भगवान बुद्ध

गौतम बुद्धांचे चरित्र


प्रकरण एक ते बारा 90

ब्राह्मणांचा लोकसंग्रह

परंतु जर एखाद्याच्या मनात विचार आला की, प्रजापतीने प्रवर्तिलेले हे चक्र ठीक नाही. कारण त्याच्या बुडाशी हिंसा आहे, तर तो मनात येऊ देऊ नये, त्यामुळे अज्ञ जनांचा बुद्धिभेद होईल.

न बुद्धिभेदं जनयेदज्ञानां कर्मसंगिनाम।।
जोषयेत्सर्वेकर्माणि विद्वानयुकत: समाचरन।।


‘कर्मात आसक्त असलेल्या अज्ञ जनांचा बुद्धिभेद करू नये, विद्वान मनुष्याने युक्त होऊन, म्हणजे सर्व कर्मे नीटपणे आचरून इतरांना तो करण्यास लावावीत.’ (भ. गो. ३।२६ हा गीताचे सर्वच अध्याय विचारणीय आहे.)

भगवदगीता कोणत्या शतकात लिहिली या वादात पडण्याचे कारण नाही. परंतु कोणत्याही लेखकाने तिला बुद्धसमकालीन गणले नाही. बुद्धानंतर पाचशे वर्षापासून एक हजार वर्षापर्यंत तिचा काळ असावा अशी भिन्न भिन्न अनुमाने पाश्चात्त्य पण्डितांनी केली आहेत. यात शंका नाही की, ती बरीच आधुनिक आहे. तथापि येथे दर्शविलेले विचार बुद्धसमकालाच्या ब्राह्मणात प्रचलित होते. आपणाला जरी कुशल तत्त्व समजले तरी ते लोकांत प्रगट करू नये, असे लोहित्य नावाचा कोसलदेशवासी प्रसिद्ध ब्राह्मण प्रतिपादीत असे. संक्षेपाने त्याची गोष्ट येणेप्रमाणे –

भगवान कोमल देशात प्रवास करीत शालवतिका नावाच्या गावाजवळ आला. तो गाव पसेनदि कोसलराजाने लोहित्य ब्राह्मणाला इनाम दिला होता. लोहित्य असे एक पापकारक मत प्रतिपादन करी की, ‘जर एखाद्या श्रमणाला किंवा ब्राह्मणाला कुशल तत्त्वाचा बोध झाला तर तो त्याने दुसर्‍याला सांगू नये. एक मनुष्य दुसर्‍याचा काय करू शकणार? तो दुसर्‍याचे जुने बंधन तोडून त्याला हे नवे बंधन उत्पन्न करील; यास्तव हे लोभी वर्तन असे मी म्हणतो.

भगवान आपल्या गावाजवळ आल्याचे वर्तमान जेव्हा लोहित्य ब्राह्मणाला समजले, तेव्हा रोसिका नावाच्या न्हाव्याला पाठवून त्याने भगवंताला आमंत्रण दिले. आणि दुसर्‍या दिवशी जेवण तयार करून त्याच न्हाव्याकडून जेवण तयार असल्याचे वर्तमान भगवंताला आणि भिक्षुसंघाला कळविले. भगवान आपले पात्र आणि चीवर घेऊन लोहित्य ब्राह्मणाच्या घरी येण्यास निघाला. वाटेत रोसिका न्हाव्याने लोहित्य ब्राह्मणाचे मत भगवंताला सांगितले आणि तो म्हणाला, “भदन्त ह्या पापकारक मतापासून लोहित्याची सुटका करा.”

लोहित्याने भगवंताला आणि भिक्षुसंघाला आदरपूर्वक भोजन दिले. भोजनोत्तर भगवान त्याला म्हणाला, “हे लोहित्य एखाद्याला कुशल तत्त्वाचा बोध झाला तर तो त्याने इतरांना सांगू नये, असे तू प्रतिपादन करतोस काय?”

लो.— होय, भो गोतम.
भ.— हे लोहित्य, तू ह्या शालवतिका गावात राहत आहेस. आता कोणी असे म्हणेल की, ह्या शालवतिका गावाचे जेवढे उत्पन्न याहे. ते सर्व एकट्या लोहित्यानेच उपभोगावे, दुसर्‍या कोणालाहि देऊ नये, असे बोलणारा तुझ्यावर अवलंबून असणार्‍या (ह्या गावच्या) लोकांचे अकल्याण करणारा होणार नाही काय?
लोहित्याने ‘होईल’ असे उत्तर दिल्यावर भगवान म्हणाला, ‘जो इतरांना अंतराय करणारा तो त्यांचा हितानुकपी होईल की अहितानुकपी?”
लो.— अहितानुकपी, भो गोतम.
भ.— अशा माणसाचे मन मैत्रीमय असेल, की वैराग्य असेल?
लो.— वैरमय, भो गोतम.
भ.— वैरमय चित्त असलेला माणूस मिथ्यादृष्टि होईल की सम्यग्दृष्टि?
लो.— मिथ्यादृष्टि भो गोतम.