पार्श्वनाथाचा चातुर्याम धर्म

पार्श्वनाथाचा चातुर्याम धर्म


खरा समाजधर्म 4

प्रस्तुत निबंधाच्या प्रस्तावनेंत जुन्या काळच्या जैन लोकांच्या मांसाहाराविषयीं उल्लेख आला आहे. गुजरातमध्यें ही चर्चा तीन वेळां कडवेपणानें झालेली माझ्या पाहण्यांत आहे. प्राचीन काळीं सगळेच जैन मांसाहार करीत असत असें कोणी म्हटलेलें नाहीं. जैन धार्मिक- साहित्यांत कित्येक जैन मांसाहार करीत असल्याचा उल्लेख निर्विवाद सांपडतो. आजच्या धार्मिक लोकांनां त्या वस्तूची चर्चा न आवडणें स्वाभाविक आहे. कारण मांसाहार त्यागाविषयीं अत्यंत आग्रह जर कुणाचा असेल तर तो आजच्या जैनांचा आहे; व समाज या नात्यानें त्यांनीं तो उत्तम रीतीनें पाळूनही दाखविला आहे. मांसाहार धर्म्य आहे असें कोणीच म्हणूं शकणार नाहीं. पशु, पक्षी, बकरीं, कोंबडीं, मासे, खेकडे वगैरे प्राण्यांना मारून स्वतःचे पोट भरणें हें एखादें थोर कृत्य आहे असें कुणीच सिद्ध करूं पहात नाहीं. आजच्या काळीं सार्वत्रिक मांसाहार त्याग कितपत शक्य आहे याविषयीं वाद होऊ शकेल. मानव जातीच्या मंद प्रगतिकडे पाहतां आजच्या स्थितींत मांसाहारी लोकांनां घातकी, क्रूर किंवा अधार्मिक म्हणणें योग्य होणार नाहीं. पण मांसाहार न करणें हाच उत्तम धर्म आहे याविषयीं कोठेंही दुमत नाहीं; प्राचीन काळीं कित्येक जैन उघडपणें मांसाहार करीत असत असा ऐतिहासिक पुरावा मिळाला म्हणून आजच्या जैनांनी मांसाहार करावा असें कोणींच म्हणत नाहीं; किंवा आजचे जैन मांस खाण्यासाठीं जुन्या पुराव्याचा उपयोग करतील असाहि संभव नाहीं. मांसाहार न करणे हेंच श्रेष्ठ जीवन आहे हा जैन धर्माचा उपदेश असंदिग्ध आहे.

अशा स्थितीत जुन्या काळीं परिस्थिति काय होती याविषयींच्या चर्चेनें चिडून जाण्याचें खरोखर कांहींच कारण नव्हतें. फार तर एवढेंच सिद्ध होईल ना कि मांसाहाराच्या बाबतींत आजच्या जैन लोकांनीं महावीर स्वामींच्या काळापेक्षां बरीच प्रगति केली आहे. यांत वाईट वाटण्याजोगें काय आहे ?

पंडित सुखलालजीनीं एक गोष्ट सुचविली आहे तिचाही विचार करण्याजोगा आहे. ते म्हणातात कीं महावीर स्वामींचा अहिंसा धर्म, प्रचारक-धर्म असल्यामुळें त्यांत निरनिराळ्या जातींचा वेळोवेळीं प्रवेश झाला आहे. अनेक सनातनी ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य जसे महावीर स्वामींचा उपदेश पटून जैन झाले, त्याचप्रमाणें कित्येक क्रूर, वन्य आणि मागासलेल्या जातींचे लोकही उपरति होऊन जैन धर्मात शिरले होते. असे लोक जैन धर्माचा स्वीकार केल्यानंतर देखील बरेच दिवस मांसाहार करीत असल्यास नवल नाहीं. तेव्हां जुन्या काळीं कित्येक जैन मांसाहार करीत होते असें सिद्ध झाल्यानें सर्वच जैनांना मांसाहार विहित होता असें अनुमान काढणें चुकीचें होईल. मांसाहार त्यागाच्या बाबतींत जैन धर्मानें मानवी प्रगतींत सर्वात अधिक भर घातली आहे ही गोष्ट निर्विवाद आहे. ब्राम्हण धर्म, महानुभावी धर्म इत्यादि पंथांत देखील मांसाहार त्यागाचा आग्रह दिसून येतो. या सर्वांनीं मिळून थोर कामगिरी केली आहे. पण या सर्वांनीं मांसाहारी लोकांशीं स्वतःचे दळणवळण बंद करून आणि रोटीबेटी व्यवहाराचा प्रतिबंध करून स्वतःचा प्रचारच कुंठित केला आहे हीहि गोष्ट विसरता कामा नये.

रोटीबेटी व्यवहार बंद केल्यानंतरच्या काळांत निरामिषाहारी लोकांनी स्वतःच या तत्त्वाचा प्रचार कोठेंही सफलतापूर्वक केल्याचा दाखला नाहीं. उलट निरामिषाहारी लोकच शिथिल होऊन हळूहळू चोरून किंवा उघडपणें मांस खाऊं लागल्याची उदाहरणें जेथें तेथें सांपडतात. अहिंसा धर्म जोंवर अग्निसारखा उज्ज्वळ आणि पावक असेल तोंवर त्याला इतरांच्या संपर्काचें भय नसणार. हा धर्म रूढी म्हणून जडपणें टिकू लागला म्हणजेच त्याला स्वतःच्या आसपास बहिष्काराच्या भिंती बांधून स्वतःचे रक्षण करावें लागतें आणि मग तो निःसत्वपणें ' जगत ' राहतो.