पाळणा (बारसे)

बारशाच्या वेळी बाळाला पाळण्यात घालताना म्हणावयाची गाणी


पांडुरंगाचा पाळणा (pahilya divashi palana)

पहिल्या दिवशी आनंद झाला । टाळ-मृदंगाचा गजर केला ॥

चंदन बुक्क्याचा सुवास त्याला । पंढरपुरात रहिवास केला ॥ जो. ॥१॥

दुसर्‍या दिवशी करुनी आरती । दिंड्या पताका वैष्णव नाचती ।

वरती बसविला लक्ष्मीचा पती ॥ जो.॥२॥

तिसर्‍या दिवशी दत्ताची छाया । नव्हती खुलली बाळाची छाया ।

आरती ओवाळू जय प्रभूराया । जो. ॥३॥

चवथ्या दिवशी चंद्राची छाया । पृथ्वी रक्षण तव कराया ।

चंद्रसूर्याची बाळावर छाया ॥ जो.॥४॥

पाचव्या दिवशी पाचवा रंग । लावूनि मृदंग आणि सारंग ।

संत तुकाराम गाती अभंग ॥ जो.॥५॥

सहाव्या दिवशी सहावा विलास । बिलवर हंड्या महाली रहिवास ।

संत नाचती गल्लोगल्लीस ॥जो.॥६॥

सातव्या दिवशी सात बहीणी । एकमेकीचा हात धरुनी ।

विनंती करिती हात जोडूनी ॥जो.॥७॥

आठव्या दिवशी आठवा रंग । गोप गौळणी झाल्या त्या दंग ।

वाजवी मुरली उडविसी रंग ॥जो.॥८॥

नवव्या दिवशी घंटा वाजला । नवखंडातील लोक भेटीला ।

युगे अठ्ठवीस उभा राहिला ॥जो.॥९॥

दहाव्या दिवशी दहावीचा थाट । रंगित फरश्या टाकिल्या दाट ।

महाद्वारातून काढिली वाट ॥जो.॥१०॥

अकराव्या दिवशी आकार केला । सोन्याचा कळस शोभे शिखराला ।

रुक्मिणी बैसली डाव्या बाजूला ॥जो.॥११॥

बाराव्या दिवशी बारावी केली । चंद्रभागेत शोभा ही आली ॥

नामदेव ते बसले पायारीला चोखोबा संत महाद्वाराला ॥जो.॥१२॥