एकदा भगवान बुद्ध भ्रमण करता करता एका राज्यात आले. तेव्हा राजाचे मंत्री म्हणाले, " महाराज, तुम्ही स्वतः भगवान बुद्धांच्या स्वागतासाठी जायला हवे!"
हे ऐकून राजा कठोरपणे म्हणाला, "मी का जावे, बुद्ध एक साधू आहे. भिक्षू समोर अशाप्रकारे नतमस्तक होणे माझ्यासाठी योग्य नाही. जर त्याला गरज असेल तर तो स्वतः माझ्या महालात येईल."
विद्वान मंत्रीना राजाचा हा अहंकार रुचला नाही. ते लगेच म्हणाले, " क्षमा करावी परंतु मी तुमच्यासारख्या वयाने लहान असलेल्या माणसाबरोबर काम करू शकत नाही. मला आज्ञा असावी."
यावर राजा रागावला आणि म्हणाला, " मी लहान आहे? मी एवढ्या विशाल साम्राज्याचा राजा आहे आणि तुम्ही मला लहान कसे म्हणू शकता? मी पैशाने, मानाने मोठा आहे आणि म्हणून मी बुद्धाचे स्वागत करणार नाही. "
मंत्री म्हणाले, " महाराज, तुम्ही हे विसरू नका की भगवान बुद्ध हे देखील एक महान सम्राट होते. त्यांनी त्यांचे राजवैभव सोडून एका साधूचे जीवन स्वीकारले आहे, म्हणून ते तुमच्यापेक्षा अधिक श्रेष्ठ आहेत.”
हे ऐकून राजाचे डोळे उघडले. तो भगवान बुद्धांकडे गेला आणि त्याने त्यांच्याकडून दीक्षा घेतली.