पार्श्वनाथाचा चातुर्याम धर्म

पार्श्वनाथाचा चातुर्याम धर्म


चातुर्याम धर्म 8

पार्श्वनाथाच्या शासनदेवता

कूर्म वाहन व मस्तकावर नागाची फणा असलेला, डावीकडील दोन हातांनी नकुल व सर्प धारण करणारा, उजवीकडील दोन हातांनी फळ व सर्प धारम करणार असा श्यामवर्ण चतुर्भुज गजानन यक्ष पार्श्वनाथाची शासनदेवता झाला. त्याचप्रमाणें कोंबड्यावर व सर्पावर बसणारी, उजवीकडील दोन हातांनीं पद्‍म व पाश धारण करणारी, डावीकडील दोन हातांनी फळ व अंकुश धारण करणारी स्वर्णवर्णा पद्‍मावती देवी पार्श्वनाथाची दुसरी शासनदेवता झाली.

पार्श्वनाथाचें निर्वाण

येथपर्यंत त्रिषष्ठी-शलाका-पुरुषचरित्राच्या ९ पर्वाच्या दुसर्‍या व तिसर्‍या सर्गांचा सारांश सांगितला. चवथ्या सर्गांत सागरदत्त आणि बन्धुदत्त ह्या दोन व्यापार्‍यांच्या पूर्वजन्मींच्या आणि त्या जन्मींच्या कथा आहेत. त्यापैकीं सागरदत्तानें पार्श्वनाथाला जिनरत्‍न प्रतिमा कशी स्थापावी असा प्रश्न केला व पार्श्वनाथानें कथन केलेल्या विधीप्रमाणें त्या मूर्तीची त्यानें स्थापना केली आणि प्रव्रज्या घेतली. बंधुदत्त नागपुरीचा राहणारा. तो व त्याची पत्‍नी प्रियदर्शना या दोघांनी पार्श्वनाथापासून गृहस्थव्रत स्वीकारलें, आणि नागपुरीच्या नवनिधिस्वामी राजानें प्रव्रज्या घेतली.

याप्रमाणें धर्मोपदेश करीत फिरत असतां पार्श्वनाथाचे साधुशिष्य १६ हजार, साध्वी ३८ हजार, श्रावक एक लक्ष ६४ हजार आणि श्राविका ३ लक्ष ७७ हजार झाल्या.

पार्श्वनाथ आपलें निर्वाण आसन्न आहे असें जाणून संमेत पर्वतावर गेला व तेथें ३३ साधूंसह ३० दिवस अनशनव्रत (उपवास) करून श्रावण शुक्ल अष्टमी विशाखा नक्षत्रांत निर्वाण पावला. तो गृहस्थाश्रमांत तीस वर्षे आणि संन्यासाश्रमांत ७० वर्षे राहिला.

दिगम्बरांचा मतभेद

त्रिषष्ठी-शलाका-पुरुषचरित्र श्वेताम्बर संप्रदायाचा ग्रन्थ आहे. त्यांतील बर्‍याच गोष्टी दिगम्बरांना मान्य नाहींत. त्यांपैकीं पार्श्वनाथाच्या चरित्रासंबंधीं आहेत त्या अशा – पार्श्वनाथाचा जन्म ते पौष कृष्ण एकादशीला विशाखा नक्षत्रांत (ति.प. ४।५४८) आणि निर्वाण श्रावण शुक्ल सप्तमीला विशाखा नक्षत्रांत (ति.प. ४।१२०७) मानतात. त्यांच्या मतें पार्श्वनाथ कुमार ब्रम्हचारी होता, व तो केवली (जीवन्मुक्त) झाल्यावर कवलाहार (अन्नाहार) करीत नसे; कारण केवलींना अन्नाची जरूरीच राहत नाहीं. अर्थात् पार्श्वनाथानें निर्वाणकालीं अनशन केलें ही गोष्ट त्यांना पसंत नाहीं. ह्या वादांत जैनेतरांना मुळींच महत्त्व वाटणार नाहीं. एखादा संप्रदाय बनल्यानंतर क्षुल्लक गोष्टींत कसे मतभेद होतात हें तात्पर्य मात्र सर्वांनीच ग्रहण करण्याजोगें आहे.