संताच्या जीवनातील प्रेरक प्रसंग -भाग पहिला

जीवनाचा मार्ग सुकर करणाऱ्या प्रेरक लघुकथा


स्वर्गाची प्राप्ती

एकदा एक श्रीमंत माणूस येशू ख्रिस्ताकडे आला. त्याने विनवणी केली, "प्रभु, तुम्ही दाखवलेल्या मार्गाचे मी अनुसरण करतो. मी रोज प्रार्थना करतो. मी लोकांची सेवा करतो. मला स्वर्गात पाठवा."
 

येशूने विचारले," तू खरोखर माझ्या शिकवणींचे पालन करतोस का? तू माझ्या प्रत्येक आदेशाचे पालन करण्यास तयार आहेस का? "

श्रीमंत म्हणाला," होय प्रभु, मी तुमचा प्रत्येक आदेश पाळायला तयार आहे. "

येशू म्हणाला, "जर तू माझ्या प्रत्येक आज्ञेचे पालन करण्यास तयार असशील तर तुझ्या तिजोरीच्या चाव्या माझ्याकडे दे."

हे ऐकून श्रीमंत स्तब्ध झाला.तो म्हणा;ला, "मी माझ्या तिजोरीच्या चाव्या कशा देऊ शकतो. त्यामध्ये माझ्या सर्व ठेवी आहेत. त्यांच्याशिवाय मी सेवेचे काम सुद्धा करू शकत नाही."

हे ऐकून येशू ख्रिस्त म्हणाला, "भल्या माणसा, तुझा लोभ लपवण्यासाठी सेवेचा आव आणू नकोस. सेवा आणि परोपकार करण्यासाठी पैशाची नाही तर मनापासून असलेल्या इच्छेची आणि तळमळीची गरज आहे. तू अजूनही लोभामुळे बांधलेला आहेस. जो कोणी काम, क्रोध आणि मद याच्या फेऱ्यात अडकतो तो कधीही स्वर्ग प्राप्त करू शकत नाही. स्वर्ग प्राप्त करण्यासाठी, या बंधनांपासून मुक्त होणे आवश्यक आहे. "

हे ऐकून श्रीमंताला स्वत:ची लाज वाटली.