संत तुकडोजी महाराज

सर्व सामान्य लोकांच्या मनावर शिक्षणाचे महत्त्व बिंबवणारा , अस्पृश्यता गाडून टाका असे सांगणारा , स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करणारा , सर्व धर्मांकडं सारख्याच नजरेनं पहा असे सांगणारा, राष्ट्रसंत म्हणजेच संत तुकडोजी महाराज.


भजन २१ ते २५

भजन - २१

अखिल विश्व मंदिर माझ्या आत्ममूर्तिचे ।

खेळ हे निसर्गे त्याच्या कार्य-पूर्तिचे ॥धृ॥

वाहती नदी-सागर हे, स्नान घालण्या तयासी ।

पृथ्वी हेच सिंहासन त्या चक्रवर्तिचे ॥माझ्या०॥१॥

वसंतबाग फुलला फलला, हार अर्पिण्या तयासी ।

सुंगधित चंदनकाष्ठे, गंध हे पुजे ॥माझ्या०॥२॥

पृथ्वी अन्न शिजले जे जे, भोग द्यावयास यासी ।

जळति द्रव्य-धातू सगळे, हवन होतसे ॥माझ्या०॥३॥

सूर्यचंद्र नंदादिप हे, जळति ज्योत द्यावयासी ।

पवन मंद वाहे सुखवी, हृदय हे तिचे ॥माझ्या०॥४॥

निर्विकल्प चिद्‍ आत्मा हा, भोगुनी अभोक्ता राही ।

दास सांगतो तुकड्या हे भाव स्फूर्तिचे ॥माझ्या०॥५॥

भजन - २२

भोग हा चुकेना कोणा, देव-दानवा ।

सृष्टि भोग भोगी देही, मागचा नवा ॥धृ॥

संत-साधु योगी-मौनी, प्राक्तना चुकविना कोणी ।

मृत्युपरी पावे ग्लानी, दुःख या जिवा ॥कोणा०॥१॥

ब्रह्मनिष्ठ नारद स्वामी, भोग-भ्रसे रतला कामी ।

आपणची स्त्रीच्या उर्मी, प्रसवला भवा ॥कोणा०॥२॥

पुत्री विधात्याने धरली, पितृ-भावना ही हरली ।

भिल्लिणिची प्रीती स्फुरली, भोळिया शिवा ॥कोणा०॥३॥

सुख-दुःख दैवे पावे, सकळ शास्त्रियांसी ठावे ।

सांगतसे तुकड्या भावे, येई अनुभवा ॥कोणा०॥४॥

भजन - २३

व्हा उभे धर्म-रक्षणा, धैर्य हे कां सोडता ? ।

गर्जु द्या वीर-गर्जना, मार्ग हा कां मोडता? ॥धृ॥

(अंतरा)

चमकु द्या रक्त वीरांचे ।

उघडु द्या कर्ण शूरांचे ।

फोडु द्या भंड क्रूरांचे ।

द्या प्राण रणी खोचुनी, हात हे कां जोडता ? ॥१॥

(अंतरा)

श्रीकृष्ण आमुचा ईश ।

सांगतो हाचि संदेश ।

ठाऊके आर्य-पुत्रास ।

लागेल पाप नैकता, वचन हे कां खोडता ? ॥२॥

(अंतरा)

गाईचे वाचवा प्राण ।

अबलासी द्या जिवदान ।

राखा वडिलांचा मान ।

चला उठा उठा तरुण हो ! वेळ ही का दवडिता ? ॥३॥

(अंतरा)

आळवा प्रभूसी ध्यानी ।

मागा यश या संग्रामी ।

घ्या उडी उधळवा उर्मी ।

तुकड्याचि आस ही पुरी, होउ द्या का तोडता ? ॥४॥

भजन - २४

किती बघशि अंत आमुचा ? श्रीहरी ! ये धावुनी ।

सुख नाहि जगी तुजविना, भाव हा घे पाहुनी ॥धृ॥

(अंतरा)

जग नाशिवंत हे चळले ।

मेंढरावाणि खळबळले ।

हे जया ज्ञानिया कळले ।

नच राहि जरा तुजबिना, दया मनि घे निरखुनी ॥१॥

(अंतरा)

हा विषय विषासम भासे ।

लागलो तुझ्या अम्हि कासे ।

नच त्रास कुणाचा सोसे ।

या अशा लेकरा करी, सख्या घे ये उचलुनी ॥२॥

(अंतरा)

कोवळे मनाचे आम्ही ।

संस्कारजन्य अति कामी ।

लागलो अता तव नामी ।

तुकड्यादास भेट दे हरी ! चित्त झुरते गाउनी ॥३॥

भजन - २५

प्रभु ! बोल बोल अनमोल, प्रेम तू का सोडला ? ।

विपरीत असा हा काळ, भारता का ओढला ? ॥धृ॥

(अंतरा)

शेतीत पिके ना होती ।

ऋतु काळवेळ ना बघती ।

दुःखद विघ्ने कोसळती ।

हे सर्व दिसुनिया असे, बघवते हे का तुला ? ॥१॥

(अंतरा)

अन्नान्न भरतभू झाली ।

कांचने होति ओतियली ।

ती वेळ कुठे रे ! गेली ? ।

रुसलासि अम्हावरि काय, कृपा कर का ओढला ? ॥२॥

(अंतरा)

अति शूर धुरंधर होते ।

प्राणापरि जपसी त्याते ।

ते भक्त तुझे का होते ? ।

लेकरा विसरुनी अता, मार्ग हा का मोडला ? ॥३॥

(अंतरा)

देवळे स्मशाने झाली ।

अबलांची इभ्रत गेली ।

दास्यात भरतभू पडली ।

तुज कसे शोभते हरी ! ब्रीद-पथ का सोडला ? ॥४॥

(अंतरा)

गर्जती पुराणि ज्ञाते ।

'राखील प्रभू आम्हाते' ।

किती वेळ ? सांग तरि बा ! ते ।

तुकड्याची हाक घे आता, प्रेम अधि का जोडला ? ॥५॥