संताच्या जीवनातील प्रेरक प्रसंग -भाग पहिला

जीवनाचा मार्ग सुकर करणाऱ्या प्रेरक लघुकथा


व्यसनमुक्ती

एका व्यक्तीला दारू आणि जुगाराचे व्यसन होते. त्यामुळे तो सतत चिंतीत असे. त्याच्या मित्रांनी त्याला सूचना  त्याने सत्संगात जावे, तिथे जाऊन तो या वाईट सवयींपासून मुक्त होईल.

एके दिवशी त्याची एका महान साधूंशी भेट झाली. त्याने आपली संपूर्ण कथा साधूंना कथन केली. साधू खूप विद्वान होते. त्याची समस्या ऐकून ते हसले. ते त्याला त्यांच्यासोबत दुसऱ्या एका खोलीत घेऊन गेले.

त्या खोलीत खिडकीतून सूर्यप्रकाश येत होता. त्यांनी त्याला खिडकीजवळ उभे राहण्यास सांगितले. जेव्हा तो खिडकीजवळ उभा राहिला, तेव्हा त्याची सावली मागच्या भिंतीवर पडत होती.

सावलीकडे निर्देश करत साधूंनी विचारले, "तू या सावलीला लाडू भरवू शकतोस का?"  

साधूंचे बोलणे ऐकून तो तरुण आश्चर्याने म्हणाला,"महाराज , तुम्ही काय बोलत आहात? सावली कसे लाडू खाऊ शकते? हे अशक्य आहे."

मग साधू हसले आणि म्हणाले, "वत्स, तुझीही तीच अडचण आहे. तू सावलीला लाडू भरवण्याचा प्रयत्न करत आहेस. ज्याप्रमाणे सावली लाडू खाऊ शकत नाही, त्याचप्रमाणे सत्संगात जाऊन तू तुझ्या व्यसनापासून मुक्त होऊ शकत नाहीस. व्यसन सोडायचे असेल तर तुला स्वतःलाच लाडू खावे लागतील. मनात एक संकल्प कर आणि आपली व्यसने सोड. यापासून मुक्त होण्याचा दुसरा कोणताही मार्ग नाही. "