुं नको ॥२४॥
अवघेंच कांहीं आहे येथ । अर्थ ना भौतिक शास्त्रांत ।
सेवी अध्यात्मविद्येप्रत । म्हणजे कृतार्थ होशील तूं ॥२५॥
त्यायोगें विचारक्रांति । श्रीधराच्या झाली चित्तीं ।
कोल्हापूरची एक व्यक्ती । आठवली या समयास त्या ॥२६॥
ते स्वामी कुंभारगल्लीचे । होते कोल्हापुरीचे ।
बोलणें याच परीचें । होतें हमेशा भक्तांसी ॥२७॥
तैसेच हेही गुरुमूर्ती । भक्तांसवें भाषण करिती ।
याचा उलगडा चित्तीं । कांहींच माझ्या होईना ॥२८॥
ऐसें श्रीधर आणितां मनीं । महाराज वदले गर्जोनी ।
हिंदुस्थाना सोडूनी । उगाच कोठें जाऊं नको ॥२९॥
अगणित करावें पुण्य । तेव्हांच होतें येथें जनन ।
या भौतिक शास्त्राहून । योगशास्त्र समर्थ असें ॥१३०॥
तें योगशास्त्र येतें ज्याला । तो न मानी या भौतिकाला ।
योगशास्त्राहून भला । अध्यात्मविचार श्रेष्ठ असे ॥३१॥
तो जमल्यास करुन पाही । कोठें न आतां जाई येई ।
ऐसें समर्थ बोलतां पाही । श्रीधर चित्तीं आनंदला ॥३२॥
पश्चिमेचा मावळला । तोंच पूर्वेकडे आला ।
विचार-सूर्य त्याचा भला । श्रीधरा सुखी करण्यास ॥३३॥
एक संतावांचून । विचाराचें परिवर्तन ।
कोणी न करुं शके आन । सत्य एक त्यांनाच कळे ॥३४॥
महाराज म्हणाले या ठायीं । तुझा अभ्युदय होईल पाही ।
कांता वाट पहाते गेहीं । तुझी कोल्हापुराला ॥३५॥
जा आतां मित्रांसहित । आपुल्या कोल्हापुराप्रत ।
तेंच पुढें झालें सत्य । श्रीधर लौकिका चढले हो ॥३६॥
श्रीधर बी.ए.एम्.ए. झाले । प्रिन्सिपाँल त्या नेमिलें ।
शिवपुरीं काँलेजाशीं भले । सिंद्याचिया राज्यांत ॥३७॥
संत साक्षात् ईश्वर । चालते बोलते भूमीवर ।
त्यांच्या कृपेचा आधार । जया मिळे तोच मोठा ॥३८॥
पहा काळे श्रीधराला । दर्शनाचा योग आला ।
म्हणून वृत्तींत फरक पडला । खरें तेंच शोधावया ॥३९॥
हें पीक संतांचें । याच देशीं यावयाचें ।
वृक्ष नंदनवनीचें । अन्य ठायीं न येती हो ॥१४०॥
स्वस्ति श्रीदासगणूविरचित । हा गजाननविजय नामें ग्रंथ ।
दावो सर्वदा सत्पथ । परम भाविकांकारणें ॥१४१॥
शुभं भवतु ॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥
॥ इति पंचदशोऽध्यायः समाप्तः ॥
गजानन विजय
शेगाव (महाराष्ट्र) मधील थोर संत गजानन महाराज यांची पोथी. हा ग्रंथ महाराष्ट्रात खूप लोकप्रिय आहे. त्याचे भक्तिभावाने पारायण केल्यास इच्छीत मनोरथ पूर्ण होतात असा भक्तांचा विश्वास आहे.