लघुपाठ

धर्मानंद कोसंबी लिखित बुद्ध साहित्य


मेत्तसुत्तं 1

मेत्तसुत्तं

करणीयमत्थकुसलेन यं तं सन्तं पदं अभिसमेच्च ||
सक्को उजू च सूजू च सुवचो चस्स मुदु अनतिमानी ||१||

शांतपदाचें ज्ञान मिळवून अर्थकुशल मनुष्याचें जें कर्तव्य (तें सांगतों)| दक्ष, अत्यंत सरळ, गोड बोलणारा, मृदु आणि निगर्वी व्हावें ||१||

सन्तुस्सको च सुभरो च अप्पकिच्चो चा सल्लहुकवुत्ति |
सन्तिन्द्रियो च निपको च अप्पगब्भो कुलेसु अननुगिद्धो ||२||


आणि संतुष्ट, पोसण्यास सुलभ, उलाढाली न करणारा, साधेपणें वागणारा, शांतेंद्रिय, हुशार, जास्त सलगी न करणारा व कुळाविषय़ीं जास्त लोभ न धरणारा व्हावें ||२||

न चं खुद्दं समाचरे किश्चि येन विञ्ञू परे उपवदेय्युं |
सुखिनो वा खेमिन होन्तु सब्बे सत्ता भवन्तु सुखितत्ता ||३||

जेंणेंकरून सुज्ञ लोक आपणास दोष लावतील असें कोणतेंहि क्षुद्र आचरण करूं नये | सर्व प्राणी सुखी, क्षेमी आणि आनंदित होवोत (अशी भावना करावी) ||३||

ये केचि पाणभूतऽत्थि तसा वा थावरा वा अनवसेसा ||
दीघा वा ये महन्ता वा मज्झिमा रस्सकाणुकथूला ||४||


जे कोणी चर किंवा स्थावर, लांब किंवा मोठे, मध्यम किंवा हृस्व, अणुक अणि स्थूल, ते एकंदर प्राणी ||४||

दिट्ठा वा येव अदिट्ठा ये च दूरे वसन्ति अविदूरे ||
भूता वा संभवेसी वा सब्बे सत्ता भवन्तु सुखितत्ता ||५||

दिसणारे अथवा न दिसणारे, आणि जे दूर व जवळ राहतात, उत्पन झालेले किंवा पुढें उत्पन्न होणारे, सर्व प्राणी आनंदित होवोत ||५||