संताच्या जीवनातील प्रेरक प्रसंग -भाग पहिला

जीवनाचा मार्ग सुकर करणाऱ्या प्रेरक लघुकथा


मोहाचा बुरखा

देशाटन करीत असताना एकदा संत कबीर एका छोट्याशा गावी गेले. तेथे त्यांनी पाहिले की काही लोकांना एका वेश्येला गावाबाहेर काढायचे होते [परंतु ती गाव सोडण्यास तयार नव्हती. तेव्हा गावकरी लोकांनी तिचे घर जाळून टाकू असे म्हटले.

तेव्हा संत कबीर यांनी त्यांना थांबवले आणि त्यांना धीर धरायला सांगितले. ते म्हणाले “थांबा, ती स्वतः निघून जाईल.”

संत कबीर दुसऱ्या दिवशी भिक्षापात्र घेऊन वेश्येच्या दारात पोहोचले.एका दैवी पुरुषाला आपल्या  घराच्या दारात भिक्षापात्र घेऊन आलेले पाहून ती आत गेली आणि अनेक पदार्थ घेऊन आली.

संत कबीर यांनी त्या पदार्थांकडे ढुंकून देखील पहिले नाही. 

ते तिला म्हणाले, "मी इथे या पदार्थांची भिक्षा मागायला आलेलो नाही, तर तुझ्या मनावरील मोहाचा बुरखा फाडून टाकण्यासाठी आलो आहे. तुझ्या अंत:करणात जगत जननीचे दिव्य रूप आहे. ते तुझ्या मनावरील मोह रूपी बुरख्याने आच्छादित आहे. मी तोच मोहाचा बुरखा भिक्षा म्हणून मागायला आलो आहे."

हे ऐकून तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती म्हणाली, "बाबा, हे इतके सोपे आहे का? हा मोहाचा बुरखा माझ्या  शरीराला त्वचेप्रमाणे चिकटला आहे. स्वत:ची कातडी सोलून काढण्यासारखे हे दुःख मी कसे सहन करू?"

संत कबीर म्हणाले, “जोपर्यंत मला भिक्षा मिळत नाही तोपर्यंत मी इथून हलणार नाही.”

मग त्या महिलेने असा विचार केला की मोहाचा बुरखा काढावाच लागेल आणि ती गोष्ट गाव सोडल्याशिवाय होऊ शकत नाही. अखेर तिने गाव सोडण्याचा निर्णय घेतला.

तिचा हा  निर्णय ऐकून,  संत कबीर यांना समाधान वाटले आणि ते स्वतःशी म्हणाले , " या दरवाजावर भिक्षेसाठी आल्यानंतर आज मी एका स्त्रीला साक्षात जगन्मातेच्या रूपात पाहिले."