पार्श्वनाथाचा चातुर्याम धर्म

पार्श्वनाथाचा चातुर्याम धर्म


प्रस्तावना 1

बुद्धसमकालीं जैनांना निर्गन्थ ( निगण्ठ ) म्हणत. त्रिष्टिक वाङमयांत ह्या निर्गन्थांचा उल्लेख अनेक ठिकाणीं आला आहे. त्यांत दोन स्थळीं ' चातुर्यामसंवरसवुती विहरति ' असा निर्देश आहे. बुद्धघोषाचार्यानें याचा भलताच अर्थ केला असल्यामुळें मला हें वाक्य मुळींच समजलें नाहीं. १९०२ सालच्या नोव्हेंबर महिन्यांत मी गुजराथ विद्यापीठाची सेवा स्वीकारली. तेथें काम करीत असतां पण्डित सुखलालजी आणि पण्डित बेवरदासजी या दोन सज्जन जैन विद्‍वानांचा व माझा चांगला परिचय झाला. त्यांनी मला वरील वाक्याचाच नव्हे, तर त्रिपिटकांत जैनांसंबंधीं जो मजकूर आढळतो त्याचा नीट अर्थ समजावून दिला. त्यांचा माझा परिचय झाला नसता, तर मी अद्यापिही जैन धर्माच्या सिद्धान्तांसंबंधीं अज्ञानच राहिलों असतों. त्यांजपासून जैन धर्माचें जें ज्ञान मला मिळालें , त्याबद्दल मी त्यांचा फार आभारी आहे.

विशेषतः चातुर्यामाचा अर्थ मला स्पष्ट समजला, आणि तेव्हांपासून मी या यामांचा विचार करूं लागलों. त्यायोगें मला असें दिसून आलें कीं, आजला जी कांहीं श्रमणसंस्कृति शिल्लक राहिली आहे, तिचा आदिगुरु पार्श्वनाथ होय; आणि बुद्धाप्रमाणेंच तोहि श्रद्धेय आहे. ह्या चातुर्यामावर मी कांहीं ठिकाणीं व्याख्यानें देउन पार्श्वनाथावरची माझी श्रद्धा प्रगट केली. परंतु अशा ह्या सोज्वल धर्माला सव्यांची अवकळा कां आली, या विषयी मनांत विचार येऊं लागले. माजी डॉक्टर भाण्डारकर मला वारंवार प्रश्न विचारीत असत की, इतका उन्नत बौद्ध धर्म हिंदुस्थानांतून पार नष्ट कसा झाला?  सामान्य लोकांत त्याचें नांव देखील कां राहिलें
नाहीं ? हा प्रश्न सोडविण्याचा यथामति प्रयत्‍न मी ' हिंदी संस्कृति आणि अहिंसा ' या पुस्तकांत केला आहे; आणि जैन धर्माला अशी दया कां आली याची चर्चा या लेखांत आहे.

बौद्ध आणि जैन धर्माला सांप्रतची दशा येण्याला मुख्य कारण झालें संप्रदायाचा परिग्रह. धम्मपदांत म्हटल्याप्रमाणें -

असारे सारमतिनो सारे चासारदस्सिनो ।
ते सारं नाधिगच्छन्ति मिच्छासंकप्पगोचरा ।।

(असार गोष्टींत सार मानणारे व सार गोष्टीत असार पाहणारे आणि मिथ्या संकल्पांत वावरणारे लोक सार प्राप्त करूं शकत नाहीत.)

हे सांप्रदायिक लोक भलत्याच गोष्टीला महत्त्व देऊन धर्म रहस्यापासून दूर गेले. याचा मला स्वतःलाच एक चांगला अनुभव आला.

बुद्धसमकालीं मांसाहाराची प्रथा कशी होती हें दाखविण्याच्या उद्देशानें ' पुरातत्त्व ' त्रैमासिकांत मी एक लेख लिहिला. त्या काळच्या सर्वच प्रकारच्या श्रमणांत मांसाहार प्रचलित होता असें मी त्या लेखांत सप्रमाण प्रतिपादलें. त्याच लेखांत काहीं फेरफार करून ' भगवान बुद्ध ' या पुस्तकाचें मी ११ वें प्रकरण लिहिलें. नागपूरच्या सुविचार प्रकाशन मंडळानें, ज्यांत हें प्रकरण आहे तें, ' भगवान बुद्ध ' पुस्तकाचें उत्तरार्ध १९४१ सालीं प्रसिद्ध केलें. तें प्रकरण कांहीं दिगम्बर जैनांच्या निदर्शनास आलें, आणि त्यांनी यवतमाळला एक संस्था स्थापन करून तिच्या द्वारें माझ्यावर निषेधाचा भडिमार केला, व कोर्टात फिर्याद करण्याचा धाक घातला. शेवटीं मी नागपूरच्या ' भवितव्य ' साप्ताहिकांत एक पत्र लिहून ह्या माझ्या टीकाकारांना जाहीर उत्तर दिलें. तेव्हांपासून वर्‍हाडांतील ही चळवळ थंडावली.