भगवान बुद्ध

गौतम बुद्धांचे चरित्र


प्रकरण एक ते बारा 12

९. कुरू

या देशाची राजधानी इन्द्रप्रस्थ नगर होते. बुद्धसमकाली तेथे कौरव्य नावाचा राजा राज्य करीत असे, एवढीच काय ती माहिती सापडते. पण तेथील राज्यव्यवस्था कशी चालत होती, याची माहिती कोठे सापडत नाही. या देशात बुद्धाच्या भिक्षुसंघासाठी एक देखील विहार नव्हता. बुद्ध भगवान् उपदेश करीत त्या देशात जाई, तेव्हा एखाद्या झाडाखाली किंवा अशाच दुसर्‍या ठिकाणी मुक्कामाला राहत असे. तथापि या देशात बुद्धोपदेशाचे चाहते बरेच होते असे दिसते. त्यापैकी राष्ट्रपाल नावाचा धनाढ्य तरुण भिक्षु झाल्याची कथा मज्झिमनिकायात विस्तारपूर्वक दिली आहे. कुरू देशातील कम्मासदम्म (कल्माषदम्य) नावाच्या नगराजवळ बुद्ध भगवंताने सतिपट्ठानासारखी काही उत्तम सुत्ते उपदेशिल्याचा उल्लेख सुत्तपिटकात सापडतो. त्यावरून असे दिसते की, तेथील सामान्य जनसमूह बुद्धाला मानीत असला, तरी अधिकारी वर्गात त्याचा कोणी भक्त नव्हता आणि वैदिक धर्माचे येथे फारच वर्चस्व होते.

१०-११ पञ्चाला (पांचाला) आणि मच्छा (मत्स्या)

उत्तरपाञ्चालांची राजधानी कम्पिल्ल (काम्पिल्य) होती, असा उल्लेख जातक अट्ठकथेत अनेक ठिकाणी सापडतो;  पण मत्स्य देशाच्या राजधानीचा पत्ता नाही. यावरून असे दिसून येते की, बुद्धसमकाली या दोन देशांना फारसे महत्त्व राहिले नव्हते आणि त्या देशांतून बुद्धाने प्रवास केला नसल्यामुळे तेथील लोकांसंबधाने किंवा शहरासंबंधाने बौद्धग्रंथात फारशी माहिती सापडत नाही.

१२. सूरसेना (शूरसेना)

यांची राजधानी मधुरा (मथुरा). येथे अवंतिपुत्र नावाचा राजा राज्य करीत होता. वर्णाश्रमधर्मासंबंधाने त्याचा व महाकात्यायनाचा संवाद मज्झिमनिकायातील मधुरसुत्तात वर्णिला आहे. या देशात बुद्ध क्वचितच जात असे. मधुरा त्याला फारशी आवडत नसावी, असे खालील सुत्तावरून दिसून येते.

पञ्चिमे भिक्खवे आदीनवा मधुरायं। कतमे पञ्च? विसमा, बहुरजा, चण्डसुनखा, वाळयक्खा, दुल्लभपिण्डा। इमे खो भिक्खवे पञ्च आदीनवा मधुरायं ति।

(अंगुत्तरनिकाय पञ्चकनिपात)

भिक्षुहो, मथुरेत हे पाच दोष आहेत. कोणते पाच? तिचे रस्ते खडबडीत, धूळ फार, कुत्रे द्वाड, यक्ष क्रूर आणि तेथे भिक्षा मिळणे फार कठीण. भिक्षुहो, मथुरेत हे पाच दोष आहेत.