व्रतांच्या कथा

चांगल्या भावनेतून व्रतांच्या कथेचे वाचन केल्यास व्रत केल्याचे पुण्य मिळते आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी श्रद्धाळू लोकांची समजूत आहे. ह्या कथा भक्तीची परिसीमा काय असते व त्यामुळे परमेश्वर आमच्यावर की कृपा करू शकतो हे शिकवतात. सोळा सोमवारची कथा, लक्ष्मी प्राप्तीची कथा आणि विविध व्रतांच्या आणि सणाच्या कथा ह्या नवीन संग्रहात उपलब्ध आहेत.


आदित्यराणूबाईची कहाणी

ऐका आदित्यराणूबाई तुमची कहाणी.

आटपाट नगर होतं. त्या नगरांत एक ब्राह्मण होता. तो नित्य समिधा, फुलं, दूर्वा, आणायला रानांत जात असे. तिथं नागकन्या देवकन्या वसा वसत होत्या. ब्राह्मणानं विचारलं,”काय ग बायांनों, कसला वसा वसतां? तो मला सांगा.” ” तुला रे वसा कशाला हवा? उतशील, मातशील, घेतला वसा टाकून देशील.” ब्राह्मण म्हणाला, “उतत नाहीं, मातत नाहीं, घेतला वसा टाकीत नाहीं.” तेव्हां त्या म्हणाल्या, “श्रावणमास येईल, तेव्हां पहिल्या आदितवारीं मौन्यानं (मुकाट्यानं) उठावं, सचीळ (वस्त्रासहित) स्नान करावं, अग्रोदक पाणी आणावं. विड्याच्या पानावर रक्तचंदनाची आदित्यराणूबाई काढावी. सहा रेघांचं मंडळ करावं, सहा सुतांचा तातू करावा. त्याला सहा गांठी द्याव्या. पानफूल वहावं, पूजा करावी. पानाचा विडा, फुलांचा झेला, दशांगांचा धूप, गुळाखोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा, सहा मास चाळावी, सहा मास पाळावी, माघी रथसप्तमीं संपूर्ण करावं. संपूर्णाला काय करावं? गुळाच्या पोळ्या, बोटव्यांची खीर, लोणकडं तूप, मेहूण जेवूं सांगावं. असेल तर चिरचोळी द्यावी, नसेल तर जोडगळसरी द्यावी, ती नसेल तर दोन पैसे दक्षणा द्यावी आणि आपल्या वशाचं उद्यापन करावं.” असा वसा ब्राह्मणानं केला. त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला.

भाग्यलक्ष्मी आली. तेव्हां राजाच्या राणीनें ब्राह्मणाला बोलावूं धाडलं, ब्राह्मण जाते वेळेस भिऊं लागला. कांपूं लागला. तेव्हां राजाच्या राणीनं सांगितलं, ” भिऊं नका, कांपू नका, तुमच्या मुली आमचे येथें द्या” “आमच्या मुली गरीबाच्या, तुमच्या घरीं कशा द्याव्या? दासी कराल, बटकी कराल.” राणी म्हणाली, ” दासी करीत नाहीं, बटकी करीत नाहीं. राजाची राणी करूं, प्रधानाची राणी करूं.”

मार्गेश्वराचा महिना आला. ब्राह्मणानं लगीन करून मुली दिल्या, एक राजाचे घरीं दिली. दुसरी प्रधानाचे घरीं दिली. गेल्या पावलीं मुलींचा समाचार घेतला नाहीं. बारा वर्षांनीं समाचारास ब्राह्मण निघाला. राजाच्या घरी गेला. लेंकीनं बसायला पाट दिला, पाय धुवायला पाणी दिलं. “बाब बाबा, गूळ खा पाणी प्या.” गूळ खात नाहीं, पाणी पीत नाहीं. माझी कहाणी करायची आहे ती तूं ऐक.” तुझी कहाणी ऐकायला मला वेळ नाहीं. राजा पारधीला जाणार आहे. त्याला जेवायला उशीर होईल. तोच त्याचे मनांत राग आला. तेथून निघाला प्रधानाच्या घरीं गेला. तिनं पाहिलं, आपला बाप आला. म्हणून बसायला पाट दिला; पाय धुवायला पाणी दिलं. “बाबा, बाबा, गूळ खा, पाणी प्या.” ” गूळ खात नाहीं पाणी पित नाहीं, माझी कहाणी करायची आहे, ती तूं अगोदर ऐक. ” तुझी कहाणी नको ऐकूं तर कोणाची ऐकूं?” घरांत गेली, उतरडींची सहा मोत्यें आणलीं. तीन आपण घेतलीं. तीन बापाच्या हातांत दिलीं. त्याने मनोभावें कहाणी सांगितली लेकीनं चित्तभावें ती ऐकली. नंतर जेवून खाऊन बाप आपल्या घरीं आला. बायकोनं विचारलं, ” मुलींचा समाचार कसा आहे?” जिनं कहाणी ऐकलीं नाहीं, ती दरिद्रानं पीडली. दुःखानं व्यापली. राजा मुलखावर निघून गेला. जिनं कहाणी ऐकली होती, ती भाग्यनं नांदत आहे.”

इकडे दरिद्री जी झाली होती, तिनं आपल्या लेकाला सांगितले. “मावशी घनघोर नांदत आहे, तिकडे जाऊन कांहीं दिलं तर घेऊन ये.” पहिल्या आदितवारीं पहिला मुलगा उठला, तळ्याच्या पाळीं जाऊन उभा राहिला.” अग अग दासींनों, तुम्ही दासी कोणाच्या?” ” आम्ही दासी प्रधानाच्या. प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा, तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे.” “कसा आला आहे? तळ्याच्या पाळीला उभा राहिला आहे.” ‘परसदारनं घेऊन या.’ परसदारानं घेऊन आल्या. न्हाऊं माखूं घातलं, पीतांबर नेसायला दिला, जेवू खाऊं घातलं. कोहोळा पोखरला, होनमोहोरा भरल्या. “वाटेस आपला जाऊं लागला. तों सूर्यनारायण माळ्याच्या रूपानं आला. हातींचा कोहोळा काढून नेला. घरीं गेला. आईनं विचारलं, ” काय रे बाबा, मावशीनं काय दिलं?” दैवें दिलं, कर्मानं नेलं. कर्माचं फळ पुढं उभं राहिलं. मावशीनं दिलं होतं. पण सर्व गेलं.

पुढं दुसर्‍या आदितवारीं दुसरा मुलगा गेला. तळ्याच्या पाळीं जाऊन उभा राहिला. “अग अग दासींनो, तुम्ही दासी कोणाच्या?” “आम्ही दासी प्रधानाच्या.” प्रधानाच्या राणीला निरोप सांगा. त्यांनी सांगितला. मग प्रधानाच्या राणीनं त्याला घरीं नेऊन न्हाऊं माखूं घातलं पीतांबर नेसायला दिला, जेवूं खाऊं घातलं. काठी पोखरून होनामोहोरांनीं भरून दिली. ” बाबा, ठेवूं नको. विसरूं नको. जतन करून घरीं घेऊन जा, ” म्हणून सांगितलं. वाटेंत सूर्यनारायण गुराख्याच्या रूपानं आला, हातची काठी काढून घेतली. घरीं गेला, झालेली गोष्ट राणीला सांगितली. “दैवें दिलं, तें सर्व कर्मानं नेलं.”

पुढं तिसरे आदितवारीं तिसरा मुलगा गेला, तळ्याच्या पाळीं उभा राहिला. त्यालाही पहिल्यासरखं प्रधानाचे घरीं नेऊन न्हाऊं माखूं घातलं, पीतांबर नेसायला दिला, जेवूं खाऊं घातलं, नारळ पोखरून होनमोहोरांनीं भरून दिला. ” ठेवू नको, विसरूं नको.” म्हणून सांगितलं, घरीं जाताना विहिरींत उतरला. तों नार्ळ गडबडून विहिरींत पडला. घरीं गेला. आईनं विचारलं. ” काय रे बाबा, मावशीनं काय दिलं?” आई ग, मावशीनं दिलं, पण दैवानं तें सर्व बुडालं.”

चवच्या आदितवारी चवथा मुलगा गेला. तळ्याच्या पाळीं उभा राहिला. त्यालाही प्रधानाच्या राणीनं घरीं नेऊन न्हाऊं माखूं घातलं, पीतांबर नेसायला दिला. जेवूं खाऊं घातलं. त्याला दह्याची शिदोरी होनामोहोरा घालून बरोबर दिली. सूर्यनारायण घारीच्या रूपानं आला. हातची शिदोरी घेऊन गेला. घरीं गेला. आईनं विचारलं, “काय रे बाबा, मावशीनं काय दिलं?” “आई मावसशीनं दिलं, पण दैवानं तें सर्व नेलं.”

पांचव्या आदितवारीं आपण उठली, तळ्याच्या पाळीं उभी राहिली. दासींनीं तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला. बहिणीनं तिलाही परसदारानं घरीं नेलं. न्हाऊं घात्लं. माखूं घातलं, पाटाच बेसायला दिला. प्रधानाची राणी आदितवाराची कहाणीकरूं लागली. ” काय वसा करतेस तो मला सांग.” बहीण म्हणाली, “अग अग चांडाळणी, पापिणी, बापाची कहाणी ऐकली नाहींस, म्हणून तुला दरिद्र आलं.” राजाच्या राणीनं विचारलं, “याला बहिणीच्या घरीं राहिली. श्रावणास आला. सांगितल्याप्रमाणं सूर्यनारायणाची पूजा केली. इकडे राजाला भाग्य आलं. राजानं बोलावूं धाडलं. “मावशी मावशी, तुला छत्रं आलीं, चामरं आलीं, पाईक आले, परवर आले.” “मला रे पापिणीला छत्रं कोठली? चामरं कोठलीं? पाईक कोठले? परवर कोठे?” बाहेर जाऊन दाराशीं बघतात, तो राजा बोलावूं आला आहे. राजा आला तशी घरीं जायला निघाली. एकमेकींना बहिणीबहिणींनीं अहेर केले. वाटेनं जाऊं लागलीं.

पहिल्या मजलेस स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं, तों कहाणीची आठवण झाली. ” करा रे हाकारा, पिटा रे डांगोरा. नगरांत कोणी उपाशी आहे का? याचा शोध करा.” “तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ? माझं पोट भरलं पाहिजे.” असं म्हणून तो राणीकडे आला. तशीं सहा मोत्यें राणीनं घेऊन तीन त्याला दिलीं. तीन आपल्या हातांत ठेवलीं. मनोभावें कहाणी सांगितली, चित्त भावें त्यानं ऐकली. त्याची लांकडाची मोळी होती, ती सोन्याची झाली. तो म्हणाला, “बाई बाई! कहाणी ऐकल्याचं एवढं फळं, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा आहे तो मला सांगा.” ” तुला रे वसा कशाला हवा? उतशील, मातशील, घेतला वसा टाकून देशील,” उतत नाहीं, मातत नाहीं, घेतला वसा टाकीत नाहीं.” तेव्हां वसा सांगितला.

पुढं दुसर्‍या मजलेस गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढला, मुलांना वाढलं. आपलं पान वाढून घेतलं, तेव्हां कहाणीची आठवण झाली. ” करा रे हांकारा, पिटा रे डांगोरा. नगरांत कोणी उपाशी आहे का? याच शोध करा.” “उपाशी नाहीं, कांहीं नाहीं” माळ्याचा मळा पिकत नाहीं, विहिरीला पाणी लागत नाहीं, असा एक माळी चिंतेनं बसला आहे त्याला हाक मारली. ‘आमच्या बाईची कहाणी ऐक.” तो आला. राणीनं सहा मोत्यें घेऊन तीन आपण घेतलीं, तीन माळ्याला दिलीं. राणीनं कहाणी मनोभावें सांगितली. चित्तभावें माळ्यानं ऐकली. माळ्याचा मळा पिकूं लागला. विहिरीला पाणी आलं. तो म्हणाला, ” बाई बाई! कहाणी ऐकल्यावर एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा असेल तो मला सांगा.” मग राणीनं त्याला वसा सांगितला.

पुढं तिसर्‍या मजलेस गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढलं. मुलांना वाढलं. आपलं पान वाढून घेतलं, तेव्हा कहाणीची आठवण झाली. ” करा रे हांकारा, पिटा रे डांगोरा. नगरांत कोणी उपाशी आहे का? याचा शोध करा.” “उपाशी नाहीं, कांहिं नाहीं.” एक म्हातारी, तिचा एक मुलगा वनांत गेला होता, एक डोहांत बुडाला होता, एक सर्पानं खाल्ला होता, त्यामुळं चिंताक्रांत बसली होती. तिला म्हणाले, “आमच्या बाईची कहाणी ऐकू.” ती म्हणाली, ” कहाणी ऐकून मी काय करूं? मी मुलांसाठी रडतें आहें. बरं येतें” मग ती राणीकडे आली. राणीनं पहिल्याप्रमाणं तिला कहाणी सांगितली. तिनं चित्तभावें ऐकली. तिचा मुलगा वनांत गेला होता तो आला. डोहांत बुडाला होता तो आला. सर्पानं खाल्ला होता तो आला. ती म्हणाली,” बाई बाई! कहाणी ऐकल्याचं हें फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा तो मला सांगा.” मग राणीनं तिलाही वसा सांगितला.

पुढं चौथ्या मजलेस गेलीं. स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं. आपलं पान वाढून घेतलं, तेव्हां कहाणीची आठवण झाली. “करा रे हांकारा, पिटा रे डांगोरा. नगरांत कोणी उपाशी आहे का? याचा शोध करा.” “उपाशी नाहीं, कांहीं नाहीं.” काणा डोळा, मांसाचा गोळा, हात नाहीं, पाय नाहीं, असा एक मनुष्य रस्त्यामध्यें होता. त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी ओतलं पालथा होता तो उताणा केला. सहा मोत्यें होतीं. तीन मोत्यें त्याच्या बेंबीवर ठेवलीं, तीन मोत्यें आपण घेतलीं, राणीनं मनोभावे कहाणी सांगितली; ती त्यानं ऐकली. त्याला हातपाय आले. देह दिव्य झाला. तो म्हणाला, “कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा तो मला सांगा. मग राणीनं त्याला वसा सांगितला.

पांचव्या मुक्कामाला घरीं आलीं. स्वयंपाक केला. सूर्यनारायण जेवायला आले. साती दरवाजे उघडले. लोहघंगाळं पाणी तापवलं. पड्रस पक्कान्नं जेवायला केलीं. सूर्यनारायण भोजनाला बसले, त्यांना पहिल्या घांसाला केंस लागला. ते म्हणाले, “अग अग, कोणा पापिणीचा केंस आहे?” राजाच्या राणीला बारा वर्षं दरिद्र आलं होतं. तिनं आदितवारीं वळचणीखालीं बसून केस विंचरलें. “काळं चवाळं, डोईचा केंस; वळचणीची काडी, डाव्या खांद्यावरून वेशीबाहेर टाकून दे.” राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला, तसा कोणाला होऊं नये.

ब्राह्मणाला, मोळीविक्याला, राजाच्या राणीला, माळ्याला, म्हातारीला, कोणा डोळा मांसाचा गोळा, इतक्यांना जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला, तसा तुम्हां आम्हां होवों. ही साठां उत्तराची कहाणी, पांचां उत्तरीं सुफळ संपूर्ण.