व्रतांच्या कथा

चांगल्या भावनेतून व्रतांच्या कथेचे वाचन केल्यास व्रत केल्याचे पुण्य मिळते आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी श्रद्धाळू लोकांची समजूत आहे. ह्या कथा भक्तीची परिसीमा काय असते व त्यामुळे परमेश्वर आमच्यावर की कृपा करू शकतो हे शिकवतात. सोळा सोमवारची कथा, लक्ष्मी प्राप्तीची कथा आणि विविध व्रतांच्या आणि सणाच्या कथा ह्या नवीन संग्रहात उपलब्ध आहेत.


शुक्रवाराची जिवतीची कहाणी

ऐका शुक्रवारा, तुमची कहाणी.

आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्या राजाला मुलगा नव्हता. तेव्हां राणीने काय केलं? एका सुईणीला बोलावून आणलं. “ अग अग सुईणी, मला नाळवारीसुद्धां एक मुलगा गुपचुप आणून दे. मी तुला पुष्कळ द्रव्य देईन.” सुईणीनं गोष्ट कबूल केली. ती त्या तपासावर राहिली.

गांवांत एक गरीब ब्राह्मणाची बाई गर्भार राहिली. तेव्हां ही सुईण तिच्या घरीं गेली, तिला सांगूं लागली कीं, “बाई बाई, तूं गरीब आहेस, तुझं बाळंतपणाचं पोट दुखूं लागेल तेव्हां मला कळव, मी तुझं बाळंतपण फुकट करीन.”

तिनं होय म्हणून सांगितलं. नंतर ती सुईण राणीकडे आली, “बाईसाहेब बाईसाहेब आपल्या नगरांत एक अमुक अमुक गरीब ब्राह्मणाची बाई गरोदर आहे. तिला नुकताच दुसरा महिना लागला आहे. लक्षणं सर्व मुलाचींच दिसताहेत. तेव्हां आपल्या घरापासून तों तिथपर्यंत कोणास कांही कळणार नाहीं असं एक गुप्त भुयार तयार करावं.

आपल्यास कांहीं दिवस गेल्याची अफवा उठवावी. “मी तुम्हांस नाळवारीचा मुलगा आणून देईन.” असं ऐकल्यावर राणीला मोठा आनंद झाला, आणि जसजसे दिवस होत गेले, त्याप्रमाणं डोहाळ्याचं ढोंग केलं. पोट मोठं दिसण्याकरितां त्याच्यावर लुगड्यांच्या घड्या बांधल्या भुयार तयार केलं. नऊ मास भरतांच बाळंतपणाची तयारी केली.

इकडे ब्राह्मण बाईचं पोट दुखूं लागलं. सुईणीला बोलावूं आलं त्याबरोबर “तुम्ही पुढं व्हा, मी येतें,” म्हणून सांगितलं. धांवत धांवत राणीकडे आली, पोट दुखण्याचं ढोंग करूं सांगितलं. नंतर ब्राह्मणाच्या घरीं आली. “बाई बाई, तुझी आहे पहिली खेप. डोळे बांधलेस तर भिणार नाहींस, नाहीं बांधलेस तर भय वाटेल.” असं सांगून तिचे डोळे बांधले. ती बाळंतीण झाली, मुलगा झाला.

सुईणीनं एका दासीकडून भुयाराच्या वाटेनं मुलगा राणीकडे पाठविला व तिनं वरवंटा घेऊन त्याला एक कुंचा बांधला, आणि तिच्यापुढें ठेविला. मग बाईचे डोळे सोडले. तुला वरवंटाच झाला असं सांगूं लागली. तिनं नशिबाला बोट लावलं. मनामध्यें दुःखी झालीं. सुईण निघून राजवाड्यांत गेली.

राणीसाहेब बाळंतीण झाल्याची बातमी पसरली. मुलाचं कोडकौतुक होऊं लागलं. इकडे ब्राह्मणबाईनं नेम धरला. श्रावणामासीं दर शुक्रवारीं जिवतीची पूजा करावी, आणि नमस्कार करून म्हणावं कीं, ‘जय जिवतीआई माते! जिथं माझं बाळ असेल, तिथं खुशाल असो.” असं म्हणून तिनं तांदूळ उडवावे, ते ह्या मुलाच्या डोक्यावर पडावे. हिरवं लुगडं नेसणं, हिरव्या बांगड्या लेणं वर्ज्य, कारलीच्या मांडवाखालून जाणं वर्ज्य केलं. तांदुळाचं धुणं ओलांडणं बंद केलं. याप्रमाणं ती नेहमीं वागूं लागली.

इकडे राजपुत्र मोठा झाला. एके दिवशीं बाहेर फिरायला निघाला. त्या दिवशीं ही न्हाऊन आपल्या अंगणांत राळे राखीत बसली होती. तेव्हां याची नजर तिजवर गेली. हा मोहित झाला व रात्रीं तिची भेट घ्यायची म्हणून निश्चय केला. रात्रीं तिच्या घरीं आला. दारांत गाय-वासरूं बांधली होतीं. चालतां चालतां राजाचा पाय वासरांच्या शेपटीवर पडला. वांसराला वाचा फुटली. तें आपल्या आईला म्हणालं, “कोण्या पाप्यानं माझ्या शेपटीवर पाय दिला?” तेव्हां ती म्हणाली, “जो आपल्या आईकडे जावयास भीत नाहीं, तो तुझ्या शेपटीवर पाय देण्यास भिईल काय?” हें ऐकून राजा मागं परतला आणि घरीं येऊन आपल्या आईपासून काशीस जाण्याची परवानगी घेतली.

काशीस जाऊं लागला. जातां जातां एका ब्राह्मणाच्या इथें उतरला. त्या ब्राह्मणाला पुष्कळ मुलं होत होतीं. पण तीं पांचवी-सहावीच्या दिवशीं जात असत. राजा आला त्या दिवशीं चमत्कार झाला. पांचवीचा दिवस होता. राजा दारांत निजला होता. सटवी रात्री आली आणि म्हणूं लागली, ‘ कोण ग मेलं वाटेंत पसरलं आहे ?” जियती उत्तर करिते, “ अग अग, माझं ते नवसाचं बाळ निजलं आहे. मी कांहीं त्याला ओलांडूं देणार नाहीं.” मुलगा आज जाणार म्हणून त्या मुलाचीं आईबाप चिंता करीत बसलीं होती. त्यांनीं हा संवाद ऐकला.

इतक्यात उत्तर रात्र झाल्यावर सटवी जिवती आपापल्या रस्त्यांनीं निघून गेल्या. उजाडाल्यावर ब्राह्मणानं येऊन राजाचे पाय धरले. “तुमच्यामुळें आमचा मुलगा जगला, आजचा दिवस मुक्काम करा.” अशी विनंती केली राजानं ती मान्य केली. त्याही रात्रीं याचप्रमाणं प्रकार झाला दुसरे दिवशी राजा चालता झाला.

इकडे ह्याचा मुलगा वाढता झाला. पुढं काशींत गेल्यावर यात्रा केली. गयावर्जनाची वेळ आली. पिंड देतेवेळीं ते घ्यायला दोन हात वर आले. असं होण्याचं कारण त्यानं ब्राह्मणांना विचारलं. ते म्हणाले, घरीं जा. सार्‍या गांवांतल्या बायकापुरुषांस जेवायला बोलाव. म्हणजे याचें कारण समजेल.”

मनाला मोठी चुटपुट लागली. घरीं आला. मोठ्या थाटानं मामदं केलं.त्या दिवशी शुक्रवार होता. गांवांत ताकीद दिली. “घरीं कोणीं चूल पेटवूं नये. सगळ्यांनीं जेवायला यावं,” ब्राह्मणीला मोठं संकट पडलं राजाला निरोप धाडला. “मला जिवतीचं व्रत आहे. माझे नेम पुष्कळ आहेत, ते पाळाल तर जेवायला येईन.” राजानं कबूल केलं. जिथं तांदुळाचं धूण होतं तें काढून तिथं सारवून त्यावरून ती आली. हिरव्या बांगड्या भरल्या नाहींत. कारल्याच्या मांडवांखालून गेलीं नाहीं. दर वेळेस “जिथं माझं बाळ असेल तिथं खुशाल असॊ,” असं म्हणे.

पुढं पानं वाढलीं. मोठा थाट जमला. राजानं तूप वाढायला घेतलं. वाढतां वाढतां ही ज्या पंक्तीत बसली होती तिथं आला. तूप वाढूं लागला. ईश्वरी चमत्कार झाला. बाईला प्रेम सुटून पान्हा फुटला. तिच्या स्तनांतून दुधाच्या धारा फुटल्या त्या ह्याच्या तोंडांत उडाल्या. तो हातची तपेली ठेवून रुसून निजला. कांहीं केल्या उठेना. तेव्हां त्याची आई गेली. त्याची समजूत करूं लागली. तो म्हणाल, “असं होण्याचं कारण काय?” तिनं सांगितलं कीं, “ ती तुझी खरी आई, मी तुझी मानलेली आई.” असं सांगून सर्व हकीकत सांगितली.

नंतर भोजनाचा समारंभ झाला. पुढं त्यानं आपल्या आईबापास राजवाड्यानजीक मोठा वाडा बांधून देऊन त्यांच्यासुद्धां आपण राज्य करूं लागला. तर जशी जिवती तिला प्रसन्न झाली, तशी तुम्हां आम्हां होवो.

ही साठां उत्तरांची कहाणी पांचां उत्तरीं सुफळ संपूर्ण.