भगवान बुद्ध

गौतम बुद्धांचे चरित्र


प्रकरण एक ते बारा 79

निर्ग्रन्थांची माहिती

निर्ग्रथांच्या मताची बरीच माहिती सुत्तपिटकत सापडते. पैकी मज्झिमनिकायातील चुळदुक्खक्खन्ध सुत्तात बुद्धाचा आणि निर्ग्रथांचा संवाद आहे, त्याचा सारांश असा :--

राजगृह येथे काही निर्गन्थ उभे राहून तपश्चर्या करीत असता बुद्ध भगवान त्यांजपाशी जाऊन म्हणाला, “बंधु हो अशा रीतीने तुम्ही आपल्या शरीराला कष्ट का देता?”

ते म्हणाले, “निर्ग्रन्थ नाथपुत्त सर्वज्ञ आहे. चालत असता, उभा असता, निजला असता किंवा जागा असता आपली ज्ञानदृष्टि कायम असते, असे तो म्हणतो, आणि आम्हास उपदेश करतो की, ‘निग्रंन्थ हो, तुम्ही पूर्वजन्मी पार केले आहे, ते अशा प्रकारच्या देहदंडानाने जीर्ण करा. (निज्जरेथ), आणि या जन्मी कायावाचामनेकरून कोणतेही पाप करू नका. ह्यामुळे पूर्वजन्मीच्या पापाचा तपाने नाश व नवे पाप न केल्यामुळे पुढच्या जन्मी कर्मक्षय होईल आणि त्यामुळे सर्व दु:ख नाश पावेल’ हे त्याचे म्हणणे आम्हास आवडते.”

भगवान म्हणाला, “निर्ग्रन्थ हो, तुम्ही पूर्वजन्मी होता किंवा नव्हता, हे तुम्हास माहीत आहे काय?”

नि.— आम्हाला माहीत नाही.
भ.— बरे पूर्वजन्मी तुम्ही पाप केले किंवा नाही, हे तरी तुम्हास माहीत आहे काय?
नि.— तेही आम्हास माहीत नाही.
भ.— आणि ते अमुक तमुक प्रकारचे पाप होते हे तरी तुम्हा माहीत आहे काय?
नि.— ते देखील आम्हास माहीत नाही.
भ.— तुमच्या एवढ्या दु:खाचा नाश झाला आणि एवढे बाकी आहे, हे तरी तुम्ही जाणता काय?
नि.— तेही आम्ही जाणत नाही.
भ.— या गोष्टी जर तुम्हाला माहीत नाहीत, तर तुम्ही मागल्या जन्मी पारध्यांसारखे क्रूरकर्मी होता. आणि ह्या जन्मी त्या पापांचा नाश करण्याकरिता तपश्चर्या करता, असे होणार नाही काय?
नि.—आयुष्मान गोतम सुखाने सुख प्राप्त होत नसते, दु:खानेच सुख प्राप्त होत असते, सुखाने सुख प्राप्त झाले असते तर बिंबिसार राजाला आयुष्मान गोतमापेक्षा अधिक सुख मिळाले असते.
भ.—निर्ग्रन्थहो, तुम्ही विचार न करता बोलला. येथे मी तुम्हाला एवढे विचारतो की, बिंबिसार राजा सात दिवसपर्यंत सरळ असून एकही शब्द न उच्चारता एकांतसुख अनुभवू शकेल काय? सात दिवस राहू द्या, एक दिवस तरी असे सुख अनुभवू शकेल काय?
“आयुष्मान त्याला हे शक्य नाही,” असे निर्ग्रन्थांनी उत्तर दिले. तेव्हा भगवान म्हणाला, “मी एक दिवसच नव्हे, तर सात दिवस अशा तऱ्हेचे सुख अनुभवू शकतो; आणि तुम्हाला विचारतो की, बिंबिसार राजा (आपल्या वैभवाने) अधिक सुखी की मी अधिक सुखी?”
नि.— असे आहे तर आयुषमान गोतमच बिंबिसार राजाहून अधिक सुखी आहे.
बौद्ध मताची विशेषता दाखविण्यासाठी हा संवाद रचला असला तरी जैन मताचा त्यात विपर्यास केलेला नाही. तपश्चर्येच्या आणि चातुर्यामाच्या अभ्यासाने पूर्व कर्माचा क्षय करता येतो, असे त्यांचे म्हणणे होते आणि ती परंपरा अद्यापि कायम आहे.