पार्श्वनाथाचा चातुर्याम धर्म

पार्श्वनाथाचा चातुर्याम धर्म


प्रस्तावना 2

पण आमचे जैन सनातनी बांधव स्वस्थ बसले नाहींत. १९४४ सालीं कलकत्त्यापासून काठेवाडपर्यंत अनेक सभा भरवून त्यांनीं माझ्या निषेधाचे ठराव पास केले. त्यांत संतोषाची एक गोष्ट घडून आली ती ही कीं, माझा निषेध करण्याला आपसांत सतत भांडणारे मूर्तिपूजक श्वेताम्बर, स्थानकवासी श्वेताम्बर व दिगम्बर जैन एक झाले. माझ्याशीं वादविवाद करण्याला अनेक जैन साधू व गृहस्थ सज्ज झाले. ह्या सर्वांना पृथक् पृथक् उत्तरें देत बसणें शक्यच नव्हतें. यास्तव मी त्यांना ' जन्मभूमि  ' या गुजराथी दैनिकाच्या द्वारें अशी विनंति केली की, त्यांनी हायकोर्टातील एका गुजराथी जज्जाला सरपंच निवडावें व त्यासमोर सर्व आक्षेप मांडावे; आणि मी माझ्या पक्षाचें समर्थन करतों. तें ऐकून सरपंचानें निकाल द्यावा. तो जर माझ्याविरुद्ध झाला तर मी जैनांची जाहीर माफी मागतों; पण त्यांच्याविरुद्ध झाला, तर तो वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध करण्यांत यावा;  म्हणजे यापुढें हा वादच राहणार नाहीं. परंतु ही गोष्ट जैनांना पसंत पडली नाहीं, आणि ही चळवळ आपोआपच बंद पडली. तथापि मधून मधून एखादा सनातनी जैन अद्वातद्वा पत्र लिहिण्याची तसदी घेतच असतो.

परंतु हे माझे जैन बांधव क्षणभर असा विचार करीत नाहींत कीं, मांसाहार न करणें हें जैन धर्माचें रहस्य, कीं चातुर्यामधर्म हें रहस्य? जर चातुर्याम धर्म हें रहस्य, तर त्याला अनुसरून जैन साधु व गृहस्थ वागतात काय? उदेपुरच्या केसरियां नांवाच्या जैन मंदिरांत श्वेताम्बरांनी व दिगम्बरांनी एकामेकांवर गोळ्या घालून खून पाडले. संमेत शिखरावरील पार्श्वनाथाच्या मंदिरांतील पूजेवर हंमेश खटले चालू असतात व ते बहुधा प्रिव्ही कौन्सिलपर्यंत जातात. आजपर्यंत ह्या खटल्यांत लक्षावधि रुपये खर्च झाले आहेत व पुढें किती होतील हें कोणी सांगूं शकत नाहीं. गिरनार वगैरे ठिकाणींहि हीं भांडणें चालूच आहेत. पण तीं चातुर्यामाला कीती विसंगत आहेत याचा कोणीहि सनातनी जैन विचार करीत नाहीं. त्यांनीं माझ्यावर एवढी तोहमत आणली, तरी त्यांच्यावरचें माझें प्रेम कायम आहे. हा दोष त्यांचा नसून सांप्रदायिकतेचा आहे, आणि सांप्रदायिकतेंपासून बौद्ध आणि क्रिस्ती लोक ही अलिप्त नाहींत. क्रिश्चनांनी तर आपसांत भांडून रक्ताच्या नद्या वाहविल्या. तेव्हां जैनांना तरी दोष कां द्या ? परंतु अशा सांप्रदायिकतेपासून मुक्त होण्याची खटपट करणें आपलें कर्तव्य आहे. तिच्यांतून पार पडून चातुर्यामधर्माचें महत्त्व आम्हाला समजावें व आम्ही त्या धर्माच्या आचरणानें मानवसमाजाचें कल्याण करण्यास समर्थ व्हावें, याचसाठीं माझा हा प्रयत्‍न आहे. यांत माझे दोष असतील ते अवश्य सुधारावे, आणि गुण ग्रहण करून आत्मपरहित तत्पर व्हावें हीच काय ती माझी सर्वांस विनंति.

बनारस – ता. २९ जून १९४६

धर्मानंद कोसम्बी