भगवान बुद्ध

गौतम बुद्धांचे चरित्र


प्रकरण एक ते बारा 125

धार्मिक संवाद किंवा आर्यमौन

सदोदित मौन धारण करून राहणारे मुनि बुद्धसमकाली पुष्कळ होते. मुनि शब्दावरूनच मौन शब्द साधला आहे. ही तपश्चर्या बुद्धाला पसंत नव्हती. ‘‘अविद्वान् अडाणी मनुष्य मौनधारणाने मुनि होत नाही.’’ तथापि काही प्रसंगी मौन धारण करणे योग्य आहे, असे भगवंताचे म्हणणे होते. अरियपरियेसन सुत्तात (मज्झिमिनकाय नं. २६) भगवान म्हणतो, ‘‘भिक्षुहो, एक तर तुम्ही धार्मिक चर्चा करावी किंवा आर्य मौन धरावे.’’

शांततेचा दाखला


जेव्हा बुद्ध भगवान् भिक्षुसंघाला उपदेश करीत नसे, तेव्हा सर्व भिक्षु अत्यंत शांततेने वागत; गडबड मुळीच होत नसे. याचा एक उत्कृष्ट नमुना दीघनियकायातील सामञ्जफलसुत्तात सापडतो, तो प्रसंग असा—

भगवान बुद्ध राजगृह येथे जीवक कौमारभुत्याच्या आम्रवनात मोठय़ा भिक्षुसंचासह राहत होता त्या समयी कार्तिकी पौर्णिमेच्या रात्री अजातशत्रू राजा आपल्या अमात्यासह वर्तमान प्रासादाच्या वरच्या मजल्यावर बसला होता. तो उद्गारला, ‘‘किती सुंदर रात्र आहे ही! असा कोणी श्रमण किंवा ब्राह्मण येथे आहे काय, की जो आपल्या उपदेशाने आमचे चित्त प्रसन्न करील?’’ त्या वेळी पुरण कस्सप, मक्खलि गोसाल, अजित केसकंवल, प्रुध कच्चायन, संजय वेलट्ठपुत आणि निगण्ठ नाथपुत्त हे प्रसिद्ध श्रमण आपापल्या संघांसह राजगृहाच्या आसपास राहत होते. अजातशत्रूच्या अमात्यांनी अनुक्रमे त्यांची स्तुति करून त्यांच्या भेटीला जाण्यासंबंधाने राजाचे मन वळविण्याचा प्रयत्न केला, परंतु अजातशत्रू काही न बोलता चुप्प राहिला.

त्या वेळी जीवक कौमारभुत्य तेथे होता. त्याला अजातशत्रु म्हणाला, ‘‘तू उगा का बसलास?’’

त्यावर जीवक म्हणाला, ‘‘महाराज, हा बुद्ध भगवान आमच्या आम्रवनात मोठय़ा भिक्षुसंघासह राहत आहे. आज महाराजांनी त्याची भेट घ्यावी. तेणेकरून आपले चित्त प्रसन्न होईल.’’

अजातशत्रूने वाहने सिद्ध करण्यासाठी जीवकाला आज्ञा केली. त्याप्रमाणे जीवकाने सर्व तयारी केल्यावर अजातशत्रू राजा आपल्या हत्तीच्या अंबारीत बसून आणि अंत:पुरातील स्त्रियांना निरनिराळ्या हत्तीणींवर बसवून मोठ्या परिवारासह बुद्धदर्शनाला निघाला.

जीवकाच्या आम्रवनाजवळ आल्यावर अजातशत्रू भयभीत होऊन जीवकाला म्हणाला, ‘‘बा जीवका, मला तू ठकवीत नाहीस ना? मला माझ्या शत्रूंच्या स्वाधीन करण्याचा तुझा बेत नाही ना? येथे एवढा मोठा भिक्षुसमुदाय आहे म्हणतोस, पण शिंक, खोकला किंवा दुसरा कोणताच आवाज एटकू येत नाही!’’

जीवक-- महाराज, भिऊ नका, भिऊ नका! आपणाला मी ठकवीत नाही किंवा शत्रूंच्या स्वाधीन करीत नाही. पुढे व्हा, पुढे व्हा. समोर मंडलमालात दिवे जळताहेत. (अजातशत्रूचे वैरी दिवे पेटवून बसतील हे संभवनीय नाही, असा याचा भावार्थ).

जेथपर्यंत हत्तीवरून जाणे शक्य होते, तेथवर जाऊन अजातशत्रू खाली उतरला, आणि जीवकाच्या आम्रवनातील मंडलमालाच्या द्वारावर पायी चालत गेला व तेथे उभा राहून जीवकाला म्हणाला, ‘‘भगवान कोठे आहे?’’

जीवक-- महाराज, मंडलमालाच्या मधल्या खांबाजवळ पूर्वेला तोंड करून भगवान बसला आहे.
अजातशत्रु भगवंताजवळ जाऊन उभा राहिला आणि मौन धारण करून शांतपणे बसलेल्या भिक्षुसंघाकडे पाहून उद्गारला, ‘‘या संघात जी शऋंति नऋंदत आहे, त्या शांतीने (माझा) उदयभद्र कुमार समन्वित होवो  अशी शांति उदयभद्र कुमारला लाभो.’’

भगवान म्हणाला, ‘‘महाराज, तुम्ही आपल्या प्रेमाला अनुसरूनच बोलतात.’’

यानंतर अजातशत्रूचा आणि भगवंताचा बराच मोठा संवाद आहे. तो येथे देण्याचे कारण नाही. संघाबरोबर भगवान राहत असे, तेव्हा भिक्षूसमुदायांत कोणतीही गडबड होत नसे. एवढे दाखविण्यासाठीच हा प्रसंग येथे दिला आहे.