भगवान बुद्ध (उत्तरार्ध)

गौतम बुद्धांचे चरित्र


कर्मयोग 5

कुशलकर्मांत जागृति आणि उत्साह

कुशलकर्मांत अत्यंत जागृति आणि उत्साह ठेवला पाहिजे, अशा प्रकारचे उपदेश त्रिपिटक वाङमयांत अनेक सापडतात. त्या सर्वांचा संग्रह येथे करणे शक्य नाही, तथापि नमुन्यादाखल त्यांपैकी एक लहानसा उपदेश येथे देतों.

बुध्द भगवान् म्हणतो, ''भिक्षुहो, स्त्रीने, पुरूषाने, गृहस्थाने किंवा प्रव्रजिताने, पांच गोष्टींचें सतत चिंतन करावें.(१) मी जराधर्मी आहें, असा वारंवार विचार करावा. कां की, ज्या तारूण्यमदामुळे प्राणी काया-वाचा-मनें दुराचरण करतात, तो मद ह्या चिंतनाने नाश पावतो; निदान कमी होतो. (२) मी व्याधिधर्मी आहें, असा वारंवार विचार करावा. कां की ज्या आरोग्यमदामुळे प्राणी कायावाचामनें दुराचरण करतात, तो मद या चिंतनाने नाश पावतो; निदान कमी होतो. (३) मी मरणधर्मी आहें, असा वांरवार विचार करावा. कां की, ज्या जिवितमदामुळे प्राणी काया-वाचा-मनें दुराचरण करतात, तो मद या चिंतनाने नाश पावतो; निदान कमी होतो. (४) प्रियांचा व आवडत्यांचा (प्राण्यांचा किंवा पदार्थाचा) मला वियोग घडणार, असा वारंवार विचार करावा. कां की, ज्या प्रियांच्या स्नेहामुळे प्राणी काया-वाचा-मने दुराचरण करतात, तो स्नेह या चिंतनाने नाश पावतो; निदान कमी होतो. (५) मी कर्मस्वकीय, कर्मदायाद, कर्मयोनि, कर्मबंधु, कर्मप्रतिशरण आहें, कल्याणकारक किंवा पापकारक कर्म करीन त्याचा दायाद होईन, असा वारंवार विचार करावा. कां की, त्यामुळे कायिक, वाचसिक आणि मानसिक दुराचरण नाश पावतें; निदान कमी होतें.

''मी एकटाच नव्हे, तर यच्चयावत् प्राणी जराधर्मी, व्याधिधर्मी, मरणधर्मी आहेत, त्या सर्वांना प्रियांचा वियोग घडतो, आणि ते देखील कर्मदायाद आहेत, असा आर्यश्रावक सतत विचार करतो, तेव्हा त्याला मार्ग सापडतो. त्या मार्गाच्या अभ्यासाने त्याचीं संयोजनें नष्ट होतात.”

ह्या उतार्‍यांत कर्मस्वकीय म्हणजे कर्मच तें माझें स्वकीय आहे; बाकी सर्व वस्तुजात माझ्यापासून कधी विभक्त होईल याचा नेम नाही; मी कर्माचा दायाद आहें, म्हणजे बरीं कर्मे केलीं तर मला सुख मिळेल, वाईट केलीं तर दु:ख भोगावें लागेल; कर्मयोनि म्हणजे कर्मामुळेच माझा जन्म झाला आहे.; कर्मबंधु म्हणजे संकटातं माझें कर्मच माझे बांधव; आणि कर्मप्रतिशरण म्हणजे कर्मच माझें रक्षण करूं शकेल. ह्यावरून बुध्द भगवंताने कर्मावर किती जोर दिला आहे, हें समजून येईल. अशा गुरूला नास्तिक म्हणणें कसें योग्य होईल?

सत्कर्मे उत्साहित मनाने करावीं, यासंबधाने धम्मपदाची खालील गाथा देखील विचार करण्याजोगी आहे.

अभित्थरेथ कल्याणे पापा चित्तं निवारये।
दन्धं हि करोतो पुञ्ञं पापस्मिं रमतौ मनो॥

'कल्याणकर्मे करण्यांत त्वरा करावी, आणि पापापासून चित्त निवारावें. कारण, आळसाने पुण्यकर्म करणार्‍याचे मन पापांत रमतें'