संताच्या जीवनातील प्रेरक प्रसंग -भाग पहिला

जीवनाचा मार्ग सुकर करणाऱ्या प्रेरक लघुकथा


दुधातली साय

एका साधूला एक महिला प्रार्थना करत म्हणाली, "महाराज, कृपया आज आमच्या घरी या आणि आम्हाला आशीर्वाद द्या."

त्या स्त्रीने साधूसाठी एका पत्रात दुध काढले. ते दुध त्या पात्रात ओतत असताना दुधातील सगळी साय त्या लहान पात्रात पडली आणि त्या महिलेच्या तोंडातून नकळत 'अरेरे' हे शब्द आले.

तिचे मन साय गेल्यामुळे खूपच हळह्ळले तरीही नंतर त्यात साखर घालून तिने दुध साधूंच्या समोर ठेवले.

साधू त्यांना ज्ञानाच्या गोष्टी सांगत होते. ते बोलत राहिले, पण त्यांनी दूध मात्र प्यायले नाही.

स्त्री ने  विचार केला की कदाचित दूध आता खूप गरम आहे म्हणून साधू महाराज पीत नाहीत. चर्चा संपल्यावर साधू महाराज दुध प्राशन न करताच निघून जाऊ लागले.

मग ती स्त्री त्यांना म्हणाली, "महाराज, दूध प्या."

साधू म्हणाले, "नाही, तुम्ही त्या दुधात साय आणि साखरे व्यतिरिक्त आणखी एक गोष्ट मिसळली आहे म्हणून मी हे दूध पिऊ शकत नाही."

स्त्री म्हणाली, "महाराज. खरच दुधात मी साय आणि साखरे व्यतिरिक्त आणखी काहीच मिसळले नाही?"

संत म्हणाले, "’अरेरे!’ या दुधात ‘अरेरे’ मिसळले आहे त्यामुळे  मी ते पिऊ शकत नाही! "

स्त्रीला आपली चूक समजली आणि तिने लगेच साधूंची क्षमा मागितली. नंतर साधू महाराजांनी दुध प्राशन केले आणि स्त्रीला आशीर्वाद देऊन ते मार्गस्थ झाले