संत तुकडोजी महाराज

सर्व सामान्य लोकांच्या मनावर शिक्षणाचे महत्त्व बिंबवणारा , अस्पृश्यता गाडून टाका असे सांगणारा , स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करणारा , सर्व धर्मांकडं सारख्याच नजरेनं पहा असे सांगणारा, राष्ट्रसंत म्हणजेच संत तुकडोजी महाराज.


भजन ५६ ते ६०

भजन - ५६

आपत्काली धैर्य नसावे, ब्रीद कसे तुमचे ? ।

साच बोलुनी साचचि करशी, वाटे मज साचे ॥धृ॥

श्रृती-वेद बहु शास्त्रे वर्णिती 'भक्ती प्रिय तुजला' ।

'याविण काहीच न रुचे आणिक', सत्य बोल मजला ॥१॥

राख राख प्रभु ! लाज आज रे ! घे पोटी पापी ।

तुकड्यादास म्हणे मी उरलो, पायी संतापी ॥२॥

भजन - ५७

दवडु नको रे ! रत्न गवसले, दगडाचे पोटी ।

पाहि दगड शोधुनी, लाव संधान तनूकाठी ॥धृ॥

शरिराचे शरिरात शोधुनी, आत शरिर पाही ।

आंतर शरिरी नेत्र प्रगटती, किति देऊ ग्वाही ॥१॥

तोचि नेत्र पाहता उमेचा, वर शंकर धाला ।

त्रैलोक्याचे जहर प्राशिता, भय नाही त्याला ॥२॥

नेत्राचे बिंदुले शोधता, हरपे मन-दृष्टी ।

जोवरि न मिळे नेत्रि 'नेत्रिया' तोवरी तू कष्टी ॥३॥

सोड पाश हा धर्म-कर्म-संस्कार खटाटोपी ।

पाहि गड्या ! 'डोळ्याचा डोळा' प्रगट दिसे आपी ॥४॥

धन्य धन्य ते गुरूराज, वैभवी स्वरूपाचे ।

तुकड्यादासा दिला ठाव, नित तत्-स्वरुपी नाचे ॥५॥

भजन - ५८

हो जागा, का निजला सखया ! अज्ञानामाजी ? ।

विसरुनिया संधान आपुले, केला भव राजी ॥धृ॥

सुख नाही, सुख नाही बापा ! या झोपेमाजी ।

लावुनि घेशी खटपट मागे. मग करिशी हाजी ॥१॥

नरजन्माची वेळ गमवुनी, का बनशी पाजी ? ।

समज अता तरि, सत्संगाने अनुभव घे आजी ॥२॥

आत्मस्वरूपी स्थिर होउनी, सोडी जग-लाजी ।

अंतर्मुख कर वृत्ति आपुली, धर निश्चय आजी ॥३॥

तुकड्यादास म्हणे का फिरशी ? धरि गुरुचरणा जी !

सत् चित् रुप सोडुनी राहशी, चोरांच्या शेजी ॥४॥

भजन - ५९

ठेवु कुणावर भार ? कन्हैया !

कोण करिल उपकार ? कन्हैया ॥धृ॥

स्वार्थलोभि ही जनता सारी, मज तारक कोणी न मुरारी ! ॥

जीव कसा जगणार ? कन्हैया ! ॥१॥

जिकडे पहावे तिकडे माया, मोहविकारे जळते काया ।

भक्ति कशी घडणार ? कन्हैया ! ॥२॥

तुकड्यादास म्हणे दिन आम्ही, लावी देह सख्या ! तव कामी ।

मज तुचि उध्दरणार कन्हैया ! ॥३॥

भजन - ६०

सोडु नको मज तू गिरिधारी !

दूर करो ही जनता सारी ॥धृ॥

जन म्हणोत मज 'वेडा झाला', तरि न दुःख मम होइ मनाला ।

परि न तुझी मर्जी हो न्यारी ॥१॥

म्हणतिल मज जरि 'ठेवु उपाशी, परि तू रमशिल ना मजपाशी ? ।

तोडु नको अंतरिची तारी ॥२॥

पाहो मज वैर्‍यापरि कोणि, तरि त्याची तिळ न धरी ग्लानी ।

तुकड्याचे भय दुःख निवारी ॥३॥