मनुस्मृति

मनुस्मृती हे धर्मशास्त्र आहे. वर्णधर्म, आश्रमधर्म, वर्णाश्रमधर्म, राजधर्म, व्यवहारनिर्णय, स्त्रीधर्म व पुरूषधर्म यांच्या या स्मृतीमध्ये व्याख्या सांगून त्यांची निष्कृती कोणत्या उपायांनी करावी हे सुचविले आहे.


मनुस्मृति - अध्याय दुसरा

वेदवेत्त्या व रागद्वेषशून्य अशा धार्मिकांनी ज्याचे अनुष्ठान केले आहे अशा श्रेयःसाधनरूप धर्मास तुम्ही ऐका. ॥१॥

कर्माच्या फलाची अभिलाषा करणे हे प्रशस्त नाही. (कारण, फलाभिलाष बंधास कारण होत असतो) पण या जगामध्ये निष्कामताही कोठे फारशी आढळत नाही. कारण, वेदांचे ज्ञान करून घेणे, वैदिक सर्व धर्मांशी संबंध ठेवणे इत्यादि सर्व इच्छेचाच विषय आहे. ॥२॥

या कर्माच्या योगाने मला हे फळ मिळेल, अशा प्रकारची जी बुद्धि तोच संकल्प होय. अशा संकल्पापासून काम म्हणजे त्या फलाची इच्छा होते. पुढे प्राणी त्याच्याकरिता प्रयत्न करू लागतो. यास्तव, प्रयत्नरूप जे यज्ञ ते संकल्पापासूनच होणारे आहेत. व्रते, चतुर्थाध्यायामध्ये पुढे सांगितले जाणारे यमरूप धर्म इत्यादि सर्व शास्त्रार्थ संकल्पापासून उत्पन्न होणारे आहेत. ॥३॥

कारण, ज्याला कशाची इच्छा नाही त्याच्या हातून या व्यवहारातील कोणतीही क्रिया कधीच होत नाही, अर्थात प्राणी जे जे काही करतो ते ते कामाचे चेष्टित आहे. ॥४॥

(अशी वस्तुस्थिति असल्यामुळे शास्त्र इच्छेचा निषेध करीत नाही तर शास्त्रोक्त कर्मामध्येच उत्तम प्रकारे प्रवृत्ति ठेवावी असे सांगते. यास्तव) बंधास कारण होणार्‍या फलाभिलाषास सोडून शास्त्रीय कर्मानुष्ठानामध्ये जो उत्तम प्रकारे प्रवृत्त होतो तो ब्रह्मभावास म्हणजे मोक्षास प्राप्त होतो. व त्यास अशी योग्यता प्राप्त झाली असता तो आपल्या संकल्पाप्रमाणे सर्व मनोरथ या लोकीच परिपूर्ण करून घेतो. (त्याचा प्रत्येक संकल्प या लोकी सिद्ध होतो असा याचा भावार्थ समजावा) ॥५॥

ऋग्यजुःसाम व अथर्वरूप सर्व म्हणजे विधि-अर्थवाद व मंत्ररूप वेद धर्माविषयी प्रमाण आहे. तसेच त्या वेदांस जाणणार्‍या मन्वादिकांच्या स्मृति व शील धर्माविषयी प्रमाण होय. त्यांचा आचारही धर्ममूल आहे. व धार्मिक पुरुषांस दोन्ही विधाने जेथे असतात तेथे त्यातील जे एक करावेसे वाटते ती त्यांची आत्मतुष्टि होय व तीही धर्माविषयी प्रमाण आहे. ॥६॥

मनूने ज्या कोणा ब्राह्मणादिकाचा जो काही धर्म सांगितलेला आहे तो सर्व वेदामध्ये सांगितलेला आहेच असे निःशंकपणे समजावे. कारण, तो मनु सर्वज्ञ आहे. ॥७॥

मीमांसा, व्याकरण इत्यादिकांचे जे ज्ञान तोच नेत्र. अशा ज्ञाननेत्राने सर्व वेदार्थोपयोगी शास्त्रांचे पर्यालोचन करून वेदप्राण्यांद्वारा अनुष्ठेयाचे ज्ञान करून घेतलेल्या विद्वानाने आपल्या धर्मामध्ये स्थित असावे; (म्हणजे स्वधर्माचरण करावे.) ॥८॥

श्रुति व स्मृति यांमध्ये सांगितलेल्या धर्माचे अनुष्ठान करणार्‍या मनुष्याची या लोकी कीर्ति होते व परलोक गेल्यावर अत्युत्तम सुख मिळते. ॥९॥

श्रुति म्हणजे वेद असे समजावे व स्मृति म्हणजे धर्मशास्त्र. त्या दोघांचाही प्रतिकूल तर्क करून विचार करू नये. कारण, त्यांच्या पासून संपूर्ण धर्म प्रकट झाला आहे. ॥१०॥

जो द्विज त्या दोन मूळग्रंथसमूहाचा, प्रतिकूळ तर्काचा आश्रय करून अवमान करील त्यास शिष्ट धार्मिकांनी अध्ययनादि कर्मापासून दूर करावे. कारण वेदवाक्यही अप्रमाण आहे. कारण की तेही एक वाक्यच आहे. ठगाच्या वाक्याप्रमाणे असा प्रतिकूल तर्क करणारा चार्वादिकाप्रमाणे नास्तिक आहे असे समजावे. कारण, तो वेदाची निंदा करणारा आहे. ॥११॥

सारांश, वेद, स्मृति, सदाचार व वैकल्पिक विधीतील कोणता पक्ष स्वीकारावा असा संशय आला असता आपल्या चित्ताची प्रीति म्हणजे त्यातील हे अमुकच करावे असे वाटणे, असे हे चार प्रकारचे धर्माचे साक्षात लक्षण आहे असे सांगतात. सदाचार म्हणजे शिष्टाचार. शीलाचाही सदाचारात अन्तर्भाव होतो. ॥१२॥

धर्मादि चार पुरुषार्थापैकी अर्थ व काम या दोन पुरुषार्थाच्या प्राप्तीची इच्छा न करणार्‍या पुरुषांस हे धर्मज्ञान (धर्मोपदेश) सांगितलेले आहे. व ज्यास अशा धर्मास जाणण्याची इच्छा होते त्यास परम प्रमाण श्रुति हेच आहे. ॥१३॥

ज्यावेळी परस्परविरुद्ध अर्थ सांगणार्‍या दोन श्रुति आढळतात त्यावेळी ते दोन्ही धर्मच आहेत असे मनूंचे सांगणे आहे. (कारण, त्या श्रुत्यक्त दोन्ही अर्थाचे बल सारखेच असते व विकल्पनुष्ठानविधानाने त्यांच्यातील विरोध नाहीसा होतो.विकल्पानुष्ठानविधान म्हणजे कोणास त्यातील एक पक्ष उक्त आहे व कोणास दूसरा. अशा व्यवस्थेने अनुष्ठानाचे विधान करणे.) कारण, ते दोन्हीही उत्तम धर्मच आहेत असे मनु, याज्ञवल्क्य इत्यादि विद्वानांनी सांगितले आहे. ॥१४॥

(आता या विकल्पांचे एक उदाहरण देतात) सूर्योदयानंतर अग्निहोत्रहोम करावा असे एक श्रुति सांगते. सूर्य व नक्षत्रे ही दोन्ही जेव्हा दिसत नाहीत (म्हणजे फटफटीत उजाडल्यापासून सूर्य क्षितिजावर येईपर्यंत जो काल जातो त्यास) तेव्हा समयाध्युषित काल म्हणतात. अशा वेळी होम करावा असे एक श्रुति सांगते व सूर्योदयाच्या पूर्वी अरुणाच्या किरणांनी युक्त जेव्हा गुरु, शुक्र, व्याध, अगस्त्य, स्वाति इत्यादि मोठमोठी नक्षत्रे मात्र दिसत आहेत अशा कालास अनुदित काल म्हणतात. व अनुदितसमयी होम करावा असेही श्रुति सांगते. तेव्हा या तीन कालातील होमास उक्त काल कोणता असा संशय येतो. पण हे तिन्ही काल श्रुत्युक्त असल्यामुळे समानबलवाले आहेत. यास्तव, परस्परविरुद्ध काल जरी श्रुतीमध्ये सांगितलेले आढळले तरी विकल्पाने अग्निहोत्राचा होम प्रवृत्त होतो. (म्हणजे ऋग्वेदी त्यातील एक पक्ष घेतात, यजुर्वेदी दुसरा घेतात व अशा रीतीने होम होतो.) अशी वैदिकी श्रुति आहे. ॥१५॥

गर्भाधानापासून अंत्येष्टीपर्यंत ज्या वर्णाची मंत्राच्या योगाने अनुष्ठाने करावी असे सांगितलेले असेल त्या वर्णासच या शास्त्राचे अध्ययन करण्याचा अधिकार आहे; त्यावाचून दुसर्‍या कोणाचाही नाही असे समजावे. ॥१६॥

सरस्वती व दृषद्वती या दोन देवनद्यांच्यामध्ये जो प्रदेश आहे त्या देवनिर्मित देशास ब्रह्मावर्त असे म्हणतात. ॥१७॥

त्या देशात प्रायः शिष्ट लोकांचाच संभव असल्यामुळे तेथील ब्राह्मणादि संकीर्ण जातीपर्यंत लोकांचा परंपराक्रमाने प्राप्त असा जो आचार तोच सदाचार असे म्हटले आहे. ॥१८॥

कुरुक्षेत्र, मत्स्य देश, कान्यकुब्ज देश व मथुरेच्या आसपासचा प्रदेश हा ब्रह्मर्षि देश ब्रह्मावर्ताहून किंचित कमी योग्यतेचा आहे. ॥१९॥

या कुरुक्षेत्रादि देशात उत्पन्न झालेल्या ब्राह्मणापासून पृथ्वीतील सर्व मनुष्यांनी आपला आपला आचार शिकावा. ॥२०॥

हिमालय व विंध्याद्रि या दोन पर्वतांच्या मध्ये व सरस्वती जेथे गुप्त झाली आहे त्याच्या पूर्वेस व प्रयागाच्या पश्चिमेस जो प्रदेश आहे त्यास मध्यदेश असे म्हटले आहे. ॥२१॥

पूर्वसमुद्रापर्यंत व पश्चिमसमुद्रापर्यंत हिमालय व विंध्य यांच्यामधील जो प्रदेश त्यास ज्ञानी आर्यावर्त असे म्हणतात. (जेथे आर्य पुनःपुनः उत्पन्न होतात तो आर्यावर्त होय) ॥२२॥

ज्या ठिकाणी कृष्णसार मृग स्वभावतःच रहातो (अर्थात बलात्काराने आणून बांधलेला नव्हे) तो यज्ञिय देश होय, अशा देशांवाचून जो देश तो म्लेच्छ देश आहे; तो यज्ञास योग्य नव्हे. ॥२३॥

अन्य देशात उत्पन्न झालेल्याही ब्राह्मणादिकांनी या देशांचा प्रयत्नाने आश्रय करावा. उपजीविकेकरिता पीडित झालेल्या शूद्राने दुसर्‍या कोठेही रहावे. ॥२४॥

या अध्यायाच्या पहिल्या श्लोकापासून येथपर्यंत मी तुम्हांस धर्म-ज्ञानाचे मूळ थोडक्यात सांगितले. तशीच पूर्व या सर्व जगाची उत्पत्तिही सांगितली. आता वर्णधर्म ऐका. येथील वर्णधर्म हा शब्द -

१ उपनयनादि वर्णधर्म.

२. भिक्षा, दंडग्रहण इत्यादि आश्रमधर्म.

३. मुंजानामक गवताची मेखला करावी इत्यादि वर्णाश्रमधर्म.

४. मूर्धाभिषिक्त राजाचे प्रजापालन इत्यादि गौण धर्म व

५. प्रायश्चित्तादिक नैमित्तिक धर्म अशा पाच प्रकारच्या भविष्यपुराणोक्त धर्माचा निर्देश करतो. ॥२५॥

वैदिक, शुभ कर्माच्या (ह्म० मंत्रप्रयोगादिकांच्या) योगाने द्विजांचा गर्भाधानादि शरीरसंस्कार करावा. तो या लोकी व परलोकीही पापक्षयास कारण होतो. ॥२६॥

गर्भाच्या शुद्ध्यर्थ जो होम केले जातात त्यास गार्भ होम म्हणतात. असे गर्भाधानादि होम (अनुष्ठाने) व जातकर्म, चूडाकर्म व मौजीबंधन यांच्या योगाने द्विजाचे बीजसंबंधी व गर्भसंबंधी पाप नाहीसे केले जाते. ॥२७॥

वेदाध्ययन, मधु, मांस वर्ज्य करणे इत्यादि नियम, होम, त्रैविद्याख्य व्रत, ब्रह्मचर्यावस्थेतील देवर्षिपितृतर्पणरूप इज्या, गृहस्थावस्थेईल पुत्रोत्पादन, ब्रह्मयज्ञादि पंचमहायज्ञ व ज्योतिष्टोमादि यज्ञ यांच्या योगाने शरीरावाच्छिन्न आत्मा ब्रह्मप्राप्तीत योग्य केला जातो. ॥२८॥

नाळ कापण्याच्या पूर्वी जातकर्माख्य संस्कार केला जातो. त्यावेळी त्या बालकास स्वगृह्योक्त मंत्रांच्या योगाने सुवर्णाने मध व घृत पाजले जाते. ॥२९॥

त्याचे नाककरण जन्मापासून दहाव्या किंवा बाराव्या दिवशी स्वतः करावे व स्वतः करिता न आल्यास दुसर्‍याकडून करवावे. (दहाव्या दिवशी सुवेर (अशौच) असतो. करिता तो फिटल्यावर अकराव्या दिवशी नामकरण करावे असे व्याख्यान करणे उचित व शंखस्मृतीस धरून आहे) पण या मुख्य काली ते करिता न आल्या पुढे प्रशस्त तिथि, मुहूर्त व गुणयुक्त नक्षत्र यावर ते करावे. ॥३०॥

ब्राह्मणाचे नाव मंगलवाचक, क्षत्रियाचे बलवाचक, वैश्याचे धनसंयुक्त व शूद्राचे निंद्य असावे. शुभ, बल, वसु व दीन हे शब्द मंगलादिकाचे वाचक आहेत. ॥३१॥

ब्राह्मणाचे नाव शर्मशब्दयुक्त, क्षत्रियांचे रक्षायुक्त, वैश्याचे पुष्टियुक्त व शूद्राचे प्रेष्ययुक्त असावे. (जसे - १ विष्णुशर्मा, शिवशर्मा; २ कृष्णवर्मा, देववर्मा, ३ असुभूति, चंद्रगुप्त; व ४ दीनदास, मित्रदा; इत्यादि नावे ठेवावी) ॥३२॥

स्त्रियांची नावे सहज उच्चारता येण्यासारखी; ज्यांचा अर्थ व्यक्त आहे अशी, मनोहर मंगलवाची व दिर्घ स्वरात आणि आशीर्वादवाचक शब्दाने युक्त असावी. (यशोदा, सुभद्रा इत्यादि) ॥३३॥

चवथ्या महिन्यात बालकास जन्मगृहातून सूर्याच्या दर्शनाकरिता बाहेर काढावे. सहाव्या महिन्यात अन्नप्राशन करवावे किंवा कुलधर्माप्रमाणे जे मंगल इष्ट असावे ते करावे. (म्हणजे वर सांगितलेल्या कालाहुन अन्य काळी निष्क्रमण केले तरी चालेल) ॥३४॥

श्रुतीने सांगितले आहे म्हणून सर्व द्विजांचे चूडाकरण पहिल्या किंवा तिसर्‍या वर्षी धर्माकरिता करावे. ॥३५॥

गर्भातील वर्षापासून आठव्या वर्षी ब्राह्मणाचे उपनयन करावे. क्षत्रियांचे गर्भापासून अकराव्या वर्षी व वैश्यांचे बाराव्या वर्षी करावे. ॥३६॥

वेदाध्ययन करणे, त्याचा अर्थ समजणे इत्यादिकांच्या परम उत्कर्षामुळे प्राप्त होणारे जे तेज त्यस ब्रह्मवर्चस असे म्हणतात. ज्या ब्राह्मणास ब्रह्मवर्चस तेजाची इच्छा असते त्याचे पाचव्या वर्षी उपनयन करावे. हत्ती, घोडे इत्यादि राज्यबलाची इच्छा करणार्‍या क्षत्रियाचे गर्भापासून सहाव्या वर्षी करावे. (पाचव्या, सहाव्या व आठव्या वर्षी बालकास इच्छा होणे शक्य नाही. यास्तव त्याच्या पित्याची इच्छा येथे समजणे उचित आहे.) ॥३७॥

ब्राह्मणाचा गर्भापासून सोळा वर्षापर्यंत उपनयनाचा काल जात नाही. बावीस वर्षापर्यंत क्षत्रियाचा व चोवीस वर्षापर्यंत वैश्याचा उपनयनकाल अतिक्रान्त होत नाही. ॥३८॥

यापुढे उक्तकाली ज्यांचा संस्कार झालेला नाही असे ते तिघेही उपनयनहीन, शिष्टांकडून निंदित व व्रात्यसंज्ञक होतात ॥३९॥

या यथाविधि प्रायश्चित्त न करणार्‍या अपवित्र व्रात्यांसह आपत्कालीही कोणी ब्राह्मणाने अध्यापन, कन्यादान इत्यादि संबंध करू नये. ॥४०॥

ब्राह्मण क्षत्रिय व वैश्य ब्रह्मचारी यांनी क्रमाने कृष्णाजिन, रुरुमृगाजिन व बकर्‍यांचे चर्म यांचे उत्तरीय घ्यावे. ताग, अतसी व बकर्‍याची लोकर यांची वस्त्रे त्यांनी क्रमाने नेसावी. ॥४१॥

ब्राह्मणाची मेखळा (कटिदोरा) मोळाची तिपेडी, एकसारखी व मृदु करावी. क्षत्रियाची मूर्वानामक तृणाची धनुष्याच्या दोरीसारखी करावी व वैश्याची तागाच्या दोर्‍यांची करावी. ॥४२॥

मुंजा (मोळ) इत्यादि मुख्य तृण न मिळाल्यास कुश, आपटा व लव्हाळा यांच्या मेखळा कराव्या. ती तिहेरी करून कंबरेत बांधावी व तिला एक, तीन किंवा पाच गाठी माराव्या. ॥४३॥

ब्राह्मणाचे उपवीत (यज्ञोपवीत) कापसाच्या सुताचे, क्षत्रियाचे तागाच्या दोर्‍यांचे व वैश्यांचे बकर्‍याच्या लोकरीच्या धाग्याचे करावे. ते तिपेडी करून त्यास उजवीकडून पीळ घालावा. (येथे जरी नुसते तिपेडी करावयास सांगितले आहे, तरी छान्दोगपरिशिष्ट, देवल इत्यादिकांच्या वचनावरून ते एकदा त्रिवृत करून उजवीकडून पीळ घालून पुन्ह तिहेरी करून त्यास डावीकडून पीळ घालावा व एक गाठ मारावी असे ठरते) ॥४४॥

ब्राह्मणाने बेलाचा किंवा पळसाचा दंड घ्यावा. क्षत्रियाने वडाचा किंवा खैराचा घ्यावा. व वैश्याने अक्रोड व उदुंबर यांचा दंड धर्मार्थ घ्यावा. ॥४५॥

ब्राह्मणाचा दंड प्रमाणतः केसापर्यंत धरावा. क्षत्रियाच्या दंडाचे प्रमाण दंडधारण करणार्‍याच्या ललाटाबरोबर धरावे. व वैश्याच्या दंडाचे प्रमाण नासिकेपर्यंत ठेवावे. ॥४६॥

ते सर्वही दंड सरळ, व्रणरहित, सुंदर दिसणारे, प्राण्यांस भयभीत न करणारे, त्वचायुक्त व अग्नीने दूषित (दग्ध) न झालेले असे असावे. ॥४७॥

आपणास इष्ट असलेला व पूर्वोक्त लक्षणांनी युक्त असा दंड घेऊन, सूर्योपस्थान करून अग्नीस प्रदक्षिणा घालून यथाविधि भिक्षा मागावी. ॥४८॥

ज्याचे उपनयन केले आहे अशा ब्राह्मणाने भिक्षा मागताना "भवति भिक्षां देहि" असे म्हणावे म्हणजे त्याने भवति हा शब्द पूर्वी उच्चारावा. क्षत्रियाने "भिक्षां भवति देहि" असे म्हणावे. व वैश्याने "भिक्षां देहि भवति" असे वाक्य उच्चारावे. ॥४९॥

उपनयनाच्या अंगभूत अशी जी भिक्षा ती प्रथम मातेजवळ, भगिनीजवळ किंवा मावशीजवळ मागावी. अथवा जी या ब्रह्मचार्‍याच "भिक्षा घालीत नाही" असे म्हणून अवमान करणार नाही अशा दुसर्‍या एकाद्या स्त्रीजवळ मागावी (येथे माता नसल्यास भगिनीजवळ, भगिनी नसल्यास मावशीजवळ असा क्रम समजावा) ॥५०॥

आपल्यास पुरे होईल इतके अन्न भिक्षा मागून आणावे व त्यात चांगले अन्न वाईट अन्नाखाली झाकून ठेवणे इत्यादि कपट न करिता गुरूस निवेदन करावे व त्यांची आज्ञा झाली असता आचमन करून पवित्र व्हावे व पूर्वेकडे तोंड करून भोजन करावे. ॥५१॥

ज्याला आयुष्याची इच्छा असेल त्याने पूर्वेकडे तोंड करून, ज्याला यशाची इच्छा असेल त्याने दक्षिणेकडे तोंड करून, लक्ष्मीची इच्छा करणाराने प्रश्चिमेस तोंड करून व सत्याच्या फलाची इच्छा करणाराने उत्तरेकडे तोंड करून भोजन करावे. ॥५२॥

ब्राह्मणाने नित्य म्हणजे ब्रह्मचर्यानंतरही आचमन करून एकाग्रमनाने भोजन करावे. भोजनानंतरही यथाशास्त्र आचमन करावे व जलाने (मस्तकसंबंधी कान, नाक, नेत्र इत्यादि) इंद्रियांस स्पर्श करावा. ॥५३॥

अन्न हे प्राणाकरिता आहे असे सतत चिंतन करावे व त्याची निंदा न करता खावे. अन्नास पाहून आनंदित व्हावे. अन्य निमित्ताने झालेला खेद टाकून प्रसन्न व्हावे व अन्नास पाहून "हे अम्हास सर्वदा असो." असे म्हणून सर्व प्रकारच्या अन्नास प्रणाम करावा. ॥५४॥

कारण, अशाप्रकारे ज्याची पूजा केली आहे असे अन्न सर्वदा सामर्थ्य व वीर्य देत असते पण त्याची पूजा न करता खाल्यास ते त्या दोघांचाही नाश करते. ॥५५॥

आपण भोजन करून राहिलेले उच्छिष्ट अन्न कोणालाही देऊ नये. तसेच मध्यान्ह व सायंकाळी असे दोनदा भोजन करावे. त्या दोन भोजनांच्यामध्ये काही खाऊ नये. दोन वेळ जे भोजन करावयाचे तेही अतिभोजन करू नये व भोजनोत्तर उच्छिष्ट असतानाच कोठे जाऊ नये. ॥५६॥

अति भोजन करणे हे आरोग्यास हितकर नाही, म्हणजे ते रोगास वाढविणारे आहे. आयुष्यास हितकर नाही, म्हणजे ते आयुष्य कमी करते. स्वर्ग मिळवुन देणार्‍या यागादिकांच्या विरोधी असल्यामुळे ते अतिभोजन अस्वर्ग्य (स्वर्ग न देणारे) आहे. ते पुण्यही देत नाही व लोकात हा खादाड आहे अशी निंदा करविणारे म्हणजे लोकविद्विष्ट आहे. यास्तव, अतिभोजनाचा त्याग करावा. ॥५७॥

ब्राह्मणादिकांनी सर्वदा ब्राह्मतीर्थाने आचमन करावे. प्रजापतितीर्थाने किंवा देवतीर्थाने आचमन केले तरी चालेल. पण पितृतीर्थाने ते कधीही करू नये. ॥५८॥

आंगठ्याच्या मूळाच्या खाली ब्राह्मतीर्थ, कनिष्ठिकेच्या मूळाशी प्राजापत्य तीर्थ, अंगुलीच्या अग्रभागी देवतीर्थ व अंगुष्ठ आणि प्रदेशिनी (आंगठ्याजवळचे बोट) यांच्या मध्ये पितृतीर्थ आहे असे विद्वान सांगतात. ॥५९॥

प्रथम ब्राह्मादि तीर्थाने तीन वेळ पाणी पोटात घ्यावे. त्यानंतर दोन्ही ओठ मिटून अंगुष्ठमूलाने दोन वेळा त्यांचे प्रक्षालन करावे. मुखसंबंधी इंद्रिये, ह्रदय व मस्तक यास जलाने स्पर्श करावा. (म्हणजे त्यास पाणी लावावे) ॥६०॥

न तापविलेल्या व फेनरहित अशा जलाच्या योगाने ब्राह्मादितीर्थाने शौचाची इच्छा करणाराने निर्जन अर्थात शुद्ध स्थळी पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून सर्वदा आचमन करावे. ॥६१॥

आचमनाचे जल ह्रदयापर्यंत जाऊन पोचले असता ब्राह्मण शुद्ध होतो. कंठगत जलाने क्षत्रिय पवित्र होतो; ते मुखात प्रविष्ट झाले असता वैश्य शुद्ध होतो. व शूद्र जिव्हा व ओष्ठ यांच्या अग्रास ज्याचा स्पर्श झाला आहे अशा जलाने पवित्र होतो. ॥६२॥

वस्त्र किंवा यज्ञोपवीत जेव्हा डाव्या खांद्यावर व उजव्या हाताच्या खाली असते तेव्हा त्यास उपवीती द्विज म्हणतात. व जेव्हा ते डाव्या हाताच्या खाली व उजव्या खांद्यावर असते तेव्हा त्यास प्राचीनवीती असे म्हणतात. व ते दोन्ही खांद्यावरून जेव्हा कंठामध्ये लोंबत असते तेव्हा निवीती म्हणतात. ॥६३॥

मेखला, अजिन, दंड, उपवीत व कमंडलु यातील काही तुटले, फुटले किंवा फाटले असता त्यास जलामह्ये सोडून स्वगृह्योक्त मंत्रांनी दुसर्‍या नव्या मेखलदिकांचे ग्रहण करावे. ॥६४॥

केशांतनामक गृह्योक्त संस्कार ब्राह्मणाचा गर्भापासून सोळाव्या वर्षी करावा असे सांगितले आहे. क्षत्रियाचा गर्भापासून बाविसाव्या वर्षी व वैश्याचा चोवीसाव्या वर्षी करावा ॥६५॥

स्त्रियांचे जातकर्मादि हे सर्व संस्कार शरीरास संस्कार व्हावा म्हणून यथायोग्य काली व योग्य क्रमाने अमंत्रक करावे. ॥६६॥

विवाहविधि हाच स्त्रियांचा उपनयनास्य संस्कार मन्वादिकांनी मानलेला आहे. पतीची सेवा हाच त्यांचा गुरुकुलवास व गृहकृत्ये हाच सायंप्रातहोम होय ॥६७॥

हा येथवर द्विजांचा उपनयनसंबंधी कर्मसमूह सांगितला. हा दुसर्‍या जन्माचा व्यंजक व पुण्यकारक आहे. आता उपनीत पुत्रांचा कर्मयोग ऐका. ॥६८॥

गुरूने शिष्याचे उपनयन करून त्यास प्रथम पुढे सांगितले जाणारे स्नान, आचमन इत्यादि शौच (आचार), अग्नीत सायंकाळी व प्रातःकाळी करावा लागणारा समिधांचा होम व संध्योपासना शिकवावी. ॥६९॥

अध्ययन करावयास लागणार्‍या शिष्याने प्रथम यथाशास्त्र आचमन करावे; व उत्तरेकडे तोंड करून, हात जोडून व पवित्र वस्त्र नेसून बसलेलया व इंद्रियास जिंकलेल्या शिष्यास गुरूने पढवावे. ॥७०॥

वेदाध्ययनास आरंभ करावयाचा असता व ते संपले असता सदा गुरूचे पाय धरावे व हात जोडून अध्ययन करावे. त्यासच ब्रह्मांजलि असे म्हटले आहे. ॥७१॥

उलट हातांनी गुरूंचे सदा पाय धरावे. उलट हात म्हणजे असे- उताण्या उजव्या हाताने गुरूच्या उजव्या पायास व उताण्या डाव्या हाताने त्यांच्या डाव्या पायास हात लावावा. ॥७२॥

अध्ययनास प्रारंभ करणार्‍या शिष्यास सदा निरलस गुरूने "अधीष्व भोः" म्हणजे" असे म्हण" असे म्हणावे व शेवटी "विरामोस्तु" म्हणजे "पुरे झाले." असे सांगून अध्ययन समाप्त करावे. ॥७३॥

वेदाध्ययनाच्या आरंभी व अंती सर्वदा "ॐ" असे म्हणावे. कारण, पूर्वी ॐ न म्हटल्यास अध्ययन हळू हळू नष्ट होते व शेवटी न म्हटल्यास ते टिकत नाही. ॥७४॥

पूर्वकडे ज्याची अग्रे आहेत अशा दर्भावर बसून दोन्ही हातात दर्भाची पवित्रके घालून तीन प्राणायामांच्या योगाने पवित्र झालेला पुरुष त्यानंतर अध्ययनार्थ ओंकाराचा उच्चार करण्यास योग्य होतो. ॥७५॥

अकार, उकार व मकार या प्रणवाच्या तीन अवयवास बभ्रू, भुवर आणि स्वर या तीन व्याह्रतीस क्रमाने ऋग्वेद, यजुर्वेद व सामवेद या तीन वेदातून काढिता झाला. ॥७६॥

त्याचप्रमाणे तीन वेदांपासून "तत्सवितुः०" इत्यादि सावित्री ऋचेचा एक एक पाद तो परमस्थानी रहाणारा ब्रह्मदेव काढिता झाला. ॥७७॥

हे "ॐ" अक्षर व तीन व्याह्रतींस ही सावित्री यांचा दोन्ही संध्यासमयी जप करणारा वेदवेत्ता ब्राह्मण तीन वेदांच्या अध्ययनाच्या पुण्याने युक्त होतो. ॥७८॥

ॐ, व्याह्रति व सावित्री या त्रिकाचा गावाच्या बाहेर नदीचे तीर, अरण्य इत्यादि स्थळी बसून जो ब्राह्मण रोज सहस्त्र जप करतो तो एका महिन्यात सर्प जसा कात टाकून मुक्त होतो त्याप्रमाणे महापातकापासूनही मुक्त होतो ॥७९॥

संध्यासमयी व दुसर्‍या वेळीही या सावित्री ऋचेचा जो जप करीत नाही व योग्य समयी आपली सायंप्रातर्होमादि क्रिया करीत नाही असा ब्राह्मण, क्षत्रिय किंवा वैश्य सज्जनांमध्ये निंदेस पात्र होतो. ॥८०॥

ॐकारपूर्वक तीन अक्षय महाव्याह्रुति व त्रिपदा सावित्री हे वेदांचे मुख आहे. कारण, यांच्यापासूनच वेदाध्ययनास आरंभ होत असतो. किंवा हे परमात्मप्राप्तीचे द्वार आहे. ॥८१॥

जे प्रतिदिनी आळस न करिता एकसारखी तीन वर्षे यांचा जप करितो तो परब्रह्माच्या संमुख जातो. वायूप्रमाणे कामचारी होतो. व ब्रह्मरूपी बनतो. ॥८२॥

ॐ हे अक्षर परब्रह्म आहे. (कारण, ब्रह्मप्राप्तीचे साधन आहे.) प्रणव, व्याह्रति व शिरयुक्त सावित्री यांची तीन वेळ आवृत्ति करून प्राणायाम करणे हे चांद्रायणादिकाहून श्रेष्ठ तप आहे. सावित्रीहून दुसरा कोणताही श्रेष्ठ मंत्र नाही. मौनापेक्षा सत्यवाणीची योग्यता अधिक आहे. ॥८३॥

वेदविहित सर्व होमयागादिरूप क्रिया स्वरूपतः व फलतःही नाश पावणार्‍या आहेत. म्हणजे त्या स्वतः नाशिवंत आहेत व त्यांचे स्वर्गादि फलही नाशिवंत आहे. पण प्रणवरूप अक्षर ब्रह्मप्राप्तीचे साधन असल्यामुळे फलद्वारा अक्षय्य आहे असे समजावे. पण ते ब्रह्मप्राप्तीचे साधन कसे म्हणून म्हणाल तर सांगतो. प्रजांचा अधिपति असे जे ब्रह्म तोच हा ॐकार आहे. (ब्रह्मप्रतिपादक असल्यामुळे ते अक्षर ब्रह्म आहे) ॥८४॥

दर्शपौर्णिमासादि विधियज्ञाहून या प्रणवादिकांचा जपयज्ञ दसपट अधिक आहे. पण तोच जप उपांशु केल्यास शतपट अधिक होतो. (जवळ बसलेल्यांसही ऐकू न जाणे हे उपांशू जपाचे लक्षण आहे.) व मानस जपाचे फल सहस्त्रपट अधिक मिळते. (जिव्हा व ओठ यांस यत्किंचितही न हालविता जप करणे हे मानस जपाचे चिन्ह आहे.) ॥८५॥

वैश्वदेवहोम, बलिकर्म, नित्यश्राद्ध व अतिथिभोजन हे जे चार पाकयज्ञ ते दर्शपौर्णिमासादि विधियज्ञांसह, जपयज्ञाच्या सोळाव्या कलेचीही बरोबरी करू शकत नाहीत. म्हणजे पाकयज्ञ व विधियज्ञ यातील एकासही जपयज्ञाची योग्यता नाही. ॥८६॥

ब्राह्मणजपाच्या योगानेच उत्तम सिद्धीस (मोक्षास) पात्र होईल; यात काही संशय नाही. तो दुसरे वैदिकयागादि कर्म करो कि न करो. कारण, सर्व भूतांशी मित्रत्वाने रहाणारा पुरुष ब्रह्माचा संबंधी होतो. ब्रह्मामध्ये लीन होतो असे वेदामध्ये म्हटले आहे. ॥८७॥

सारथि जसा रथास जोडलेल्या घोड्यांचे नियमन करण्याविषयी प्रयत्न करितो त्याप्रमाणे विषय क्षणभंगुर आहेत इत्यादि जाणणार्‍या पुरुषाने आपल्याकडे ओढून नेणार्‍या विषयांचे ठयी रहाणार्‍या इंद्रियांचे नियमन करण्याविषयी यत्न करावा. ॥८८॥

पूर्वीच्या ज्ञानी पुरुषांनी जी अकरा इंद्रिये सांगितली आहेत ती आधुनिकांच्या ज्ञानाकरिता मी संपूर्णपणे त्यांच्या नावांसह व कर्मांसह क्रमाने सांगतो. ॥८९॥

श्रोत्र, त्वक, नेत्र, रसना व पाचवे घ्राण, वाक, पाणी, पाद, पायु व दहावे उपस्थ होय. ॥९०॥

या दहा इंद्रियातील श्रोत्रादिक जी पहिली पांच इंद्रिये ती ज्ञानाची साधने असल्यामुळे ज्ञानेंद्रिये होत. व वागादि जी क्रमाने दुसरी पाच इंद्रिये सांगितली आहेत ती भाषण करणे इत्यादि कर्माची साधने असल्यामुळे कर्मेंद्रिये होत, असे इंद्रियवेत्ते सांगतात. ॥९१॥

अकरावे इंद्रिय मन होय असे जाणावे. ते आपल्या संकल्पगुणाने वर सांगितलेल्या दोन्ही इंद्रियांच्या गणांचे प्रवर्तक आहे. म्हणून एक मन जिंकले असता इंद्रियांचे हे दोन्ही समूह जिंकल्यासारखे होतात. ॥९२॥

इंद्रिये विषयांचे ठायी आसक्त झाली असता दृष्ट व अदृष्ट दोष निःसंशय प्राप्त होतात. पण तेच त्यांचे उत्तम प्रकारे नियमन केले असता मोक्षादि पुरुषार्थांची योग्यता हीच सिद्धि प्राप्त होते. ॥९३॥

विषयांच्या उपभोगाने काम कधीही शांत होत नाही. तर तो घृतादि हवीने जसा अग्नि (वाढतो) तसा उत्तरोत्तर वाढतो. ॥९४॥

जो या सर्व विषयांस प्राप्त होतो व जो या सर्वांची उपेक्षा करतो त्यांतील उपेक्षा करणारा पुरुष श्रेष्ठ होय. यास्तव सर्व इष्ट मनोरथांची प्राप्ति करून घेण्यापेक्षा त्यांचा परित्याग करणे अधिक प्रशस्त आहे. ॥९५॥

विषयांमध्ये आसक्त झालेल्या या इंद्रियांचे सर्वदा त्यांच्या क्षणिकत्वादि दोषांच्या ज्ञानाने (चिंतनाने) जसे नियमन होते तसे त्यांचे केवल सेवन न केल्याने म्हणजे त्यांचा सहवास सोडल्याने होत नाही. ॥९६॥

वेदाध्ययन, दान, यज्ञ, नियम व तप, विषयसेवनाविषयी संकल्प करणे हेच ज्याचे शील होऊन बसले आहे अशा पुरुषास कधीही फलसिद्धि देत नाहीत. ॥९७॥

आपली स्तुति किंवा निंदा ऐकून मऊ किंवा खरबरीत वस्त्रास किंवा पदार्थास स्पर्श करून, मधुर किंवा नीरस पदार्थ खाऊन, सुगंध किंवा दुर्गंध यांचा वास घेऊन ज्यास हर्ष व खेद होत नाही तो जितेंद्रिय होय असे समजावे. ॥९८॥

सर्व इंद्रियांपैकी जर एकादेही इंद्रिय विषयाभिमुख झाले तर त्या विषयी पुरुषाचे तत्त्वज्ञान दुसर्‍या इंद्रियांच्या द्वाराही क्षीण होते. चामड्याच्या पाण्याच्या पिशवीतून एकाच छिद्राच्या द्वारा जसे पिशवीतील सर्व ठिकाणचे पाणी गळून जाते तसाच या ज्ञानाचा प्रकार होतो. यास्तव, एकाद्याही इंद्रियास विषयी होऊ देऊ नये. ॥९९॥

बाह्य इंद्रियसमूहास आपल्या वश करून व तसेच मनाचे नियमन करून सर्व पुरुषार्थांस उपायांच्या योगाने सिद्ध करून घ्यावे; पण शरीरास पीडा देऊन उपायांचे अनुष्ठान करू नये. ॥१००॥

प्रातःसंध्यासमयी सूर्यदर्शन होईतो सावित्रीचा जप करीत उभे रहावे व सायंसंध्येचे वेळी नक्षत्रांचे चांगले दर्शन होईतो सावित्रीचा जप करीत बसावे. ॥१॥

प्रातःसंध्येच्या वेळी उभा राहून जप करणारा पुरुश रात्री केलेल्या पापाचा नाश करितो व सायंसंध्येच्या वेळी बसून जप करणारा पुरुष दिवसा घडलेल्या पापाचा नाश करितो (येथे अज्ञानाने घडलेल्या पापाचा नाश होतो असे समजणेच सयुक्तिक व योग्य आहे.) ॥२॥

जो पूर्वसंध्येच्या वेळी उभा राहून जप करीत नाहा व पश्चिमसंध्येचीही उपासना करीत नाही त्यास सर्व अतिथिसत्कारादि द्विजकर्मापासूनही बहिष्कृत करावे. (यावेळी हा नियम पाळावयाचा असे कोणी अधिकारी पुरुषाने मनात आणले तर ब्राह्मण म्हणविणारांपैकी बहिष्कृत झाल्यावाचुन कितीसे राहतील याची कल्पना करवत नाही) ॥३॥

अरण्यादि निर्जन प्रदेशी जाऊन नदी इत्यादि जलाचे समीप बसून इंद्रियाचे नियमन करून एकाग्रमनाने ब्रह्मयज्ञरूप नित्यविधि करण्याची इच्छा करणाराने पूर्वोक्त प्रणवव्याह्रतियुक्त सावित्रीचेही पठन करावे. पुष्कळ (वेदाध्ययन करण्यास जेव्हा कर्ता समर्थ नसेल तेव्हाचे हे विधान आहे) ॥४॥

वेदाची अंगे (शिक्षा, कल्प इत्यादि) नित्य ब्रह्मयज्ञरूप स्वाध्याय व होमाचे मंत्र यास अनाध्यायाच प्रतिबंध नाही. (म्हणजे अनध्याय असेल तेव्हाहि या वरील अंगादिकांचा पाठ करण्यास हरकत नाही.) ॥५॥

पूर्वोक्त नित्य जपयज्ञास अनध्याय नाही. कारण, मन्वादिकांनी त्यास ब्रह्मसत्र म्हटले आहे ( जे अनुष्ठान सतत होते त्यास सत्र म्हणतात) या सत्रात ब्रह्म म्हणजे वेद या आहुतीचेच हुत झालेले असते म्हणजे वेदाध्ययन हीच येथील आहुती आहे व सत्रांत जसा वषट्‍कार सतत होत असतो तसे येथे अनध्यायाच्या दिवशी होणारे अध्ययन आहे. ॥६॥

जो एक वर्षभरही इंद्रियांचे नियमन करून व शुद्ध होऊन विहित अंगासह स्वाध्याय करतो त्याचा हा जपयज्ञ क्षीर, दधि, मधु व घृत ही देतो. म्हणजे तो क्षीरादिकांच्या योगाने देव व पितर यांना संतुष्ट करतो. ॥७॥

ज्याचे उपनयन केले आहे अशा ब्राह्मणाने सायंप्रातःसमिधांचा होम, भिक्षासमूह आणणे, भूमीवर शयन करणे, गुरूस पाणी वगैरे आणून देणे इत्यादि समावर्तन होई तो करावे. ॥८॥

आचार्यांचा पुत्र, शुश्रुषा करणारा, दुसरे एकादे ज्ञान देणारा, धर्मज्ञ, मृत्तिका, पाणी इत्यादिकांनी पवित्र, बांधव, ग्रहण व धारण करण्यास समर्थ, धन देणारा, हिताची इच्छा करणारा व आपल्या ज्ञातीचा अशा दहाजणांस धर्मदृष्टीने शिकवावे. ॥९॥

जर दुसर्‍या कोणी कमी अक्षरे म्हटली किंवा स्वर बरोबर न म्हटला तर त्याचे तत्त्व विचारल्यावाचून कोणास सांगू नये (शिष्याने मात्र जरी विचारले नाही तरी त्यास सांगावे). भक्ति, श्रद्धा इत्यादि प्रश्नाचे जे धर्म आहेत त्यांचे उल्लंघन करणे हा अन्याय होय. अशा अन्यायाने कोणी विचारू लागल्यास त्यासही सांगू नये. जाणत असतानाही शहाण्याने मुक्यासारखा व्यवहार करावा. ॥११०॥

अधर्माने प्रश्न केलेला असाही जो कोणी ज्यास सांगतो व जो अन्यायाने ज्यास विचारितो त्यातील जो मर्यादा सोडणारा असेल तो मरतो. किंवा त्याच्याशी त्याचा द्वेष करतो. ॥११॥

ज्या शिष्यामध्ये धर्म व अर्थ हे दोन्ही नसतात व अध्ययनरूप सेवाही जो करीत नाही त्यास शुभ्र बीज माळजमिनीवर पेरण्याप्रमाणे विद्या शिकवू नये. (कारण, ती माळ जमिनीवर पेरलेल्या बीजाप्रमाणे व्यर्थ होणार हे ठरलेलेच आहे.) वेदाचे अध्ययन करणाराने विद्येसह खुशाल मरावे पण योग्य शिष्य न मिळाल्यास आपत्कालीही ती अयोग्य शिष्यास देऊ नये. तिला अयोग्य जागी पेरू नये. ॥१२-१३॥

विद्येची अधिष्ठात्री देवता वेदाध्यापक ब्राह्मणाजवळ येऊन त्यास म्हणाली 'मी तुझा निधि आहे. यास्तव, तू माझे रक्षण कर. असूयादि दोषांनी युक्त असलेल्या शिष्यास मला देऊ नको म्हणजे मी अतिशय वीर्ययुक्त होईन. ॥१४॥

जो पवित्र व जितेंद्रिय शिष्य आहे असे तुला माहीत असेल त्या विद्यारूप निधीचे रक्षण करणार्‍या प्रमादरहित पुरुषास माझे अर्पण कर' ॥१५॥

जो अभ्यासार्थ अध्ययन करणार्‍यापासून किंवा दुसर्‍या कोणास शिकवीत असता त्याच्यापासून शिकविणार्‍याच्या अनुमोदनावाचून वेदाचे ग्रहण करतो तो वेदाची चोरी करणारा नरकास जातो. (यास्तव असे करू नये) ॥१६॥

अर्थशास्त्रादि लौकिक ज्ञान, वेदार्थज्ञान व ब्रह्मज्ञान ही पुरुष ज्याच्यापासून घेतो त्यास अनेक मान्य लोकांच्या समुदायामध्ये त्याने प्रथम वंदन करावे. पण जेथे ही तिन्ही ज्ञानदाते असतात तेथे अगोदर ब्रह्मज्ञानाच्या उपदेशकास, नंतर वेदार्थ सांगणार्‍यास व त्यानंतर अर्थशास्त्राचार्यास वंदन करणे प्रशस्त आहे. ॥१७॥

शास्त्राप्रमाणे आचरण करणार्‍या ब्राह्मणाला केवळ गायत्रीच जरी येत असली तरी तो मान्य आहे. पण जो शास्त्राप्रमाणे चालत नसून हवे ते खाणारा व पाहिजे ते (निषिद्ध) विकणारा आहे तो तीन वेदांस जाणणारा जरी असला तरी मान्य नाही. ॥१८॥

विद्या, वय व मान यांनी जो श्रेष्ठ (गुरु) आहे, तो ज्या शय्येवर निजला असेल किंवा ज्या आसनावर बसला असेल त्याच्यावर आपण त्याच्या समक्षही बसू नये. व स्वतः आसनावर बसले असता गुरु आल्यास उठून अभिवादन करावे. ॥१९॥

कारण, वृद्ध आला असता तरूणाचे प्राण देहांतून बाहेर जाण्याचि इच्छा करतात. पण वृद्धास उत्थापन दिल्याने व वंदन केल्याने ते पुन्हा सुस्थ होतात. ॥२०॥

याप्रमाणे उठून सदा वृद्धांस अभिवादन करणार्‍या व त्यांची सेवा करणार्‍या विद्यार्थ्याची आयुष्य, विद्या, यश व बल ही चार अतिशय वाढतात. ॥२१॥

वृद्धांस अभिवादन करणार्‍या विप्रादिकाने "अभिवादये ह्म० नमस्कार करतो" या शब्दाच्या उच्चारानंतर "मी अमुक आहे" असे आपले नाव सांगावे ॥२२॥

उच्चारिलेल्या नामशब्दाचा अर्थ ज्या (संस्कृत न जाणणार्‍या) वृद्धास समजत नसेल त्यास अभिवादन करणार्‍या शहाण्याने "मी नमस्कार करितो" इतकेच म्हणावे. सर्व स्त्रियांनीही तसेच करावे ॥२३॥

अभिवादनामध्ये जे नाव योजलेले असते त्याच्या शेवटी "भोः" असा शब्द उच्चारावा. कारण, "भोः" असा शब्द असणे हे ज्यास नमस्कार करावयाचा असतो त्याच्या नावाचे स्वरुपच होय असे ऋषि म्हणतात. ॥२४॥

अभिवादन केले असता "आयुष्यमान्‍ भव सौम्य म्हणजे हे प्रियदर्शना, तू आयुष्यमान हो" असे आशीर्वाद देणाराने ब्राह्मणादिकास म्हणावे व अभिवादन करणाराच्या नावाच्या शेवटी जो अकारादि स्वर असेल त्यास प्लुत उच्चारावे. ॥२५॥

जो ब्राह्मण अभिवादनाचे योग्य प्रत्युत्तर जाणत नाही त्यास विद्वानाने पूर्वोक्त विधीने अभिवादन करू नये. कारण, जसा शूद्र तसाच तो अभिवादन करण्यास अयोग्य होय. ॥२६॥

समागम झाला असता अभिवादन करणार्‍या लहान किंवा ते न करणार्‍या समानवयस्क ब्राह्मणास कुशल विचारावे; क्षत्रियास अनामय विचारावे; वैश्यास क्षेम विचारावे व शूद्रास आरोग्य विचारावे. ॥२७॥

ज्याने यज्ञादिकाची दीक्षा घेतली आहे तो पुरुष वयाने जरी लहान असला तरी दीक्षा घेतल्यापासून कर्म समाप्त होईतो त्यास (अभिवादनसमयी प्रत्युत्तर देताना किंवा अन्य प्रसंघी) नावाने हाक मारु नये तर अहो, आपण, इत्यादि शब्द पूर्वी योजून दीक्षित, यजमान इत्यादि बहुमानवाचक शब्दांनीच त्याच्याशी बोलावे. ॥२८॥

जी परस्त्री असेल व जिच्याशी आपला काही योनितः संबंध नसेल तिला बाई, सुभगे व भगिनि असे म्हणावे. ॥२९॥

मातुल, पितृव्य, श्वशुर, ऋत्विज व गुरु हे कनिष्ठ असल्यास ते येताच आसनावरून उठून हा मी आहे असा नावाचा निर्देश करावा. (त्यास नमस्कार करू नये) ॥१३०॥

मावशी, मामी, सासू व आते या गुरुपत्नीप्रमाणे पूज्य आहेत. कारण, त्या गुरुभार्येच्या बरोबरीच्याच आहेत. ॥३१॥

भ्रात्याच्या सजातीय श्रेष्ठ स्त्रीच्या पायांवर रोज मस्तक ठेवावे. व पितृपक्षाकडील पितृव्यादि ज्ञातीचे लोक, मातृपक्षाकडील व श्वशुरादि संबंधी यांच्या स्त्रियांस प्रवासातून आल्यावर वंदन करावे; रोज करण्याचे कारण नाही. ॥३२॥

वयाने मोठी असणारी आते, मावशी व आपली बहीण यांच्या ठायी मातेसारखी वृत्ति ठेवावी. पण माता त्या सर्वांहून श्रेष्ठ आहे. ॥३३॥

एका ग्रामात राहणार्‍या लोकांचे दशाब्दसंज्ञक सख्य होते. गायनादि कला जाणणारांचे पंचाब्दाख्य सख्य होते. (ह्म० एका गावातील विद्यादि गुणरहित पुरुषांच्यावयामध्ये दहा वर्षांचे अंतर असल्यास त्यांचे सख्य होते. त्याहून अधिक अंतर असल्यास मात्र होत नाही. गायनादि कलाज्ञ लोकांच्या वयामध्ये पाच वर्षांचे अंतर असल्यास सख्य होते. त्याहून अधिक असल्यास होत नाही.) श्रोत्रियांचे तीन वर्षांच्या आत अंतर असल्यास सख्य होते. व आपल्या कुलातील लोकांशी थोड्या कालाचे अंतर असल्यासच सख्य होते. ॥३४॥

दहा वर्षाचा ब्राह्मण व शंभर वर्षाचा क्षत्रिय हे पितापुत्रासारिखे आहेत असे समजावे. त्यातील ब्राह्मण हा पिता होय. ॥३५॥

न्यायाने मिळविलेले धन, पितृव्यादि बांधव, वय, श्रौतस्मार्त कर्म व विद्या (वेदार्थतत्त्वज्ञान) ही पाच मान्य होण्याची कारणे आहेत. व यातील उत्तरोत्तर श्रेष्ठ आहे. म्हणजे विद्या सर्वात श्रेष्ठ, कर्म वित्तादि तिघांहून श्रेष्ठ, वय वित्त व बंधु याहून श्रेष्ठ व बंधु वित्ताहून श्रेष्ठ होय. ॥३६॥

पण ब्राह्मणादि तीन वर्णातील ज्याच्यामध्ये या पाच साधनातील पूर्वीचीही अधिक. साधने असतील तो पुढच्या एखाद्या साधनाने युक्त असलेल्या पुरुषाहून मान्य होय. - जसे- वित्त व बंधु यांनी युक्त असलेला केवल वयोवृद्धाहून श्रेष्ठ आहे. वित्तादि तीन साधनांनी जो युक्त असतो तो केवल कर्मठाहून श्रेष्ठ आहे. व वित्तादि चार साधनांनी संपन्न असणारा विद्वानाहून मान्य आहे. नव्वद वर्षाहून अधिक वयाचा शूद्रही द्विजांच्या मानास पात्र आहे. ॥३७॥

रथादि यानावर आरूढ झालेल्यास, नव्वद वर्षाहून अधिक वयाच्या पुरुषास, रोग्यास, भाराने पीडित झालेल्यास, स्त्रीस, ज्याचे नुकतेच समावर्तन झाले आहे अशास, देशाच्या अधिपास व विवाह करावयास निघालेल्या वरास आपण एकीकडे सरून मार्ग द्यावा. ॥३८॥

ते सर्व एकत्र मिळाले असता देशाधिप व ज्याचे नुकतेच समावर्तन झाले आहे असा स्नातक हे दोघे मान्य आहेत. व त्या दोघांमध्येही राजापेक्षा स्नातक अधिक मान्य होय. ॥३९॥

जो ब्राह्मण शिष्याचे उपनयन करून त्यास यज्ञविद्या व उपनिषद यांसह वेद शिकवितो त्यास आचार्य असे पूर्वीचे मुनि म्हणतात. ॥१४०॥

जो वेदाचा एक भाग व वेदरहित व्याकरणादि अंगे आपल्या निर्वाहार्थ शिकवितो तो उपाध्याय होय. ॥४१॥

जो (अर्थात पिता) गर्भाधानादि संस्कारकर्मे यथाशास्त्र करितो व अन्न घालून वाढवितो त्या ब्राह्मणास गुरु असे म्हणतात. ॥४२॥

आहवनीयादि जे अग्न्युत्पादक कर्म त्यास अग्न्याधेय म्हणतात. ते, अष्टकादि पाकयज्ञ व ज्योतिष्टोमादि यज्ञ ही कृत्ये यजमानाने वरिले असता जो करितो त्यास या शास्त्रामध्ये ऋत्विज असे म्हणतात. ॥४३॥

जो दोन्ही कान स्वर, वर्ण इत्यादिकांच्या द्वारा होणार्‍या वैगुण्याने रहित म्हणजेच सत्यरूप अशा वेदाच्या योगाने भरतो तो माता व पिता आहे असे समजावे. वेदाचे ग्रहण केल्यावर त्याचा द्रोह करू नये. ॥४४॥

दहा उपाध्यायांच्या अपेक्षेने आचार्य, शंभर आचार्यांच्या अपेक्षेने पिता व सहस्त्र पित्यांच्या अपेक्षेने माता श्रेष्ठ आहे. (येथे आचार्य शब्दाचा- उपनयनपूर्वक केवल सावित्रीचा उपदेश करणारा-एवढाच अर्थ समजावा.) ॥४५॥

उत्पादक व ब्रह्मदाता यांच्यामध्ये ब्रह्मदाता श्रेष्ठ होय. (पिता व आचार्य हे दोघेही निरनिराळे जन्म देणारे असल्यामुळे जनक आहेत.) कारण, ब्राह्मणाचा वेदाध्ययानार्थ जो उपनयनसंज्ञक ब्रह्मजन्म तो या लोकी व परलोकीही नित्य आहे. ॥४६॥

माता व पिता ही परस्पर कामवश होऊन बालकास जो जन्म देतात तो त्याचा जन्म पश्वादिसाधारण आहे. कारण, पश्वादिकांप्रमाणेच मातेच्या गर्भाशयात याची अंगे व प्रत्यंगे वृद्धि पावतात. ॥४७॥

पण वेदामध्ये पारंगत झालेला आचार्य, यास जो जन्म यथाशास्त्र सावित्रीच्या उपदेशाने देतो तो जन्म सत्य, अजर व अमर असतो. (अर्थात मातापित्यांनी दिलेल्या पशुसाधारण जन्माप्रमाणे हा जन्म नाशिवंत नसतो.) ॥४८॥

जो उपाध्याय ज्या शिष्यावर थोडे किंवा फार शिकवून उपकार करतो तोहि त्या विद्यारूपी उपकाराच्या योगाने त्याचा गुरु आहे असे जाणावे. ॥४९॥

उपनयनरूप जन्माचा कर्ता व आपल्या धर्माचा उपदेश करणारा असा एखादा जरी बालक असला तरी तो वृद्धाचा धर्मतः पिता होतो. ॥१५०॥

अंगिरसाचा विद्वान पुत्र, त्याचे पितृव्य व वडील चुलतभाऊ यांस वेदाध्ययन सांगता झाला व ज्ञानाच्या द्वारा त्यांचा शिष्यभावाने स्वीकार करून 'हे पुत्रहो' असे त्यास म्हणाला. ॥५१॥

ते ऐकून पितृतुल्य अशा त्यास राग आला व त्यांनी त्या शब्दाचा अर्थ देवास विचारला. तेव्हा सर्व देवांनी मिळून "तुम्हाला त्याने 'पुत्रहो' अशी जी हाक मारिली ती योग्यच होय" असे सांगितले. ॥५२॥

कारण, जो अज्ञ असतो तोच बालक; व मंत्रात्मक वेद सांगणारा पिता होय. कारण, पुर्वमुनींनीही त्यास बालक असे व वेद सांगणारास पिता असे म्हटले आहे. ॥५३॥

पुष्कळ वर्षे, पिकलेले केस, विपुल धन व अनेक पितृव्यादि बांधव यातील एकाद्याच्या किंवा सर्वांच्या योगाने कोणासही महत्व मिळत नाही. तर ऋषींनी हा धर्म करून ठेविला आहे की जो सांग वेद शिकविणारा तो आम्हास मोठा म्हणून मान्य आहे. ॥५४॥

ब्राह्मणांस विद्येच्या योगाने, क्षत्रियांस वीर्याने, वैश्यास धान्य, वस्त्र इत्यादि धनाच्या योगाने व शूद्रास जन्माच्या योगाने श्रेष्ठत्व प्राप्त होते. ॥५५॥

याच्या मस्तकावरील केस पिकले आहेत एवढ्याच कारणाने कोणी वृद्ध होत नाही तर जो तरुण असूनही विद्वान असतो त्यास देव वृद्ध असे समजतात. ॥५६॥

जसा काष्ठाचा हत्ती, चामड्याचे हरण व अध्ययन न करणारा ब्राह्मण हे तिघेही केवल नामधारक आहेत. (कारण, त्यांच्या हातून नावाप्रमाणे कृति होणे शक्य नाही.) ॥५७॥

जसा षंढ स्त्रियांचे ठायी निष्फळ ठरतो, गाय गायीच्या ठायी निरुपयोगी असते; व अज्ञास दिलेले दान निष्फळ होते, त्याप्रमाणे अध्ययन न करणारा ब्राह्मण निष्फळ होय. ॥५८॥

शिष्याच्या कल्याणार्थ जे अनुशासन करावे लागते ते अतिशय पीडा होईल असे करू नये व धर्माची इच्छा करणार्‍या गुरूने प्रीति उत्पन्न करणारी, व नम्र वाणी शिष्याच्या शिक्षेकरिता योजावी. ॥५९॥

ज्याची वाणी व मन ही दोन्ही असत्य भाषण व रागद्वेषादि य दोषांनी रहित असल्यामुळे शुद्ध आहेत व ती निषिद्ध व्यवहारापासून उत्तम प्रकारे सतत सुरक्षित आहेत त्यास वेदान्तात सांगितलेले सर्व फल प्राप्त होते. ॥१६०॥

आपणास जरी कोणी दुःख दिलेले असले तरी आपण त्यांचा मर्मभेद करू नये. दुसर्‍यास अपकार होईल असे कर्म व संकल्प ही दोन्ही टाकावी. आपल्या ज्या वाणीच्या योगाने दुसर्‍यास पीडा होईल अशी मर्मभेदक व उत्तमलोकप्राप्तीच्या विरुद्ध असलेली वाणी बोलू नये. ॥६१॥

ब्राह्मणाने विषाप्रमाणे समानास सतत भ्यावे; व अमृताप्रमाणे अपमानाची सदा इच्छा करावी. ॥६२॥

कारण, दुसर्‍याने अपमान केला असता त्या विषयी खेद न करणारा सुखाने झोप घेतो; सुखाने जागा होतो व सुखाने या लोकी व्यवहार करितो. पण अपमान करणारा त्या पापाने नाश पावतो ॥६३॥

क्रमाने सांगितलेल्या या जातकर्मादि उपनयनान्त संस्कारांच्या योगाने सुसंस्कृत झालेल्या द्विजाने गुरुकुली राहून हळु हळु वेदग्रहणार्थ पूर्वी सांगितलेल्या व पुढे सांगितल्या जाणार्‍या तपाचे अनुष्ठान करावे. ॥६४॥

द्विजाने अनेक प्रकारच्या शास्त्रोक्त नियमांच्या योगाने उपनिषदांसह मंत्रब्राह्मणात्मक वेद पढावा ॥६५॥

तप करणार्‍या द्विजाने सतत वेदाचाच अभ्यास करावा. कारण, वेदाभ्यास हेच ब्राह्मणाचे या लोकचे परम तप म्हणून मुनींनी म्हटले आहे. ॥६६॥

जो द्विज ब्रह्मचारिव्रताचा त्याग करून गळ्यात माळ घालूनही यथाशक्ति प्रतिदिनी वेदाध्ययन करितो तो चरणनखापर्यंत म्हणजे सर्व शरीरात व्यापून असणारे परम तपच करितो. ॥६७॥

जो द्विज वेदाचे अध्ययन न करिता दुसर्‍या शास्त्रामध्ये श्रम करितो तो जीवंतपणीच पुत्रपौत्रादिकांसहवर्तामन तात्काल शूद्रत्वास प्राप्त होतो. (वेद न पढता स्मृति व वेदांची व्याकरणादि अंगे शिकली तरी फारसा विरोध नाही असे शंखलिखितांच्या वचनाचा आधार देऊन कुल्लूकभट्टांनी टिकेत सांगितले आहे.) ॥६८॥

मातेपासून पुरुषाचा प्रथम जन्म होतो. उपनयनामध्ये दुसरा जन्म होतो व वेदामध्ये सांगितलेले असल्यामुळे ज्योतिष्टोमादि यज्ञदीक्षेमध्ये द्विजाचा तिसरा जन्म होतो. ॥६९॥

त्या तीन जन्मांपैकी वेदाध्ययनार्थ मौजीबंधन या चिन्हाने युक्त असलेला जो हा उपनयनसंस्कार (ह्म० दुसरा जन्म) त्यात या बालकाची सावित्री माता व आचार्य पिता होय असे सांगितले आहे. ॥१७०॥

वेदाध्ययन सांगितल्यामुळे आचार्यास मन्वादि ज्ञानी पिता असे म्हणतात. (पित्याप्रमाणे आचार्य महाउपकार करीत असल्यामुळेल त्यास गुणतः पिता असे म्हणतात.) कारण, मौजीबंधन होई तो त्या बालकाशी कोणत्याही श्रौतस्मार्त कर्माचा संबंध येत नाही. (म्हणजे त्यास त्यांचा अधिकार नसतो.) ॥७१॥

श्राद्धाच्या उपयोगी असे जे मंत्र आहेत. त्यास सोडून बाकी कोणत्याही मंत्राचा उच्चार उपनयनाच्या पूर्वी करवू नये. कारण, द्विजबालकही जो पर्यंतही वेदाध्ययनार्थ दुसरा जन्म घेत नाही. तोपर्यंत तो शूद्रासारिखाच असतो.॥७२॥

कारण, या बटूस "दिवसा निजू नको", समिधेचा होम कर" इत्यादि व्रतोपदेश व वेदाचे क्रमाने अध्ययन ही ज्याचे यथाविधि उपनयन झाले आहे त्यासच सांगितलेली आहेत. (तस्मात, उपनयनापूर्वी वेदाक्षराचा उच्चार करू नये.) ॥७३॥

ज्या ब्रह्मचार्‍यास जे चर्म, सूत्र, मेखला, दंड व वस्त्रे ही उपनयनसमयी गृह्यसूत्राने सांगितली असतील त्यास तीच गोदानसमयी नवी द्यावी. ॥७४॥

गुरूंच्या जवळ रहाणार्‍या ब्रह्मचार्‍याने इंद्रियांचा संयम करून आपल्या तपाच्या वृद्ध्यर्थ या पुढच्या नियमांचे अनुष्ठान करावे. ॥७५॥

नित्य स्नान करून पवित्र होऊन देव, ऋषि व पितर यांस उदकदान (तर्पण) करावे. हरिहरादि देवांच्या प्रतिमांचे पूजन करावे व सायंप्रातर्होम करावा. ॥७६॥

मध व मांस यांस भक्षण करू नये. कापूर, चंदन, कस्तूरी इत्यादि सुगंधांचा त्याग करावा. माळा घालू नयेत. गुडादि उष्ण रसांचे सेवन करू नये. स्त्रीसमागम करू नये. जे पदार्थ स्वभावतः मधुर असून कालवशात किंवा जलामध्ये राहिल्याने आंबट होतात त्यांस हुक्त असे म्हणतात. त्यांस खाऊ नये. व प्राण्यांची हिंसा करू नये. ॥७७॥

मस्तकादि सर्व अंगास तेल लावणे, डोळ्यांत काजळ घालणे, पायांत जोडे घालणे, छत्री घेण, अति विषयाभिलाष, क्रोध, लोभ, गाणे, नाच व वाजविणे ही सोडावी. ॥७८॥

द्यूत (जुगार), लोकांसह निरर्थक वाक्कलह, दुसर्‍याची निंदा, असत्य भाषण, स्त्रियांकडे संभोगाच्या इच्छेने पहाणे व त्यांस आलिंगन देणे व दुसर्‍यास अपकार करणे या गोष्टी वर्ज्य कराव्या. ॥७९॥

सर्व स्थळी नीच शय्येवर एकट्यानेच निजावे. आपल्या इच्छेने आपले शुक्र पाडवू नये. कारण, आपल्या इच्छेनेन आपल्या इंद्रियांतून रेत पाडविणारा आपल्या व्रताचा नाश करीत असतो. ॥१८०॥

इच्छा नसताना ज्या द्विज ब्रह्मचार्‍याने रेत स्वप्नामध्ये स्खलन पावले असेल त्याने स्नान करून सूर्याची गंधादि उपचारांनी पूजा करावी व "पुनर्मामेत्विंद्रिय०" या ऋचेचा तीन वेळ जप करावा. ॥८१॥

जलाचा कुंभ, पुष्पें, गोमय, मृत्तिका व कुश ही आचार्यांच्या कामापुरती आणावी व रोज भिक्षा मागावी. ॥८२॥

ज्यांनी वेद व यज्ञ यांस सोडिलेले नाही व जे आपल्या कर्मामध्ये दक्ष आहेत अशा गृहस्थांकडून ब्रह्मचार्‍याने रोज सिद्धान्नाची भिक्षा आणावी. ॥८३॥

आचार्याचे जे सपिंड असतील त्यांच्या घरी व आपल्या ज्ञातीचे कुलाचे संबंधी असे जे असतील त्यांच्या घरी भिक्षा मागू नये. पण यांच्यावाचून दुसरी घरेच नसली तर पूर्व पूर्व गृहास सोडावे. (म्हणजे प्रथम संबंधी, नंतर कुलाचे लोक व शेवटी आचार्याचे सपिंड यांचे घरी भिक्षा मागावी) ॥८४॥

१८३ श्लोकात सांगितल्याप्रमाणे गृहे न मिळाल्यास उक्तगुणशून्य अशा सर्व गावात शुचि व मौनी होऊन फिरावे पण त्यांतही जे महापातकी असतील त्यांस सोडावे. ॥८५॥

दुरून समिधा आणून वर अधांतरी ठेवाव्या व त्यांच्या योगाने सायंकाळी व प्रातःकाळी आळस न करिता अग्नीत होम करावा. ॥८६॥

काही रोग नसतानाही एकसारिखे सात दिवस भिक्षाहार व सायंप्रातर्होम न करणारा आपल्या व्रतापासून भ्रष्ट होतो. त्याने अवकीर्णप्रायश्चित्त करावे. ॥८७॥

ब्रह्मचार्‍याने एकाचेच अन्न नित्य खाऊ नये, तर भिक्षेवर निर्वाह करावा. कारण, ब्रह्मचार्‍याने भिक्षेवर वृत्ति करणे हे उपवासारेखिच आहे असे म्हटले आहे. ॥८८॥

देवकर्मामध्ये देवतांस उद्देशून भोजनास बोलाविलेल्या ब्रह्मचार्‍याने व्रतविरुद्ध मधुमांसादि पदार्थात सोडून एकाचेही अन्न येथेष्ट खावे व पितरांच्या उद्देशाने बोलाविलेल्या ब्रह्मचार्‍याने तत्त्वज्ञानसंपन्न यतीप्रमाणे मधुमांसरहित यथेच्छ अन्न खावे. त्याच्या योगाने त्याचे व्रत लुप्त होत नाही. ॥८९॥

हे एकान्नभोजनरूप कर्म विद्वानांनी ब्राह्मणासच सांगितले आहे; क्षत्रिय व वैश्य यांस हे सांगितलेले नाही. ॥९०॥

गुरूने आज्ञा केली असता किंवा केली नसताही स्वतःच रोज अध्ययनाविषयी व गुरुहिताविषयी उद्योग करावा. ॥९१॥

शरीर, वाणी, बुद्धीद्रिये व मन यांचे नियमन करून हात जोडून गुरूच्या तोंडाकडे पहात उभे रहावे. ॥९२॥

सतत उजवा हात उत्तरीयांतून वर काढलेला असावा. सुंदर आचार करावा. वस्त्राने देह आच्छादित करावा व 'गुरूने' बैस असे सांगितले असता त्याच्या संमुख बसावे. ॥९३॥

गुरूच्या सन्निध असताना शिष्य अन्न व वस्त्र गुरूच्या अन्नवस्त्राहून सदा हीन असावे. पहाटे गुरूच्या अगोदर उठावे व रात्री त्याच्या मागून निजावे. ॥९४॥

गुरूची कोणतीही आज्ञा घेणे किंवा त्याच्याशी संभाषण करणे ही शय्येवर निजून, आसनावर बसून, खात असताना व पाठ करून उभे राहून करू नयेत. ॥९५॥

तर आसनावर बसलेले गुरु आज्ञा करीत असल्यास स्वतः आसनावरून उठून ती घ्यावी. उभे रहाणारे गुरु आज्ञा करीत असल्यास त्यांच्यापुढे काही पावले जाउन ती शिरसा मान्य करावी. ते येत असताना आज्ञा करू लागल्यास त्यांच्यापुढे जाऊन ती घ्यावी व ते धावता धावता आज्ञा करीत असल्यास आपणही त्यांच्या मागे धावत जाऊन तिचा स्वीकार करावा. ॥९६॥

तसेच पराङमुख असून ते सांगू लागल्यास शिश्याने संमुख उभे राहून ऐकावे. गुरू दुरूनच काही सांगू लागल्यास त्यांच्याजवळ जावे. निजलेले गुरु काही म्हणू लागले तर नमस्कार करून नम्रपणे त्यांचे म्हणणे ऐकावे व जवळ असलेले गुरु आज्ञा करू लागल्यास तीही वाकून नम्रपणे ऐकावे. ॥९७॥

गुरूच्या समक्ष शिष्याचे आसन व शय्या ही दोन्ही सदा नीच असावी (उंच कधीही असू नयेत.) गुरूची जेथवर दृष्टि पोचत असेल तेवढ्या अवकाशात हातपाय पसरून इत्यादि प्रकारे यथेच्छ बसू नये. ॥९८॥

या गुरूच्या मागेहि (उपाध्याय, आचार्य इत्यादि पूज्य उपपदे न लावता नुस्ते) त्याचे नाव उच्चारू नये. त्याची गति, भाषण व चेष्टा यांची नक्कल (अनुकरण) करू नये. ॥९९॥

गुरूचा जेथे परीवाद किंवा निंदा होत असेल तेथ असलेल्या शिष्याने एक तर हातांनी दोन्ही कान झाकावे किंवा तेथून दुसरीकडे निघून जावे. (खरोखर असलेले दोष बोलणे हा परीवाद व नसलेल्या दोषांचाही आरोप करणे ही निंदा होय). ॥२००॥

गुरूच्या परिवादामुळे शिष्य मेल्यावर गाढव होतो. निंदा करणारा कुत्रा होतो. अनुचित गुरुधनावर उपजीविका करणारा कृमि होतो व त्यांचा उत्कर्ष सहन न करणारा कीट बनतो. (कृमीहून कीट मोठा असतो. ॥१॥

दुर असलेल्या शिष्याने दुसर्‍याकडून गुरूची वस्त्रादिकांच्या योगाने पूजा करवू नये. (पण स्वतः जाण्यास असमर्थ असल्यास दुसर्‍याकडून पूजा करविली तरी चालेल.) रागावलेल्या व स्त्रीजवळ असलेल्या गुरूची स्वतःही पूजा करणे उचित नाही. वाहन व आसन यांवर बसलेल्या शिष्याने त्यावरून उतरून गुरूस वंदन करावे. ॥२॥

गुरूच्या सन्मुख शिष्य असताना गुरूच्या बाजूने शिष्याकडे वायु वहात असल्यास प्रतिवात म्हणतात व शिष्याच्या बाजूकडून गुरूंच्याकडे वारा वहात असतो तेव्हा त्यास अनुवात म्हणतात. पण या दोन्ही प्रसंगी गुरूबरोबर असू नये. तसेच आपले भाषण गुरूस चांगलेसे ऐकू जात नसल्यास त्यावेळी त्यांच्याविषयी किंवा दुसर्‍या कोणाविषयी काही सांगू नये. ॥३॥

बैलगाडी, घोड्याची गाडी, उंटाची गाडी, मोठ्या मंदिराची माडी, हांतरूण, गवताची चटई, शिळा, लांब फळी व नौका यामध्ये गुरूंच्या बरोबर बसले तरी चालेल. ॥४॥

गुरूंचा गुरू जवळ असल्यास त्याच्याशी गुरूप्रमाणेच वंदनादि व्यवहार करावा. तसेच गुरूच्या गृही रहाणार्‍या शिष्याने आचार्याच्या आज्ञेवाचून आपल्या आईबापास वंदन करू नये. ॥५॥

विद्यागुरु जे उपाध्याय त्यांच्या ठायीही अशीच वृत्ति ठेवावी, त्याचप्रमाणे आपल्या ज्ञातीचे जे पितृव्यादिक श्रेष्ठ व अधर्माचा निषेध करणारे व धर्माचा उपदेश करणारे जे असतात त्यांच्याशीही गुरूप्रमाणे आचरण करणारे ॥६॥

विद्या व तप यांनी जे समृद्ध असतात त्यांच्या ठायी, श्रेष्ठ गुरुपुत्रांचे ठिकाणी व गुरूचे जे पितृव्यादि असतील त्यांच्या ठायी गुरूप्रमाणेच सदा वृत्ति ठेवावी. ॥७॥

गुरुपुत्र लहान, समानवयस्क, किंवा शिष्य जरी असला तरी तो जर वेद पढविण्यास समर्थ असला तर तो (यज्ञकर्मामध्ये ऋत्विग असो की नसो) नुस्ते यज्ञकर्म पहावयास जरी आलेला असला तरी गुरूप्रमाणे पूजेस योग्य आहे. ॥८॥

पण अंग रगडणे, स्नान घालणे, उष्टे खाणे, व पाय धुणे ही गुरुपुत्राची कामे करू नये. ॥९॥

गुरूप्रमाणे गुरूच्या सवर्ण स्त्रिया पूज्य आहेत व ज्या असवर्ण असतील त्यांचि उत्थान व अभिवादन यांच्याच योगाने पूजा करावी. ॥२१०॥

अंगास तेल लावणे, न्हावू घालणे, हातपाय रगडणे, डोक्यात फूल इत्यादि घालून बुचडा बांधणे, इत्यादि गुरुपत्‍नीची कामे करू नयेत. ॥११॥

तरुन गुरुपत्‍नीच्या चरणास स्पर्श करून, ज्यांस पुरी वीस वर्षे झाली आहेत व जो गुण दोषज्ञ आहे अशा तरुण शिष्याने तिला वंदन करू नये. ॥१२॥

सहज शृंगार चेष्टेने मोहित करून पुरुषांस दूषित करणे हा स्त्रियांचा स्वभावच आहे. यास्तव ज्ञानी पुरुष स्त्रियांविषयी कधी बेसावध रहात नाहीत. ॥१३॥

देहधर्मामुळे कामक्रोधाच्या अधीन होणार्‍या अविद्वान व विद्वान पुरुषासही स्त्रिया उन्मार्गी बनविण्यास समर्थ आहेत. ॥१४॥

माता, बहीण, व कन्या यांच्या बरोबरही एकांतात बसू नये. कारण इंद्रिय समुदाय अति बलाढ्य असून तो विद्वानासही परवश करून सोडित असतो. ॥१५॥

तरुण गुरुपत्नीस तरुण शिष्य "हा मी अमुक आहे" असे म्हणून भूमीवर खुशाल यथाविधि वंदन करो. (त्याला शास्त्राची मना नाही.) ॥१६॥

शिष्टांच्या आचारास जाणणार्‍या तरुण शिष्याने प्रवासातून आल्यावर उजव्या हाताने उजवा पाय व डाव्या हाताने डावा पाय धरणे इत्यादि विधीने गुरुपत्नीस अभिवादन करावे व रोज भूमीवर नमस्कार घालावा. ॥१७॥

ज्याप्रमाणे कुदळीने जमीन खणणारास जल मिळते त्याप्रमाणे गुरूची सेवा करणार्‍या शिष्यास गुरूजवळची विद्या प्राप्त होते. ॥१८॥

एकतर, ब्रह्मचार्‍याने सर्व मस्तकाचे मुंडन करावे. किंवा सर्व डोक्यावरील केसांच्या जटा वाढवाव्या अथवा शेंडीच्याच मात्र जटा होऊ द्याव्या. हा ब्रह्मचारी गावात निजला असता सूर्योदय किंवा सुर्यास्त होता कामा नये. म्हणजे त्यावेळी त्याने गावात शय्येवर असता कामा नये. ॥१९॥

निद्रावश होऊन तो पडला असता जर सूर्योदय झाला तर सर्व दिवसभर त्याने सावित्रीचा जप करीत राहुन उपोषण करावे व रात्री भोजन करावे व त्याला न समजता जर सूर्यास्त झाला तर त्याने दुसर्‍या दिवशी जप व उपवास करावा. ॥२०॥

कारण, ब्रह्मचारी निजलेला असताना जर सूर्यास्त किंवा सूर्योदय झाला व त्याने प्रायश्चित्त न केले तर त्यास महापातक लागते (व त्यामुळे तो नरकात पडतो. म्हणून संध्येच्या कालाचा अतिक्रम करू नये). ॥२१॥

आचमन करून, पवित्र होऊन, एकाग्रमनाने पवित्रस्थळी बसून सावित्रीचा जप करीत दोन्ही संध्यांची यथाविधि उपासना करावी. ॥२२॥

स्त्री किंवा शूद्र यापैकीही जो कोणी काही पुण्याचरण करीत असेल ते सर्व या ब्रह्मचार्‍याने मोठ्या आस्थेने करावे. तसेच शास्त्राने निषेध केलेल्या अशा ज्या पुण्याचरणांत त्याचे मन रममाण होत असेल ते त्याने करावे. ॥२३॥

काही आचार्य धर्म व अर्थ हेच दान कामाचे हेतु असल्यामुळे श्रेष्ठ आहेत असे म्हणतात. कोणी काम व अर्थ (हीच सुखसाधने असल्यामुळे) श्रेष्ठ आहेत असे म्हणतात. कोणी धर्म हेच सर्व सुखाचे मूळ असल्यामुळे त्यास श्रेयस्कर मानतात. कोणी नुसत्या अर्थासच श्रेष्ठत्व देतात. पण धर्म, अर्थ व काम या त्रिवर्गाचेही समपक्षपाताने सेवन केल्यास ते तिन्ही श्रेयस्कर होतात व हीच खरी स्थिति आहे. ॥२४॥

आचार्य ही परमात्म्याची मूर्ति आहे. पिता हिरण्यगर्भाचे शरीर आहे. उदरात धारण करणारी माता पृथ्वीची मूर्ति आहे. व भ्राता समान उदरांत निर्माण झालेला असल्यामुळे तो आपल्या क्षेत्रज्ञ आत्म्याचीच मूर्ति आहे. ॥२५॥

आचार्य, जनक, जननी, व सख्खा ज्येष्ठ भ्राता यांच्या कडून जरी पीडा झालेली असली तरी विशेषतः ब्राह्मणाने त्यांचा अपमान करू नये. ॥२६॥

अपत्यांच्या गर्भाधाना पासूनच माता पित्यांस जे क्लेश सोसावे लागतात त्यांची फेड अपत्यांच्या हातून शेकडो वर्षांनी फार काय पण शेकडो जन्मांनीही होणे शक्य नाही. ॥२७॥

माता व पिता यांचे नित्य प्रिय करावे व आचार्यास सर्वदा प्रसन्न करावे. कारण, ती तिघे प्रसन्न झाली असता चांद्रायणादि सर्व तप फलासह प्राप्त होते. ॥२८॥

त्या तिघांची सेवा हेच परम तप होय. त्यांच्या आज्ञेवाचून दुसर्‍या कोणत्याही धर्माचे अनुष्ठान करू नये. ॥२९॥

ती तिघे हेच तीन लोक; तेच तीन आश्रम, तेच तीन वेद व तेच तीन अग्नि आहेत असे सांगितले आहे. ॥३०॥

पिता हा गार्हपत्य अग्नि, माता दक्षिणाग्नि व गुरु आहवनीय अग्नि आहे. व हा तीन अग्नींचा समुदाय अतिश्रेष्ठ आहे. ॥३१॥

या तिघांविषयी प्रमाद न करणारा ब्रह्मचारी तर त्रैलोक्यास जिंकीलच पण गृहस्थही त्रैलोक्याचा विजय करितो; तो आपल्या शरीराने चमकत असलेला पुण्यात्मा सूर्यादि देवांप्रमाणे स्वर्गामध्ये आनंद भोगतो. ॥३२॥

मातृभक्तीच्या योगाने या लोकास, पितृभक्तीने अंतरिक्ष लोकास व आचार्यभक्तीने हिरण्यगर्भ लोकास तो जातो. ॥३३॥

ज्याने या तिघांचा आदर केला आहे त्याने सर्व धर्मांचा आदर केला आहे. (अर्थात त्यास सर्व धर्मफल प्राप्त होते.) ज्याने या तिघांचा अनादर केला आहे त्याची सर्व श्रौतस्मार्त कर्मे निष्फळ होतात. ॥३४॥

ती तिघे जीवंत असता तो स्वतंत्रपणे दुसर्‍या कोणत्याही धर्माचे अनुष्ठान करू नये. तर त्यांचे प्रिय करण्यात निमग्न राहून नित्य त्यांचीच सेवा करावी. ॥३५॥

त्यांच्या परिचर्येमध्ये विघ्न न येईल अशा रीतीने परलोकी फल देणारे जे कोणतेही कायिक, वाचिक व मानसिक कर्म केले असेल ते त्यास अनुष्ठानानंतर सांगावे. ॥३६॥

ज्याअर्थी या तिघांची उत्तम प्रकारे सेवा केली असता सर्व श्रौतस्मार्तकर्मानुष्ठान संपूर्णपणे केले आहे असे होते, त्याअर्थी सर्व पुरुषार्थ प्राप्त करून देणारा असा हा धर्म श्रेष्ठ आहे व दुसरे सर्व अग्निहोत्रादि धर्म गौण आहेत. ॥३७॥

श्राद्धयुक्त पुरुषाने दृष्टशक्ति देणारी गारुडादि शुभ विद्या शूद्रापासूनही शिकावी. (मोक्षाचा उपाय असा जो) परम धर्म तो चांडालापासूनही घ्यावा. अति सुंदर स्त्री आपल्या अपेक्षेने नीच कुलात जरी उत्पन्न झालेली असली तरी तिच्याशी विवाह करावा (हे कलियुगेतेतर युगास उद्देशून आहे. असे धर्मशास्त्राकारांचे म्हणणे आहे). ॥३८॥

विषापासून अमृत काढून घ्यावे. बालकाचेही हितकर वचन ऐकावे. शत्रूपासूनहि सदाचरण शिकावे. अपवित्र पदार्थात पडलेलेही सुर्वणादि उच्चप्रतीचे द्रव्य उचलून घ्यावे. ॥३९॥

सारांश, स्त्रिया, रत्ने, विद्या, धर्म, शौच, सुभाषित व चित्रलेखनादि विविध कला ही सर्व मिळतील तेथून संपादन करावी. ॥२४०॥

आपत्काली ब्राह्मणेतरापासूनही ब्रह्मचार्‍याने अध्ययन शिकावे असे विधान आहे व अशा क्षत्रिय आणि वैश्य गुरूची अनुगमनरूप सेवा अध्ययन संपेपर्यंत करावी. ॥४१॥

जो ब्राह्मण नाही अशा गुरुचे गृही शिष्याने यावज्जीव राहू नये व सांग वेदाध्ययन न सांगणार्‍या ब्राह्मणाचे गृहीही मोक्षसंज्ञक उत्तम गतिची इच्छा करणार्‍या ब्रह्मचार्‍याने राहू नये. ॥४२॥

जर एकाद्या शिष्यास गुरुकुलामध्ये नौष्ठिक ब्रह्मचर्याच्या उद्देशाने यावज्जीव वास करण्याची इच्छा असेल तर त्याने शरीर असेपर्यंत उद्युक्त राहून गुरूची शुश्रूषा करावी. ॥४३॥

शरीरपात होईतो जो गुरूची शुश्रूषा करितो तो ब्राह्मण तत्त्वतः ब्रह्माच्या अविनाशी स्वरूपास प्राप्त होतो. ॥४४॥

धर्मज्ञ ब्रह्मचार्‍याने स्नानाच्या पूर्वी गुरूस काही द्यावेच असे नाही (तर जर काही यदृच्छेने मिळाले च तर ते द्यावे) पण समावर्तनसमयी गुरूने ज्यास आज्ञा दिली आहे अशा शिष्याने यथाशक्ति श्रीमानाजवळ याचना करूनही गुरूस द्रव्य आणून अवश्य द्यावे. ॥४५॥

क्षेत्र, सुवर्ण गाय, घोडा, छत्री, जोडा, धान्य, भाजी व वस्त्रे यातील एक किंवा मिळतील तितके पदार्थ गुरूस देऊन त्याचे प्रेम संपादन करावे. ॥४६॥

(नैष्ठिक ब्रह्मचार्‍याने ) आचार्य मरण पावला असता विद्यादि गुणयुक्त अशा त्याच्या पुत्राचे ठायी, (पुत्राच्या अभावी) त्याच्या पत्‍नीचे ठायी, किंवा त्याच्या पितृव्यादि सपिंडाचे ठायी गुरूप्रमाणे वृत्ति ठेवावी. ॥४७॥

पण यापैकीही कोणी नसल्यास सतत आचार्याच्याच अग्निजवळ स्नान, आसन, विहार इत्यादिकांच्या योगाने सायंप्रातर्होमरूप अग्निशुश्रूषा करीत देहावच्छिन्न जीवास ब्रह्मप्राप्तीस योग्य करावे. ॥४८॥

याप्रमाणे जो नैष्ठिक ब्रह्मचारी अखंडित ब्रह्मचर्य पाळितो तो ब्रह्म संज्ञक उत्तम स्थानास जातो व पुनरपि कर्मवशात या संसारात उत्पन्न होत नाही. ॥२४९॥

ह्याप्रमाणे मानवधर्मशास्त्राच्या भृगुप्रोक्त संहितेच्या दुसर्‍या अध्यायाचा श्रीमच्छंकराचार्यभक्त विष्णुयुक्त प्राकृत अनुवाद समाप्त झाला. श्रीकृष्णार्पणमस्तु ॥