भगवान बुद्ध (उत्तरार्ध)

गौतम बुद्धांचे चरित्र


जातिभेद 10

राजा - तो जर वधार्ह असला, तर त्याचा मी वध करीन; दंडनीय असला, तर त्याला मी दंड करीन; आणि हद्दपार करण्याला योग्य असला, तर त्याला हद्दपार करीन. कां की, क्षत्रिय-ब्राह्मणादिक जी त्याची पूर्वीची संज्ञा होती, ती नष्ट झाली आणि तो गुन्हेगार आहे, असें ठरलें.

का.- तर मग हे चारही वर्ण समान नाहीत काय?

राजा.- ह्या दृष्टिने पाहूं गेलें असतां चारही वर्ण समान ठरतात.

का.- समजा, ह्या चारही वर्णांपैकी कोणताही मनुष्य जर परिव्राजक झाला आणि सदाचार पाळूं लागला, तर तुम्ही त्याच्याशीं कसे वागाल?

राजा .- त्याला आम्ही वंदन करूं, त्याचा योग्य मान ठेवूं, व त्याला अन्नावस्त्रादिक जरूरीचे पदार्थ देऊं. कां की, त्याची क्षत्रिय, ब्राह्मण, वैश्य, शूद्र, इत्यादिक संज्ञा नष्ट होऊंन तो श्रमण या संज्ञेनेच ओळखला जातो.

का.- तर मग हे चारही वर्ण समसमान ठरत नाहीत काय?

राजा .- या रीतीने हे चारही वर्ण खात्रीने समान ठरतात.

का.- म्हणून मी म्हणतों की, ब्राह्मण वर्णच श्रेष्ठ आहे, हा नुसता आवाज होय.

हा संवाद झाल्यावर अवंतिपुत्र राज महाकात्यायनाला म्हणाला, 'भो कात्यायन, आपला उपदेश फारच सुंदर आहे. जसें एखादें पालथें घातलेलें भांडें ऊर्ध्वमुख करून ठेवावें, झाकलेली वस्तु उघडी करावी, वाट चुकलेल्याला वाट दाखवावी, किंवा डोळसांना पदार्थ दिसावे म्हणून अंधारामध्ये मशाल पाजळावी, त्याप्रमाणें भवान् कात्यायनाने अनेक पर्यायांनी धर्मोपदेश केला. म्हणून मी भवान् कात्यायनाला, धर्माला आणि भिक्षुसंघाला शरण जातों. मी आजपासून आमरण शरण गेलेला उपासक आहें असें समजा.''

का.- महाराज, मला शरण जाऊं नका. ज्या भगवंताला मी शरण गेलों, त्याला तुम्ही देखील शरण जा.

राजा.- भो कात्यायन, तो भगवान सध्या कोठे आहे?

का.- तो भगवान् परिनिर्वाण पावला.