( भगवज्जनन )
मौलौ यो बिभृते शुभां सुरधुनीं भाले कलामैन्दवीम्
नेत्रे मन्मथदाहकानलशिखां कण्ठे विषं भीषणम्
वामाङ्के गिरिजां वपुष्युपचितं भस्म स्मशानोद्भवम्
तं वन्दे शिरसा भुजङ्गरशनं सर्वैरलिप्तं शिवम् ॥१॥
पूर्णब्रह्मा सच्चिदानंद - रूपा
मेघश्यामा माधवा मायबापा
हे गोविंदा विठ्ठला चक्रपाणे
त्वत्पादाब्जा वन्दितों आदरानें ॥२॥
तत्त्व करीं ये वसुदेवाचे
यदुवंशाचें सुदैव नाचे
देवकिच्या गर्भीं ये ईश
गवसेना जो श्रुतिस्मृतीस ॥३॥
प्रवेशतां उदरीं विश्वंभर
कमलाच्या कोषीं जणुं रविकर
शुभा देवकी प्रफुल्ल झाली
जशी वनश्री वसंत - कालीं ॥४॥
दुःख भयादिक सर्व विकार
त्या कल्याणीपासुन दूर
गुहे मधें वनराज रिघाले
उरतिल कां मग तेथें कोल्हे ॥५॥
गर्भाच्या त्या उदात्त तेजें
ती मंगल देवता विराजे
दिसे सर्वदा प्रशांत मूर्ती
ध्यानरता जणुं कीं मुनिवृत्ती ॥६॥
शुचि स्मितानें तिच्या पुण्यकर उजळे कारागार
पवित्र होई वस्तुजात कीं तत्सहवासें थोर ॥७॥
तिचें घडे ज्या मंगल दर्शन
दृष्ट भाव मावळे हृदांतुन
नभीं प्रभा फाकतां उषेची
किरकिर लोपे रातकिड्यांची ॥८॥
निष्ठुर रक्षक नम्र - वचांनीं
वदती दोन्ही जोडुन पाणी
उद्धटही नमवी निज माना
कंसाज्ञा पालन करवे ना ॥९॥
स्वयें कंस ये छळण्या तीतें
तिज बघतां परि धैर्य न होतें
डौल आपुला मिरवी कां तरि
गरुडासन्मुख सर्प विषारी ॥१०॥
वसुदेवाच्या आनंदासी
पार न उरला त्या वेळेसी
गमे तया ती सर्वदेवता
तिला मनानें होय वंदिता ॥११॥
देवकिच्या गर्भी सर्वेश्वर आला ऐसें कळतां
सर्व देव पातले ऋषींसह ईशवंदना करितां ॥१२॥
इंद्र वरुण विधि पिनाकपाणी
सावित्री शारदा मृडानी
अत्री गौतम मैत्रावरुणी
स्तविती गर्भा नमस्कारुनी ॥१३॥
वसंतास आदरिती कोकिल
रव्युदयीं खग करिती किलबिल
भ्रमर गुंजती कमला भंवतीं
भाट जणू वा वीरा स्तविती ॥१४॥
जय विश्वाद्या त्रिगुणातीता
सद्रूपा हे जय भगवंता
भवभय - नाशन भो करुणाकर
नमन तुम्हांसी हे वरचेवर ॥१५॥
अचिंत्य - रूपा अनंतशक्ते
कोण तुम्हां संपूर्ण जाणते
नेति नेति हे निगमहि म्हणती
शास्त्रांचे गण मागे सरती ॥१६॥
निर्गुण निरूपाधिक निर्वासन निराकार हे देवा
सर्वव्यापक रूप निरंजन गोचर परि सद्भावा ॥१७॥
हा विश्वाचा भव्य पसारा
तव मायेनें ये आकारा
तीच करी लय त्याचा अंतीं
स्वप्ना गिळिते जशी जागृती ॥१८॥
भवत्कृपा होतसे जयावर
तोच तरे हा माया सागर
त्या भक्तासाठींच दयाळा
युगीं युगीं अवतार घेतला ॥१९॥
पुनः पुनः हें सादर वंदन
तव चरणासी असो दयाघन
सदा अम्हांवर कृपा असावी
अन्य कोणती आस न जीवीं ॥२०॥
धन्य धन्य हे सती देवकी
पूर्वपुण्य तव फळास ये कीं
माते या सर्वहि जगतावर
असंख्यात केले उपकार ॥२१॥
तपस्विनी पृश्नी अससी तूं भगवति गतजन्मासी
मागितलेंसी श्रीविष्णूसी ये माझ्या उदरासी ॥२२॥
वचन तुला ईशानें दिधलें
आज पहा तें खरें जाहलें
ब्रह्माण्डांतहि जो न मावला
तोच तुझ्या गर्भांत राहिला ॥२३॥
वेद जयाचें यश गुण गाती
जपी तपी ज्या शोधित फिरती
जो सार्या विश्वाची जननी
त्याची ही तूं जन्मदायिनी ॥२४॥
भय - नाशन तव उदरीं असतां
कोणाचें भय तुला न आतां
वंद्य सेव्य तूं सर्वांसीही
अम्हांविषीं हो वत्सल हृदयीं ॥२५॥
वदुन यापरी सकल देव ते सती देवकीचरणीं
प्रेमें मस्तक ठेवुन गेले परतुनियां स्वस्थानीं ॥२६॥
देवकीस जो मास आठवा
लागला न लागला असे वा
ईश म्हणे तों घ्यावें जनन
सामान्या नियमाचें बंधन ॥२७॥
ईशाचें होणार आगमन
गेले सगळे आनंदून
परमेशाचें करण्या स्वागत
काल निजगुणासह हो उद्यत ॥२८॥
उत्सव करण्या त्या समयासी
धजे न कोणीही पुरवासी
मनीं वाहुनी राजभयातें
निसर्ग कां परि मोजिल यातें ॥२९॥
सहा ऋतू बाराही मास
पक्ष तिथी नी रजनी दिवस
प्रगट जाहली पांचहि भूतें
निज - वैभव अर्पण्या प्रभूतें ॥३०॥
प्रत्येकाला वाटे सेवा घडो प्रभूची मजसी
एकाहुन एकानें रचिली शोभा त्या समयासी ॥३१॥
प्रसन्न झाल्या दिशा दहाही
चारुतेस त्या तुलना नाहीं
लखलख करिती अनंत तारे
नभीं जणूं उजळलीं झुंबरें ॥३२॥
पुष्पराजा मिसळुनि भूवरतीं
जलधारा जणुं सडा शिंपिती
मृदंग कीं वाजवी पयोधर
मोर नाचती त्या तालावर ॥३३॥
पार न चंद्राच्या हर्षासी
ईश जन्म घेई तद्वंशीं
आज अष्टमी भान न उरलें
निजधन त्यानें सर्व उधळिलें ॥३४॥
हेव्यानें रविराज लपवि मुख
परि त्यासहि झालासे हरिख
कमल - बंधना करुन मोकळे
त्यानें बंदी भ्रमर सोडिले ॥३५॥
लता बहरल्या रम्या फुलांनीं
सुगंध भरला पानोंपानीं
वायूसंगें तोच धाडिला
अर्पण करण्या भगवंताला ॥३६॥
वृक्षानींही तसेंच केलें
सरोवरानें शैत्य अर्पिलें
त्याचें इतकें ओझें झालें
कीं तो वायु हळूं हळुं चाले ॥३७॥
फलभारें लवलेल्या वृक्षीं किलबिलती मधु पक्षी
लक्ष्मीचीं मंदिरें विकसलीं सरोवरांच्या कुक्षीं ॥३८॥
आम्र - तरूसी मोहर आला
मंजुळ गाती वरी कोकिळा
गुंजारव करिताती मधुकर
वनदेवीचे जणुं का नूपुर ॥३९॥
नद्यां नद्यांना पूर लोटला
होत्या परि सर्वही निर्मला
कुल - कन्येचें संपदेंतही
शुचित्व विलयासी नच जाई ॥४०॥
मांगल्यानें न्हाली अवनी
चंदन - चर्चित दिसे यामिनी
नवीच शोभा स्थला स्थला ये
प्रसन्न झालीं सज्जन - हृदयें ॥४१॥
कुंडांतिल विप्रांचे अग्नी
प्रदीप्त झाले शांत - पणानीं
स्वर्गीं दजदण झडे नगारा
देव वर्षिती सुमसंभारा ॥४२॥
गंधर्वांचें सुस्वर गायन नृत्य अप्सरा करिती
पावित्र्यासह आनंदानें वातावरणें भरती ॥४३॥
सत्य सत्य तो बहुशुभकाल
जें मांगल्याचेंही मंगल
सौंदर्यांचें रूप मनोहर
होतें आतां अवतरणार ॥४४॥
प्रगटणार वेदांचें हृद्गत
अथवा उपनिषदांचा अर्थ
सकलहि शास्त्रांचें प्रतिपाद्य
ध्येय पुराणांचें निरवद्य ॥४५॥
विशुद्धभक्तीचा आधार
सौख्य - संपदेचें भांडार
कला - कलापांचें सौंदर्य
काव्यरसांतिल वा माधुर्य ॥४६॥
जगत्त्रयाचें मूलकारण
संतसज्जनांचें वा जीवन
योगांचें सामर्थ्य महत्तर
तत्त्वज्ञानांचें वा सार ॥४७॥
सात्विकशा प्रेमाचा निर्झर
वा सद्धर्माचा ध्वज उज्वल
साहित्याचें विशाल हृदय
श्रेयाचें वा मूर्त प्रेय ॥४८॥
समाधान तीक्ष्णा बुद्धीचें
निधान जणुं वा कल्याणांचें
सुदैव सार्या सोमकुलांचें
पूर्वपुण्य कीं वसुदेवाचें ॥४९॥
वद्यपक्ष अष्टमी श्रावणीं
मध्यरात्र नक्षत्र रोहिणी
बुध दिन असतां ग्रह उच्चीचे
जनन होत भूवरी प्रभूचें ॥५०॥
ज्याच्या वंशीं जन्मा येणें
तत्प्रिय पत्नी जननी करणें
ना तरि ये वनवास वादुनी
यास्तव निवडी ऋक्ष रोहिणी ॥५१॥
कुंदरदन अरविंदवन शतचंद्रमदनसम चारुतरा
पीतांबरधृत कंबरमाला अंबरकांती मुकुटधारा
चतुर्भुजा भास्वरा गोजिरी प्रियंकरा जी भक्तांची
अशी देवकीचिया समोरी प्रगटे मूर्ती श्रीहरिची ॥५२॥
परमेशाचें होतां दर्शन
वसुदेवानें केलें वंदन
भाव परि कोणते उमटले
देवकीच्या हृदयांत ना कळे ॥५३॥
चार करांचें बालरूप तें
बघतांना पापणी न लवते
सर्वांगीं रोमांच ठाकती
स्तब्ध जाहल्या इंद्रियवृत्ति ॥५४॥
सतेज काळे वत्सल डोळे
बघबघतां ओघळूं लागले
नेत्र मिटे ओठहि थरथरती
भाग्यशालिनी मूक रडे ती ॥५५॥
झाला होतां बहु जरि हरिख
त्याचें तिज भोगतां नये सुख
काय म्हणावें स्त्री - हृदयांतें
जें आनंदानें ही रडतें ॥५६॥
बालरूप वदलें स्मितवदनें
ढाळिति अश्रू कां तव नयने
रडूं नको तूं माझी माता
भय कोणाचें नाहीं आतां ” ॥५७॥
वसुदेवासी म्हणे परात्पर
“ येथ न ठेवा मजसी पळभर
नंदघरीं नेऊन पोचवा
जें वात्सल्या मूर्त विसावा ॥५८॥
बारा वर्षें तेथें राहुन येइन मग सोडाया
तुम्ही विचारी उभयहि तोंवर धीर धरावा हृदया ॥५९॥
ऐकत होती सर्व देवकी
वज्रपात जणुं तिच्या मस्तकीं
“ आठ बालकें येऊन पोटीं
तशींच उरलें मी वांझोटी ॥६०॥
अपत्यसुख नच माझ्या भाळीं
मग कां बाळें दैवें दिधलीं
आशा दावुन मूळ छेदिलें
दुःखांचे डोंगर वाढविलें ” ॥६१॥
वसुदेवासी म्हणते त्रासुन
“ तुम्हीच मम दुःखासी कारण
कां मज वांचविलें त्या समया
पुनः पुनः मरणें भोगाया ॥६२॥
आस केवढी होती धरिली
हृदयीं माझ्या मी यावेळीं
येतो परमात्मा उदरासी
भय कोणाचें नाहीं त्यासी ॥६३॥
वाढवीन मी त्या प्रेमानें
न्हाऊं घालिन वात्सल्यानें
निरखिन वदना अंकीं घेउन
चुंबित कुरवाळिन शिर हुंगिन ॥६४॥
कुशींत घेउन धरिन हृदासीं
गाइन अंगाई गीतासी
निवविन डोळे लीला बघुनी
शब्द बोबडे ऐकिन कानीं ॥६५॥
हाय हाय परि एकवेळ ही इच्छा नच हो पुरती
कंसा हातें अंतरलीं तीं हा जाई या रीतीं ॥६६॥
साक्षात् ईशाचेंही हांतुन
होत नसे माझें शांतवन
मीच करंटी जन्मा आलें
तेथ कुणाचा उपाय चाले ? ॥६७॥
तुज कनवाळू म्हणती देवा
एक वेळ तरि अनुभव यावा
रूप तुझें हें नको चतुर्भुज
घेऊम दे मम अंगावर तुज ॥६८॥
ओठ हांसते हात चिमुकले
लोभस डोळे कुंतल कुरळे
तांबुस कोमल पाय नाचते
डोळे भरुनी बघुं दे मातें ॥६९॥
पदराखालीं तुजसी घेउन
वात्सल्या तव मुखांत देइन
कवळ्या ओठीं तूं चेपावे
स्पर्शे त्या मी पुलकित व्हावें ॥७०॥
अनेक वेळां उरीं दाटला
पान्हा परि तो विफल जाहला
सार्थक त्याचें एकवार तरि
करणें, इच्छा नाहीं दुसरी ॥७१॥
अभागिनीची या गोविंदा
आस एवढी पुरवी एकदां
माता झालें मी ऐसें मज
क्षणभर तरि वाटुं दे अधोक्षज ॥७२॥
अशी विनवणी करुण ऐकतां परमात्मा द्रवला तो
कल्पतरूपासून कधीं कां याचक विन्मुख येतो ॥७३॥
मूल उपजलेलें हरि झाला
सान लालसर देह कोंवळा
लुकलुकताती इवले डोळे
गर्भजलानें जावळ ओलें ॥७४॥
उचलुन त्यातें घेउन अंगीं
निजहृदया लावीत देवकी
करपाशीं त्या करिते गोळा
अधिर्या ओंठीं चुंबी गाला ॥७५॥
स्पर्श सुखद तो नाना - रीतीं
आससुनी अनुभवीत होती
बालकास परि कुरवाळोनी
तृप्त कधीं कां झाली जननी ॥७६॥
सांगुन तिजसी गोष्टी चार
शांतवून लव कष्टी अंतर
टोपल्यांत घेऊन मुलाला
नंदघरा वसुदेव निघाला ॥७७॥
यास आठवा होता म्हणुनी सावध कुणी नव्हते
मध्यरात्र अंधारी त्यांतुन जागल कुढुनी असते ॥७८॥
निखळुन उघडीं झालीं दारें
ओलांडुन निद्रिस्त पहारे
दबकत चाले चाहुल येत
भय सत्कृत्या खल - राज्यांत ॥७९॥
पथीं आडवी होती यमुना
जलोद्धता उसळती भीषणा
खळाळ बहु भंवरे करितात
ओघ वाहतो तीरा कापित ॥८०॥
गर्जतसे लाटांचें तांडव
आंत विहरती मगरी कासव
फोफावत ती वाहे यमुना
द्विग्विजया जणुं निघते सेना ॥८१॥
निर्भय परि वासुदेव तशा कीं
नदींत शिरला वीर अनीकीं
दुष्कर सांगा कृत्य कोणतें
पुत्र - प्रेमापुढें पित्यातें ॥८२॥
घेउनियां टोपलें शिरावर पाणी कापित जाई
देव मस्तकीं धरिल्यावर कां अशक्य उरतें कांहीं ॥८३॥
विस्मित होउन बाहुबलानें
वाट जणूं दिधली यमुनेनें
प्रवाह उतरुन ये तीरावर
पथीं चालतां करी विचार ॥८४॥
“ स्नेही जिवलग नंद जरी मम
करील कां परि तो हें काम
वाहुन चित्तीं कंसाचें भय
नाहीं म्हणतां करूं मी काय ? ॥८५॥
काय कथावें, कसें करावें
पोर कसें हें संरक्षावें ? ”
चिंतित असतां असें मनासी
येउन पोंचे नंद - घरासी ॥८६॥
कुडावरून शिरतांच अंगणीं
तेथें मूर्च्छित नंद - कामिनी
नवजातार्भक मृतवत जवळी
बघुन कल्पना मनीं उदेली ॥८७॥
“ मूल दिसत हें उपजत मेलें
हिला परी कांहीं न कळालें
असह्यवेणा होउन मूर्च्छित
झालीसे ही गमते येथ ॥८८॥
हिचे जवळ मम बाळा ठेउन म्रुतशिशु घेउन जाऊं
गुप्तताच उचिता या वेळीं नंदा हें नच कळवूं ॥८९॥
आपलेंच समजुन मम बाळ
वाढवील कीं तो स्नेहाळ
कंसाचीही समजुत करितां
येइल मजसी परतुन जातां ” ॥९०॥
अशा विचारें अलटापालट
करुन परतची धरली वाट
येताती जसजसे प्रसंग
तसें वागणें पडतें भाग ॥९१॥
प्रभातीस होता अवसर लव
तों स्वस्थानीं ये वसुदेव
“ वदे देवकीतें घे शिशु हें
नंदाचें जें मृत गे आहे ” ॥९२॥
ऊब परी लागतां गृहांतिल अर्भक सावध झालें
रुदन करी नाचवी पदांतें निरखी सभोंवताले ॥९३॥
बघुनी तान्ही पोर अशी ती
वात्सल्यासी आली भरती
हृदयासी लावून तियेतं
रोषें वदली वसुदेवातें ॥९४॥
अशी कशी तरि बुद्धि फिरली
कां कन्या नंदाची अणिली
वांचविण्यासी अपुला बाळ
कसे जाहलां हिज़सी काळ ॥९५॥
तुमच्यास्तव मित्र - प्रेमानें
दिधली कन्या निज नंदानें
थोरपणा हा शोभे त्यासी
विचार होता हवा तुम्हांसी ॥९६॥
दुसर्याचें तोडोनी काळिज
हृत्पीडा का शांतविणें निज ?
आणित असतां धर्माधर्मा
यशास कां लाविला काळिमा ॥९७॥
निष्ठुर कंसें वधितां हिज कां दुःख उणें मज होई
मातेच्या हृदया न जाणिलें केली म्हणुन कृती ही ॥९८॥
सहा मुलांच्या हत्त्येहुनही
दुःख अधिकची मज देइल ही
उठा उठा, जा परत पोंचवा
दुःखाग्नींतुन मला वांचवा ” ॥९९॥
दोष जरी दे वासुदेवासी
परी न आला राग तयासी
दिसे कस्तुरी करुनी काळी
घृणा म्हणुन कां कुणास आली ॥१००॥
तेजास्तव आवडे हिरकणी
कठिणता न घे ध्यानीं कोणी
स्वरमाला ऐकुन सुख होय
कोण बघे मुद्रेचा अभिनय ॥१०१॥
खळाळ सिंधूच्या लाटांचा
मोत्यांसाठीं सह्यचि साचा
वीजेच्या चंद्राची कोर
असुन वांकडी सुखवी अंतर ॥१०२॥
तसें उताविळ रागाखालीं
वत्सलता हृदयींची दिसली
स्निग्धवचानें वसुदेवें मग
वृत्त निवेदन केलें सांग ॥१०३॥
रडणें ऐकुन कन्येचें तों रक्षक सावध झाले
कंसासी कळवाया कांहीं त्वरा करोनी गेले ॥१०४॥
धांवत तेथें आला कंस
पिंजारुन वर उडती केस
ठेंचा लागुन रक्त निघालें
भान परि ना त्यासी उरलें ॥१०५॥
उभ्या राहिल्या शिरा कपाळीं
धुंद लोचनां चढली लाली
क्रौर्याचें मुद्रेवर नर्तन
हृदय परी धडधडतें आंतुन ॥१०६॥
दणदण पद आपटी भूवरीं
वरचेवर निज गदा सांवरी
घट्ट धरियले ओठ आंवळुन
श्वासाच्या वाफा नाकांतुन ॥१०७॥
मृत्यूसम देवकी समोरी येउन निष्ठुर वाचा
म्हणे, “ कुठें तें तुझें कारटें घेतों घोट गळ्याचा ॥१०८॥
येण्यासाठीं माझ्यापुढती
कृतांतासही नाहीं छाती
तेथ कथा कां या पोराची
सिंहासन्मुख घुंगुरड्याची ” ॥१०९॥
अबलेवर ऐसें गुरकावत
घेण्या बालक पसरी हात
तों तिज पदराखालीं झांकी
मागे सरकुन वदे देवकी ॥११०॥
“ दादा, थांब असे मुलगी ही
ही कांहीं तुज घातक नाहीं
ठेव एवढी तरी अम्हांसी
देइन हिजसी तव पुत्रासी ” ॥१११॥
गर्जे कंस तिला झिडकारित
“ मी नच मुलगा मुलगी जाणित
गर्भ तुझा, जाणितों एवढें ”
हिसकुन घे तें पोर बापुडें ॥११२॥
स्त्री म्हणुनी करितांच उपेक्षा
बहुतां झाली मागें शिक्षा
मी न तसा भोळा महिषासुर
करिन रिपूंचा ठेंचुनियां चुर ॥११३॥
प्रयत्नसंपादित यश न्यावें हिरावुनी दुर्दैवें
झंझावातें फलसंभारा पाडुन नष्ट करावें ॥११४॥
तसें मूल तें धरुनी हातीं
फिरवी गरगर डोक्याभंवतीं
बघत शिळेवर जों अपटाया
तोंछ निसटुनी गेली माया ॥११५॥
उसळे तेजाचा वर झोत
बाण जसा अग्निक्रीडेंत
वदली प्रगटुन देवी रुष्टा
“ मला काय मारितो दुष्टा ॥११६॥
तुज वधणारा माझ्या आधीं
जन्मा आला ज्या त्या शोधी
घडा, तुझ्या भरला पापांचा
नाश न आतां टळावयाचा ॥११७॥
माझ्या सह तव जीवज्योति
समज आजची जात लयाप्रति
खालीं उरलें प्रेत जिवंत
पडेल तें थोड्या दिवसांत ” ॥११८॥
असें वदुन ती गुप्त जाहली घाव बसे कंसाला
ताठा गेला दर्पहि गेला विस्तव जणुं विझलेला ॥११९॥
क्रौर्य मगाचें झालें दुबळें
देहावरतीं दैन्य पसरलें
व्याकुळ करिती अश्रू नयनां
स्वरांतली लोपली गर्जना ॥१२०॥
खालीं घालुन मान परतला
साप जसा मुकतां दंताला
करी कसें तरि मार्गक्रमण
पंख छेदितां जेंवीं श्येन ॥१२१॥
संतापानें अंतःकरण
जळत सारखें होतें आंतुन
दुष्टांची दुष्टता कधींही
मेल्यावांचुन शमणें नाहीं ॥१२२॥
निंद्य पाशवी साध्य खलांचे
हृदयें जणुं कीं कुंभ विषाचे
साधन सोज्वल असेल केवीं
कशी सर्पगति सरळ असावी ॥१२३॥
सभा तयें भरविली तांतडी
सोडविण्या मरणाची कोडी
जमली क्रूर पशूंची सेना
अघ, बक, केशी, द्विविद, पूतना ॥१२४॥
जनहित नाहीं ठावुक कोणा
गर्वे ताठर असती माना
अन्या - जवळी घेण्याजोगें
असेल कांहीं हे नच वागे ॥१२५॥
सत्तेची बहु हांव जयासी
असे सभासद राजसभेसी
टिको आपुलें पद, हो कांहीं
भलें बुरें हा निषेध नाहीं ॥१२६॥
सभेंत मग तेधवां त्वरित घेतला निर्णय
नृपावरिल वारण्या परम संकटाचें भय
मुलें चिरुन टाकणें सकल एक वर्षांतलीं
घरोघर फिरावया कुशल नेमणें मंडळी ॥१२७॥
रक्षावें जनतेप्रती नृपतिनें स्व - प्राणही वेंचुनी
आहे दंडक यापरी परि तया कोणी न आणी मनीं
कृत्यें घोर करावया न दचके स्वार्थे झुगारी नया
त्याचें आज नसे उद्यां फल परी लागेच भोगावया ॥१२८॥
‘ भगवज्जनन ’ नांवाचा तिसरा सर्व समाप्त
लेखनकाल :-
श्रावण, शके १८६७
श्रीगणुदासकृत - श्रीकृष्ण - कथामृत
संतकवि श्रीगणुदास यांनी रचलेले श्रीकृष्ण - कथामृत अमृताची गोडी देते.