भगवान बुद्ध (उत्तरार्ध)

गौतम बुद्धांचे चरित्र


मांसाहार 6

१    (तिष्य् तापस-) श्यामक, चिंगूलक, चीनक, झाडांची पानें, कंदमूळ आणि फळें धर्मानुसार मिळालीं असतां त्यांजवर निर्वाह करणारे चैनीच्या पदार्थांसाठी खोटें बोलत नसतात.
२    हे काश्यपा, परक्यांनी दिलेलें निवडक व चांगल्या रीतीने शिजविलेल्या तांदळांचे सुरस व उत्तम अन्न स्वीकारणारा तूं आमगंध (अमेघ्य पदार्थ ) खातोस!
३    हे ब्रह्मबंधु, पक्ष्याच्या मांसाने मिश्रित तांदळांचें अन्न खात असतां तूं आपणाला आमगंध योग्य नाही, असे म्हणतोस! तेव्हा हे काश्यपा, मी तुला विचारतों की, तुझा आमगंध कशा प्रकारचा?
४    (काश्यप बुध्द -) प्राणघात, वध, छेद, बंधन चोरी, खोटें भाषण, ठकविणें नाडणें, जारणमारणादिकांचा अभ्यास आणि व्यभिचार, हा आमगंध होय; मांसभोजन हा नव्हे.
५    ज्यांना स्त्रियांच्या बाबतींत संयम नाही, जे जिव्हालोलुप, अशुचिकर्ममिश्रित, नास्तिक, विषम आणि दुर्वितीत त्यांचे कर्म हा आमगंध होय मांसभोजन हा नव्हे.
६    जे रूक्ष, दारूण, चहाडखोर, मित्रद्रोही, निर्दय, अतिमानी, कृपण, कोणालाही कांहीही देत नाहीत, त्यांचें कर्म हा आमगंध होय; मांसभोजन हा नव्हे.
७    क्रोध, मद, कठोरता, विराध, माया, ईर्ष्या, वृथा बडबड, मानातिमान आणि खळांची संगति हा आमगंध होय; मांसभोजन हा नव्हे.
८    पपी, ऋण बुडवणारे, चहाडखोर, लाच खाणारे खोटे अधिकारी, जे नराधम इहलोकीं कल्मष उत्पन्न करतात त्यांचें कर्म हा आमगंध होय; मांसभोजन हा नव्हे.
९    ज्यांना प्राण्यांविषयी दया नाही, जे इतरांना लुटून उपद्रव देतो, दु:शील, भेसूर, शिवीगाळ देणारे व अनादर करणारे (त्यांचे कर्म)- हा आमगंध होय; मांसभोजन हा नव्हे.
१०    अशा कर्मांत आसक्त झालेले, विरोध करणारे, घात करणारे, सदोदित अशा कर्मांत गुंतलेले की जे परलोकीं अंधकारांत शिरतात व वर पाय, खाली डोकें होऊन नरकांत पडतात (त्यांचे कर्म) – हा आमगंध होय; मांसभोजन हा नव्हे.

११    मत्स्यमांसाचा आहार वर्ज्य करणें नागवेपणा, मुंडण, जटा, राख फासणें, खरखरीत अजिनचर्म, अग्निहोत्राची उपासना किंवा इहलोकींच्या दुसर्‍या विविध तपश्चर्या, मंत्राहुति, यज्ञ आणि शीतोष्णसेवनाने तप करणें, या गोष्टी कुशंकांच्या पार न गेलेल्या मर्त्याला पावन करूं शकत नाहीत.
१२    इंद्रियांत संयम ठेवून व इंद्रियें जाणूंन वागणारा, धर्मस्थित, आर्जव व मार्दव यांत संतोष मानणारा, संगातीत व ज्याचें सर्व दु:ख नाश पावलें असा जो धीर पुरूष, तो दृष्ट आणि श्रुत पदार्थांत बध्द होत नाही.
१३    हा अर्थ भगवंताने पुन:पुन: प्रकाशित केला आणि त्या मंत्रपारगाने (ब्राह्मणतापसाने) जो जाणला. हा अर्थ त्या निरामगंध, अनासक्त आणि अदम्य मुनीने रम्य गाथांनी प्रकाशित केला.
१४    निरामगंध आणि सर्व दु:खांचा नाश करणारें असें बुध्दाचें सुभाषित वचन ऐकून तो (तापस) नम्रपणें तथागताच्या पायां पडला आणि त्याने येथेच प्रव्रज्या घेतली.