व्रतांच्या कथा

चांगल्या भावनेतून व्रतांच्या कथेचे वाचन केल्यास व्रत केल्याचे पुण्य मिळते आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी श्रद्धाळू लोकांची समजूत आहे. ह्या कथा भक्तीची परिसीमा काय असते व त्यामुळे परमेश्वर आमच्यावर की कृपा करू शकतो हे शिकवतात. सोळा सोमवारची कथा, लक्ष्मी प्राप्तीची कथा आणि विविध व्रतांच्या आणि सणाच्या कथा ह्या नवीन संग्रहात उपलब्ध आहेत.


सोळा सोमवाराची कहाणी

आटपाट नगर होतं. त्या नगरांत एक महादेवाचं देऊळ होतं. एके दिवशीं काय झालं? शिवपार्वती फिरतां फिरतां त्या देवळांत आलीं. सारीपाट खेळूं लागलीं. “डाव कोणी जिंकला?” म्हणून पार्वतीनं गुरवाला विचारलं. त्यानं शंकराचं नांव सांगितलं. पार्वतीला राग आला. गुरवाला “तूं कोडी होशील” म्हणून शाप दिला. तशा त्याला असह्य वेदना होऊं लागल्या.

पुढें एके दिवशी काय झालं? देवळीं स्वर्गीच्या अप्सरा आल्या. त्यांनी गुरव कोडी पाहिला. त्याला कारण पुशिलं गुरवानं गिरिजेचा शाप सांगितला. त्या म्हणाल्या, “भिऊं नको. घाबरूं नको. तूं सोळा सोमवारांचं व्रत कर, म्हणजे तुझं कोड जाईल.”

गुरव म्हणाला “ तें व्रत कसं करावं?” अप्सरांनीं सांगितलं, “सारा दिवस उपास करावा. संध्याकाळीं आंघोळ करावी. शंकराची पूजा करावी. नंतर अर्धा शेर कणीक घेऊन त्यांत तूप गूळ घालावा व तें खावं. मीठ त्या दिवशीं खाऊं नये. त्याप्रमाणं सोळा सोमवार करावे. सतरावे सोमवारीं पांच शेर कणीक घ्यावी, त्यांत तूप गूळ घालून चूर्मा करावा, तो देवळीं न्यावा. भक्तीनं शंकराची षोडशोपचारे पूजा करावी. नंतर चुर्म्याचा नैवद्य दाखवावा. पुढं त्याचे तीन भाग करावे. एक भाग देवाला द्यावा. दुसरा भाग देवळीं ब्राह्मणांना वांटाचा किंवा गाईला चारावा, तिसरा भाग आपण घरीं घेऊन जाऊन सहकुटुंबी भोजन करावं.” असं सांगून त्या नाहीशा झाल्या.

पुढं गुरवानं तें व्रत केलं, गुरव चांगला झाला. पुढं कांहीं दिवशंनीं शंकरपार्वती पुन्हां त्या देउळीं आलीं. पार्वतीनं गुरवाला कुष्ठरहित पाहिलं. तिनं गुरवाला विचारलं, “तुझं कोड कशानं गेलं?” गुरवानं सांगितलं, “मीं सोळा सोमवारांचं व्रत केलं, त्यानं माझं कोड गेलं” पारवतीला आश्चर्य वाटलं. तिनं आपला रागावून गेलेला मुलगा कार्तिकस्वामी परत यावा म्हणून हें व्रत केलं. समाप्तीनंतर कार्तिकस्वामी लागलीच येऊन भेटला. दोघांना आनंद झाला.

त्यानं आईला विचारलं “आई, आई, मी तर तुझ्यावर रागावून गेलों होतों आणि मला पुन्हां तुझ्या भेटीची इच्छा झाली, याचं कारण काय?” पार्वतीनं त्याला सोळा सोमवारच्या व्रताचा महिमा सांगितला. पुढें कार्तिकस्वामीनं तें व्रत केलं. त्याचा एक ब्राह्मण मित्र फार दिवस देशांतराला गेला होता त्याची व ह्याची सहज रस्त्यांत भेट झाली.पुढें कार्तिकस्वामींनं हे व्रत त्या ब्राह्मणाला सांगितलं. त्यानं लग्नाचा हेतु मनांत धरला. मनोभावें सोळा सोमवाराचं व्रत केलं. समाप्तीनंतर तो प्रवासाला निघाला. फिरतां फिरतां एका नगरांत आला.

तिथं काय चमत्कार झाला? तिथल्या राजाच्या मुलीचं लग्न होतं. लग्नाला अनेक देशांचे राजपुत्र आले होते. मंडप चांगले सुशोभित केले आहेत. लग्नाची वेळ झाली आहे. पुढं राजानं हत्तिणीच्या सोंडेंत माळ दिली. माळ ज्याच्या गळ्यांत हत्तीण घालील, त्याला आपली मुलगी द्यायची असा राजाचा पन होता. तिथं आपला हा ब्राह्मण ती मौज पहायला गेला होता. पुढं कर्मधर्मसंयोगानं ती माळ हत्तिणीनं ह्याच ब्राह्मणाच्या गळ्यांत घातली, तशी राजानं आपली मुलगी त्याला दिली. दोघांचं लग्न लावलं व नवरानवरींची बोळावण केली.

पुढं काय झालं? राजाची मुलगी मोठी झाली. तशीं दोघं नवराबायको एका दिवशीं खोलींत बसलीं आहेत; तसं बायकोनं नवर्‍याला विचारलं, “कोणत्या पुण्यानं मी आपणांस प्राप्त झालें?” त्यानं तिला सोळा सोमवारांच्या व्रताचा महिमा सांगितला. त्या व्रताची प्रचीती पाहण्याकरितां पुत्रप्राप्तीचा हेतु मनांत धरला व तें व्रत ती करूं लागली. तसा तिला सुंदर मुलगा झाला. तो मोठा झाल्यावर त्यानं आईला विचारलं कीं,“मी कोणत्या पुण्यानं तुला प्राप्त झालीं?” तिनं त्याला व्रताचा महिमा सांगितला. त्यानं राज्यप्राप्तीची इच्छा मनांत धरली. तो व्रत करूं लागला व देशपर्यटनाला निघाला.

इकडे काय चमत्कार झाला? फिरंता फिरंता तो एका नगरांत गेला. त्या राजाला मुलगा नव्हता, एक मुलगी मात्र होती. तेव्हां कोणीतरी एकादा सुंदर व गुणावान असा नवरामुलगा पाहून त्याला आपली मुलगी द्यावी, व राज्यही त्यालाच द्यावं, असा त्यानं विचार केला. अनायासं त्या पुत्राची गांठ पडली. राजानं त्याला पाहिलं. तों राजचिन्हं त्याच्या दृष्टीस पडली. राजानं त्याला आपल्या घरी आणलं. कन्यादान केलं व त्याला आपल्या राज्यावर बसवलं.

इतकं होत आहे तों ब्राह्मणाचा सतरावा सोमवार आला. ब्राह्मणपुत्र देऊळीं गेला. घरीं बायकोला निरोप पाठविला की, पांच शेर कणकीचा चुर्मा पाठवून दे. राणीनं आपला थोरपणा मनांत आणला. चुर्म्याला लोक हंसतील, म्हणून एका तबकांत पांचशें रुपये भरून ते पाठवून दिले. चुर्मा वेळेवर आला नाहीं, व्रतभंग झाला म्हणून देवाला राग आला. त्यानं राजाला दृष्टांत दिला. तो काय दिला?

राणीला घरांत ठेवशील तर राज्याला मुकशील. दरिद्रानं पिडशील. असा शाप दिला. पुढं दुसरे दिवशीं ही गोष्ट राजानं प्रधानाला सांगितली. तो म्हणाला. “महाराज, राज्य हें तिच्या बापाचं. आपण असं करू लागलों तर लोक दोष देतील, याकरितां असं करणं अयोग्य आहे.” राजा म्हणाला, ‘ईश्वराचा दृष्टान्त अमान्य करणं हेंहीं अयोग्य आहे.” मग उभयतांनीं विचार केला. तिला नगरांतून हांकून लावलं. पुढं ती दीन झाली. रस्त्यानं जाऊं लागली. जातां जातां एका नगरांत गेली. तिथं एका म्हातारीच्या घरीं उतरली. तिनं तिला ठेवून घेतलं, खाऊंपिऊं घातलं.

पुढं काय झालं? एके दिवशीं म्हातारींनं तिला चिवटं विकायला पाठवलं. दैवाची गति विचित्र आहे! बाजारांत ती चालली. मोठा वारा आला, सर्व चिवटं उडून गेलीं. तिनं घरीं येऊन म्हातारीला सांगितलं. तिनं तिला घरांतून हांकलून लावलं. तिथून निघाली तों एका तेल्याच्या घरीं गेली, तिथे तेलाच्या घागरी भरल्या होत्या, त्यांजवर तिची नजर गेली. तसं त्यातलं सगळं तेल नाहीसं झालं. म्हणून तेल्यानं तिला घालवून दिलं. पुढं तिथून निघाली. वाटेनं जाऊं लागली.

जातां जातां एक नदी लागली. त्या दिवशी नदीला पाणी पुष्कळ होतं. पण तिची दृष्टी त्याजवर गेल्याबरोबर सर्व पाणी आटून गेलं. पुढं जातां जातां एक सुंदर तळं लागलं. त्याजवर तिची दृष्टी गेली, तसे पाण्यांत किडे पडले. पाणी नासून गेलं. रोजच्यासारखे तळ्यावर गुराखी आले. नासकं पाणी पाहून मागं परतले. गुरंढोरं तान्हेलीं राहिली.

पुढं काय झालं? तिथं एक गोसावी आला. त्यानं तिला पाहिलं. कोण कुठची म्हणून सगळी हकीकत विचारली. तिनं सगळी हकीकत सांगितली. गोसाव्यानं तिला धर्मकन्या मानलं व आपले घरीं घेऊन आला. तिथं राहून ती कामधंदा करूं लागली. तशी जिकडे तिकडे तिची दृष्टी जाऊं लागली. ज्यांत तिची दृष्टी जाई त्यांत किडे पडावे, कांहीं जिनसा आपोआप नाहींशा व्हाव्या, असा चमत्कार होऊं लागला.

मग गोसाव्यानं विचार केला. अंतर्द्दष्टि लावली. तिच्या पदरीं व्रत मोडल्याचं पाप आहे असं त्यानं जाणलं. तें नाहीसं केल्याशिवाय तिची दृष्टी चांगलीं होणार नाहीं असं ठरवलं. मग त्यानं शंकराची प्रार्थना केली. देव प्रसन्न झाले. गोसाव्यानं राणीबद्दल प्रार्थना केली. शंकरानं तिला सोळा सोमवाराचं व्रत करायला सांगितलं व आपण अंतर्धान पावले. पुढं गोसाव्यानं तिच्याकडून सोळा सोमवाराचं व्रत करविलं, तसा परमेश्वराचा कोप नाहींसा झाला.

तिच्या नवर्‍याला तिच्या भेटीची इच्छा उद्भवली, दूत चोहीकडे शोधाला पाठवले. शोधतां शोधतां तिथं आले. गोसाव्याच्या मठींत राणीला पाहिलं. तसंच जाऊन त्यांनी सांगितलं. त्याला मोठा आनंद झाला. राजा प्रधानासुद्धा गोसाव्याकडे आला. गोसाव्याला साष्टांग नमस्कार केला. वस्त्रप्रावर्णं देऊन संतोषित केलं. गोसावी म्हणाला, “राजा राजा, ही माझी धर्मकन्या. मी इतके दिवस तिला माहेरी ठेवूनीं घेतलं होतं, ती तुझी स्त्री आपले घरीं घेऊन जा व चांगल्या रीतीनं पाणिग्रहण करून सुखानं नांद.”राजानं होय म्हटलं. गोसाव्याला जोड्यानं नमस्कार केला व राणीला घेवून आपल्या नगरीं आला. पुढं मोठा उत्सव केला. दानदक्षिणा देऊन ब्राह्मण संतुष्ट केले. राजाराणींची भेट झाली. आनंदानं रामराज्य करूं लागली.

तसे तुम्ही शंकराला प्रसन्न करून रामराज्य करा. ही साठां उत्तरांची कहाणी पांचा उत्तरीं, देवाब्राह्मणांचे द्वारीं, गाईचे गोठींत, पिंपळाचे पारीं सुफळ संपूर्ण.