सार्थ श्रीसत्यनारायण पूजा कथा

Satyanarayan is a very popular vrata and this vrat katha is always told during the katha. It is considered holy to listen to this story.


सार्थ श्रीसत्यनारायण पूजा कथा - अध्याय तिसरा

अध्याय तिसरा
सूत उवाच ॥ पुनरग्रे प्रवक्षयामि शृणुध्वं मुनिसत्तमा: ॥ पुरा चोल्कामुखो नाम नृपश्चासीन्महीपति: ॥१॥
जितेंद्रिय: सत्यवादी ययौ देवालयं प्रति ॥ दिने दिने धनं दत्त्वा द्विजान्संतोषयन्सुधी: ॥२॥
भार्या तस्य प्रमुग्धा च सरोजवदना सती ॥ भद्रशीला नदीतीरे सत्यस्य व्रतमाचरत्॥३॥
एतस्मिन्नंतरे काले साधुरेक: समागत: ॥ वाणिज्यार्थं बहुधनैरनेकै: परिपूरित: ॥४॥
नावं संस्थाप्य तत्तीरे जगाम नृपतिं प्रति ॥ दृष्ट्‌वा स व्रतिनं भूपं पप्रच्छं विनयान्वित: ॥५॥
साधुरुवाच ॥ किमिंद कुरुषे राजन्भक्तियुक्तेन चेतसा ॥ प्रकाशं कुरु तत्सर्वं श्रोतुमिच्छामि सांप्रतम्॥६॥

सूत सांगतात, "ऋषीहो, याविषयी आणखी एक कथा सांगतो ती ऎका. पूर्वी या पृथ्वीवर उल्कामुख नावाचा एक सार्वभौम राजा होता. ॥१॥ तो राजा जितेंद्रिय व सत्य बोलणारा, भक्तिमान व बुद्धिमान्होता. तो देवळात जाऊन प्रत्येक दिवशी ब्राह्मणांना द्र्व्य देऊन संतुष्ट करीत असे. ॥२॥ त्याची भार्या पतिव्रता, सुंदरवदना व अत्यंत रूपवान होती. एक दिवशी तो राजा स्त्रीसह नदीचे तीरावर सत्यनारायणाचे पूजन करीत होता. ॥३॥ त्या वेळी साधुवाणी व्यापारासाठी पुष्कळ द्रव्य घेऊन राजा पूजन करीत होता त्या ठिकाणी आला, ॥४॥ व नौका नदीच्या तीरावर उभी करून राजाच्या जवळ आला व व्रत करणार्‍या राजाला पाहून अत्यंत विनयाने विचारू लागला. ॥५॥ साधुवाणी म्हणाला, "हे राजा, भक्तियुक्त अंत:करणाने हे तू काय करीत आहेस, ते सविस्तर मला सांग. माझी ऎकण्याची इच्छा आहे." ॥६॥
राजोवाच ॥ पूजनं क्रियते साधो विष्णोरतुलतेजस: ॥ व्रतं च स्वजनै: सार्धं पुत्राद्यावाप्तिकाम्यया ॥७॥
भूपस्य वचनं श्रुत्वा साधु: प्रोवाच सादरम्॥ सर्वं कथय मे राजन् करिष्येऽहं तवोदितम्॥८॥
ममापि संततिर्नास्ति एतस्माज्जायते ध्रुवम्॥ ततो निवृत्य वाणिज्यात्सानंदो गृहमागत: ॥९॥
भार्यायै कथितं सर्वं व्रतं संततिदायकम्॥ तदा व्रतं करिष्यामि यदा मे संसतिर्भवेत्॥१०॥
इति लीलावती प्राह पत्‍नीं साधु: ससत्तम: ॥ एकस्मिन्दिवसे तस्य भार्या लीलावती सती ॥११॥
भर्तृयुक्तानंदचित्ताऽभवद्धर्मपरयणा ॥ गर्भिणी साऽभवत्तस्य भार्या सत्यप्रसादत: ॥१२॥
दशमे मासि वै तस्य: कन्यरत्‍नमजायत ॥ दिने दिने सा ववृधे शुक्लपक्षे यथा शशी ॥१३॥
नाम्ना कलावती चेंति तन्नामकरणं कृतम्॥ ततो लीलावती प्राह स्वामिनं मधुर वच: ॥१४॥

राजा म्हणाला, "हे साधो, पुत्र, धन इत्यादी प्राप्त व्हावे या हेतूने अतुल तेजस्वी, सर्व मनोरथ पूर्ण करणार्‍या सत्यनारायण विष्णूचे पूजनात्मक व्रत मी बांधवासह करीत आहे." ॥७॥ राजाचे हे वाक्य ऎकून अत्यंत आदराने साधुवाणी म्हणाला. "महाराज आपण हे व्रत विस्तार करून मला सांगा; जसे सांगाल तसे मी करीन,. ॥८॥ मला पण संतती नाही. ती या व्रतामुळे नक्की होईल." असे बोलून व्यापारासाठी अन्य गावी न जाता आनंदाने साधुवाणी घरी परत आला, ॥१०॥ व त्याने संतती देणारे हे व्रत आपल्या भार्येला सांगितले, ज्या वेळी मला संतती होईल त्या वेळी मी सत्यनारायणाचे व्रत करीन असा नवस पण त्याने केला. ॥१०॥ अशा प्रकारचे व्रत शीलवान्साधु वाण्याने आपल्या लीलावती नावाच्या भार्येला सांगितले. नंतर धार्मिक व पतिव्रता अशी त्याची लीलावती नावाची भार्या आनंदी अंत:करणाने पतीची सेवा करीत असता, सत्यनारायणाच्या कृपाप्रसादाने गर्भवती झाली. ॥११॥ ॥१२॥ नंतर तिला दहावा महिना सुरू होताच एक कन्यारत्‍न झाले. ती कन्या शुक्ल पक्षातील चंद्राप्रणाणे प्रत्येक दिवशी वाढू लागली व म्हणूनच तिचे नाव कलावती असे ठेवले. नंतर काही दिवसांनी त्या लीलावतीने साधु वाण्याला गोड वाणीने प्रश्न विचारला. ॥१३॥ ॥१४॥
न करोषि किमर्थवै पुरा संकल्पितं व्रतम्॥ साधुरुवाच ॥ विवाहसमये त्वस्या: करिष्यामि व्रतं प्रिये ॥१५॥
इति भार्यां समाश्वास्य जगाम नगरं प्रति ।। तत: कलावती कन्या विवृधे पितृवेश्मनि ॥१६॥
दृष्ट्‌वा कन्यां तत: साधुर्नगरे सखिभि: सह ॥ मंत्रयित्वा द्रुतं दूतं प्रेषयामास धर्मवित्॥१७॥
विवाहार्थं च कन्याया वरं श्रेष्ठं विचारय ॥ तेनाज्ञप्तश्च दुतोऽसौ कांचनं नगरं ययौ ॥१८॥
तस्मादेकं वणिक्पुत्रं समादायागतो हि स: ॥ दृष्ट्‌वा तु सुंदरं बालं वणिक्पुत्रं गुणान्वितम्॥१९॥
ज्ञातिभिर्बंधुभि: सार्धं परितुष्टेन चेतसा ॥ दत्तवान्साधु: पुत्राय कन्यां विधिविधानत: ॥२०॥
ततोऽभाग्यवशात्तेन विस्मृतं व्रतमुत्तमम्, विवाहसमये तस्यास्तेन रुष्टोऽभवत्प्रभु: ॥२१॥
तत: कालेन नियतो निजकर्मविशारद: ॥ वाणिज्यार्थं गत: शीघ्रं जामातृसहितो वणिक्॥२२॥

"महाराज, पूर्वी केलेले नवस केलेले सत्यनारायणाचे व्रत आपण का करीत नाही?" असा तिचा प्रश्न ऎकून साधुवाणी म्हणाल. "हे प्रिये, कलावतीच्या लग्नाच्या वेळी हे सत्यनारायणाचे व्रत मी करीन." ॥१५॥ अशा प्रकारे भार्येचे समाधान करून व्यापारासाठी साधुवाणी दुसर्‍या गावाला निघून गेला. त्याची कन्या कलावती गुणांनी व वयाने मोठी होऊ लागली. ॥१६॥ साधु वाण्याने आपली मुलगी लग्नाला योग्य झाली आहे असे पाहून मित्रमंडळींबरोबर विचार केला व लगेच उत्तम वर शोधण्यासाठी एका दूताला आज्ञा केली. तो दूत आज्ञेप्रमाणे वर शोधण्यासाठीकांचन नावाच्या नगराला आला. ॥१७॥ ॥१८॥ नंतर तो दूत एका वाण्याच्या मुलाला घेऊन परत आला; त्या वेळी सर्वगुणसंपन्न व सुंदर अशा वाण्याच्या मुलाला पाहून ॥१९॥ त्या साधुवाण्याने आपल्या ज्ञातिबांधवांसह आनंदी अंत:करणाने त्या वैश्यपुत्राला विधियुक्त कन्यादान केले. ॥२०॥ त्या विवाहाचे वेळी दुर्दैवाने पूर्वी नवस केलेले सत्यनारायणाचे व्रत करण्यास तो विसरला. त्यामुळे भगवान्रागावले. ॥२१॥ नंतर तो व्यापारात चतुर असणारा साधुवाणी कालाच्या प्रेरणेप्रमाणे व्यापारासाठी जावयासह निघून गेला. ॥२२॥
रत्‍नसारपुरे रम्ये गत्वा सिंधुसमीपत: ॥ वाणीज्यमकरोत्साधुर्जामात्रा श्रीमता सह ॥२३॥
तौ गतौ नगरे रम्ये चंद्रकेतोर्नृपस्य च ॥ एतस्मिन्नैव काले तु सत्यनारायण: प्रभु: ॥२४॥
भ्रष्टप्रतिज्ञामालोक्य शापं तस्मै प्रदत्तवान्‌ ॥ दारुणं कठिनं चास्य महद्‌दु:खं भविष्यति ॥२५॥
एकस्मिन्दिवसे राज्ञो धनमादाय तस्कर: ॥ तत्रैव चागतश्चौरो वणिजौ यत्र संस्थितौ ॥२६॥
तत्पश्चाद्धवकान्दूतान्दृष्ट्‍वा भीतेन चेतसा ॥ धनं संस्थाप्य तत्रैव स तु शीघ्रमलक्षित: ॥२७॥
ततो दूता: समायाता यत्रास्त्रे सज्जनो वणिक्‌ ॥ दृष्ट्‍वा नृपधनं तत्र बद्‌ध्वा दूतैर्वणिक्सुतौ ॥२८॥
हर्षेण धावमानाश्च ऊनुर्नृपसमीपत: ॥ तस्करौ द्वौ समानीतौ विलोक्याज्ञापय प्रभो ॥२९॥
राज्ञाज्ञप्तास्तत: शीघ्रं दृढं बद्‌ध्वा तु तावुभौ ॥ स्थापितौ द्वौ महादुर्गे कारागारेऽविचारत: ॥३२॥

आणि सिंधु नदीच्या जवळ असणार्‍या रम्य अशा रत्‍नपुरामध्ये जाऊन आपल्या श्रीमान्जावयासह तो साधु वाणी व्यापार करू लागला. ॥२३॥ ते दोघे चंद्रकेतूच्या नगरात व्यापार करीत असता काही काल उत्तम गेला. इतक्यातच सत्यनारायणप्रभूंनी हा वाणी आपल्या सत्यनारायणपूजनाच्या प्रतिज्ञेपासून भ्रष्ट झाला आहे म्हणून याला भयंकर दु:ख प्राप्त होवो असा शाप दिला.॥२४॥ शाप दिल्यानंतर थोड्याच दिवसांत चंद्रकेतूच्या राजवाड्यात चोरी झाली व तो चोर चोरलेले द्रव्य घेऊन साधुवाणी ज्या ठिकाणी राहत होता त्या ठिकाणी आला. ॥२६॥ आपल्यामागून राजदूत येत आहेत असे पाहून तो चोर घाबरला व चोरलेले द्रव्य साधुवाण्याच्या दाराजवळ टाकून तो चोर पळून गेला. ॥२७॥ इतक्यात ते राजदूत, सज्जन साधुवाणी ज्या ठिकाणी राहत होता त्या ठिकाणी आले व त्यांनी चोरीस गेलेले राजद्रव्य त्या ठिकाणी पाहिले व हेच ते चोर आहेत असे समजून त्या दोघांस बांधले, ॥२८॥ व आनंदाने धावत धावत त्या दोघांना आपणासमोर आणले आहेत. आज्ञा करावी." ॥२९॥ राजाने विशेष विचार न करताच त्यांना बंदीशाळेत टाकण्याची आज्ञा केली व लगेच राजदूतांनी त्या दोघांना बेड्या घालून किल्ल्यातील कारागृहात टाकले. ॥३०॥
मायया सत्यदेवस्य न श्रुतं कैस्तयोर्वच: ॥ अतस्तयोर्वनं राज्ञा गृहीतं चंद्रकेतुना ॥३१॥
तच्छापाच्च गृहे तस्य भार्या चैवातिदु:खिता ॥ चौरेणापह्रतं सर्वं गृहे यच्च स्थितं धनम्॥३२॥
आधिव्याधिसमायुक्ता क्षुत्पिपासादिदु:खिता ॥ अन्नचिंतापर भूत्वा बभ्राम च गृहे गृहे ॥३३॥
कलावती तु कन्यापि बभ्राम प्रतिवासरम्॥ एकस्मिन्दिवसे जाता क्षुधार्ता द्विजमंदिरम्॥ गत्वाऽपश्यद्व्रतं तत्र सत्यनारायणस्य च ॥३४॥
उपविश्य कथां श्रुत्वा वरं प्रार्थितवत्यपि ॥ प्रसादभक्षणं कृत्वा ययौ रात्रौ गृहं प्रति ॥३५॥
माता कलावती कन्यां पृच्छयामास प्रेमत: ॥ पुत्रिं रात्रौ स्थिता कुत्रं किं ते मनसि वर्तते ॥३६॥
कन्या कलावती प्राह मातरं प्रति सत्वरम्॥ द्विजालये व्रतं मातर्दृष्टां वांछितसिद्धिदम्॥३७॥

त्यावेळी आम्ही चोर नाहीं असे ते म्हणत होते, परंतु सत्यदेवाच्या मायेमुळे त्यांचे बोलणे कोणी ऎकले नाहि; उलट साधुवाण्याचेच सर्व द्रव्य जप्त केले.॥३१॥ सत्यनारायणाच्या शापामुळे साधुवाण्याच्या भार्येला फार दु:ख झाले व त्याच्या घरातील सर्व द्रव्य चोरांनी चोरले. ॥३२॥ तेव्हापासून मानसिक दु:ख व रोग यांनी व्याप्त होऊन क्षुधा व तृषा यांनी दु:खी झालेली साधुवाण्याची भार्या प्रत्येक घरी भिक्षा मागण्यासाठी फिरू लागली. ॥३३॥ साधुवाण्याची मुलगी कलावतीपण घरोघर भिक्षा मागू लागली. एक दिवस ती कलावती भुकेने व्याकुळ झालेली अशी एका ब्राह्मणाच्या घरी गेली व त्या ठिकाणी तिने सत्यनारायणाचे पूजन चाललेले पाहिले, ॥३४॥ आणि तेथे बसली व नंतर कथा ऎकून सत्यनारायणप्रभूची प्रार्थना केली व प्रसाद भक्षण करून आपल्या घरी गेली. ॥३५॥ त्या वेळी फार रात्र झाली होती. त्यामुळे आईने कलावतीस प्रेमाने असे विचारले की, "हे मुली, तू इतकी रात्र होईपर्यंत कोठे होतीस? तुझ्या मनात काय विचार चालू आहे?" ते ऎकून कलावती म्हणाली, "हे आई, मी ब्राह्मणाच्या घरी सर्व इच्छा पूर्ण करणारे व्रत पाहिले." ॥३६॥ ॥३७॥
तच्छुत्वा कन्यकावाक्य व्रतं कर्तुं समुद्यता ॥ सा मुद्रा तु वणिग्भार्या सत्यनारायणस्य च ॥३८॥
व्रतं चक्रे सैव साध्वी बंधुभि" स्वजनै: सह ॥ भर्तृजमातरौ क्षिप्रमागच्छेतां स्वमाश्रमम्‌ ॥ ३९॥
अपराधं च मे भर्तार्जामातु: क्षन्तुमर्हसि ॥ इति दिव्यं वरं वव्रे सत्यदेवं पुन: पुन: ॥ व्रतेनानेन तुष्टोऽसौ सत्यनारायण: प्रभु: ॥४०॥
दर्शयामास स्वप्नं हि चंद्रकेतुं नृपोत्तमम्॥ बंदिनौ मोचय प्रातर्वणिजौ नृपसत्तम ॥४१॥
देय धनं च तत्सर्वं गृहीतं यत्त्वयाऽधुना ॥ नो चेत्त्वां नाशयिष्यामि सराज्यधनपुत्रकम्॥४२॥
एवमाभाष्य रामानं ध्यानगम्योऽभवत्प्रभु: ॥ तत: प्रभात समये राजा च स्वजनौ: सह ॥४३॥
उपविश्य सभामध्ये प्राह स्वप्नं जनं प्रति ॥ बद्धौ महाजनौ शीघ्रं मोचयध्वं वणिक्सुतौ ॥४४॥
इति राज्ञो यच: श्रुत्वा मोचयित्वा महाजनौ ॥ समानीय नृपस्याग्रे प्राहुस्ते विनयान्विता: ॥४५॥

मूलीचे वाक्य ऎकून आनंदी झालेली साधुवाण्याची भार्या सत्यनारायणाचे व्रत करण्यास तयार झाली ॥३८ ॥ व त्या पतिव्रता असणार्‍या साधुवाण्याच्या भार्येने आपला पती व जावई लवकर घरी येवोत असा संकल्प करून बांधव व इतर आप्तजन यांसह सत्यनारायणाचे पूजन केले ॥३२॥ व 'हे भगवंता, माझ्या पतीचे व जावयाचे अपराध क्षमा करण्यास आपण समर्थ आहात' अशी सत्यनारायणाची प्रार्थना केली. त्या वेळी भगवान सत्यनारायण व्रताने संतुष्ट झाले. ॥४०॥ नंतर चंद्रकेतुच्या स्वप्नात जाऊन त्यांनी सांगितले, "हे नृपश्रेष्ठा, तू जे दोन वाणी बंदीशाळेत टाकले आहेस ते सकाळी सोडून दे. ॥४१॥ तसेच हे राजा, तू जे त्यांचे धन घेतले आहेस ते त्यांचे त्यांना परत दे. ॥४२॥ असे जर तू न करशील तर धन, पुत्र व राज्य यांसह तुझा नाश करीन." असे राजास स्वप्नात सांगून सत्यनारायण भगवान्अदृश्य झाले. नंतर प्रात:काळी राजाने सभेमध्ये बसून स्वजनांसह सर्वांना ते स्वप्न सांगितले व जे दोन वाणी आपण बंदीशाळेत टाकले आहेत त्यांना लवकर मुक्त करा अशी दुतांना आज्ञा केली. ॥४३॥ ॥४४॥ दूतांनी राजाच्या आज्ञेप्रमाणे साधुवाणी व त्याचा जावई या दोघांना बंधमुक्त करून राजाच्यासमोर आणले व हात जोडून नम्रतेने म्हणाले. ॥४५॥
आनीतौ द्वौ वणिक्पुत्रौ मुक्‍तौ निगडबंधनात्॥ ततो महाजनौ नत्वा चंद्रकेतुं नृपोत्तमम्॥४६॥
स्मरंतौ पूर्ववृत्तान्तं मोचतुर्भयविव्हलौ ॥ राजा वणिक्सुतौ वीक्ष्य वच: प्रोवाच सादरम्॥४७॥
दैवत्प्राप्तं महद्‌दु:खनिदानीं नास्ति वै भयम्॥ सदा निगडसंत्यागं क्षौरकर्माद्यकारयत्॥४८॥
वस्त्रालंकरण दत्वा परितोष्य नृपश्च तौ । पुरस्कृत्य वणिक्पुत्रौ वचसाऽतोषयद्भृशम्॥४९॥
पुरा ह्रतं तु यद्‌द्रव्यं द्विगुणीकृत्य दत्तवान् ॥ प्रोवाच तौ ततो राजा गच्छ साधो निजाश्रमम्‌ ॥५०॥
राजानं प्रणिपत्याह गंतव्यं त्वप्रसादत: ॥५१॥
इति श्रीस्कंदपुराणे रेवाखंडे सत्यनारायणव्रतकथायां तृतीयोऽध्याय: ॥३॥

"महाराज, आपल्या आज्ञेप्रमाणे बंदीशाळेतून मुक्त करून दोनही वैश्यपुत्र आणले आहेत." नंतर साधुवाणी व त्याचा जावई यांनी चंद्रकेतु राजाला नमस्कार केला व पूर्वीचा वृत्तान्त आठवून शिक्षेच्या भीतीमुळे त्यांनी काहीच भाषण केले नाही. ॥४६॥ त्या दोघा वाण्यांना पाहून चंद्रकेतु राजा आदराने म्हणाला, "वैश्यहो, तुमच्या दैवयोगाने तुम्हाला दु:ख भोगावे लागले. आता भीती नाही." असे बोलून त्यांच्या बेड्या काढवून क्षौरकर्म व मंगलस्नान करविले. ॥४७॥ ॥४८॥ नंतर त्या दोघांना वस्त्र व अलंकार देऊन गौरव केला व नम्र भाषणाने त्यांना अत्यंत संतुष्ट केले ॥४९॥ व त्या वाण्याने जे द्रव्य घेतले ते ते त्यांना दुप्पट करून दिले व म्हणाला, 'हे साधो, आपण आपल्या घरी जा." नंतर त्या दोघांनी राजाला नमस्कार केला व म्हणाले, "आम्ही आपल्या कृपेने घरी जातो." ॥५०॥ ॥५१॥ या ठिकाणी सत्यनारायण कथेतील तिसरा अध्याय पुरा झाला. ॥३॥ हरये नम: ॥
॥इति तृतीयोध्याय: समाप्त: ॥