पार्श्वनाथाचा चातुर्याम धर्म

पार्श्वनाथाचा चातुर्याम धर्म


चातुर्याम धर्म 7

धनधान्यांचा, सामान्य धातूंचा, गायीघोडे वगैरे जनावरांचा, शेती वाडीचा व घरांचा आणि सोन्यारुप्याचा आपण ठरविलेल्या मर्यादेपलीकडे संग्रह करणें हे अपरिग्रह अणुव्रताचे पांच अतिचार वर्ज्य करावे.

दिग्विरति म्हणजे अमुक दिशेला अमुक मर्यादेपलीकडे न जाणें. देशविरति म्हणजे अमुक गांवांत किंवा प्रदेशांत न जाणें. काया, वाचा आणि मन यांच्या प्रयोगाला दण्ड म्हणतात.* ह्यांचा दुरुपयोग करणें अनर्थदण्ड होय. त्यापासून विरति अनर्थ-दण्डविरति. ह्या तीन विरति पांच अणुव्रतांना गुणकारक आहेत; म्हणून यांस गुणव्रतें म्हणतात.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
(* मज्झिम निकाय उपालिसुत्त पहा.)
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
अशा कालीं व ठिकाणीं मी हें व्रत किंवा व्रतें आचरीन असा नियम करणें सामायिक व्रत होय. दोन अष्टमी व दोन चतुर्दशी हे चार प्रोषध दिवस त्या दिवशीं पवित्र स्थानीं जावून उपवास करणें प्रोषधव्रत होय. खाण्यापिण्याला उपभोग म्हणतात, आणि अंथरूण, पांघरूण, वस्त्र, शयन, आसन, गर इत्यादिकांना परिभोग म्हणतात. त्यांत परिमाण ठेवणें उपभोग-परिभोग-परिमाणव्रत होय. अतिथींना, साधूंना, भिक्षा देणें अतिथिसंविभागव्रत होय. हीं चार व्रतें पांच अणुव्रतांचें शिक्षण देतात, म्हणून यांना शिक्षाव्रतें म्हणतात.

तो उपदेश ऐकून पुष्कळ लोकांनी, वामादेवीनें, प्रभावतीनें आणि तेथल्या तेथेंच राज्य हस्तिसेनाला देऊन अश्वसेनानें प्रव्रज्या घेतली.