पार्श्वनाथाचा चातुर्याम धर्म

पार्श्वनाथाचा चातुर्याम धर्म


खरा समाजधर्म 1

साधुचरित श्री. धर्मानंद कोसंबी हे सनातनी हिंदूंच्या ब्राम्हणी संस्कृतींत वाढलेले. भगवान बुद्धांचें चरित्र लहानपणींच वाचून त्यांच्या उपदेशाकडे ते ओढले गेले; आणि त्यानीं महाकष्टानें तिब्बत, सीलोन, ब्रम्हदेश आणि सियाम सारख्या देशांत जाऊन तेथील बौद्ध धर्म शिकून घेऊन बौद्ध विद्येची परंपरा स्वदेशीं परत आणली. बौद्ध धर्माची जरी त्यानीं दीक्षा घेतली होतीं तरी बौद्ध धार्मिकांचे ते अंध अनुयायी बनले नाहीत. बौद्ध विद्येच्या प्रचारासाठी अनेकवार अमेरिकेंत आणि एकवार रशियांत गेले असताना त्यांनीं तेथील अर्थमूलक समाजधर्माचे अध्ययन केलें. लाला हरदयाळसारख्यांच्या सहवासांत आल्यानें समाजवाद आणि साम्यवाद या विषयीं त्यानां सहानुभूति वाटूं लागली. गुजरात विद्यापीठांत येऊन तेथें बौद्ध विद्येचा प्रसार करीत असतांना जैन धर्माचा त्यानीं सहानुभूतिपूर्वक खोल अभ्यास केला. महात्मा गांधींच्या सिद्धान्ताचा केवळ अभ्यास करून स्वस्थ न बसतां त्यांनीं त्यांच्या चळवळींत भागही घेतला.

अशा रीतीनें मानवी समाजावर ज्या ज्या प्रधान विचारांचा आणि धार्मिक वृत्तींचा पगडा आहे त्या सर्वांचा आपुलकीनें अभ्यास करून त्यांनीं त्यांवर आपली स्वतंत्र प्रज्ञा चालविली आणि आपल्या परिपक्व अभिप्रायांचें सार त्यानीं दोन-तीन पुस्तकांत आपल्याला दिलें आहे. बौद्ध विद्या प्राप्त करण्यासाठीं आणि तिचा फैलाव करण्यासाठीं स्वतः काय काय केलें हें त्यांनीं ' निवेदन ' आणि ' खुलासा ' या आत्मचरित्रपर दोन ग्रंथांत नमूद करून ठेवलें आहे.

इतक्या कष्टानें मिळविलेली बौद्ध विद्या आहे तरी काय याची सविस्तर कल्पना देण्यासाठीं त्यानीं मराठींत कितीतरी पुस्तकें लिहिलीं आहेत. त्या पुस्तकांवरून त्यांची गाढ विद्वत्ता जशी दिसून येते त्याचप्रमाणें लोक-कल्याणाविषयींची त्यांची कळकळही दिसून येते.

अधिकारयुक्त वाणीनें बौद्ध धर्माचें इतकें सोपें विवेचन दुसरें कोणीही केलेलें दिसून येत नाहीं.

" बुद्धचरित्र " भाग १ आणि २ यांत भगवान बुद्धाविषयींची विश्वसनीय अशी अद्यतन सर्व माहिती येऊन जाते. " बुद्ध धर्म आणि संघ " या लहानशा पुस्तकांत पुस्तकाच्या नांवाप्रमाणें तिन्हीं गोष्टींची अगदीं प्राथमिक माहिती आहे. " बुद्धलीला-सार-संग्रह " या त्यांच्या अत्यंत लोकप्रिय ग्रंथाच्या पहिल्या भागांत बुद्धाच्या पूर्व-जन्मांविषयींच्या जातक कथा असून त्यांत बोधिसत्वानें चारित्र्यांतील निरनिराळ्या पारमिता कशा प्राप्त केल्या याची पौराणिक माहिती दिली आहे. दुसर्‍या भागांत बुद्धाचें चरित्र आहे; आणि तिसर्‍यांत बुद्धाचा उपदेश अगदीं थोडक्यांत दिलेला आहे.