श्रीगणुदासकृत - श्रीकृष्ण - कथामृत

संतकवि श्रीगणुदास यांनी रचलेले श्रीकृष्ण - कथामृत अमृताची गोडी देते.


श्रीकृष्ण कथामृत - श्री सद्गुरु प्रार्थना

सदा प्रभुपदावरी निज समर्पिलीसे तनु
कथेंत मन गोविलें कमल मालिकेसी जणुं
मुखांतुन जसा झरा सगुण भक्तिचा वाहतो
समर्थ गणुदास ते सतत मी नमस्कारितों ॥१॥
कवीस गिरिशापरी नगरदेश वेशें दिसे
गणेश करि सार्थ तें अवतारोनि ज्यांच्या मिषें
बघून मतिवैभवा विबुधसंघही डोलतो
समर्थ गणुदास ते सतत मी नमस्कारितों ॥२॥
जरी अधम चाकरी, कवन हीनशी लावणी
निकृष्टजन भोंवतीं परि न लिप्त तद्दुर्गुणीं
पटासह असूनही ‘ जर ’ खरा न कीं रंगतो
समर्थ गणुदास ते सतत मी नमस्कारितों ॥३॥
नवीन कविता जणो हृदय - वाटिकेभीतरी
सदा उमलतात या तुळशिच्या शुची मंजिरी
तिहींचि परमादरेंकरुन पूजिला ईश तो
समर्थ गणुदास ते सतत मी नमस्कारितों ॥४॥
जयांस परमेश्वरें हृदय दूसरें मानिलें
सुशद्बमयमंदिरीं सकल संत ते स्थापिले
महीपति जणो गमे फिरुन भूवरी शोभतो
समर्थ गणुदास ते सतत मी नमस्कारितों ॥५॥
करी विशद भाव जी परिमलें अशी मंजिरी
जयीं विरचिली असे अनुभवामृताचे वरी
म्हणून इतरेजनां सुगम जाहला बोध तो
समर्थ गणुदास ते सतत मी नमस्कारितों ॥६॥
यदीय हरिकीर्तनें नयन ढाळिती आसवें
सुधाकरकरें जसा विमल चंद्रकान्त स्रवे
सदैव कर जोडुनी ‘ करुण ’ ज्यापुढें ठाकता
समर्थ गणुदास ते सतत मी नमस्कारितों ॥७॥
प्रसाद कवितेमधें वसत कालिदासापरी
रसाळ बहु बोलणें जणुं सुधेंतली माधुरी
विराग हृदयामधें शुचिपणासवें नांदतो
समर्थ गणुदस ते सतत मी नमस्कारितों ॥८॥
अनाथजनवत्सला गुरुवरा दयेच्या घना
त्वदीय चरणीं असे विनत एकची प्रार्थना
तरंग उठती सदा विकृत संशयाचे जिथें
असें कुटिल जें करा सरळ सद्गुरो चित्त तें ॥९॥
अजून हरिच्यापदीं मन मदीय हें ना जडे
मुखीं भजन चालतां नयन राहती कोरडे
धरीत मति तर्कटा सरलतेसवें वांकडें
अतां तुम्हिच वंचिलें तरि बघूं कुणाच्याकडे ॥१०॥
हरिस्मरण झालिया गहिंवरून यावा गळा
उठोत पुलकावली नयन ढाळुंद्या कीं जला
तुम्हांतिल असा मिळो लव तरी जिव्हाळा अम्हा
अनंत अपुला म्हणा मग नसे कशाची तमा ॥११॥
चरणी लीन दास
अनंत