भगवान बुद्ध (उत्तरार्ध)

गौतम बुद्धांचे चरित्र


आत्मवाद 9

आत्म्याचे पांच विभाग

आत्मा शाश्वत आहे किंवा अशाश्वत आहे, असा प्रश्न केला असतां त्यांचे सरळ उत्तर दिल्याने घोटाळा होण्याचा संभव होता, म्हणून बुध्द भगवंन्ताने आत्मा म्हणजे काय याची नीट कल्पना येण्यासाठी त्याचें पृथक्करण या पंचस्कन्धांत केलें आहे. जड पदार्थ, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान, असे या आत्म्याचे होता, म्हणून बुध्द भगवन्ताने आत्मा म्हणजे काय याची नीट कल्पना येण्यासाठी त्याचें पृथक्करण या पंचस्कन्धांत केलें आहे. जड पदार्थ, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान, असे या आत्म्याचे पाच विभाग करतां येतात. आणि ते विभाग पाडल्याबरोबर स्पष्ट दिसतें की, आत्मा शाश्वत किंवा अशाश्वत नाही. कां की, हे पांचही स्कन्ध सदोदित बदलणारे म्हणजे अनित्य आहेत, दु:खकारक आहेत, आणि म्हणूनच ते माझे किंवा तो माझा आत्मा असें म्हणणें योग्य होणार नाही. हाच बुध्दाचा अनात्मवाद होय. आणि तो शाश्वतवाद व अशाश्वतवाद या दोन टोकांना जात नाही. भगवान् कात्यायनगोत्र भिक्षूला उद्देशून म्हणतो, ''हे कात्यायन, जनता बहुतकरून अस्तिता आणि नास्तिता ह्या दोन अन्तांना जाते. हे दोन्ही अन्त सोडून तथागत मध्यममार्गाने धर्मोपदेश करतो.”*
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
* निदानसंयुक्त, वग्ग २, सुत्त ५.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
अनावश्यक वाद

एवढें स्पष्टीकरण करून झाल्यावर जर कोणी हट्ट धरून बसला की, शरीर आणि आत्मा एक आहे किंवा भिन्ना आहे हें सांगा, तर भगवान् म्हणे,''ह्या ऊहापोहांत मी पडत नसतों. कां की, त्यामुळे मनुष्यजातीचें कल्याण होणार नाही.'' याचा थोडास मासला चूळमालुंक्यपुत्तसुत्तांत सापडतो. † त्या सुत्ताचा सांराश असा -

'बुध्द भगवान् श्रीवस्ती येथे अनाथपिंडिकाच्या आरामांत राहत असतां मालुंक्यपुत्त नांवाचा भिक्षु त्याजपाशीं आला आणि नमस्कार करून एका बाजूला बसला. नंतर तो भगवंताला म्हणाला, '' भदंत, एकान्तांत बसलों असतां माझ्या मनांत असा विचार आला की, हें जग शाश्वत आहे किंवा अशाश्वत आहे, शरीर व आत्मा एक आहे की भिन्न, मरणोत्तर तथागताला पुनर्जन्म आहे की नाही, इत्यादि प्रश्नांचा भगवंन्ताने खुलासा केला नाही; तेव्हा भगवन्ताला मी हे प्रश्न विचारावे, आणि जर भगवंन्ताला या प्रश्नांचा निकाल लावता आला, तरच भगवन्ताच्या शिष्यशाखेंत राहावें. पण जर भगवन्ताला हे प्रश्न सोडवितां येत नसले, तर भगवन्ताने सरळ तसें सांगावें.''

'भ.- मालुंक्यपुत्ता, तूं माझा शिष्य होशील, तर या प्रश्नांचें स्पष्टीकरण करीन असें मी तुला कधी सांगितलें होतें काय ?

मा.- नाही, भदन्त.

भ.- बरें, तूं तरी मला म्हणालास की, जर भगवन्ताने या सर्व प्रश्नांचें सष्टीकरण केलें, तरच मी भगवन्ताच्या भिक्षुसंघात समाविष्ट होईन.

'मा.- नाही भदन्त.

'भ.- तर मग आता ह्या प्रश्नांचा खुलासा केल्याशिवाय मी भगवन्ताचा शिष्य राहणार नाही असें म्हणण्यांत अर्थ कोणता? मालुंक्यपुत्ता, एखाद्या मनुष्याच्या शरीरामध्ये बाणांचे विषारी शल्य शिरून तो तळमळत असतां त्याचे आप्तमित्र शस्त्रक्रिया करणार्‍या वैद्याला बोलावून आणतील. पण तो रोगी जर त्याला म्हणेल, हा बाण कोणी मारला ? तो ब्राह्मण होता की क्षत्रिय होता? वैश्य होता की शूद्र होता ? काळा होता की गोरा होता? त्याचें धनुष्य कोणत्या प्रकारचें होतें ? धनुष्याची दोरी कोणत्या पदार्थाची केली होती ? इत्यादिक गोष्टींचा खुलासा केल्यावाचून मी या शल्याला हात लावूं देणार नाही ; तर हे मालुंक्यपुत्ता, अशा परिस्थितींत त्या माणसाला या गोष्टी न समजतांच मरण येईल. त्याचप्रमाणे जो असा हट्ट धरील की जग हें शाश्वत आहे किंवा अशाश्वत आहे, इत्यादि गोष्टींचें स्पष्टीकरण केल्यावाचून मी ब्रह्मचर्य आचरणार नाही, त्याला ह्या गोष्टी समजल्यावाचूनच मरण येईल.