भगवान बुद्ध (उत्तरार्ध)

गौतम बुद्धांचे चरित्र


दिनचर्या 8

श्रमण गोतम मिळालेल्या राहण्याच्या जागेंत संतोष मानतो, आणि तशा संतुष्टीचे गुण वर्णितो, एवढयाचसाठी जर, हे उदायि माझे श्रावक मला मान देऊन माझ्या आश्रयाखाली राहिलें असते, तर त्यांत ते जे झाडाखाली किंवा उघडया जागेंत राहतात, आणि आठ महिने आच्छादिलेल्या जागेंत प्रवेश करीत नाहीत, ते माझा मान ठेवून माझ्या आश्रयाने राहिले नसते. कारण, मी कधी कधी मोठयाला विहारांत देखील राहतो.

श्रमण गोतम एकांतात राहत असून एकांताचे गुण वर्णितो, एवढयाचसाठी जर माझे श्रावक माझा मान ठेवून माझ्या आश्रयाने राहिले असते, तर त्यांत जे अरण्यांतच राहतात, केवळ पंधरा दिवसांनी प्रतिमोक्षासाठी संघांत येतात, ते माझा मान ठेवून माझ्या आश्रयाने राहिले नसते. कारण मी कधी कधी भिक्षु, भिक्षुणी, उपासक, उपासिका, राजा, मंत्री, इतर संघांचे पुढारी आणि त्यांचे श्रावक, यांना भेटतो.

परंतु हे उदायि, दुसरे पांच गुण आहेत की, ज्यामुळे माझे श्रावक माझा मान ठेवून माझ्या आश्रयाखाली राहतात. (१) श्रमण गोतम शीलवान आहे. (२) तो यथार्थतया धर्मोपदेश करतो. (३) तो प्रज्ञावान आहे. म्हणून माझे श्रावक मला मानतात आणि माझ्या आश्रयाने राहतात.
(४) याशिवाय मी माझ्या श्रावकांना चार आर्यसत्यांचा उपदेश करतों आणि (५) आध्यात्मिक उन्नात्तीचे निरनिराळे प्रकार दाखवितो. या पांच गुणांमुळे माझे श्रावक माझा मान ठेवतात आणि आश्रयाने राहतात.

भिक्षुसंघाबरोबर असतां भगवंताची दिनचर्या

आपल्या संघात बुध्द भगवान कशी शिस्त ठेवतो, हे सर्व परिव्राजकांना माहीत झालें होतें. तो जेव्हा त्यांच्या परिषदेंत जाई, तेव्हा ते देखील मोठया शांततेने वागत, हें या सुत्तावरून दिसून येईलच. बुध्द भगवान कधी कधी गृहस्थांचे आमंत्रण व गृहस्थांनी दिलेले वस्त्र स्वीकारीत असे, तथापि अल्पाहार करण्यांत, अन्नावस्त्रांदिकांच्या साधेपणांत आणि एकान्तवासाच्या आवडीत देखील त्याची प्रसिध्दी होती. तो जेव्हा भिक्षुसंघाबरोबर प्रवास करी, तेव्हा एखाद्या गावाबाहेर, उपवनांत किंवा अशाच दुसर्‍या सोयीवार जागीं राहत असे. रात्री ध्यानसमाधि आटपून मध्यम यामांत वर सांगितल्याप्रमाणें सिंहशय्या करी. आणि पहाटेला उठून पुन्हा चंक्रमण करण्यांत किंवा ध्यानसमाधीत निमग्न असे.

सकाळी भगवान त्या गावांत किंवा शहरांत बहुधा एकटाच भिक्षाटनाला जात असे, वाटेंत किंवा भिक्षाटन करीत असतां प्रसंगानुसार गृहस्थांना उपदेश करी. सिगालोवादसुत्त भगवंताने वाटेंत उपदेशिलें, आणि कसिभाद्वाजसुत्त व अशींच दुसरीं सुत्तें भिक्षाटन करती असतां उपदेशिली.

पोटापुरती भिक्षा मिळाल्याबरोबर भगवान गावाबाहेर येऊन एखाद्या झाडाखाली किंवा अशाच दुसर्‍या प्रशस्त जागी बसून तें अन्न जेवी, व विहारांत येऊन थोडा वेळ विश्रांति घेऊन ध्यानसमाधीत काही काळ घालवीत असे. संध्याकाळच्या वेळी त्याला भेटण्यासाठी गृहस्थ लोक येत असत आणि त्याच्याशी धार्मिक संवाद करीत. अशाच वेळीं सोणदंड, कूटदंड वगैरे ब्राह्मणांनी मोठया ब्राह्मणसमुदायासह बुध्दाची भेट घेऊन धार्मिक चर्चा केल्याचा दाखला दीघनिकायांत सापडतो. ज्या दिवशीं गृहस्थ येत नसत, त्या दिवशीं भगवान बहुधा बरोबर असलेल्या भिक्षूंना धर्मोपदेश करी.

पुन्हा एक दोन दिवसांनी भगवान प्रवासाला निघे आणि अशा रीतीने पूर्वेला भागलपूर, पश्चिमेला कुरूंचे कल्माषदम्य नांवाचें शहर, उत्तरेला हिमालय व दक्षिणेस विंध्य, या चतु:सीमांच्या दरम्यान आठ महिने भिक्षुसंघासह प्रवास करीत राही.