श्री शनिदेव

श्री शनिदेव


शनिजयंती

वैशाख वद्य अमावस्येस हा कार्यक्रम उत्साहाने साजरा केला जातो. याच दिवशी श्री शनैश्र्वर महाराजांची जयंती ( जन्म दीन ) उत्सव दिन म्हणून साजरा करण्यात येतो. प्रस्तुत उत्सवासाठी अनेक ठिकाणाहून नामवंत ब्राम्हणांना पाचारण केले जाते. एका लघुरुद्र अभिषेकाला ११ ब्राम्हण लागतात , व हा कार्यक्रम सुमारे २ || ते ३ तास चालतो. दिवसेंदिवस अभिषेकाचे प्रमाण वाढत चालले आहे. त्या प्रमाणात ब्राम्हणांच्या संख्येत वाढ करण्यात येते. सध्या ५५ ब्राम्हणांना बोलवावे लागते.

अभिषेकाचा कार्यक्रम सकाळी ७ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत चालू असतो. शेवटी महापूजा होवून शनी महाराजांच्या पालखी मिरवणुकी नंतर शनिजयंती वद्य महापूजा महाआरती होम व महाप्रसाद वाटला जातो. प्रारंभी शनैश्र्वरच्या मूर्तीला पंचामृत, तेल व वाळ्याचे पाणी यांनी स्नान घालण्यात येते व नंतर शनैश्र्वराच्या नामघोषचा जल्लोषात रुद्राभिषेक घालण्यात येतो. यावेळी वातावरण अगदी दुमदुमून गेल्यासारखे वाटते. प्रसन्न व उत्साही वातावरणामुळे प्रत्येक भक्ताचे मन प्रफुल्लीत व टवटवीत राहते. प्रस्तुत काळात सर्वच भक्तगण आपल्या सर्व सांसारिक चिंता, व्यथा एकदम विसरून जातात. हा अपूर्व सोहळा पाहण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणाहून लाखो भक्तगण उपस्थित राहून शनि महाराजांच्या दर्शनाचा मनमुराद आनंद लुटतात. त्यामुळे हया दिवशी सुद्धा शनि शिंगणापूर मध्ये भव्य यात्रेचे स्वरूप प्राप्त झालेले असते. असे म्हणतात की शनि जयंतीला शनिमूर्ती निळसर रंगाची दिसते. त्यात मूर्तीला आंघोळ घातल्यावर श्री शनिदेवाला नौरत्न हार जो सोने, हिरे , जडजवाहीराने रत्नजडीत आहे असा हार घालतात.

प्रत्येक शनि जयंतीला देवस्थान चे विश्र्वस्त , भक्तगण " सामाजिक सेवा दिवस " रुपाने साजरा करीत असतात. याच दिवशी इतर ही अनेक सामाजिक कार्यक्रम उदा. - डोळ्याचे शिबीर , आरोग्य शिबीर , स्वातंत्र्य सैनिक किंवा शहीद जवानाच्या विधवा पत्नीचा सन्मान करून सामाजिक सेवा दिन या रुपाने हा यात्रा दिवस साजरा केला जातो.