प्रभातसमयीं नभा शुभ रविप्रभा फांकली । स्मरे गुरु सदा अशा समयिं त्या छळे ना कली ।।
म्हणोनि कर जोडूनी करुं अतां गुरुप्रार्थना । समर्थ गुरु साइनाथ पुरवी मनोवासना ।। 1 ।।
तमा निरसि भानु हा गुरुहि नासि अज्ञानता । परन्तु गुरुची करी न रविही कधीं साम्यता ।।
पुन्हां तिमिर जन्म घे गुरुकृपेनि अज्ञान ना । समर्थ गुरु साइनाथ पुरवी मनोवासना ।। 2 ।।
रवि प्रगट होउनि त्वरित घालवी आलसा । तसा गुरुहि सोडवी सकल दुष्कृतीलालसा ।।
हरोनि अभिमानही जडवि तत्पदीं भावना । समर्थ गुरु साइनाथ पुरवी मनोवासना ।। 3 ।।
गुरुसि उपमा दिसे विधिहरीहरांची उणी । कुठोनि मग येई ती कवनिं या उगी पाहुणी ।।
तुझीच उपमा तुला बरवि शोभते सज्जना । समर्थ गुरु साइनाथ पुरवी मनोवासना ।। 4 ।।
समाधि उतरोनियां गुरु चला मशीदीकडे । त्वदीय वचनोक्ति ती मधुर वारिती सांकडें ।।
अजातरिपु सदुरो अखिलपातका भंजना । समर्थ गुरु साइनाथ पुरवी मनोवासना ।। 5 ।।
अहा सुसमयासि या गुरु उठोनियां बैसले । वोलोकुनि पदाश्रिता तदिय आपदे नासिलें ।।
असा सुहितकारि या जगतिं कोषिही अन्य ना । समर्थ गुरु साइनाथ पुरवी मनोवासना ।। 6 ।।
असे बहुत शाहणा परि न ज्या गुरुची कृपा । न तत्स्वहित त्या कळे करितसे रिकाम्या गपा ।।
जरी गुरुपदा धरी सुदृढ़ भक्तिने तो मना । समर्थ गुरु साइनाथ पुरवी मनोवासना ।। 7 ।।
गुरो विनति मी करीं हृदयमंदिरीं या बसा । समस्त जग हें गुरुस्वरुपची ठसो मानसा ।।
करो सतत सत्कृती मतिहि दे जगत्पावना । समर्थ गुरु साइनाथ पुरवी मनोवासना ।। 8 ।।