पार्श्वनाथाचा चातुर्याम धर्म

पार्श्वनाथाचा चातुर्याम धर्म


चातुर्याम धर्म 10

चाउज्जामो य जो धम्मो जो इमो पंचसिक्खिए ।
देसिओ वद्धमाणेण पासेण य महामुणी ।।
एककज्जपवन्नानं विसेसे किं नु कारणं ।
धम्मे दुविहे मेहावी कथं विप्पच्चयो न ते ।।


[ हे महामुनि, चातुर्याम धर्म पार्श्वानें उपदेशिला, आणि तोच पंचव्रतांचा वर्धमानानें उपदेशिला. एकाच कार्यांत उद्यत झालेल्या या दोघांत फरक कां ? ह्या द्विविध धर्माविषयीं, हे मेघावी, तुला शंका कशी येत नाहीं ? ]

त्यावर गोतम म्हणाला,

पुरिमा उज्जुजड्डाउ वक्कजड्डाय पच्छिमा ।
मज्झिमा उज्जुपन्नाउ तेण धम्मे दुहा कए ।।


[ प्रथम तीर्थंकराचे अनुयायी ऋजु-जड असतात, व शेवटच्या तीर्थंकराचे अनुयायी वक्र-जड असतात; पण मध्यम (२२) तीर्थंकरांचे अनुयायी ऋजु-प्रज्ञ असतात; म्हणून दोन प्रकारचा धर्म होतो. ] याचा अर्थ असा कीं, ऋषभदेवाचे अनुयायी सरळ पण जड असल्यामुळें आणि वर्धमानाचे अनुयायी वक्र आणि जड असल्यामुळें ते दोघे ते दोघे तीर्थंकर पंचमहाव्रतांचा धर्म उपदेशितात; आणि मधल्या २२ तीर्थंकरांचे अनुयायी सरळ आणि प्रज्ञावान असल्यामुळें ते तीर्थंकर केवळ चातुर्याम धर्म उपदेशितात.

केशीनें दुसरा प्रश्न विचारला तो असा -

अचेलओ अ जो धम्मो जो इमे संतरुत्तरो ।
देसिओ वद्धमाणेण पासेण य महामुणी ।।
एक-ज्ज-पवन्नाणं विसेसे किं नु कारणं ।
लिंगे दुविहे मेहावी कहं विप्पच्चयो न ते ।।


[ हे महामुनि, वर्धमानानें अचेलक (दिगम्बर) धर्म आणि पार्श्वाने तीन, दोन किंवा एक वस्त्र बाळगण्याचा धर्म उपदेशिला. एका कार्यांत उद्यत झालेल्या ह्या दोघांत फरक कां ? हे मेघावी, ह्या द्विविध लिंगाविषयीं तुला शंका कशी येत नाहीं ? ]

त्यावर गोतम म्हणाला,

विन्नाणेण समागम्म धम्मसाहणमिच्छियं ।
पच्चयत्थं च लोगस्स नाणाविहविकप्पणं ।
जत्तत्थं गहणत्थं च लोगे लिंगपओअणं ।।


[ केवलज्ञानानें संपन्न होऊन (ह्या दोन तीर्थंकरांनी) लोकांच्या विश्वासासाठीं, शरीरयात्रेसाठीं आणि ज्ञानलाभासाठीं भिन्न भिन्न लिंगप्रयोजन उपदेशिलें. (उत्तराध्ययन, २३ वें अध्ययन.) ]