भगवान बुद्ध

गौतम बुद्धांचे चरित्र


प्रकरण एक ते बारा 88

कुशल कर्मे व अष्टांगिक मार्ग

यापैकी कुशल कर्मपथांना आर्य अष्टांगिक मार्गात समावेश होतोच. तीन प्रकारचे कुशल कायकर्म म्हणजे सम्यक् कर्म, चार प्रकारचे कुशल वाचसक कर्म म्हणजे सम्यक् वाचा, आणि तीन प्रकारचे मानसिक कुशल कर्म म्हणजे सम्यक् दृष्टि व सम्यक् संकल्पाबाकी राहिलेली आर्य अष्टांगिक मार्गाची चार अंगे या कुशल कर्मपथांना पोषकच आहेत. सम्यक् आजीव, सम्यक् व्यायाम, सम्यक् स्मृति आणि सम्यक् समाधि या चार अंगाच्या यथातथ्य भावनेशिवाय कुशल कर्मपथाची अभिवृद्धि आणि पूर्णता व्हावयाची नाही.

अनासक्तियोग

केवळ कुशल करीत गेलो आणि तर त्यात आसक्त झालो तर त्यायोगे अकुशल उत्पन्न होण्याचा संभव आहे.

कुसलो धम्मो अकुसलस्स धम्मम्स आरम्मणपच्चयेन पच्चयो। दानं दत्वा सीलं समादियित्वा उसथकम्मं कत्वा तं अससादेति अभिनन्दति। तं आरब्भ रागो उप्पज्जति दिठ्ठि उप्पज्जति विचिकिच्छा उप्पज्जति उद्धच्चं उप्पज्जति दोमनस्सं उप्पज्जति (तिकपट्टठान). ‘कुशल मनोविचार अकुशलाला आलंबन प्रत्ययाने प्रत्यक्ष होतो. (एखादा मनुष्य) दान देतो, शील राखतो, उपोसथकर्म करतो आणि त्याचा आस्वाद घेतो त्याचे अभिनंदन करतो. त्यामुळे लोभ उत्पन्न होतो, दृष्टि उत्पन्न होते, शंका उत्पन्न होते, भ्रान्तता उत्पन्न होते, दौर्मनस्य उत्पन्न होते.’ येणेप्रमाणे कुशल मनोवृत्ति अकुशलाला कारणीभूत होत असल्यामुळे कुशल विचारामध्ये आसक्ति ठेवता कामा नये, निरपेक्षपणे कुशल कर्मे करीत राहिले पाहिजे. हाच अर्थ धम्मपदातील खालील गाथेत संक्षेपाने दर्शविला आहे.

सब्बपापस्स अकरणं कुसलस्स उपसम्पदा।
सचित्तपरियोदयन एतं बुद्धान सासनं।।


‘सर्व पापांचे अकरण, सर्व कुशलांचे सम्पादन आणि स्वचित्ताचे संशोधन हे बुद्धाचे शासन होय.’ म्हणजे वर सांगितलेले सर्व अकुशल कर्मपथ पूर्णपणे वर्ज्य करावयाचे आणि कुशल कर्मपथाचे सदोदित चरण करून त्यात आपले मन आसक्त होऊ द्यावयाचे नाही. हे सर्व अष्टांगि मार्गाच्या अभ्यासाने घडून येते.

कुशलकर्मात जागृति आणि उत्साह

कुशलकर्मात अत्यंत जागृति आणि उत्साह ठेवला पाहिजे. अशा प्रकारचे उपदेश त्रिपिटक वाङमयात अनेक सपडतात. त्या सर्वांचा संग्रह येथे करणे शक्य नाही. तथापि नमुन्यादाखल त्यपैकी एक लहानसा उपदेश येथे देतो.

बुद्ध भगवान म्हणतो, “भिक्षुहो, स्त्री पुरुषाने, गृहस्थाने किंवा प्रव्रजिताने पाच गोष्टींचे सतत चिंतन करावे.

(१) मी जराधर्मी आहे असा वारंवार विचार करावा. का की, ज्या तारुण्यामदामुळे प्राणी काया-वाचा-मने, दुराचरण करतात. तो मद या चिंतनाने नाश पावतो, निदान कमी होतो. (२) मी व्यधिधर्मी आहे, असा वारंवार विचार करावा. का की, ज्या आरोग्यमदामुळे प्राणी काया-वाचा-मने दुराचरण करतात. तो मद या चिंतनाने नाश पावतो; निदान कमी होतो. (३) मी मरणधर्मी आहे, असा वारंवार विचार करावा. का की, ज्या जीवितमदामुळे प्राणी काया-वाचा-मने दुराचरण करतात. तो मद या चिंतनाने नाश पावतो. (४) प्रियाचा व आवडत्याचा (प्राण्याचा किंवा पदार्थाचा) मला वियोग घडणार. असा वारंवार विचार करावा. का की, ज्या प्रियाच्या स्नेहामुळे प्राणी काया-वाचा-मने दुराचरण करतात तो स्नेह या चिंतनाने नाश पावतो, निदान कमी होतो. (५) मी कर्मस्वकीय कर्मदायाद, कर्मयोनि, कर्मबंधू, कर्मप्रतिकरण आहे. कल्याणकारक किंवा पापकारक कर्म करीन त्याचा दायाद होऊन, असा वारंवार विचार करावा. का की, त्यामुळे कायिक, वाचसिक आणि मानसिक दुराचरण नाश पावतो, निदान कमी होतो.