संत तुकडोजी महाराज

सर्व सामान्य लोकांच्या मनावर शिक्षणाचे महत्त्व बिंबवणारा , अस्पृश्यता गाडून टाका असे सांगणारा , स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करणारा , सर्व धर्मांकडं सारख्याच नजरेनं पहा असे सांगणारा, राष्ट्रसंत म्हणजेच संत तुकडोजी महाराज.


भजन १६ ते २०

भजन - १६

पाहतोसि अंत काय, नंद-नंदना रे ! ॥धृ॥

दीन अम्ही घाबरलो, भवचक्री सापडलो ।

'सुख' म्हणुनी गडबडलो, ऎक वंचना रे ॥१॥

पाहुनि जनि सृष्टि-खेळ, नटलो बहु करुनि मेळ ।

खोवियली ऎसी वेळ, कोणि ना सखा रे ! ॥२॥

सोसियले दुःख किती, परि येईना सुमती ।

अंतकाळि काय गती, होइल गिरिधारे ! ॥३॥

बुध्दि दे अम्हास अता, लागू तव नाम पथा ।

होउ नकोसी परता, देइ दर्शना रे ! ॥४॥

वेळ गेलिया निघून, काय पाहशी दुरून ? ।

तुकड्या म्हणे जीवप्राण, दान देइ बारे ! ॥५॥

भजन - १७

या या रे सकळ गडी ! 'कृष्ण कृष्ण' गाऊ ॥धृ॥

कुंजवनी यमुनेतिरि, वाट पाहतो श्रीहरि ।

जाउ धावु पाहु तया, रंगि रंग लावू ॥१॥

बहु जमले धेनुपाळ, वाटतसे दिव्य माळ ।

कापतसे दुरुनि काळ, त्या रुपास पाहू ॥२॥

मोरमुकुट सुंदरसा, कटि पीतांबर सरसा ।

बंसरिच्या नाद-रसा, तल्लिन मनि राहू ॥३॥

रामरंग अमित संग, प्रभुची महिमा अभंग ।

तुकड्या म्हणे देहभाव, कृष्ण-पदी वाहू ॥४॥

भजन - १८

सद्गुरुचे गूण-नाम, गाइ मनोभावे ॥धृ०॥

संसारी सर्व मिळे, व्यवहारी सर्व कळे ।

परि गुरुगम्यचि विरळे, नाहि जगा ठावे ॥१॥

सागर उतरेल पार, वायुगमनीहि फार ।

गुरुची महिमा अपार, नाहि कुणा पावे ॥२॥

अमृत मंथने निघेल, जीव मस्त हा बनेल ।

गुरु-ज्ञानविण कुणी, शेवटी न धावे ॥३॥

तुकड्याची एक आस, सद्गुरूचि पुरवि खास ।

करुनी भवदुःख-नाश, अंतकाळि पावे ॥४॥

भजन - १९

आवडिचा मोहन हा, सोडु नये वाटे ॥धृ॥

जीवभाव तोचि अम्हा, धनिकासी जेवी जमा ।

विसरताचि एक क्षण, अंगि येति काटे ॥१॥

नेत्रि सगुण रूप सदा, वाटे सुख शांति-सुधा ।

त्याविण ना गात जरा, क्षण न एक कंठे ॥२॥

मधुर ध्वनि बंसरिचा, नाश करी षड्‍ -अरिचा ।

बाग फुले या उरिचा, निर्मळ जल दाटे ॥३॥

तुकड्याचा देव एक, परि हा नटतो अनेक ।

त्या पदि मन हे निशंक, कमलामृत चाटे ॥४॥

भजन - २०

सावळा मुरारी, अमुच्या रंगि रंगला ।

विसरुनी न जाऊ आम्ही, संग हा भला ॥धृ॥

जाउ जिथे पाही तेथे, आपणाची मागे येते ।

विसरिना कधी आम्हाते, मोहिला भला ॥१॥

नेत्र मिटोनिया बसता, भासतसे हसता हसता ।

खेळ खेळता नि निजता, सोडिना मला ॥२॥

सृष्टिसुखा पहाया जात, मार्गि लावितो हा चित्ता ।

भासवितो अपुली सत्ता, दावितो कली ॥३॥

नाठविता आठव देई, आठविता जवळी राही ।

देउनिया तुकड्या ग्वाही, सांगतो खुला ॥४॥