( विधिमोहनाश )
रत्नौघे सति मंगलाय जगतो हालाहलं भीषणम्
स्वर्गादीन्यतिसुंदराणि भुवनान्युज्झित्य चित्यास्थलम्
पौलस्त्ये च निधाय येन विभवं भिक्षाटनं स्वीकृतम्
तं वन्दे विगतस्पृहं शिवकरं मृत्युंजयं सादरम् ॥१॥
ज्यांनीं मथोनि जणुंभारत सागरातें
गीतामृतास दिधलें अमुच्या करातें
रत्नें तशींच बहु जेवि सनत्सुजात
व्यासास त्या नित अनंत नती असोत ॥२॥
नमन करोनी कुलदेवासी
नंदा तेवीं निज जननीसी
सवें घेउनी बलरामाला
कृष्ण जावया निघे वनाला ॥३॥
कटीस पावा करांत काठी
खांद्यावर टाकुन कांबळा
कृष्ण जावया निघे वनाला ॥४॥
दारीं जमलीं गोपबालकें
गुरें उताविळ घेतीं हिसके
यशोमतीचा उर गहिंवरला
कृष्ण जावया निघे वनाला ॥५॥
गोविन्दासी धरुनी पोटीं
ओंठ टेकुनी हंसर्या ओठीं
मुख कुरवाळित वदे यशोदा
“ जपुन रहा हां, वनीं मुकुंदा ॥६॥
गेहीं परतुन येई लवकर
माझा अवघा जीव तुझ्यावर ”
वळुनी सांगे ती गोपाळा
“ हूड असे हा या सांभाळा ” ॥७॥
अवघड बहु जाहलें तियेला तुडुंबलें जल नयनीं
समजावी हरि, “ काय जात मी फार दिसांस्तव जननी ? ” ॥८॥
श्याम जातसे गुरें घेउनी
आल्या हें कळतांच गौळणी
म्हणती सार्या करुन अचंबा
“ आजच होता कां खोळंबा ॥९॥
अम्हीं बोललों सहज आपुलें
ते कां गे तूं खरेंच धरिलें
तसा अजुन हा असे लहान
निघेल कां या भूक तहान ॥१०॥
दिनभर हा राहील वनासी
सुनेंसुनें होईल आम्हांसी
म्हणुन यशोदे तुला विनवणीं
अतांच या धाडी न काननीं ॥११॥
पथीं वोंचतिल खडे सराटे
खरडतील झुडुपांचे कांटे
उन्ह वार्यानें सुकेल ना हा
असे कोवळा अमुचा कान्हा ” ॥१२॥
नंद उत्तरे हंसुनी, “ हा का राजपुत्र सुकुमार
कसाहि झाला तरी असे कीं गवळ्याचाच कुमार ॥१३॥
मुलें इतर याच्याच वयाचीं
नच जाती कां रानीं साचीं
शुभ दिन हा जाउं द्या वनातें
सवयीनें सारेंच सोसतें ॥१४॥
वेळ होतसे, चला, निघा, रे
नीट बघा निज गुरें वांसरें
त्यांस उन्हाचें न्या पाण्यावर
शिरा न झाडीमधें दूरवर ” ॥१५॥
‘ बरें ’ म्हणोनि पुनः एकदां
प्रेमें नमुनी नंद - यशोदा
हांकित धेनूंच्या कळपाला
कृष्ण जावया निघे वनाला ॥१६॥
तांबुस बांड्या कपिला गाई
ढवळ्या पवळ्या हरण्या कांहीं
कास घटासम मोठी ज्यांची
जातां पोळी डुले गळ्याची ॥१७॥
तशीच त्यांचीं पुष्ट वासरें
बागडतीं धांवतीं चौखुरें
मान आपुली पुढें घुसविती
घागर - माळा रुणझुणताती ॥१८॥
कृष्ण नेतसे आज तयांना वनांत चारायातें
मुके जीवहि हर्षित झाले नाचविती पुच्छांतें ॥१९॥
कृष्णासह आनंदहि गेला
गोपीचा जणुं तदा वनाला
घरकामासी हात गुंतले
होत असे परि चुकलें चुकलें ॥२०॥
एक गोपिका करिते घुसळण
खळवळतें डेर्यासी विरजण
रवी फिरतसे उजवी डावी
श्याम शोधण्या दृष्टी जेवीं ॥२१॥
रवी होतसे लव वरखालीं
स्थिती मनाची तशीच झाली
येउन आतां म्हणेल कोणी
रवी धरुन ‘ कां मज दे लोणी ’ ॥२२॥
जेवायासी जेव्हां बसती
घांस न उतरे घशाखालतीं
असतां हरि तरि पडुनी पाठीं
ओढवितां मुख घासासाठीं ॥२३॥
उठतां बसतां श्याम आठवे
अश्रू नयनीं उभे राहवे
आणिक म्हणती घडोघडीळा
“ उगाच त्या रानांत धाडिला ॥२४॥
रांगोळी ना पुसते साची
तशीच वाटी नैवेद्याची
धका न पाण्याच्या भांड्याला
उगाच त्या रानांत धाडिला ” ॥२५॥
मन रमवाया कृष्णावर मग मंजुळ गातीं गाणीं,
‘ श्याम मुकुंदा सांज जाहली लवकर ये परतोनी ’ ॥२६॥
यशोदेस तर लव करमेना
मनास शांती क्षणहि असेना
तिजा प्रहर नव्हताच संपला
तोंच म्हणे, “ कां अजुनि न आला ? ” ॥२७॥
कुठें कशाचा ध्वनि ऐकियला
भासे तिजसी कृष्णाचि आला
मार्गीं येउन बघे दूरवर
झाल्या खेपा सहज दहांवर ॥२८॥
कोण उन्हाचे परि दिसणार
नभीं एकटी फिरते घार
मग जननीच्या वत्सलहृदयीं
शंकालागी उणीव कायी ॥२९॥
“ गुरें काय नसतीं आवरलीं
आडवनीं कां वाटचि चुकली
कां हा अवखळ कोठें पडला
धाडूं तरि कवणा बघण्याला ” ॥३०॥
धीर देत रोहिणी तियेसी, “ येतिल बाळें आतां
वेळ जाहली नसे अजूनी, कशास चिंता करितां ? ” ॥३१॥
सांज जाहली उन्हें निवालीं
परत यावया गुरें निघालीं
नभीं उडाली धूळ पथाची
जशी पताका गोमचमूची ॥३२॥
पथें गुराखी मुलें चालती
कळप गुरांचा घालुन पुढतीं
हरिसंगें तइं दिसती धेनू
प्रणवासह त्या वेदऋचा जणुं ॥३३॥
वत्सासाठीं उत्सुक होउन
धांवत धांवत येई गोधन
माना उंचवुनी हंबरती
वात्सल्यानें ओट्या स्रवती ॥३४॥
शिरती गाई अचुक घरांसी
वळवावें लागे न तयांसी
सहज वसे शब्दांत कल्पना
श्रम ना पडती महाकवींना ॥३५॥
अजुनी गाई नव्हत्या आल्या
सोडि यशोदा तों वत्साला
कोण ओळखी गाईंचें मन
अपत्यवत्सल आईवांचुन ॥३६॥
वत्सा चाटित हंबरती कीं धेनू आनंदानीं
जणूं तूंहि हो अशीच हर्षित आशिर्वचिलें त्यांनीं ॥३७॥
हांसत दारीं उभा सांवळा
धुरळ्यानें जो धूसर झाला
मोरपिसें मस्तकीं डोलती
रानफुलें छातीवर रुळती ॥३८॥
असें गोजिरें ध्यान पाहतां
हृदयीं मावे ना वत्सलता
कृष्णें धांवत पुढतीं येउन
दिधलें मातेला आलिंगन ॥३९॥
कवळुन घेई मुके माउली
ओठीं गालीं स्कंधीं भालीं
कोठें ठेवूं तरी श्रीहरी
यशोदेस जाहलें यापरी ॥४०॥
तुकडा घेउन येत रोहिणी
ओवाळाया मुलांवरूनी
उतरुन टाकी दूर नेउनी
मग पायावर ओती पाणी ॥४१॥
वात्सल्याचें कवन ज्यावरी त्यास दृष्ट बाधे कां ?
परि वरचे उपचारच गमती खरे भाबड्या लोकां ॥४२॥
प्रभात समयीं दुसरे दिवशीं
यशोमती जागवी हरीसी
“ ऊठ मुकुंदा खगगण उठले
सरोवरानें नेत्र उघडिले ॥४३॥
अंघुळलीं बघ फुलें दंवानें
अतां चांगलें नसें झोपणें
प्रातर्विधि उरकणें, ऊठ, चल
तेवढ्यांत तव मित्रहि जमतिल ॥४४॥
बलरामाचें स्नानहि झालें
तुझेंच आहे सर्व राहिलें ”
असें म्हणुन उठविलें हरीला
कुरकुरतां मग तोही उठला ॥४५॥
उष्णजलानें अंघुळ घालुन
स्तोत्र म्हणवुनी करवी वंदन
देत यशोदा मग हातावर
नैवेद्याची लोणी - साखर ॥४६॥
धारोष्णाचीं फेनिल पात्रें पिउनी दोघे निघतां
प्रेमभरानें चुंबुन देती निरोप दारीं माता ॥४७॥
असें प्रतिदिनीं प्रातःकालीं
गुरें वळायासी वनमाळी
जात काननीं यमुना - तीरीं
सवें गोप घेऊन शिदोरी ॥४८॥
अतां घरीं कुणि ना कुरकुरती
असेल तें पाथेय बांधिती
कृष्ण पुढें जाईल निघोनी
त्वरा असे सर्वांस म्हणोनी ॥४९॥
कधीं भक्ष्य वेळेस नसावें
परी कुणीही ना थांबावें
भूक खरी त्या नच अन्नाची
असे हरीच्या सहवासाची ॥५०॥
चरणें सोडुन कितीक वेळां
गाईंनीं चाटणें हरीला
श्याम वाजवी मंजुळ वेणू
तृप्त तयेंची होती धेनू ॥५१॥
नाचवीत निज पुच्छचामरें श्रीकृष्णाचे भंवतीं
बागडतीं वांसरें जणूं नव पल्लव आम्रावरतीं ॥५२॥
भोजन - समयीं एके दिवशीं
वदे यशोदा श्री नंदासी
“ होइल कां मम एक ऐकणें
अतां पुरे गोकुळीं राहणें ॥५३॥
नवेंच संकट नित्य कोसळें
चार दिवसही नीट न गेले
काय तरी केलें नच जाणें
या मेल्यांचें मम बाळानें ॥५४॥
काल म्हणे यमुना - तीरावर
बक कोणी धांवला हरीवर
परवां वत्सच ये माराया
निश्चित ही असुरांची माया ॥५५॥
जगदंबेची कृपा म्हणोनी
हरी वांचला विघ्नांतूनी
अतां परीक्षा नको विषाची
दूर इथुन जाउं या सदाची ” ॥५६॥
नंदाच्याही मनांत होतें गोकुळ सोडावेंसें
कारण आतां नुरलें तेथें गवत गुरांस पुरेसें ॥५७॥
पत्नीसी परि कसें कथावें
याच विचारीं तयें असावें
मांडियला संसार मोडणें
रुचे न कधिंही स्त्रियांकारणें ॥५८॥
आज तीच होऊन सांगते
सहज मानिलें नंदानें तें
इतरांची तों होती वृत्ती
नंद म्हणे जी पूर्वदिशा ती ॥५९॥
सामानानें गाडे भरिले
पेट्या, भांडीं, फडे, टोपलें
संसारांतिल क्षुद्रहि वस्तू
गृहिणींचा त्यावरतीं हेतु ॥६०॥
वृंदावन नामें सुमनोहर
स्थान असे यमुनातीरावर
सर्व सोय पाहतां त्या स्थलीं
गोपांनीं निजगृहें वसविलीं ॥६१॥
यमुनातीरीं अर्धवतुलें शोभे घोष तयांचा
आकाशांतिल गंगेजवळी चंद्र जसा षष्ठीचा ॥६२॥
तरु - शाखे पोवळें मधाचें
दृध्य मनोरम तसें व्रजाचें
वा पुष्पांचा एकच झुबका
वनवेलींवर खुले जणूं कां ॥६३॥
शाद्वल भूमी असे भोंवतीं
हरित कोवळीं गवतें डुलती
मधें दिसे व्रज बेट ज्यापरी
लाटांच्या नृत्यांत सागरीं ॥६४॥
फलवृक्षांनीं वनें बहरलीं
आम्र, जांभळी, चिंचा, बकुळी,
ताड, माड, खर्जूर, पोफळी,
विविध फुलांसी सीमा नुरली ॥६५॥
वृक्षराज भांडीर तेथिंचा
क्रीडामंडप जणूं वनींचा
विस्तरलासे शतखोडांनीं
आच्छादित वर घनपर्णांनीं ॥६६॥
पारंब्यांचे झुलती झोके
गोंड्यांसम ज्यां पिंवळीं टोकें
शुकादिकांचें कल संगीत
तलाश्रितांचें मन रमवीत ॥६७॥
पहिल्यापेक्षां वनस्थली ही आवडली गोपांतें
बालपणाहुन तारुण्याची दशा जशी सर्वांतें ॥६८॥
गाई सोडुन चरण्यासाठीं
जमती वल्लव यमुनाकांठीं
आज खेळणें कवण्या रीती
प्रश्नावर या रणें माजती ॥६९॥
राम म्हणे खेळूं या झोंब्या
हरीस रुचती सुरपारंब्या
पेंद्या बोले बरी लंगडी
‘ आहे कें तव तशी तंगडी ’ ॥७०॥
प्रेमळ थट्टा अशी करावी
कधीं मनोहर गीतें गावीं
श्रम हरुनी उत्साह देत जणुं
श्रीकृष्णाची मंजुळ वेणू ॥७१॥
कधीं दुपारीं नदींत त्यांनीं
हुदडावें सबकावित पाणी
कुणी तयानें होत घाबरा
हास्याचा मग उडे फवारा ॥७२॥
परी वदे बलराम, “ राम ना पोहण्यांत या कांहीं
उणीव येथें हीच एवढी अथांगसें जल नाहीं ” ॥७३॥
“ डोह येथही आहे रामा
खूप खोल परि येत न कामा ”
“ काय कारणें, ” हरी विचारी
“ तेथ कालिया नाग विषारी ॥७४॥
गरल तयाचें फार भयंकर ”
कथी सिदामा, “ म्हणती वनचर
खग जे डोहावरुनी उडती
दाहक वाफेनें कोसळती ॥७५॥
शक्य नसे नुसतें जल शिवणें
दूरच राहो पिणें पोहणें
जीव चुकुन जे तेथें गेले
पुनः कधींही परत न आले ॥७६॥
गायरान संपन्न तेथलें
तरु-वेलींनीं शोभविलेलें
वर्ज्य जाहलें अम्हां सदोदित
सदन जसें कां पिशाच्चपीडित ” ॥७७॥
म्हणत हरी, “ मग कोठुन शांती व्रजामधें नांदेल
आग भडकती उशास असतां झोंप काय येईल ॥७८॥
कशी खुलावीं तळ्यांत कमळें
वचनागाचें असतां जाळें
जेथें घरटें करुन ससाणा
सुखद काय तो वृक्ष शुकांना ॥७९॥
त्या दुष्टासी निर्दाळावें
वा हें स्थळ सोडून पळावें
ना तरि माझें अपाप गोधन
निर्भय सांगा होईल कोठुन ॥८०॥
त्यजणें निजसुख खलभीतीनें
हीं तों भ्याडांचींच लक्षणें
उचित गमे मज दुष्टांचा वध
जयें नांदती सुखामधें बुध ॥८१॥
दादा, चल रे, चला सर्वजण
त्या सर्पाचें करितो शासन ”
“ नको, जाउं दे ” हें म्हणण्याही
गोपां अवसर उरला नाहीं ॥८२॥
कृष्णामागुन बलरामादिक कांहीं धांवत गेले
इतरीं होउन मनीं भयाकुल वृत्त गोकुळा नेलें ॥८३॥
अग्निवर्ष जाहला गोकुळीं
व्यथित जाहली हृदयीं सगळी
काम करांतिल तसेंच टाकुन
यमुनेवर धांवती गोपजन ॥८४॥
भान - रहित कीं होय यशोदा
हांका मारी, ‘ कृष्ण, मुकुंदा ’
पिटी हृदय बडवी कर भाळीं
विव्हल नयनें अश्रू ढाळी ॥८५॥
ठेंच लागली पद मुरगळलें
गुंतुन झुडुपा वस्त्र फाटलें
पडली, उठली, पुनः धांवते
भान कशाचें तिजला नव्हतें ॥८६॥
सांवरती गौळणी तियेसी
दुःख उणें जरि नसे तयांसी
व्यथा जरी दोन्हीहि करांसी
गोंजारी कीं एक दुजासी ॥८७॥
हरी ऽ थांब अविचार करी न हा लोक धांवता वदले
तोंच हरीनें चदुन कदंवा उडी घेतली खाले ॥८८॥
‘ कृष्णा, बाळा, ’ आक्रंदून
घेत यशोदा भूवर लोळण
धाय मोकलुन रडे बापुडी
केंस आपुले ओदुन तोडी ॥८९॥
गोंधळलेल्या व्यथित मनानें
बघती सारे सजल लोचनें
धांव घेत कालिया हरीवर
फुंफाटत निज फणा भयंकर ॥९०॥
इंगळ तेवीं जळते डोळे
लाल शरीरा हे वेटोळे
जिभा उग्र शतमुखी लोळती
ज्वाळा जणुं गिरिकुहरीं उठती ॥९१॥
घालुन विळखे श्रीकृष्णासी
घट्ट आवळी सर्वांगासी
डंख करावया बघे शिरावर
हरी परी ना देई अवसर ॥९२॥
श्रीकृष्णाची स्थिती पाहुनी गोपवधू उर पिटति
सती यशोदा मूर्च्छित झाली, कासाविस जन होती ॥९३॥
निष्ठुर कां झालास दयाघन
घेशी अमुचा प्राण हिरावुन
कृष्णावांचुन गोकुळ सारे
प्रेताहुनहि प्रेत असे रे ॥९४॥
संकट तेथें ये वरचेवर
म्हणुनी केलें व्रजें स्थलांतर
तीच दुर्दशा परी येथही
करंट्यास सुख कुठेंच नाहीं ॥९५॥
कशास व्हावें जीवित असलें
उडीं घालण्या सर्वहि सजले
डोहामाजीं, रामानें परि
आडविलें विनवून कसें तरि ॥९६॥
मुकुंद इकडे करीत कौतुक
निजांग फुगवी करुनी कुंभक
मजके झाले ढिले तनूचे
प्रतान कोमल जसे लतेचे ॥९७॥
चदुनीं मग त्या सर्पफनेवर
तांडव आरंभी योगेश्वर
पदविन्यासें गोविंदाचे
व्याकुळ झाले प्राण खलाचे ॥९८॥
धापा टाकित शरण येत तो, “ रक्षी देवा मातें ”
भार्या त्याच्या पदां विनविती, “ दे प्रभु सौभाग्यातें ” ॥९९॥
द्रवला चित्तीं श्रीकरुणाघन
“ शरण येत त्या भय तें कोठुन
रमणकास जा निघा येथुनी ”
आज्ञा ती मानिली तयांनीं ॥१००॥
श्री हरि परतुन येतां कांठीं
यशोमतीनें धरिला पोटीं
नयनाश्रूंनीं केला सत्वर
विजयाचा अभिषेक हरीवर ॥१०१॥
निज - नेत्रांच्या शुभ - दीपांनीं
औक्षण केलें गोपवधूंनीं
जयजयकारें गोप गर्जले
व्योम तयानें कंपित झालें ॥१०२॥
बघुन हरीचा विक्रम अद्भुत
“ हा नाहीं सामान्य गोप - सुत
ईश जन्म होता घेणार
तोच असावा हा अवतार, ” ॥१०३॥
निश्चय होता असा जनांचा श्रीकृष्णाचे विषयीं
प्रीती हृदयीं होती तीतें रुप आगळें येई ॥१०४॥
विवाहिता कुलकन्या जेवीं
साध्वीच्या पदवीस चढावी
उद्यानांतिल सुरभी कलिका
ईशपूजनें प्रसाद जणुं कां ॥१०५॥
स्वच्छ सुशीतल असे मेघजल
तीर्थतेस ये गंगोत्रीवर
तेवी हरिविषयींची प्रीती
भक्तीची घे पावनता ती ॥१०६॥
गोपांच्या संसार वासना
उदात्त वा परमार्थ भावना
एकरूप जाहल्या हरीसी
रजनीदिन ते जसे उषेसी ॥१०७॥
सागरसीमा अंबररेषा
एकरूप वा क्षितिजीं जैशा
हरीस अर्पुन हृदय आपुलें
व्रज हरि - भजनीं वेडे झाले ॥१०८॥
कृष्णाच्या ईशत्वाविषयीं ब्रह्मदेव परि हृदयीं
शंकित झाली ज्ञात्यालाही मोह पडावा कायी ? ॥१०९॥
ग्रहण लागतें श्रीसूर्यातें
गदुळ गौतमीजलही होतें
रत्नाकर हें नाम साजलें
आंत तरीही शंख - शिंपलें ॥११०॥
तुरटपणा लव वसे मधूसी
मुखीं न वंदावे गाईसी
काय नवल मग तरी जाहलें
ज्ञानीं जर अज्ञान राहिले ॥१११॥
एके दिवशी यमुनातीरीं
गोपांनीं सोडिली शिदोरी
परी वांसरें वनीं रिघाली
मुलें त्यामुळें अधीर झालीं ॥११२॥
वदत हरी चालुं द्या तुम्ही रे
आणिन मी वळवून वांसरें
तशीच हातीं भाकरलोणी
श्याम जात वांसरांमागुनी ॥११३॥
कृष्ण लोपतां वनांत इकडे मायामुग्ध विधाता
गुप्त करी झणि गाई गोपां म्हणे ‘ पाहुं या आतां ॥११४॥
वाजवीत निज वेणू मंगल
वत्सासह परते घननीळ
ठाव नसे गाई गोपांचा
हांसत गालीं धनी जगाचा ॥११५॥
करुन आपुल्यापरी चातुरी
बाळ जसा भाबड्या विचारीं
चिंचोके लपवीत मुठीसी
ते न कळे कां परी पित्यासी ॥११६॥
श्रीकृष्णानें असें जाणिलें
धात्याचें तें लाघव सगळें
स्वतःच नटला अनंतरूपें
परमात्म्यासी काय न सोपें ॥११७॥
प्रकाश एकच जसा रवीचा
वर्ण रंगवी इंद्रधनूचा
अथवा प्रतिभा सत्काव्यासी
विविध रसानें नटते जैसी ॥११८॥
तसेंच झाला हरी सर्वही गोप आणखी गाई
कंबल, पावा, काठी, शिंगें, उणें न उरलें कांहीं ॥११९॥
एक वर्ष हें असें चाललें
कुणास ना कांहींहि उमगलें
गोप - बाळ परि निज जननींतें
पूर्वींहुन झाले आवडते ॥१२०॥
सुरधेनू जणुं झाल्या गाई
कधींच दुग्धा उणीव नाहीं
स्रवती ओट्या पिउन वांसरें
नवल करी गोकूळ विचारें ॥१२१॥
पाहुन असली अगाध सत्ता
लज्जित झाला मनीं विधाता
अहंकार हृदयींचा टाकुन
श्रीचरणावर घेई लोळण ॥१२२॥
चार शिरें जणुं चारहि मुक्ती
भक्तीपुढतीं विनम्र होती
हात जोडुनी विनवी देवा
“ प्रमाद माझा क्षमा करावा ॥१२३॥
अंकावर घेतल्या शिशूचा पाय लागला म्हणुनी
काय होतसे रुष्ट कधीं तरि वत्सल - हृदयी जननी ॥१२४॥
“ ब्रह्माण्डाचा तूं उत्पादक
आम्ही सारे अजाण बालक
गोविंदा, माधवा, उदारा
क्षणोक्षणीं आम्हास सांवरा ॥१२५॥
ज्ञेय म्हणोनी जे जे कांहीं
तूच एक त्या सर्वाठायीं
ज्ञाता ही उरतो न निराळा
ज्ञान तेंहि तव रूप दयाळा ॥१२६॥
असे असुनही जनहित - तत्पर
संत लुब्ध तव सगुणतनूवर
स्वेच्छामय ही मूर्ति मनोहर
असे खरोखर पराहुनी पर ॥१२७॥
नोळखितां तव श्यामल रूप
ज्ञानमत्त जे करिती जप तप
जवळ तयानें खचितचि केली
कल्पतरू सोडून बाभळी ॥१२८॥
गळ्यांत सुम - मालिका कटितटीस पीतांबर
घुमे मधुर बासरी मयुरपिच्छ डोईवर
पदा मृदुल चाटती अशन सोडुनी वांसरें
मदीय हृदयीं वसो सतत रूप हें गोजिरें ” ॥१२९॥
गमन करीत विधाता स्तवुन असा गोपकाय मायावी
श्रवतां सादर चरिता या त्यासी गोप काय माया वी ॥१३०॥
‘ वि्धिमोहनाश ’ नांवाचा पाचवा सर्ग समाप्त
लेखनकाल :-
पौष, शके १८६८
श्रीगणुदासकृत - श्रीकृष्ण - कथामृत
संतकवि श्रीगणुदास यांनी रचलेले श्रीकृष्ण - कथामृत अमृताची गोडी देते.