पार्श्वनाथाचा चातुर्याम धर्म

पार्श्वनाथाचा चातुर्याम धर्म


खरा समाजधर्म 7

उलट पक्षीं सांगतां येईल कीं चातुर्याम धर्मांत आत्म्याचा जसा स्वीकार नाहीं तसा निषेधही नाहीं. चातुर्याम धर्म व्यक्तीसाठीं आणि समाजासाठीं संपूर्ण धर्म आहे. ज्या कुणाला आत्म्या-परमात्म्याचा आधार हवा असेल त्यानें तो अवश्य घ्यावा. चातुर्याम धर्माला अशा आधाराची जरूर नाहीं. चातुर्याम हींच आमची दैवतें आहेत असें धर्मानंदजी म्हणतात. वेदान्त म्हणतो कीं विश्वात्मैक्य स्वीकारल्यावांचून कोणताही समाजधर्म सिद्ध होऊं शकत नाहीं. अस्तेय, अपरिग्रह, ब्रम्हचर्य आणि अहिंसा हीं विश्वात्मैक्यावरच आधारलेलीं आहेत आणि विश्वात्मैक्य हेंच परम सत्य आहे. या सत्याहून निराळा ईश्वर नाहीं.

पण या चर्चेत उतरावयास बौद्ध धर्मानंदजी तयार नव्हते. आपणही ही चर्चा क्षणभर टाळून त्यांच्या या पारमार्थिक निबंधाचें श्रद्धा-प्रज्ञा-पूर्वक परिशीलन करूं या.

अगदी शेवटच्या दिवसांत श्री धर्मानंदजीनीं आम्हांला स्वतःची दोन हस्तलिखित पुस्तकें दाखविली -

१.पार्श्वनाथाचा चातुर्याम धर्म आणि
२.बोधिसत्व नाटक

धर्मानंदजींच्या स्मारकांतील एक अंग म्हणून त्यांचें समग्र साहित्य निरनिराळ्या भाषेंत प्रसिद्ध करण्याचें आम्ही ठरविलें तेव्हां चातुर्याम धर्माच्या संपादनाची व प्रकाशनाची जबाबदारी मी मजकडे घेतली । पुस्तक छापण्यासाठी जो पैसा गुंतवावा लागेल तो निपाणीचे माझे मित्र स्व. श्री अक्षयचंदजी यांनीं सार्वजनिक कामांसाठी काढून ठेवलेल्या रकमेतून त्यांच्या वारसाकडून मला मिळाला । बोधिसत्त्व नाटकाचें प्रकाशन करण्याची जबाबदारी श्री. लाडानीं आपलेकडे घेतली आहे । तें ही पुस्तक चातुर्याम धर्मांच्या मागोमाग लवकरच प्रकाशित होईल ।

श्री धर्मानंदजींचें तिसरे अप्रकाशित पुस्तक म्हणजे शान्तिदेवाचार्याच्या बोधिचर्यावताराचें मराठी भाषांतर । हें पुस्तक धर्मानंदजींचे शिष्य प्राध्यापक भागवत हे आपल्या धर्मचक्र मासिकांत क्रमशः प्रसिद्ध करीत आहेत । हें भाषांतर पुस्तकरूपानें धर्मानंद ट्रस्ट यथाकाळीं प्रसिद्ध करील बाकीचें लिखाण ग्रंथरूपानें किंवा लेखरूपानें पूर्वी प्रकाशित झालेलें असलें तरी आज जवळ जवळ दुर्मिळ झालेलें आहे । त्यांचें ही प्रकाशन निरनिराळ्या भाषेंत करावयाचें आहे ।

चातुर्याम धर्माच्या संपादनाचें काम मी मजकडे घेतलें पण त्या कामीं पूर्ण लक्ष देऊ शकलो नाहीं । प्रुफे तपासणें आणि प्रस्तावना लिहिणें याचा आतां सराव होऊन गेला आहे । पण प्रत्येक पानाचा मथळा आणि खालील टीपा मुख्य संपादक क्वचितच पहात असतांत । माझेकडूनही या बाबतीत गफलत झाल्यामुळें टीपांतून अमुक पृष्ठ पहा असा उल्लेख जेथें आहे तेथें मुळांत हस्तलिखिताची पृष्ठे देणेंच शक्य होतें । छापतानां ते आकडे बदलून छापील पानाचे आकडे देणे आवश्यक होते । ते बरोबर दिले गेले असतील अशा विश्वासाने मी चाललो आणि शेवटीं पाहतो तो ती चूक राहूनच गेली आहे । वाचकांची क्षमा मागून शुद्धिपत्र देण्या खेरीज दुसरा इलाज राहिला नाहीं । वाचकांपेक्षाही श्री धर्मानंदजींची क्षमा मागीतली पाहिजे । ते अशा बाबतींत अतिशय चौकस असत । त्यांना यत्किंचित चूकही खपत नसे ।

काका कालेलकर