भगवान बुद्ध

गौतम बुद्धांचे चरित्र


प्रकरण एक ते बारा 91

कुशल कर्माने अकुशलावर जय मिळवावा

येथे आणि दुसर्‍या अनेक ठिकाणी बुद्ध भगवंताचे म्हणणे असे की, चालत आलेल्या कुशल रूढीविरुद्ध कुशल विचार सुचला तर तो लोकांत प्रचलित करणे हे सज्जन मनुष्याचे श्रेष्ठ कर्तव्य होय, वाईट कर्मे आचरणार्‍याला काही एक न बोलता किंवा आपण त्याच्यासारखेच वागून ती तशीच आचरू देणे हे कर्तव्य नव्हे.

ब्राह्मणांचे म्हणणे होते की, यज्ञयाग आणि वर्णव्यवस्था प्रजपतीनेच उत्पन्न केली असल्यामुळे त्यांना अनुसरून घडणारी कर्मे पवित्र होत. परंतु भगवान बुद्धाचे म्हणणे हे की, तृष्णेपासून उतपन्न झालेली हिंसादिक कर्मे कधीही शुद्ध होऊ शकत नाहीत. त्यामुळे मनुष्य विषम मार्गात बद्ध झाला आहे आणि त्या कर्माविरुद्ध कुशल कर्मे आचरल्यानेच त्याची ह्या विषम मार्गापासून सुटका होईल. मज्झिमनिकायातील उल्लेख सुत्तांत (नं. ८) भगवान म्हणतो, ‘हे चुन्द, दुसरे हिंसक वृत्तीने वागतात तेथे आपण अहिंसक होऊ या, अशी सफाई* करावी. दुसरे प्राणघात करतात तर आपण प्राणघातापासून निवृत्त होऊ या अशी सफाई करावी, दुसरे चोर होतात तर आपण चोरापासून निवृत्त होऊ या. दुसरे  अब्रह्मचारी तर आपण होऊ या. दुसरे खोटे बोलतात, तर आपण खोटे बोलण्यापासून निवृत्त होऊ या. दुसरे चहाडी करतात तर आपण चहाडीपासून निवृत्त होऊ या. दुसरे शिवीगाळ करतात तर आपण शिवीगाळीपासून निवृत्त होऊ या. दुसरे वृथाप्रलाप (बडबड) करतात तर आपण वृथाप्रलपापासून निवृत्त होऊ या. दुसरे परकीय धनाचा लोभ धरतात तर आपण परकीय धनाच्या लोभापासून मुक्त होऊ या. दुसरे द्वेष करतात तर आपण द्वेषपासून मुक्त होऊ या. दुसरे मिथ्यादृष्टि आहेत, तर आरण सम्यग्दृष्टि होऊ या, अशी सफाई करावी...
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
*शंख वगैरे पदार्थ घासून साफ करतात. त्याला सल्लेख म्हणतात. या ठिकाणी आत्मशुद्धीला सफाई म्हटले आहे.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
“हे चुन्द एखाद्या विषम मार्गात सापडलेल्या माणसाला त्यातून बाहेर पडण्यासाठी सरळ मार्ग सापडावा, त्याप्रमाणे विहिंसक माणसाला विहिंसेपासून बाहेर निघण्याला अविहिंसा आहे. प्राणघाती माणसाला मुक्त होण्याला प्राणघातापासून विरति, चोराला मुक्त होण्याला चोरीपासून विरति, अब्रह्मचार्‍याला मुक्त होण्याला अब्रह्मचर्यापासून विरति, लबाडाला मुक्त होण्याला लबाडीपासून विरति, चहाडखोराला मुक्त होण्याला चहाडीपासून विरति, कर्कश वचन बोलणार्‍याला मुक्त होण्यास कर्कश वचनापासून विरति, आणि वृथाप्रलाप करणार्‍यास मुक्त होण्याला वृथाप्रलापापासून विरति, हाच उपाय आहे...”

“हे चुन्द, जो स्वत: गंभीर पंकात रुतलेला आहे, तो दुसर्‍याला त्या चिखलातून वर काढील हे शक्य नाही. त्याचप्रमाणे ज्याने स्वत:चे दमन केले नाही स्वत:ला शिस्त लावून घेतली नाही, जो स्वत: शान्त नाही, तो दुसर्‍याचे मन करील, दुसर्‍याला शिस्त लावील, दुसर्‍याला शांत करील, हे संभवत नाही. पण जो स्वत: दान्त, विनीत आणि परिनिर्वृत्त असेल तोच दुसर्‍याचे दमन करील, दुसर्‍याला विनय शिकवील आणि दुसर्‍याला परिनिर्वृत्त (शान्त) करील हे संभवनीय आहे.”

हाच अर्थ धम्मपदाच्या एका गाथेत संक्षेपाने निर्देशिला आहे. ती गाथ ही –

अक्कोधोन जिने कोधं असाधुं साधुन जिने।
जिने कदरियं दानेन सच्चेनालीकवादिनं।।


‘क्षमेने क्रोधाला जिंकावे, असाधूला साधुत्वाने जिंकावे, कृपणाला दानानेन जिंकावे व लबाडाला सत्याने जिंकावे.’