भगवान बुद्ध

गौतम बुद्धांचे चरित्र


प्रकरण एक ते बारा 128

भिक्षुसंघाबरोबर असता भगवंताची दिनचर्या

आपल्या संघात बुद्ध भगवान कशी शिस्त ठेवतो, हे सर्व पारिव्राजकांना माहीत झाले होते. तो जेव्हा त्यांच्या परिषदेत जाई, तेव्हा ते देखील मोठय़ा शांततेने वागत, हे या सुत्तावरून दिसून येईलच. बुद्ध भगवान कधी कधी गृहस्थांचे आमंत्रण व गृहस्थांनी दिलेले वस्त्र स्वीकारीत असे, तथापि अल्पाहार करण्यात, अन्नवस्त्रादिकांच्या साधेपणात आणि एकान्तावासाच्या आवडीत देखील त्याची प्रसिद्धि होती. तो जेव्हा भिक्षुसंघाबरोबर प्रवास करी, तेव्हा एखाद्या गावाबाहेर उपवानात किंवा अशाच दुसर्‍या सोयीवार जागी राहत असे. रात्री ध्यानसमाधि आटपून मध्यम यामात वर सांगितल्याप्रमाणे सिंहशय्या करी. आणि पहाटेला उठून पुन्हा चंक्रमण करण्यात किंवा ध्यानसमाधीत निमग्न असे.

सकाळी भगवान त्या गावात किंवा शहरात बहुधा एकटाच भिक्षाटनाला जात असे, वाटेत किंवा भिक्षाटन केरीत असता प्रसंगानुसार गृहस्थांना उपदेश करी. सिंगालोवादत्त भगवंताने वाटेत उपदेशिले. आणि कसिभारद्वाजसुत्त व अशीच दुसरी सुत्त भिक्षाटन करीत असता उपदेशिला.

पोटापुरती भिक्षा मिळाल्याबरोबर भगवान गावाबाहेर येऊन एखाद्या झाडाखाली किंवा अशाच दुसर्‍या प्रशस्त जागू बसून ते अन्न जेवी, व विहारात येऊन थोडा वेळ विश्रांति घेऊन ध्यानसमाधित काही काळ घालवित असे. संध्याकाळच्या वेळी त्याला भेटण्यासाठी गृहस्थ लोक येत असत आणि त्याच्याशी धार्मिक संवाद करीत. अशाच वेळी सोणदंड कूटदंड वगैरे ब्राह्मणसमुदायासह बुद्धाची भेट घेऊन धार्मिक चर्चा केल्याचा दाखला दीघनिकायात सापडतो. ज्या दिवशी गृहस्थ येत नसत, त्या दिवशी भगवान बहुधा बरोबर असलेल्या भिक्षूंना धर्मोपदेश करी.

पुन्हा एक दोन दिवसांनी भगवान प्रवासाला निघे आणि अशा रीतीने पूर्वेला भागलपूर, पश्चिमेला कुरूंचे कल्माषदम्य नावाचे शहर, उत्तरेला हिमालय व दक्षिणेला विंध्य या चातु:सीमांच्या दरम्यान आठ महिने भिक्षुसंघासह प्रवास करीत राही.

वर्षावास

बुद्ध भगवंताने उपदेशाला आरंभ केला तेव्हा त्याचे भिक्षु वर्षाकाळात एका ठिकाणी राहात नसत; चारी दिशांना हिंडून धर्मोपदेश करीत. इतर संप्रदायांचे श्रमण वर्षाकाळात एका ठिकाणी राहत असल्यामुळे सामान्य जनांना बुद्ध भिक्षुंचे हे वर्तन आवडले नाही. ते भिक्षुंवर टीका करू लागले; तेव्हा त्यांच्या समाधानाकरिाता बुद्ध बगवंतानो, भिक्षुनी वर्षाकाळात निदान तीन महिने एका ठिकाणी राहावे असा नियम केला.

महावग्गात वर्षावासाची जी कथा आली आहे, तिचा हा सारांश. परंतु ती कथा सर्वथैव बरोबर असेल असे वाटत नाही. एक तर सगळे क्षमण वर्षाकाळी एकाच स्थळी राहत होते असे नाही, आणि भगवंताने केलेल्या नियमालाहि पुष्कळच अपवाद आहेत. चोरांचा किंवा असाच दुसरा उपद्रव उत्पन्न झाला असता वर्षाकाळालाही भिक्षूला दुसरीकडे जाता येते.