पार्श्वनाथाचा चातुर्याम धर्म

पार्श्वनाथाचा चातुर्याम धर्म


खरा समाजधर्म 6

'तुला आत्महत्या करण्याचा हक्क नाही ' असें म्हणणारा समाज कित्येक गुन्हेगारांना मरणाची शिक्षा ठोठावतोच. यावरून असें अनुमान काढावयास हरकत नाहीं की ज्याला जगण्यांत कांहीं सार उरलें नाहीं असें वाटेल त्यानें केवळ स्वतःच्या अभिप्रायावरून मरणाला कवटाळू नये. पण या बाबतीत समाजाची सल्लासंमति आणि आशीर्वाद घेऊनच मरणाचा अंगीकार करावा.

पण व्यक्तिस्वातंत्र्याचा विचार करतां मरणाच्या बाबतींत मनुष्य समाज-परतंत्र आहे किंवा काय याचाही विचार करावा लागेल. घोडा, कुत्रा, गाय वगैरे पाळलेल्या जनावरांनां त्यांची अंतिम सेवा म्हणून मरण देण्याचा धर्म आजकाल मान्य केला जातो. आणि कुष्ट रोगासारख्या व्याधीनें पीडित झालेल्या मनुष्याची परोपरीनें सेवा केल्यानंतर अगदीं शेवटची सेवा म्हणून त्याला मरण देण्याची जबाबदारी सबंध समाजाने स्वीकारावी किंवा नाहीं या विषयाची चर्चा जेथें जबाबदार लोक करीत आहेत तेथें आमरण अनशनाचा अधिकार विशिष्ट परिस्थितीत देखील मनुष्याला नाहीं असें कुणी म्हणूं शकणार नाहीं. कोणत्या परिस्थितीत मनुष्याला तो अधिकार पोहोंचतो याची चर्चा होणें आवश्यक आहे.

प्रस्तुत निबंधांत धर्मानंद कोसंबीनीं जो विचार मांडला आहे तो स्वतः अमलांत आणण्याचा प्रयत्‍न करून त्यांनीं या चर्चेला जिवंतपणा आणला आहे. समाजानें केव्हां तरी या प्रश्नाची सांगोपांग चर्चा केलीच पाहिजे. चातुर्याम हा जसा सामाजिक जीवनधर्म आहे त्याचप्रमाणें सल्लेखन हा सामाजिक मरणधर्म आहे. दोन्हीं मिळून  व्यापक समाज-धर्म होता.

धर्मानंद कोसंबींचा हा विद्वत्तापूर्ण निबंध वाचल्यानंतर कित्येकांच्या मनांत अशी शंका जरूर यावयाची कीं धर्माच्या कलेवरांतून जर ईश्वर आत्मा, परलोक, ईश्वरप्रेरित ग्रंथ, मरणोत्तर जीवन आणि पुरोहित वर्ग या सर्व वस्तू काढून टाकल्या तर धर्मांत धर्मत्व असें काय राहिलें ? चातुर्याम, संयम आणि अंग मेहनत एवढ्याच गोष्टींचा धर्म बनूं शकेल काय? गेल्या पिढीच्या प्रारंभीं धर्माधर्मांच्या वैमनस्याला कंटाळून गेलेले कित्येक लोक म्हणत असत कीं सोवळे नीतिशिक्षण आणि नागरिकांचीं कर्तव्यें एवढ्यांचेंच शिक्षण द्यावें आणि सगळ्याच धर्मांना शिक्षणांतून आणि जीवनांतून फाटा द्यावा. त्या भूमिकेंत आणि धर्मानंद कोसंबींच्या भूमिकेंत विशेष असा फरक कोणता? उत्तरादाखल म्हणता येईल कीं भूमिका जर शुद्ध असेल तर फरक असलाच पाहिजे असा आग्रह कां धरावा? सामान्य नीतिशिक्षणाविषयीं त्या काळचे धार्मिक लोक म्हणत असत कीं कोर्‍या नीतिशिक्षणामध्यें मनुष्याच्या हृदयाचा संपूर्ण कब्जा घेण्याचें सामर्थ्य नाहीं. सामान्य नीतिशिक्षण मनुष्याला जगांत कसें वागावे हें सांगतें, पण तसें कां वागावे हे सांगू शकत नाहीं. ती शक्ति धर्मांतच आहे. ईश्वरदत्त किंवा ईश्वरप्रेरित धर्मग्रंथ अथवा ईश्वराचा कोणी प्रेषित पैगंबर यांचेवर श्रद्धा असल्याशिवाय आणि परमात्म्यासारखे, निदान अंतरात्म्यासारखें स्थायी तत्व आधार म्हणून स्वीकारल्याशिवाय मनुष्याच्या हातून आत्मसमर्पणासारखे किंवा आत्मबलिदानासारखें दिव्यकर्म होऊंच शकत नाहीं. जीवनाचा अंतिम आधार एखाद्या गूढ अतीन्द्रिय अनश्वर अशा तत्वांवर असल्याशिवाय मनुष्याला श्रद्धारूपी पाथेय मिळूंच शकत नाहीं आणि श्रद्धेवांचून उच्च जीवन संभवतच नाहीं.