अधिकमास माहात्म्य पोथी

अधिक मास हा चांद्र वर्षांत कधी कधी येतो आणि ह्या महिन्यात अध्यात्मिक काम जास्त केले जाते.


अधिकमास माहात्म्य - अध्याय तेरावा


अध्याय तेरावा
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ जयश्री सर्वोत्तम वासुदेवा ॥ दामोदरा अनंता केशवा ॥ क्षीराब्धिजामाता रमाधवा ॥ देवाधिदेवा दयानिधे ॥ १ ॥
तव चरणसरोजीं प्रेमा ॥ अखंड देई सर्वोत्तमा ॥ नाम वदायाची सीमा ॥ शेषातेंही गती नव्हे पै ॥ २ ॥ 
तेथें मी अल्पमती पामर ॥ वदेन म्हणतों स्तुतिउत्तर ॥ एक जिव्हेचा प्रसर ॥ केवि विस्तार साहों शके ॥ ३ ॥
परी आत्मसार्थक करावें कांहीं ॥ म्हणोन आरंभिलीसे नवाई ॥ कृपाळुत्वें शेवटास न्यावी ॥ हेची परिसावी विज्ञापना ॥ ४ ॥
मी नेणें जपतपसाधन कांहीं ॥ दानधर्म व्रतें उद्यापनें पाहीं ॥ करावयातें धनही नाहीं ॥ गृहीं संग्रहीं तूं जाणता ॥ ५ ॥
निशिदिनीं संसाराची हळ ॥ सदां चित्तीं वाटे तळमळ ॥ तेणें न गमेची काळवेळ ॥ म्हणोनिया खेळ आरंभिला ॥ ६ ॥
तरी कृपा करूनि रमारंगें ॥ न्यून तें पूर्ण करावें अंगें ॥ रसोत्पती रसवेगें ॥ जीवन घाली दयाळुवा ॥ ७ ॥
समर्थे मुक्ताफळाची लाखोली ॥ वाहतां हरुष ह्रदयकमळीं ॥ दरिद्रें तुळसीदळें समर्पिलीं ॥ तरी का न स्वीकारा स्वामियां ॥ ८ ॥
श्रीमानें नैवेद्य पक्वान्न ॥ अर्पिता तोषलें मन ॥ दरिद्रियाचें किंचित कदान्न ॥ काय अव्हेरून सांडावें ॥ ९ ॥
तैसे थोर थोरांनीं प्रबंध केले ॥ नानापरीं गीतीं आळविले ॥ तयाचे लळे पुरविले ॥ मज अव्हेरितां भलें नोहे कीं ॥ १० ॥
असो कृपा कराल श्रीहरी ॥ तरीच वदेल वैखरी ॥ सरस्वती बैसे जिव्हाग्रीं ॥ मनतुरंगीं आत्माराम ॥ ११ ॥
ऐकां संत श्रोते सज्जन ॥ पांचा पर्वाचा केला प्रश्न ॥ तया माजी चार संपूर्ण ॥ मागें निवेदन जालेंसे ॥ १२ ॥
व्यतीपात वैधृती पाहीं ॥ पूर्णिमा अमावास्याही ॥ ऐसीं पर्वे चार पाहीं ॥ केलें सर्वही कथन पै ॥ १३ ॥
आतां पांचवें पर्व तें कवण ॥ तयाचें ऐकावें निरोपण ॥ लक्ष्मीप्रती नारायण ॥ सांगता जाहलासे ॥ १४ ॥
लक्ष्मी रुवाच ॥ पुरुषोत्तम ह्रषीकेश भक्तिप्रिय दयानिधे द्वादश्याश्वैध माहात्म्यं वद लोकहितायच ॥ १ ॥
लक्ष्मी वदे जी पुरुषोत्तमा ॥ भक्तकामकल्प द्रुमा ॥ मागें निवेदिला महिमा ॥ पूर्णिमा अमावास्या ते ॥ १५ ॥
उपरी पर्व राहिलेंसे एक ॥ तेंही परिसावें नावेक ॥ व्रतामाजी श्रेष्ठता अनेक ॥ कैसेनि देख स्वामीयां ॥ १६ ॥
तरी कृपा करुनि समग्र ॥ लोकहितार्थ वदावें साचार ॥ जे ऐकतां जडमूढउद्धार ॥ तात्काळिक होय पै ॥ १७ ॥
श्रीकृष्ण उवाच ॥ श्रृणु देवि प्रवक्ष्यामि द्वादशीफलमुत्तमं ॥ मलमासें विशेषेण मुनिभिर्भाषितं पुरा ॥ २ ॥
विष्णु बोलते झाले उत्तर ॥ एक क्षीराब्धिजे सादर ॥ पर्वामाजी पर्व थोर ॥ विशेष सत्कार द्वादशीं ॥ १८ ॥
तयामाजी मलमास ॥ पातल्या विशेषाविशेष ॥ आदरें आचरलिया व्रतास ॥ तुटें पाश यमाचा ॥ १९ ॥
हें ऐकतां महिमान ॥ पापें भस्म होती जाण ॥ यदर्थी नसे अनुमान ॥ सावधान परिसावें ॥ २० ॥
समग्र तीर्थांची गर्जना तोंवरी ॥ संपूर्ण यज्ञक्रिया बरी ॥ अवघीहीं पर्वे पृथ्वीवरी ॥ न पवतीसरी द्वादशीतें ॥ २१ ॥
संपूर्ण पर्वाचें फळ पाहीं ॥ न तुळे द्वादशीचें ठायीं ॥ काय सांगो तेथीची नव्हाई ॥ मी शेषशायी वदतसें ॥ २२ ॥
यज्ञ केलियाचें फळ ॥ अथवा प्रयागीं स्नान गंगाजळ ॥ तेथींचा कल्पवास प्रबळ ॥ सेविला सर्वकाळ आदरें ॥ २३ ॥
तरीं द्वादशीतें तुळणा नाहीं ॥ शास्त्र देती याची ग्वाही ॥ प्रत्ययो घेइजे स्वदेहीं ॥ केलिया पाहीं व्रताते ॥ २४ ॥
उपोषण एकादशी दिने ॥ द्वादशींत कीजे पारणें ॥ ब्राह्मण संतर्पण मिष्टान्ने ॥ आणीक दानें नानाविध ॥ २५ ॥
आणीक करावें पिंडदान ॥ श्राद्धतिथी असो नसो जाण ॥ परि अगत्य कीजे श्राद्धसाधन ॥ घडे पुण्य कोटीगुणें ॥ २६ ॥
हें तव त्रिरात्रीचें व्रत ॥ दशमीपासोन द्वादशीयुक्त ॥ तिन्ही देवता मूर्तिमंत ॥ वसताती तेथें निश्चयीं ॥ २७ ॥
दशमीते दैवत चतुरानन ॥ एकादशी गिरिजारमण ॥ द्वादशीतें विष्णु आपण ॥ वास्तव्य स्थान त्रिवर्गी ॥ २८ ॥
दशमीतें दृश्य दोष त्यागावे ॥ एकादशीं वर्जावे ॥ द्वादश द्वादशी तें बरवे ॥ आधीं त्यागावे शास्त्राधारे ॥ २९ ॥
परान्न गृहान्न उष्णोदक ॥ सर्व स्नेह खट्‌वांग देख ॥ लवण ताबूल स्त्रीसंग सुखदुःख ॥ एकभुक्त दशमीते ॥ ३० ॥ 
ऐसें एकादशी दिनीं ॥ एक अधिकतये स्थानीं ॥ अन्न न स्वीकारावे जनीं ॥ एकादशी म्हणून बोलिजे ॥ ३१ ॥
आता द्वादशीते वर्ज कीजे ॥ दिवा निद्रा न सेविजे ॥ शास्त्राधार बोलिजे ॥ ऐके क्षीराब्धीतनये ॥ ३२ ॥ 
ऐसे विधियुक्त एकादशी ॥ व्रत कीजे सायासेंसी ॥ वरी साधनद्वादशी ॥ ब्राह्मणेसी विधियुक्त ॥ ३३ ॥
त्याहीवरी केलिया पिंडदान ॥ ते तंव विशेषाहून विशेष जाण ॥ तेणे केले गयावर्जन ॥ पितृउद्धारण कुळाशी ॥ ३४ ॥
तुळसीपत्रासमान ॥ अर्पिला जरी पिंड जाण ॥ तरी ते मज मेरूसमान ॥ वदे नारायण स्वमुखे ॥ ३५ ॥
कृता यज्ञाखिलास्तेन गयायां पिंडपातनं ॥ अहो धन्याश्चते धन्या येषां बुद्धिर्हरेर्दिने ॥ ३ ॥
तुळशीपत्रमिश्रानं मक्षिकापादमात्रकं ॥ द्वादशां ब्राह्मणेदत्तं तदन्नं मेरुतां व्रजेत ॥ ४ ॥
मलमासाची द्वादशी ॥ जरी उपोषण घडे ते दिवशीं ॥ तया ऐसा पुण्यराशी ॥ दुजा आन असेना ॥ ३६ ॥
जन्मांतर सहस्रेन ॥ तयाने जिंकिलेसे जाण ॥ वरी ब्राह्मण संतर्पण ॥ पूजाविधान यथोचित ॥ ३७ ॥
ऐसें व्रत भावें आचरतां ॥ यमरावो वोढवी माथा ॥ तया दुरिताची वार्ता ॥ बोलो नयेचि राजसे ॥ ३८ ॥
तये दिनीं ब्राह्मणालागून ॥ जरी वस्त्र करविले परिधान ॥ तरी कल्पपर्यंत स्वर्गभोग जाण ॥ तयालागून प्राप्त होय ॥ ३९ ॥
विष्णुमाधवप्रीत्यर्थ ॥ जरीं आचरेल हे व्रत ॥ ब्राह्मणभोजन यथार्थ ॥ विष्णुप्रीत्यर्थ द्वादशीसी ॥ ४० ॥
सुवर्णदान सहस्रदान ॥ रौप्यदान उपानहदान ॥ छत्रासहीत पादुकादान ॥ पुरुषोत्तमा अर्पण कीजे ॥ ४१ ॥
घृतदान घृतपाचित पक्वान्न ॥ त्रयोदशगुणी तांबूल दान ॥ गंधपुष्प सुदान ॥ कीजे अर्पण यथाविधीं ॥ ४२ ॥
इतुके दान केलिया पाहीं ॥ वैकुंठवास तयातें होई ॥ मलमास द्वादशीठायीं ॥ शेषशायीं संतुष्टे ॥ ४३ ॥
यथाऋतुकाळे फळे ॥ कर्दळी फळें नारीकेळे ॥ खर्जूरी लवंगा पूगीफलें ॥ जायफळादी आदरें ॥ ४४ ॥
कपिला गोदानें नेमस्त ॥ महिदान अश्वासहित ॥ गजअजादी रथगणीत ॥ अर्पणकीजे द्विजातें ॥ ४५ ॥
इतुकीं दानें सांगितलीं देख ॥ परी घृतदानाचें महात्म अधिक ॥ मलमास पर्वणी आवश्यक ॥ कीजे देख यथाविधी ॥ ४६ ॥
कांस्यपात्रीं घालूनियां घृत ॥ सुवर्णप्रतिमासंयुक्त ॥ पूजा करूनि नेमस्त ॥ दीजे दान विप्रालागीं ॥ ४७ ॥
त्याही वरी घृतपाचिक पक्वान्न ॥ तेंही कांस्यपात्रीं घालून ॥ घृतासहीत पूजा करून ॥ ब्राह्मणाकरीं अर्पिजे ॥ ४८ ॥
संख्या तयाची त्रीणि दशक ॥ वरी त्रीणि अधीक देख ॥ ऐसें करूनियां आवश्यक ॥ दीजे सम्यक विप्रांतें ॥ ४९ ॥
साक्षर विप्रालागीं बरवें ॥ पूजा करूनि वस्त्र द्यावें ॥ वरी दक्षिणेसहीत दान अर्पावें ॥ तेणें पावे स्वर्गवासु ॥ ५० ॥
द्वादशी ऐसें दुजें पर्व ॥ काशी ऐसें क्षेत्र अपूर्व ॥ तीर्थामाजी विशेष गौरव ॥ प्रयागराज जाणिजे ॥ ५१ ॥
द्वादशीं केलिया अन्नदानें ॥ कोटिकुळें उद्धरलीं तयानें ॥ नरकीं तारिले पितृगण ॥ ऐक महिमान शुभानने ॥ ५२ ॥
सकळ दानामाजी वरिष्ठ ॥ अन्नदान अतिश्रेष्ठ ॥ म्हणोनि महिमा उत्कृष्ट ॥ वर्णिला श्रेष्ठ पुराणीं ॥ ५३ ॥
असाक्षी भोजन द्वादशी ॥ तया ऐसा न देखो दोषी ॥ अनकूल असे ज्या समयासी ॥ तेंचि ब्राह्मणासीं अर्पिजे ॥ ५४ ॥
चित्त आशेतें न धरावे ॥ भगवंतीं विन्मुख न व्हावें ॥ अतिथी विन्मुख नसावे ॥ वित्त असोनी जवळीक ॥ ५५ ॥
सर्वांचे अंतर ह्रद्गत ॥ स्वये जाणें त्रैलोक्यनाथ ॥ तयातें करितां वंचनार्थ ॥ पावे अघात रोकडा ॥ ५६ ॥
यालागीं उत्तम अथवा मध्यम ॥ सकळ श्रोतीं धरि जे नेम ॥ बहुतीं मार्ग हा सुगम ॥ निर्मून ठेविला अनंतें ॥ ५७ ॥
ये विषयीं इतिहास पुरातन ॥ होऊन ऐकिजे सावधान ॥ पूर्वी सूर्यवंशीं राजा पुण्यवान् ॥ अंबरीष जाण नाम तया ॥ ५८ ॥
सार्वभौम सर्वा वरिष्ठ ॥ तपोबळें अति उत्कृट ॥ अति धैर्य गांभीर्य श्रेष्ठ ॥ भक्‍ती एकनिष्ठ जयाची ॥ ५९ ॥
प्रजेलागी अति कनवाळु ॥ विप्रालागीं परम स्नेहाळु ॥ रिपुद्रुमालागीं जैसा काळु ॥ कृतांतवत तयाते ॥ ६० ॥
परम धर्मिष्ठ ह्रदयीं ॥ आडकाठी कवणातें नाहीं ॥ व्रत नेम उद्यापनें पाहीं ॥ सदांसर्वदांही चालवीत ॥ ६१ ॥
विन्मुख नव्हेची कवणातें ॥ मागितलें अर्पितसे त्यातें ॥ आपत्यापरी मागत्यातें ॥ लळे त्याचे पुरवीत ॥ ६२ ॥
ऐसें असतां वरिष्ठ ॥ द्वादशी नेम अचाट ॥ साधनयुक्त द्वादशी श्रेष्ठ ॥ नृपवरिष्ठ आचरतसें ॥ ६३ ॥
सहस्रावधी ब्राह्मणपंक्‍ती ॥ घेऊन साधी द्वादशी तिथी ॥ न उगवताची गभस्ती ॥ साधन रीती साधीतसे ॥ ६४ ॥
ऐसे लोटतां काळ बहुत ॥ पुण्य संग्रहो जाला अपरिमित ॥ इतुकेंही असुनि गर्वरहित ॥ नृपनाथ वेगळा तो ॥ ६५ ॥
तंव वासवा अंगी भय दारुण ॥ माझें पद घेईल हिरून ॥ चिंता करी रात्रंदिन ॥ तंव नवल पूर्ण वर्तलें ॥ ६६ ॥
अकस्मात ऋषी दुर्वास ॥ येता झाला इंद्रसभेस ॥ वासवें सन्मानोनि बहुवस ॥ षोडशोपचारें पूजिला ॥ ६७ ॥
बैसवूनियां निजासनीं ॥ स्वागत पुसिलें तये क्षणीं ॥ स्वस्ति क्षेम विप्र वदोनी ॥ पाहे नयनीं तयातें ॥ ६८ ॥
तंव परम कृश जालें शरीर ॥ शोकें उतरला मुखचंद्र ॥ देखूनी बोले मुनीश्वर ॥ दुःख अपार ह्रदयीं दिसे ॥ ६९ ॥
येरू म्हणे महाराजा ॥ उपाव न देखोंजी दुजा ॥ मग समग्र वृत्तांत वोजा ॥ ऋषिवर्या सांगतसे ॥ ७० ॥
म्हणें अंबरीष परम विख्यात ॥ तपोतेजें आगळा अमित ॥ द्वादशी व्रतातें आचरत ॥ न चाले तेथें उपावो ॥ ७१ ॥
ऐसियासी करूं मी काहीं ॥ ह्रद्रोग हा परम माझे जीवी ॥ म्हणोन पायीं ठेविली डोई ॥ सांगा काई मजलागीं ॥ ७२ ॥
जयातें ह्रद्रोग लागला ॥ तो रोगी दे नखो वांचला ॥ महद्रोग जयातें जाला ॥ तरी धन्वंतरी तयाला वांचविती ॥ ७३ ॥
परी ह्रद्रोगी प्राणियातें ॥ कवण वांचवूं शके तयातें ॥ एक सद्‍गुरु वांचून त्यातें ॥ उपाय अन्य असे ना ॥ ७४ ॥
तरीं तुम्ही सद्‍गुरु वरिष्ठ ॥ सकळ ऋषींमाजी श्रेष्ठ ॥ अमृतवचनीं स्पष्ट ॥ देऊनि रोग कुष्ट निवारा ॥ ७५ ॥
ऐकून वासवाची ग्लानी ॥ कोमलह्रदय दुर्वास मुनी ॥ अंतरीं परम कळवळोनी ॥ बोलतवाणी ते ऐका ॥ ७६ ॥
द्वादश्यां यत्कृतं सर्वमक्षय्यंतद्भवेदिह ॥ द्वादश्यामक्षयंदानं द्वादश्यामक्षयोजप: ॥ ५ ॥
दुर्वास वदे वासवा पाहीं ॥ द्वादशी ऐसें व्रत दुजें नाहीं ॥ जे आचरती सदां सर्वदाही ॥ त्या एवढा नाहीं पुण्यश्लोक ॥ ७७ ॥
अक्षयी स्वर्गवास तयातें ॥ प्राप्त होय जाण निरुतें ॥ द्वादशीये पुण्यव्रतातें ॥ साम्यता आन असेना ॥ ७८ ॥
अक्षयीतीर्थी स्नान केलें ॥ अथवा तपव्रत जरी केलें ॥ यज्ञयागादिही साधिलें ॥ उपासिलें ज्ञानयोग पै ॥ ७९ ॥
तरी नातुळे द्वादशी समता ॥ ऋषी देव गंधर्वादि तत्वता ॥ आचरलिया व्रता ॥ वंद्य सर्वथा ते जाले ॥ ८० ॥
व्रत आचरला चतुरानन ॥ कुबेरासहित सिद्धगण ॥ तयातें प्राप्त जालें पदनिर्वाण ॥ अक्षयी भानु तोंवरी पावे ॥ ८१ ॥
स्वयें वासवा तूंतें पाहीं ॥ इंद्रपद लाधलें पूर्ण कमाई ॥ याचि व्रत प्रभावें पाहीं ॥ अधिप सुरगणातें ॥ ८२ ॥
यमधर्म आचरे व्रत ॥ ते पद जालें तरी प्राप्त ॥ साधन द्वादशी कैलासनाथ ॥ स्वयें आचरे व्रताते ॥ ८३ ॥
ऐसे हे व्रत अति श्रेष्ठ ॥ आचरतसे नृपराव वरिष्ठ ॥ तया अपाय करावयाचे कष्ट ॥ कवण नष्ट करूं शके ॥ ८४ ॥
जयाते पुण्यसामोग्री ॥ पूर्ण असे हो पदरीं ॥ तयातें साह्य श्रीहरी ॥ व्रत निरंतरी चालतसे ॥ ८५ ॥
यालागीं अमरनाथा ॥ न प्रवर्ते ऐसिया घाता ॥ येणें दुरिताचि वार्ता ॥ आंगी सर्वथा बाणेल पै ॥ ८६ ॥
ऐकता ऋषीचे उत्तर ॥ देवेंद्रे केला नमस्कार ॥ उपाव न सुचे अणुमात्र ॥ पद स्वतंत्र नरा हेची ॥ ८७ ॥
यालागीं गुरुवर्या पाहीं ॥ एक वेळ तेथवर जाई ॥ कळेल तैसी करा नवाई ॥ पद अक्षयी राहे जेणें ॥ ८८ ॥
ऐसें ऐकतां वचनातें ॥ ऋशी विचारी अंतरातें ॥ म्हणे जाउनि पाहू नृपाते ॥ पुण्य पुरुषाचे दर्शन ॥ ८९ ॥
दुर्वासा ऐसा सत्पुरुष ॥ परी मतीतें तात्काळ भ्रंश ॥ जया संगती संगदोष ॥ धरिला हव्यास मानसीं ॥ ९० ॥
धीरवान ज्ञानवान पाहीं ॥ सुशीळ जरी जाहला देहीं ॥ तरी संगती संगदोष पाहीं ॥ मती पालटे तयाची ॥ ९१ ॥
म्हणोनियां सत्संग धरावा ॥ दुर्जन संग तो त्यागावा ॥ जेणें विश्रांती पावे जीवा ॥ देवाधिदेवा प्रेमा चढे ॥ ९२ ॥
आतां दुर्वास ऋषीरावो ॥ घेऊन शिष्य समुदावो ॥ नमूनियां वासवो ॥ निघता जाला तात्काळीं ॥ ९३ ॥
घेईल अंबऋषीची भेटी ॥ तेथें होईल जे राहटी ॥ तें कथानक मराठी ॥ श्रोतियां कर्णपुटीं परिसवूं ॥ ९४ ॥
जें ऐकतां पाप झडे ॥ कलि कल्मष अवघें पळे ॥ श्रवण करितां रोकडें ॥ मलमहात्म समग्र हें ॥ ९५ ॥
पापकोटी सहस्राणि पापकोटि शतानिच ॥ विलयं यांति देवेशि मलामासे तिथौमम ॥ ६ ॥
श्लोकाधरें वदली वाचा ॥ प्रबंध नव्हे माझे पदरचा ॥ न्यून पूर्ण करणे याचा ॥ अधिकार साचा तुम्हांतें ॥ ९६ ॥
मी तंव रामसंप्रदायी ॥ भिक्षा मागतो गृहींगृहीं ॥ ती भिक्षा एकत्र एक ठायीं ॥ पचवून अर्पावी द्विजातें ॥ ९७ ॥
ऐसी हे तव कविता जाण ॥ कवीश्वराचें भिक्षान्न ॥ अर्थावबोध एकत्र करून ॥ श्रोतियां लागुन वाटिलें ॥ ९८ ॥
इति श्रीमलमहात्म ग्रंथ ॥ पद्मपुराणींचें संमत ॥ मनोहरसुत विरचित ॥ त्रयोदशोध्याय गोड हा ॥ १३ ॥ 
ओव्या ९८ ॥ श्लोक ६ ॥
॥ इति त्रयोदशोऽध्यायः ॥