पार्श्वनाथाचा चातुर्याम धर्म

पार्श्वनाथाचा चातुर्याम धर्म


चातुर्याम धर्म 4

पार्श्वाची कथा

वाराणसीच्या अश्वसेन राज्याच्या पत्‍नीला (वामादेवीला) चैत्र कृष्ण चतुर्दशीच्या दिवशीं विशाखा नक्षत्रांत गर्भ प्राप्त झाला, व ती पौष कृष्ण दशमीच्या दिवशीं अनुराधा नक्षत्रांत पुत्र प्रसवली. इन्द्रादिक देवांनीं त्याचें स्तोत्र गाइलें; आणि अश्वसेन राजानें कैदींना बन्धमुक्त करून मोठ्या थाटानें पुत्रजन्मोत्सव केला. वामादेवीनें तो पुत्र उदरांत असतां अंधारी रात्र असून देखील आपल्या बाजूस (पार्श्वतः) सरपटणारा सर्प पाहिला होता. राजाला ती आठवण झाली, आणि त्यानें मुलाचें नांव पार्श्व ठेवलें. पार्श्व वयांत आला, तेव्हां तो ९ हात उंच होता.

त्या कालीं अश्वसेन राजापाशीं एक अनोळखी दूत आला. राजानें त्याला येण्याचें कारण विचारलें असता तो म्हणाला, " महाराज, मी कुशस्थलीं नगरीच्या प्रसेनजित् राजाकडून आलों आहे. त्या राजाला प्रभावती नांवाची एक अत्यंत सुस्वरूप कन्या आहे. ती आपल्या सखींसह उद्यानांत विहरत असतां, तेथें पार्श्वनाथाच्या स्तुतीनें भरलेलें गीत किन्नरी गात होत्या, तें तिनें ऐकलें, आणि तेव्हांपासून ती पार्श्वनाथावर अनुरक्त झाली आहे. ही गोष्ट तिच्या आईबापांना समजली, तेव्हां त्यांना फार आनंद झाला, आणि त्यांनी तिला इकडे पार्श्वनाथापाशीं पाठविण्याचा बेत केला."

"हे वर्तमान यवन (नांवाच्या) कलिंग राजाला समजलें, आणि तो आपल्या दरबारांत म्हणाला, ' मी येथें असतांना प्रभावतीशीं लग्न करणारा पार्श्व कोण? आणि हा कुशस्थलीचा राजा तिला मला कां देत नाहीं? पण दानाची वाट याचक पाहतात, आणि शूर जबरदस्तीनें घेतात. कां कीं, सर्व वस्तु शूरांच्याच आहेत.' असें म्हणून त्यानें मोठ्या सैन्यासह येऊन कुशस्थलीला वेढा दिला आहे;  कोणालाहि आंतबाहेर जातां येत नाहीं. मी त्यांतून रात्रीं निसटलों. "

हें त्या दूताचें भाषण ऐकून अश्वसेन क्रुद्ध होऊन म्हणाला, "भिकारी यवन माझ्यासमोर काय करील ? आणि मी असतांना तुम्हांला भीति कोणाची? आतांच तुमच्या नगराच्या रक्षणासाठीं सैन्य पाठवितों." असें म्हणून त्यानें रणभेरी वाजविण्यास हुकूम केला.

पार्श्व त्यावेळीं क्रीडागृहांत होता. त्यानें तो भेरीशब्द व एकत्रित झालेल्या सैनिकांचा मोठा घोष ऐकला, आणि पित्याजवळ जावून त्यानें प्रश्न केला कीं ही तयारी कशासाठीं आहे? पित्यानें त्या दूताला दाखविलें व त्याजकडून मिळालेली बातमी पार्श्वाला सांगितली. तेव्हां पार्श्व म्हणाला, " तात, तुम्ही या स्वारीवर न जातां मलाच पाठवा. " अश्वसेन म्हणाला, "मुला, हें तुझें वय क्रीडा करण्याचें आहे. त्वां घरींच आनंदांत रहावें यांत मला हर्ष वाटतो." पार्श्व म्हणाला, " तात, ही एक माझी क्रीडाच होईल. यास्तव आपण घरींच असावें."

याप्रमाणें पार्श्वाच्या आग्रहामुळें त्याला अश्वसेनानें लढाईवर पाठविलें. त्यानें कुशस्थलीला जाऊन यवनाचा पुरा पराजय केला, आणि यवन त्याला शरण आला. पार्श्वनाथानें यवनाला 'पुनः असें करूं नये, असें बजावून त्याच्या राज्यांत परत जाण्याची परवानगी दिली. त्यानंतर प्रसेनजित् राजानें पार्श्वाचा मोठा गौरव केला. आणि प्रभावतीच्या प्रेमाचें वर्तमान त्याला सांगितलें. तेव्हां पार्श्व म्हणाला, " पित्याच्या आज्ञेनें मी केवळ तुमचें रक्षण करण्यासाठी इकडे आलों, तुमच्या कन्येला वरण्यासाठीं आलों नाहीं."