शनी शिंगणापूर

भारतामध्ये सूर्यपुत्र शनिदेवाचे अनेक मंदिरे आहेत. यामधील एक प्रमुख मंदिर महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात शिंगणापूर येथे आहे. जगप्रसिद्ध या शनि मंदिराची विशेषता म्हणजे येथील शनिदेवाची पाषाण मूर्ती खुल्या आकाशाखाली उघड्यावरच संगमरवराच्या एक चौथर्‍यावर विराजित आहे. देव आहे पण देऊळ नाही असे या देवाचे वैशिष्ट्य आहे. ही मूर्ती उंचीला पाच फुट नऊ इंच आणि लांबीला एक फुट सहा इंच आहे. शनि शिंगणापूरचे महत्त्व शनिदेवाच्या इतर सर्व मंदिरांपेक्षा वेगळे आहे. आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे या गावातील लोक घरांना कुलूप लावत नाहीत.


आख्यायिका

या स्वयंभू मूर्तीबद्दल अनेक आख्यायिका भाविकात प्रचिलित आहेत. येथील कथाही रोचक आहे. शनी देव येथेच वास्तव्य करतात, असे मानले जाते. त्यामुळे येथे चोरी होत नाही, असे सांगितले जाते. त्यामुळे गावातील घरांनाही कुलपे नाहीत. एवढ्या वर्षांत घरातून कधी एक खिळाही चोरीला गेलेला नाही, असे येथील लोक गौरवाने सांगतात. या लहानशा गावाची लोकवस्ती सुमारे ३००० असेल पण येथील घरांना दरवाजे नाहीत याचे आश्चर्य वाटते. शनीच्या या नगरीची रक्षण खुद्द शनी देव करतात असे लोक मानतात. चोरी केल्यावर,कोणीही चोर या गावाची सीमारेषा जिवंत अवस्थेत पार करूच शकत नाही असेही सांगितले जाते. तेथे चोरी केल्यास अंधत्व येत असल्याची आख्यायिका भाविकांमध्ये प्रचलित आहे. येथे पर्यटक मोठ्या संख्येने असतात.वाच्या मूर्तीजवळ घेऊन गेल्यास विष उतरते, असे येथे सांगतात. अगदी जगावेगळे असलेले हे देवस्थान चमत्कारांमुळे खूप प्रसिद्ध पावले आहे.

येथील मंदिरात दर्शनाचे नियम अतिशय कडक आहेत. देव दर्शन दिवसातून कोणत्याही वेळेस घेता येते. शनी बाल ब्रह्मचारी असल्याने महिला दूरूनच दर्शन करतात. स्त्रियांना मात्र चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेण्यास मनाई आहे. दुरून दर्शन घेता येते. दर्शनापूर्वी आंघोळ करून शुचिर्भूत होणे आवश्यक असते. आंघोळीची व्यवस्था देवस्थानाच्या आवारात कायम आहे. पुरूष स्नान करून, ओल्या कपड्यांनीच दर्शन घेतात. त्यानंतर शनीच्या मूर्तीवर तीळाचे तेल वाहून प्रदक्षिणा घालतात. दर्शन घेतल्यानंतर भाविक तिथे असलेल्या दुकानातून घोड्याची नाल तसेच काळ्या कपड्यांनी बनलेली शनी देवाची बाहुली खरेदी करतात. घोड्याची नाल घराच्या बाहेर लावल्याने दृष्ट लागत नाही, असे मानले जाते. शिवाय घरात सुख-समृद्धी नांदते.