( इंद्रगर्व परिहार )
वेदैश्च सर्वैः स्मृतिभिः पुराणैः
शास्त्रैश्च तैस्तैर्मुनिभिः प्रणीतैः
ज्ञातं न सम्यक् खलु यस्य रूपं
भक्तप्रियं तं गिरिशं नमामि ॥१॥
ज्यांची रामकथा उदारचरिता वर्षे सहस्रावधि
अश्रूंचा करुणाभिषेक करिते या हिन्दुभूच्या हृदीं
पुण्या भारतसंस्कृतीवर जिची कोरीयलीम अक्षरें
ते वाल्मीकिमुनी कवींत पहिले मी वंदितों आदरें ॥२॥
मोह विधीचा ऐसा निरसुन
गोपगणीं परते मनमोहन
मुलें पुढें घेऊन शिदोरी
तशींच होतीं यमुनातीरीं ॥३॥
श्रीकृष्णाची विचित्र माव
कुणा न कांहीं कळला ठाव
विशंक म्हणती गोपकुमा
“ कृष्णा, चल ना किती उशीर ” ॥४॥
हरी समोरी अर्ध वर्तुलें
गोपबाळ ते वसले सगळे
करीं घेउनी भाकरकांदा
प्रेमें म्हणती, “ घे, गोविंदा ” ॥५॥
एक उसळ दे दुसरा भाजी
कुणी म्हणत, ‘ घे चटणी माझी ’
पेंद्यांचें तें ताक शिळें कीं
श्रीहरि मिटक्या मारित भुरकी ॥६॥
घांस कुणाच्या मुखांत, ओढी
आणि म्हणे, ‘ यामधिं बहु गोडी ’
कुणी स्वतास्तव कांहीं लपवी
श्याम तयाचें सर्वच पळवी ॥७॥
भात, भाकरी, ताक, दही तें असुनी साधी भाजी
अमृत सांडुनी सेवण्यास हें, देवहि होती राजी ॥८॥
गोड आजचा फारच काला
असे लागला गोप - जनाला
हृदयीं भरलें प्रेम हरीचें
गोडीसी मग उणें कशाचें ॥९॥
गोविंदावर भाविक गीतें
गात आदरें गोप - बाल ते
परत निघाले निजा घराला
वेश जयांचा साधा भोळा ॥१०॥
खांद्यावर घोंगडी, शिरावर
गोंड्याची ती टोपी सुंदर
गोपीचंदन टिळा ललाटीं
पदीं वाहणा करांत काठी ॥११॥
फिरवी कर निज गाईपाठीं
एक वाजवी पावा ओठिं
गमती कोणी वदती हांसुन
हात हरीच्या गळ्यांत घालुन ॥१२॥
यतीं - मुनींना स्वप्नांतहि जें भाग्य कधीं गवसेना
तेंच करितसे खेळींमेळीं गोपाळांच्या सदना ॥१३॥
नंद - गृहासी एके दिवशीं
जमले कांहीं गोकुलवासी
विचारविनिमय कीं करण्यास्तव
कारण जवळीं आला उत्सव ॥१४॥
गोकुळांत होती परिपाटी
याग करावा इंद्रासाठीं
श्रावण मासीं प्रतिवर्षाला
आलीसे ती समीप वेळां ॥१५॥
चर्चा करिती सर्व गोपजन
मधें नंद लोडासी टेकुन
सिद्ध पुढें साहित्य विड्याचें
वृद्धास्तव खल तसे रूप्याचे ॥१६॥
यज्ञासाठीं विप्र कोणते
बोलविणें विद्वान जाणते
मंडप भव्य कुठें उभवावे
कार्य कोणतें कुणीं करावें ॥१७॥
प्रयोजनाची वा यज्ञाची सामग्री अन्नादि
वदती सारे, ‘ मी करितों, मी प्रथम मला द्या संधी ’ ॥१८॥
“ सर्वच कामें करीन मी मी
हें केवीं हो येइल कामीं ”
नंद वदे हांसुनी तयांना
“ श्रम विभाग कार्यांत हवा ना ॥१९॥
मोठ्या कार्यीं लहान मोठें
कृत्य न माना कधींहि कोठें
जें जें भागा येइल वांटुन
तेंच करावें अंगा झाडुन ॥२०॥
एक कुणाचें कार्य नसें हें
स्थान येथ सर्वांना आहे
काम करावें प्रेमें सादर
सुख देइल सर्वदा पुरंदर ॥२१॥
तोंच तेथ ये कृष्ण मुरारी
गळा पडुन नंदास विचारी,
“ जमला कां हा येथें मेळा
बाबा कसला विचार केला ॥२२॥
सांगाना मज, तात, ठरविलें काय तुम्हीं सर्वांनीं
हर्ष कशाचा सांगा सारे दिसती प्रसन्न वदनीं ” ॥२३॥
“ लग्न तुझं ठरविलें असें रे, ”
विडा कुटित कुणि वृद्ध उत्तरे
एकच पिकलें हसूं यामुळें
रुसली हरिची कपोलकमळें ॥२४॥
हिंदळीत नंदाच्या अंगा
“ असे काय हो, बाबा, सांगा, ”
वदे हरी दे नंद उत्तरा
“ इंद्रयाग ठरविला, सुंदरा ” ॥२५॥
“ कवण निमित्तें असतीं याची ”
बाळ ! रीत ही प्रतिवर्षांची
इंद्र असे पर्जन्यदेवता
सौख्य आपुलें त्याचे हातां ॥२६॥
पिकते शेती, गवत उगवतें,
फळांफुलांनीं तरुवन डुलतें
सहजच त्यानें गोधनवृद्धि
धनधान्याची होत समृद्धि ॥२७॥
जलास यास्तव जीवन्म्हणती इंद्र - कृपें लाभे तें
यज्ञ होत पर्जन्या कारण, ऐसें शास्त्रहि म्हणतें ॥२८॥
प्रसन्न नसता पती सुरांचा
सर्व नाश होईल आमुचा
तोषविण्या म्हणुनी पुरहूता
याग अम्ही हा करितों आतां ” ॥२९॥
चिंती हरि, “ हा याक कामनिक
भक्तिसुखासी असे विघातक
वाढवील हा चित्तमलातें
खंडिलेंच पाहिजे मला तें ” ॥३०॥
वदे प्रगट सर्वांस सांवळा
“ याग उचित ना वाटत मजला
सर्व जगाचा प्रभू तरात्पर
रागावेल तयें अपणांवर ॥३१॥
ईशें हें जग रक्षायासी
लोकपाल नेमिलें दिशांसीं
इंद्र, वरुण, मारुत, वैश्वानर
तद्भीतीनें कार्या तत्पर ॥३२॥
जगत् लेंकरूं परमेशाचें हे ते सेवक त्याचे
कृपा कोठली या इंद्राची देणें जगदीशाचें ॥३३॥
इंद्रयाग जरि केला येथें
लांच दिलेसें होइल कीं तें
रुचेल कैसें तें देवाला
तन्नियमाचा विघात झाला ॥३४॥
त्यापेक्षा हा गिरि गोवर्धन
नामा ऐसें ज्याचें वर्तन
उत्तम करणें उत्सव याचा
हा सुखदाता असे ब्रजाचा ॥३५॥
स्वतः झिजुन करि सुपीक भूमी
रोधित मेघा वर्षाकामीं
दिव्य औषधी देई वत्सल
भजतां यातें यथार्थ होईल ॥३६॥
चारा पुरवी हा गाईंसी
हाच रक्षितां असे व्रजासी
खेळगडी हा गोपाळांचा
चला करूं या उत्सव त्याचा ॥३७॥
भजन, समर्चन, यजन असावें प्रेमपूर्ण हृदयाचें
बाळगुनी भय करितां तेची होत विडंबन साचें ॥३८॥
पटलेसें तें बहुतेकांना
कांहीं थोडे वदले ‘ ना, ना, ’
नंदासी कृष्णप्रेमानें
ना म्हणवेना ठामपणानें ॥३९॥
खटपट नीरस यज्ञांतिल ती
स्त्रियांस कधिंही रूचली नव्हती
हर्ष जाहला फार तयांना
प्रिय असतो उत्सव सर्वांना ॥४०॥
श्रीकृष्णाची जशी सूचना
तशी जाहली सिद्ध साधना
कामा झटती व्रज - नारीनर
प्रिय व्यक्तीचा न हो अनादर ॥४१॥
पाक - कुशल त्या स्त्रीवर्गानें कृष्णाज्ञा मानियली
नानापरिची रुचकर हितकर पक्वान्नें निर्मियली ॥४२॥
दुध गहूं साखर यांपासुन
मिष्टान्नें निर्मीत वधूजन
विविध पसारा विश्वाचा या
त्रिगुणांतुन जणुं निर्मी माया ॥४३॥
फेण्या, मांडे, बेसन, बुंदी
पुरी, चिरोटे, नी बासुंदी
चिवडा, चकली, शेव, डाळही
पात्रें सजलीं विविध वड्यांही ॥४४॥
कुर्ड्या, पापड, रुचिर, मुरंबे,
कैरी, भोकर, भरलीं लिंबें,
परोपरीचीं फळें तशीं तीं
थाटा कांहीं सीमा नव्हती ॥४५॥
गोपाळांनीं फुलें आणिलीं
निळीं, ला, सित, हिरवीं पिवळीं
कुणी गुंफिल्या माळा सुंदर
गजरे, जाळ्या, गुच्छ मनोहर ॥४६॥
अष्टगंध, अर्गजाहि, अनुपम
गुलाल, बुक्का, चंदन कुंकुम
धूपदीप, कापूर, सर्वही
न्यून कशाचें उरलें नाहीं ॥४७॥
मंगल दिवशीं प्रातःकाळीं गोवर्धन शैलासी
गाई गोपीं गोपाळांसह येत सखा हृषिकेशी ॥४८॥
वाजुं लागलीं मंगल वाद्यें
गोपी गाती सुस्वर पद्यें
झुली मनोहर गाई - पाठीं
घागरमाळा नदती कंठीं ॥४९॥
फेर कुणी धरिले टिपर्यांचे
गोपाळांची लेजिम वाजे
जयजय घोषें भरलें अंबर
असा वृंद तो ये शैलावर ॥५०॥
श्याम सखा जो भक्तजनांसी
ये पूजाया शैलवरासी
स्वयें भव्य तनु केली धारण
घेत आपुली पूजा आपण ॥५१॥
नंद यशोदादि व्रजवासी
धाले पाहुन त्या रूपासी
पूजियलें प्रेमें सर्वांनीं
आनंदाश्रु आले नयनी ॥५२॥
गुलाल बुक्का फुलें उधळुनी षोडशोपचारानें
पूजन केलें गोप - जनांनीं हृदय भरे हर्षानें ॥५३॥
ईशार्पित - सत्पुष्प - मालिका
धारण करिती गोप - गोपिका
सुम - मंडित ते दिसती अभिनव
लतावृक्षसे झाले मानव ॥५४॥
भोजनास मग बसल्या पंक्ती
सर्वां वाढी करुणामूर्ती
उच्चनीच हा प्रपंच कांहीं
सर्वात्म्यानें केला नाहीं ॥५५॥
ज्याचें दुर्लभ दर्शन नुसतें
ब्रह्म सगुण तें इथें वाढतें
आग्रह करिती परस्परांना
घास बळेंची भरवी कान्हा ॥५६॥
उत्सव तो जाहला समाप्त
भव्यरूप तें झालें गुप्त
दिधला सर्वा मंगल आशी
“ रक्षिन मी संकटीं तुम्हांसी ” ॥५७॥
शिगोशीग भरलीं आनंदें मनें तदा सर्वांचीं
विशेष गोडी मानवहृदया असते नाविन्याची ॥५८॥
इंद्र परी संतप्त जाहला
ओळखिलें नाहीं कृष्णाला
प्रलय - घनांतें आज्ञा केली
तयें वर्षण्याप्रती गोकुळीं ॥५९॥
सुटे प्रभंजन घोर तांतडी
गमे महीची होत वावडी
मेघखंड कीं प्रचंड पर्वत
अंधेरासह आले धांवत ॥६०॥
गडगडाट कांपवी अजस्रें
जशीं गर्जतीं सिंहसहस्रें
मध्येंच चमके भीषण चपला
पिशाच्च जणुं विचकी दंताला ॥६१॥
मुसळधार वर्षे जलधारा
तशांत मारा करिती गारा
शिलाही फुटती त्या घातानें
शूर - हृदय जणुं पराभवानें ॥६२॥
कोसळताती घरें धडाडा वृक्ष टाकिती अंगा
दुर्बल हृदयीं सर्व मनोरथ जसे पावती भंगा ॥६३॥
कूप नदी, ओढा, सर, सागर,
हा न भेद राहिला महीवर
पाणी पसरे प्रलयघडीसम
पंच महापातक्या न तर - तम ॥६४॥
जीव बापुडे सैरावैरा
पळती शोधायास निवारा
सूर काढिती केविलवाणे
‘ धांव धांव हे रथांगपाणें ’ ॥६५॥
वृद्ध बोलती “ हरिचें ऐकुन
घेतियलें हे संकट ओढुन
बालिशता कारण नाशासी
त्राता आता कोण अम्हांसी ” ॥६६॥
भक्तवत्सले तों गोवर्धन
करांगुलीवर धरिला उचलून
“ यारे यारे येथें सगळे
छत्र पहा हें गिरिनें धरिलें ” ॥६७॥
भयविव्हल, असहाय जीव ते गोप गोपिका गाई
येती तेथें मनुनौकेसी जेवीं ऋषिगण जाई ॥६८॥
मीनशृंगसी संरक्षक ती
करांगुली कृष्णाची होती
अपूर्व विक्रम ऐसा बघतां
सर्व नमविती चरणीं माथा ॥६९॥
“ अवघडेल ना हात हरी तव
टेका देतों काठ्यांनीं लव ”
वदुनी बल्लव करितां तेवीं
हळुंच हासे गालांत लाघवी ॥७०॥
सात दिवस नभ जरी कोसळे
गोकुळचें कांहीं न बिघडलें
निज जननीच्या पंखाखाले
पिलें तसे जन निर्भय झाले ॥७१॥
दुर्दिन सरले जल ओसरलें
अंधाराचें ठाणें उठलें
रवि उघडी जेवीं नारायण
योग शयन सरतां निज लोचन ॥७२॥
चकितलोचनें बघती व्रजजन तशींच होतीं सदनें
वनराजी ही प्रसन्न बघतां कृष्णा करिती नमनें ॥७३॥
वदती देवा सद्गदवाचें
“ तूंच सर्व राखिले व्रजाचें
संशयबाधा अतां न होवो
हेत तुझ्या चरणावर राहो ” ॥७४॥
नंदयशोदां हृदयीं धरिलीं
मधुर हांसरी मूर्त सांवळी
गोपवधू कुरवाळुन त्यातें
म्हणती ओवाळूं प्राणांतें ॥७५॥
जयजयकारें गोप गर्जती
घेउन कृष्णा खांद्यावरती
नाचतात कीं प्रेमभरानीं
फुलें उधळिलीं दिवौकसांनीं ॥७६॥
कशी मोडली खोड म्हणोनी
इंद्र बघे गोकुळा वरोनी
व्रज पूर्वींपरि सुखांत लोळे
उघडी झांकी सहस्र डोळे ॥७७॥
येत कळोनी श्रीकृष्णाची महती देवेंद्राला
“ हा न मनुज परमेश परात्पर भक्तांस्तव अवतरला ॥७८॥
मी सेवक हा अमुचा स्वामी
शिरीं धरावें पदरज आम्हीं
क्षुद्र गणोनी छळिलें त्याला
किती घोर हा प्रमाद केला ॥७९॥
कोण आज मज दुसरा वाली
दार्द्र आहे हा वनमाळी
विनम्र होतां चरणावरतीं
क्षमा करिल हा करुणामूर्ति ” ॥८०॥
पुरंदरानें देह आपुला
श्रीकृष्णाच्या पदीं घातिला
दिसूं लागले सहस्र डोळे
वाहियलीं श्रीचरणीं कमळें ॥८१॥
“ नमो महात्मन् नमो नमस्ते
विशुद्धसत्वा नमो नमस्ते
शांत तपस्वी स्वयंप्रकाशी
क्षमा करी भो या दासासी ॥८२॥
राग लोभ मत्सरादि तुजसी स्पर्शती न हृषिकेशी
दंड परी धरिसी खलदमना रक्षण्यास धर्मासी ॥८३॥
दुर्धर माया त्रिगुणात्मकही
स्पर्श तियेचा तुजसी नाहीं
परी नाचवी ती आम्हांसी
वश होतो या मदमोहासी ॥८४॥
तूंच दिलेल्या ऐश्वर्यानें
मत्त जाहलों मी अज्ञानें
मूर्खपणें उलटलों धन्यावर
क्षमा करावी मज करुणाकर ॥८५॥
मिठी मारूनी श्रीचरणासी
लोटांगण घेई भूमीसी
स्पर्शुन हांसत वदे दयामय
“ ऊठ, ऊठ हो इंद्रा, निर्भय ” ॥८६॥
इंद्रादेशें सुरधेनूनें
न्हाणियला गोवळा दुधानें
दिसे तदा तो श्याम लाघवी
नीलमणी चांदण्यांत जेवीं ॥८७॥
अखंड धारा स्रवति पयाच्या चार हरीच्या वरती
चहुवाणींतुन भक्तिरसाचे जणुं कां पाझर फुटती ॥८८॥
दिव्य अर्पिंलीं वस्त्राभरणें
सम्राटासी मांडलिकानें
कल्पवृक्ष - सुमनांची माळा
समर्पिली प्रेमें घननीळा ॥८९॥
पुनः पुनः वंदुन ईशासी
परते वासव निजस्थलासी
गोपबाळ पुसतात हरीला
“ कोण बुवा हा होता आला ॥९०॥
सर्वांगावर त्याच्या कसले
माशासम रे होते खवले ”
“ वेड्यांनों, ते डोळे त्याचे
राज्य करी हा स्वर्लोकाचें ॥९१॥
“ चल पाहू या गांव तयांचें ”
“ मेल्याविण तें दिसत न साचें ”
“ जिवंत तो जर तेथें आला
अडचण मग कोणती अम्हांला ” ॥९२॥
आग्रह पाहुन गोपाळांचा स्वर्ग तया दाखविला
भक्ताला कां अशक्य कांहीं मोक्षहि सुलभ जयाला ॥९३॥
सुखभोगांचें जें कां आगर
जेथ सुधेचे भरले सागर
सुरांगनांचा होत तनाना
रुचले नच तें स्थल गोपांना ॥९४॥
क्षुधा न म्हणुनी गोड सुधा ना
डोळ्याची पापणी लवेना
देवाचे अप्सरा - विलास
ग्राम्य वाटले गोप गणांस ॥९५॥
प्रथम वासना निज वाढविणें
तृप्तिस्तव मग नित धडपडणें
बहु जेवाया विजया खावी
तेवी कृति ती निंद्य दिसावी ॥९६॥
प्रेमादर या चुकला वाटे
समाधान सात्त्विक नच कोठें
घेइल कोणी सुख हरुनी मम
या भीतीनें सकलांसी श्रम ॥९७॥
“ चल, खालीं हें पुरें, श्रीपती
श्रेष्ठ आपुलें व्रज यावरती
स्वर, सुख, एकच एकच चवही
तव काल्याची सर या नाहीं ” ॥९८॥
एके दिवशीं हरी वनाला
गोपाळांसह लवकर आला
नसे पुरेशी जवळ शिदोरी
भूक फार लागली दुपारीं ॥९९॥
वदे श्याम, “ जा जवळ चालला यज्ञ असे कीं मोठा
मागुन आणा अन्न हवें तें तिथें न कांहीं तोटा ” ॥१००॥
त्यापरि पेंद्या कांहीं गोपां
घेउन आला यज्ञमंडपा
नम्रपणें विनवी विप्रांना
“ असे भुकेला अमुचा कान्हा ॥१०१॥
वेदशास्त्र, इतिहास, पुराणें
अवगत सारीं शब्दार्थानें
उदार आपण सर्वहि धार्मिक
याचकांस ना लावा विन्मुख ॥१०२॥
तपोधना ज्या यज्ञा आपण
उद्यत करण्या जनकल्याण
त्या यज्ञाचा प्रसाद द्यावा
आम्हांसीही. हे भूदेवा ” ॥१०३॥
तें न मानिलें विप्रगणानें
दृष्टी ज्यांची मंद धुरानें
इंद्र - याग ज्यानें बुडवियलें
काय तयाचें अम्ही बांधिलें ॥१०४॥
यजन करावे ज्यास्तव तो हा हविर्हरी गोविंद
प्रसन्न होतां स्वयें, तयासी अवगणिती हे अंध ॥१०५॥
निघतां तेथुन वदे सिदामा
“ जाऊं आतां अंतर्धामा
स्त्रीहृदयीं हो दया नि भक्ति
पुरुषांपेक्षां उत्कट असती ” ॥१०६॥
पाक - गृहासी येउन विनवी
“ आई अमुची दया करावी
श्याम उपाशी आहे रानीं
कळवळलों आम्हीहि भुकेनी ॥१०७॥
धकी आम्हां दिले द्विजांनीं
तुम्ही तरी द्या अन्न निदानीं ”
हरीस भोजन हवें, ऐकतां
सती बोलल्या हर्षुन चित्ता ॥१०८॥
“ भाग्य केवढें आज उदेलें
पुण्य आमुचें शिगास गेलें
दुर्लभ जो कीं व्रतनियमांसी
प्रसन्न तो झाला आम्हांसी ॥१०९॥
सेवा ज्याची घडो म्हणोनी झुरते सुरधेनूही
तो परमात्मा आज चाकरी अमुची स्वेच्छे घेई ॥११०॥
गोप गणांनों, तुम्ही खरोखर
कृपा किती केलीत अम्हांवर
हरिसखयांनों पुढती व्हा रे
आणूं आम्ही पदार्थ सारे ” ॥१११॥
एक वदे हळुं, “ अजुनी कांहीं
नैवेद्यासी ठिकाण नाहीं, ”
वदे दुजी, “ गे, नसो, नसे तर
स्वयें आज वोळगे परात्पर ” ॥११२॥
विविधान्नाचीं पात्रें सुंदर
यज्ञवधू घेऊन शिरावर
हरिगुण गातां पथें शोभती
जणुं अवलंबुन नवरस भक्ती ॥११३॥
सर्व निघाल्या एक राहिली
तों तत्पतिनें तिला पाहिली
हात ओढिला हिसडुन नष्टें
“ सांग, कुठें चाललीस दुष्टें ॥११४॥
तो गवळ्याचा पोर चोरटा कुलटे, तूं त्यासाठीं
नेशी जेवण आज्ञाविरहित लाज नसे कां पोटीं ” ॥११५॥
“ नाथ, वदा ना भलतें कांहीं, ”
वदत सती काकुळती येई
“ गवळी ना, तें ब्रह्म गोजिरें
तेथ मला जाउं द्या आदरें ॥११६॥
आडविण्याचे घेतां कां श्रम
मन नुरलें स्वाधीन अतां मम ”
“ बघतों हो जातीस कसें तें ”
खांबासी बांधिलें तियेतें ॥११७॥
“ हे गोविंदा, सख्या कन्हय्या
मोकलिसी कां दासीला या
देह जयाचा तयें रोधिला
प्राण परी कां तुजसी मुकला ॥११८॥
भगिनी माझ्या तुज गोपाळा
कवळ देत असतिल यावेळां
अन्न वाढितां गोपालागीं
उरलें मागें मीच अभागी ॥११९॥
दूर ठेवितो तुजपुन ऐसा देह नको हा मजला
नंदनंदना, सख्या, ” वदोनी प्राण तिनें सोडियला ॥१२०॥
यज्ञसती जों घेउन अन्ना
हरिसंनिध येतात कानना
तो तेथें ही सहर्ष नाचे
गात कृष्ण हरि, मुकुंद वाचे ॥१२१॥
भरवी कृष्णा दे आलिंगन
प्रेमें घेई चरणीं लोळण
‘ इतक्या लवकर येथ कशी ही ’
नवल कुणा उलगडलें नाहीं ॥१२२॥
नंदसुतांचें मग सर्वांनीं
पूजन केलें प्रेमभरानीं
गोपाळांसह गोविंदाचें
भोजन झालें आनंदाचें ॥१२३॥
देत हरी तृप्तीची ढेकर
वदे, “ यज्ञफल तुम्हां पुरेपुर
अतां सुखानें ज सदनांप्रत
होतील सारे सफल मनोरथ ॥१२४॥
तुमची आतां मात्र सखी ही
भिन्न मजहुनी होणें नाहीं
नाश वृत्तिचा होतां जेवीं
ज्ञान भक्ति भिन्नता नुरावी ” ॥१२५॥
येतां सती परतुनी कळलें तयांसी
टाकून देह मिळली जगदीश्वरासी
हा धन्य धन्यपद मेळविलें सखीनें
आम्हांस कां न तरि बांधियलें पतीनें ॥१२६॥
‘ इंद्रगर्व परिहार ’ नांवाचा चवथा सर्ग समाप्त
लेखनकाल :-
माघ, शके १८६८
श्रीगणुदासकृत - श्रीकृष्ण - कथामृत
संतकवि श्रीगणुदास यांनी रचलेले श्रीकृष्ण - कथामृत अमृताची गोडी देते.