व्रतांच्या कथा

चांगल्या भावनेतून व्रतांच्या कथेचे वाचन केल्यास व्रत केल्याचे पुण्य मिळते आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी श्रद्धाळू लोकांची समजूत आहे. ह्या कथा भक्तीची परिसीमा काय असते व त्यामुळे परमेश्वर आमच्यावर की कृपा करू शकतो हे शिकवतात. सोळा सोमवारची कथा, लक्ष्मी प्राप्तीची कथा आणि विविध व्रतांच्या आणि सणाच्या कथा ह्या नवीन संग्रहात उपलब्ध आहेत.


वर्णसठीची कहाणी

आटपाट नगर होतं. तिथं एक गरीब ब्राह्मण होता. त्याला सात मुली होत्या. मुली मोठ्या झाल्या, तसं त्यांना एके दिवशीं त्या ब्राह्मणानं विचारलं, “मुली मुली, तुम्ही कोणाच्या नशिबाच्या?” त्याच्या साही मुलींनीं उत्तर केलं, “बाबा बाबा, आम्ही तुमच्या नशिबाच्या.” सातवी मुलगी होती, ती म्हणाली, ” मी माझ्या नशिबाची” हें ऐकल्यावर तिच्या बापाला मोठा राग आला. मग ब्राह्मणानं काय केलं? साही मुलींना चांगली चांगली श्रीमंत ठिकाणं पाहून दिली व थाटामाटानं त्यांची लग्नें केलीं.

सातव्या मुलीचं लग्न एका भिकारड्याशीं लावून दिलं. त्याच्या अंगावर व्याधि उठली होती. हातपाय झडून चालले होते. आज मरेल किंवा उद्यां मरेल ह्याचा भरंवसा नव्हता. आईनं लेकीची ओटी वालांनी भरली, मुलीची बोळवण केली, व तिच्या नशिबाची पारख पाहूं लागलीं.

पुढे थोड्याच दिवसांनीं तो तिचा नवरा मेला. तसं त्याला स्मशानांत नेलं. पाठीमागून तीही गेली. सर्व लोक त्याला दहन करू लागले. तिनं त्यांना प्रतिबंध केला. ती म्हणाली, “आता तुम्ही जा, जसं माझ्या नशिबीं असेल तसं होईल.” असं सांगितलं. सर्वांनीं तिला पुष्कळ समजाऊन सांगितलं. आतां इथं बसून काय होणार?” पण तिनं कांहीं ऐकलं नाहीं. तेव्हां लोक आपापल्या घरीं गेले.

पुढं काय झालं? तिनं आपल्या नवर्‍याच्या प्रेताला मांडीवर घेतलं, तसा बापानं तिला टोला दिला कीं, “तुझं नशीब कसं आहे?” तिनं परमेश्वराचा धांवा केला कीं, “देवा, मला आईबापानं सांडिया, मी उपजतच का रांडिया?” असं म्हणून नवर्‍याच्या तोंडांत एक एक वालाचा का दाणा घालीत रडत बसली. मग काय चमत्कार झाला? मध्यरात्र झाली.

शिवपार्वती विमानांत बसून त्याच वाटेनं जाऊं लागलीं. तसं पार्वती शंकराला म्हणाली, ” कोणी एक बाई रडते आहे असं ऐकूं येतं. तर आपण जाऊन पाहूं या.” शंकरानं विमान खालीं उतरविलं. दोघांनीं तिला रडतांना पाहिलं. रडण्याचं कारण विचारलं. तिनं झालेली सर्व हकीकत सांगितली. पार्वतीला तिची दया आली. तिनं सांगितलं, “तुझ्या मावशीला वर्णसठीचा वसा आहे. तिकडे जाऊन त्या व्रताचं पुण्य घेऊन ये, तें तुझ्या नवर्‍याला अर्पण कर, म्हणजे तुझा नवरा जिवंत होईल.” असं सांगून शंकरपार्वती निघून गेलीं.

तिनं नवर्‍याला तिथंच ठेवलं. मावशीकडे गेली. वर्णसठीचा पुण्य घेतलं. इकडे आली, नवर्‍याला दिलं, तसा नवरा जिवंत झाला, रोगराई गेली. कांती सुंदर झाली. बायकोला विचारूं लागला, “माझ्या हातापायांच्या कळा गेल्या. देह सुंदर झाला हें असं कशानं झालं?” तिनं सर्व हकीकत सांगितली. मग दोघं नवराबायको मावशीच्या घरीं गेली, तिला वर्णसठीचा वसा विचारला.

ती म्हणाली, “श्रावण शुद्ध षष्ठीच्या दिवशी, एका पानावर तांदूळ घ्यावे, दुसरे पानावर वरणे (वाल) घ्यावे, त्याजवर दक्षिणा ठेवावी, व ‘शंकर नहाटी, गौरी भराडी, हें माझ्या वर्णसठीचं वाण’ असं म्हणून उदक सोडावं. तें ब्राह्मणास द्यावं. असं दरवर्षी करावं. म्हणजे सर्व संकटं नाहींशीं होतात. इच्छित मनोरथ प्राप्त होतात. संतत संपत लाभते.” याचप्रमाणं तिनं केलं. सुखी झाली. माहेरीं गेली. बापाला भेटली. त्याला म्हणाली “बाबा बाबा, तुम्ही टाकलं, पण देवानं दिलं.” पुढं सर्वांणा आनंद झाला. तसा तुम्हां आम्हां होवो.

ही साठां उत्तरांची कहाणी, पांचां उत्तरीं सुफळ संपूर्ण.