पार्श्वनाथाचा चातुर्याम धर्म

पार्श्वनाथाचा चातुर्याम धर्म


चातुर्याम धर्म 9

पार्श्वनाथाच्या कथेत इतिहासाचा अभाव

पार्श्वनाथाची वरील सर्वच कथा काल्पनिक आहे हें वर वर वाचणार्‍यालाहि तेव्हांच दिसून येईल. पार्श्वनाथाच्या कालीं कलिंग देशांत यवन नांवाचा राजा राज्य करीत होता हें संभवतच नाहीं. दुसर्‍याहि गोष्टी तशाच आहेत. त्याचा जन्म वाराणसींत झाला हें संभवनीय आहे. पण त्याचा बाप तेथील राजा होता याला मुळींच आधार नाहीं. वज्जींच्या किंवा मल्लांच्या राज्यांप्रमाणें काशीचें राज्य गणसत्ताक होतें. परंतु बुद्धसमकालीं त्याचें स्वातंत्र्य नष्ट होऊन त्यांचा समावेश कोसल देशांत झाला होता. पार्श्वनाथ काशी स्वतंत्र असतांना जन्मला किंवा त्याचा समावेश कोसल देशांत झाल्यावर जन्मला हें सांगतां येत नाहीं. त्याकालीं चांगल्या वस्त्राला ' काशिक वस्त्र ' व चांगल्या चंदनाला ' काशिक चन्दन ' म्हणत, यावरून काशीचे गणराजे प्रगमनशील होते असें अनुमान करतां येतें. अशा देशांत पार्श्व जन्मला असल्यास नवल नाहीं.

पार्श्वनाथ ऐतिहासिक नव्हता काय ?

येथें असा प्रश्न उद्‍भवतो कीं, पार्श्वाच्या कथा जर काल्पनिक आहेत, तर खुद्द पार्श्व देखील काल्पनिक कां नसावा? ह्याला उत्तर हें कीं, ह्या सर्व दन्तकथा असल्या तरी त्रिपिटक ग्रन्थांत जैनांसंबंधानें आणि जैनांच्या आगमांत पार्श्वासंबंधानें जी माहिती मिळते, तिजवरूनच पार्श्वनाथ ऐतिहासिक पुरुष होता असा निष्कर्ष निघतो.

त्रिपिटकांत निर्गन्थांचा उल्लेख अनेक ठिकाणीं आला आहे. त्याच्यावरून असें दिसतें कीं, निर्गन्थ संप्रदाय बुद्धाच्यापूर्वी पुष्कळ वर्षें अस्तित्वांत होता. वप्प नांवाचा शाक्य निर्गन्थांचा श्रावक होता असा उल्लेख अंगुत्तर निकायांत सांपडतो,१ व त्या सुत्ताच्या अठ्ठकथेंत हा वप्प बुद्धाचा चुलता होता असें म्हटलें आहे.२ म्हणजे गोतम बुद्धाच्या जन्मापूर्वी किंवा अल्प वयांतच निर्गन्थांचा धर्म शाक्य देशांत पोंचला होता असें म्हणावें लागतें. महावीरस्वामी बुद्धरामकालीन. तेव्हां हा धर्म-प्रचार त्यानें केला नसून तो त्याच्यापूर्वीच्या निर्गन्थांनीं केला होता असें समजणें योग्य आहे.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
(१. एकं समयं भगवा सक्केसु विहरति कपिलवत्थुस्मिं। अथ खा बप्पो सक्को निगण्ठ सावको इ.। अंगुत्तर, चतुक्कनिपात, चतुत्थपण्यासक, वग्ग ५ वा। २. वप्पोति दसबलस्स चुल्लापिता। अंगुत्तर अठ्ठकथा, सयामसंस्करण २।४७४)
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
ह्या प्राचीनंतर निर्गन्थांचा नेता पार्श्वनाथ होता असा उल्लेख जैनग्रंथांत अनेक ठिकाणीं आहे. त्यापैकीं एक महत्त्वाचा उतारा येथें देतों. पार्श्व तीर्थंकराचा प्रख्यात शिष्य केशी आपल्या मोठ्या शिष्यशाखेसह श्रावस्तीला आला आणि तिन्दुक नांवाच्या उद्यानांत उतरला. वर्धमान तीर्थंकराचा प्रसिद्ध शिष्य गोतमहि मोठ्या शिष्यशाखेसह श्रावस्तीला आला आणि कोष्ठक नावांच्या उद्यानांत उतरला. त्या दोघांच्या शिष्यसंघांत ह्या दोन संप्रदायांच्या मतान्तरासंबंधीं चर्चा होऊं लागली. तेव्हां, जेष्ठ कुल कोशीचें आहे असें जाणून गोतम आपल्या शिष्यशाखेसह तिन्दुक उद्यानांत आला, आणि त्यानें केशीची भेट घेतली, त्या प्रसंगी केशीनें त्याला प्रश्न वीचारला कीं,