भगवान बुद्ध (उत्तरार्ध)

गौतम बुद्धांचे चरित्र


जातिभेद 5

आ.- भो गोतम, कोणत्याही वर्णाच्या मनुष्याने हीं पापे केलीं असतां तो मरणोत्तर नरकाला जाईल. ब्राह्मण काय किंवा अब्राह्मण काय, सर्वानांच आपल्या पापाचें प्रायश्चित्त भोगावें लागणार.

भ.- एखादा ब्राह्मण प्राणघातापासून निवृत्त झाला, चौर्यकर्म, व्यभिचार, असत्य भाषण, चहाडी, शिवीगाळ, वृथाप्रलाप, परधनाचा लोभं, द्वेष आणि नास्तिकता, या ( दहा) पापांपासून निवृत्त झाला, तर तोच काय तो देहावसानंतर स्वर्गाला जाईल, पण इतर वर्णांचे लोक या पापांपासून निवृत्त झाले, तर ते स्वर्गाला जाणार नाहीत असें तुला वाटतें काय?

आ.- कोणत्याही वर्णाचा मनुष्य या पापकर्मापासून निवृत्त झाला तर स्वर्गाला जाईल; पुण्याचरणाचें फळ ब्राह्मणाला काय किंवा ब्राह्मणेतराला काय सारखेंच मिळेल.

भ.- या प्रदेशांत ब्राह्मणच काय तो द्वेषवैरविरहित मैत्रीभावना करूं शकतो; पण क्षत्रिय,वैश्य आणि शुद्र ती भावना करूं शकत नाहीत, असें तुला वाटतें काय?

आ.- चारी वर्णांना मैत्रीभावना करतां येणें शक्य आहे.

भ.- तर मग ब्राह्मण वर्णच श्रेष्ठ, आणि इतर वर्ण हीन आहेत, या म्हणण्यांत अर्थ कोणता?

आ.- आपण कांही म्हणा. ब्राह्मण आपणाला श्रेष्ट समजतात व इतर वर्णांना हीन समजतात, ही गोष्ट खरी आहे.

भ.- हे आश्वलायना, एखादा मूर्धावसिक्त राजा सर्व जातींच्या शंभर पुरूषांना एकत्र करील, त्यांपैकी क्षत्रिय, ब्राह्मण आणि राजकुलांत जन्मले असतील, त्यानां तो म्हणेल, 'अहो इकडे या, आणि शाल किंवा चंदनासारख्या उत्तम वृक्षांची उत्तरारणी घेऊन अग्नि उत्पन्न करा.' आणि त्यांपैकी चांडाळ, निषाद इत्यादिक हीन कुलांमध्ये जन्मलेले असतील, त्यांना तो म्हणेल, 'अहो इकडे या व कुत्र्याला खावयाला घालावयाच्या दोणींत, डुकराला खावयाला घालावयाच्या दोणीत किंवा रंगार्‍याच्या दोणींत एरंडाच्या उत्तरारणीनें अग्नि उत्पन्न करा.' हे आश्वलायना, ब्राह्मणादिक उच्च वर्णांच्या मनुष्याने उत्तम अरणीने उत्पन्न कलेला अग्नि तेवढा भास्वर आणि तेजस्वी होईल, आणि चांडालादिक हीन वर्णाच्या मनुष्याने एरंडादिकांच्या अरणीने उत्पन्न केलेला अग्नि भास्वर आणि तेजस्वी होणार नाही. व त्यापासून अग्निकार्यें घडणार नाहीत, असें तुला वाटतें काय?

आ. - भो गोतम, कोणत्याही वर्णाच्या माणसाने बर्‍या किंवा वाईट लांकडाची उत्तरारणी करून कोणत्याही ठिकाणी अग्नि उत्पन्न केला तर तो एकसारखाच तेजस्वी होईल व त्यापासून समान अग्निकार्ये घडून येतील.