भगवान बुद्ध

गौतम बुद्धांचे चरित्र


प्रकरण एक ते बारा 97

या चारांचेही सविस्तर विवरण त्या सुत्तात सापडते. त्यापैकी तिसर्‍या प्रकारच्या माणसाच्या वर्णनाचा सांराश येणेप्रमाणे :-- भगवान म्हणतो, “भिक्षुहो, आत्मन्तप आणि परन्तप माणूस कोणता? एखादा क्षत्रिय राजा किंवा एखादा श्रीमंत ब्राह्मण एक नवीन संस्थागार बांधतो आणि मुंडण करून खराजिन पांघरून तुपालेताने अंग माखतो, व मृगाच्या शिंगाने पाठ खाजवीत आपल्या पत्नीसह व पुरोहित ब्राह्मणासह त्या संस्थागारात प्रवेश करतो. तेथे ते शेण सारवलेल्या जमिनीवर काही न अंथरता निजतो. एका चांगल्या गाईच्या एका पान्ह्याच्या दुघावर तो राहतो. दुसर्‍या पान्हयाच्या दुधावर त्याची पत्नी राहते आणि तिसर्‍या पान्हयाच्या दुधावर पुरोहित ब्राह्मण राहतो. चौथ्या पान्ह्याच्या दुधाने होम करतात. चारही पान्ह्यातून शिल्लक राहिलेल्या दुधावर वासराला निर्वाह करावा लागतो.

“मग तो म्हणतो, ‘ह्या माझ्या यज्ञाकरिता इतके बैल मारा, इतके गोहरे मारा, इतकया कलवडी मारा, इतके बकरे मारा, इतके मेंढे मारा, यूपांसाठी इतके वृक्ष तोडा, कुशासनासाठी इतके दर्भ कापा.’ त्याचे दास, दूत आणि कर्मकार दंडभयाने भयभयीत होऊन आसवे गाळीत रडत रडत ती कामे करतात. या म्हणतात, आत्मन्तप आणि परन्तप.”

लोकांना गोहिंसा नको होती

हे दास दूत आणि कर्मकार यज्ञाची कामे रडत रडत का करीत असावेत? कारण, या यज्ञात जी जनावरे मारली जात. ती गरीब शेतकर्‍यांकडून हिरावून घेण्यात येत असत, आणि त्यामुळे शेतकर्‍यांना फार दु:ख होईल, सुत्तनिपातातील ब्राह्मणधम्मिक सुत्तांत अतिप्राचीन काळच्या ब्राह्मणाचे चरण वर्णिले आहे. त्यात खालील गाथा सापडतात –

यथा माता पिता भाता अञ्ञे वापि च आतका।
गावो ना परमा मत्ता यसु जायन्ति ओसधा।।
अन्नदा बलदा चेत वण्णदा सुखदा तथा।
एतमत्थवसं अत्था नस्सु गावो हनिसु ते।।


‘आई, बाप, भाऊ, आणि दुसरे सगेसोयरे, याप्रमाणेच गाई आमच्या मित्र आहेत. का की, शेती त्यांच्यावर अवलंबून असते. त्या अन्न, बल, कान्ति आणि सुख देणार्‍या आहेत. हे कारण जाणून प्राचीन ब्राह्मण गाईची हत्या करीत नव्हते.’
यावरून असे दिसून येते की, सामान्य लोकांना गाई आपल्या आप्तेष्टांसारख्या वाटत, आणि यज्ञयागात त्यांची बेसुमारपणे कत्तल करणे त्यांना मुळीच पसंत नव्हते. राजांनी आणि श्रीमंत लोकांनी स्वत:च्या गाईचा वध केला असता, तर त्यांच्या दास, कर्मकारांना रडण्याचा प्रसंग कमी प्रमाणात आला असता, पण ज्याअर्थी ही जनावरे त्यांच्यासारख्या गरीब शेतकर्‍यांकडून बळजबरीने घेतली जात. त्याअर्थी त्यांना अतोनात दु:ख होणे अगदी साहजिकच होते. यज्ञासाठी लोकांवर जबरदस्ती कशी होत असे हे खालील काथेवरून दिसून येईल.

ददन्ति एके विसमे विनिट्ठा
छेत्वा वधित्वा अथ सोचयित्वा!
सा दक्खिणा अस्सुमुखा सदण्डा।
समेन दिन्नस्स न अग्धेमेति।

‘कोणी विषम मार्गात निविषट होऊन हाणमार करून लोकांना शोक करावयास लावून दान देतात. ती (लोकांच्या) अश्रूंनी भरलेली सदण्ड दक्षिणा समत्वाने दिलेल्या दानाची किंमत पावत नाही.’

त्या काळी जसे यज्ञयागासाठी तसेच उदरनिर्वाहासाठी अनेक प्राणी मारले जात, गाईला मारून तिचे मास चवाठ्यावर विकण्याची प्रथा फार होती.* परंतु बुद्धाने जितका यज्ञयागांचा निषेध केला तितका या कृत्यांचा केलेला दिसून येत नाही. चवाठ्यावर मास विकण्याची पद्धति बुद्धाला पसंत होती असे समजता कामा नये. पण एखाद्या यज्ञयागासमोर तिची काहीच किंमत नव्हती. कसायाच्या हाती जी गाय आणि जो बैल पडे, ती गाय दुभती नसे आणि तो बैल शेतीला निरुपयोगी झालेला असे; त्याच्याबद्दल कोणी आसवे गाळीत नसत. यज्ञाची गोष्ट निराळी होती. पाचशे किंवा सातशे कालवडी किंवा गोहरे एका यज्ञात मारावयाचे म्हणजे शेतीचे किती नुकसान होत असे आणि त्याबद्दल शेतकरी लोक किती हळहळत, याची नुसती कल्पनाच केली पाहिजे! अशा जुलमांचा निषेध बुद्धाने केला तर त्याला वेदनिंदक कां म्हणावे?
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
*सेय्यथापि भिक्खवे दक्खो गोघातकी वा गोघातकन्तेवासी वा गावि वधित्वा चातुम्महापथे बिलसो विङजित्वा निसिन्नो अस्स। (सतिपट्ठानसुत्त)
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------